Nagpur Marbat Festival Controversy: पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी अर्थात तान्हा पोळ्याच्या दिवशी नागपुरात काळी आणि पिवळी मारबत तसेच सामाजिक व राजकीय मुद्द्यांवर भाष्य करणाऱ्या बडग्याची मिरवणूक काढली जाते. देशात फक्त नागपुरातच ही परंपरा असून दरवर्षी नागपूरकर उत्साहात या मिरवणुकीत भाग घेऊन आनंदोत्सव साजरा करतात. काळी व पिवळी मारबत उत्सव समिती व बडग्या उत्सव समितीकडूनच मिरवणुकीसह विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदा महापालिकेतील सत्ताधारी भाजपने तो साजरा करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे मारबत उत्सव आयोजक समितीकडून ‘हायजॅक’ करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने सध्या त्याची नागपुरात चर्चा आहे.
आताच या महोत्सवाला महापालिकेने हातात का घेतले?
‘ईडा पिडा घेऊन जा गे मारबत’ असा जयघोष करीत तरुण या मारबत मिरवणुकीत सामील होतात. स्थानिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मुद्द्यांकडे लक्ष वेधणारे बडगेही या मिरवणुकीत सामील केले जातात. अर्थात अनेक बडगे हे राज्य किंवा केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध असतात. अशावेळी सरकारच्या नावानेही या मिरवणुकीत बोंब ठोकली जाते. सरकारविरोधात एका दिवसासाठी दिलेल्या घोषणांमुळे सत्ताधाऱ्यांविरोधात वातावरण तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महापालिकेतील भाजप सत्ताधाऱ्यांनी या महोत्सवासाठी प्रथमच अर्थसंकल्पात तरतूद करीत हातात घेतल्याची चर्चा रंगली आहे.
तरुणाईपर्यंत पोहोचण्याची संधी?
मारबत मिरवणुकीत ८० टक्के तरुणांचा समावेश असतो. नुकताच जंतर-मंतरवरील आंदोलनातून तरुण दूर जात असल्याचे भाजपच्या लक्षात आल्याचे केंद्र सरकारने घेतलेल्या एक विद्यापीठ एक मंत्री संवादाच्या निर्णयातून दिसून येत आहे. त्यामुळे तरुणापर्यंत पोहोचण्यासाठी मारबत महोत्सव उत्तम संधी असल्याने भाजप सत्तेत असलेल्या महापालिकेने हा उत्सव हातात घेतल्याचीही चर्चा यानिमित्त रंगली आहे. सत्ताधाऱ्यांच्या या प्रयत्नातून तरुण भाजपच्या गळाला लागणार काय, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.
महापालिकेला यश मिळेल?
आतापर्यंत काळी व पिवळी मारबत उत्सव समिती व बडग्या उत्सव समितीचे पदाधिकारी व्यापारी वर्गाकडून वर्गणी गोळा करून देखणी व आकर्षक मिरवणूक काढत होती. एका लाखापेक्षा जास्त नागरिक यात सहभागी होत असल्याने महापालिकेची भूमिका मिरवणूक गेल्यानंतर रस्ते स्वच्छ करण्याची होती. परंतु यंदा महापौर नीता ठाकरे यांच्या नेतृत्वात सध्या महापालिकेकडून मारबत महोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. महापालिकेच्या स्थायी समिती सभापती शिवानी दाणी यांनी अर्थसंकल्पात या महोत्सवासाठी २ कोटींची तरतूद केली आहे. हा नागरिकांचा उत्सव असल्याने यात नागरिकांच्या सहभागासाठी महापालिकेला प्रयत्न करावे लागणार नाही. परंतु महापालिकेने या महोत्सवासाठी केंद्रातील मंत्री, देशातील व्यक्तिविशेषच नव्हे तर परदेशातील भारतीयांनाही बोलावण्याचा निर्धार केला असून निमंत्रण दिले जात आहे. आता या महोत्सवाच्या निमंत्रणाला केंद्रीय स्तरावरील नेते, परदेशी पाहुणे किती प्रतिसाद देतात, यावर महापालिकेचे यश अवलंबून राहणार असल्याचे उत्सव समितीतील काहींनी नमूद केले.
‘एमटीडीसी’ का ठरली होती अपयशी?
१४५ वर्षांची परंपरा असलेल्या मारबत महोत्सवाला प्रथमच महापालिकेने आपल्या हातात घेतले. परंतु यापूर्वी असा प्रयत्न महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) ने २०१३-१४ मध्ये महोत्सवाला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली होती. नागपूरची ही अनोखी संस्कृती देशातील व जगातील पर्यटकांपर्यंत पोहोचावी यासाठी महामंडळाने मारबत महोत्सवाला पर्यटनाच्या नकाशावर स्थान दिले होते. एमटीडीसीने त्यावेळी शहरात केवळ काही बॅनर लावले. मारबत निघते त्या भागात एक मंडप टाकला. एवढाच तोंडदिखाऊपणा एमटीडीसीने त्यावेळी केला. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली. मुळात मारबत महोत्सव समितीला महामंडळाचा काहीही फायदा झाला नाही. त्यानंतर एमटीडीसीने मारबत महोत्सवाचे कधीही नाव काढले नाही.
मारबत, बडगे मिरवणूक का काढली जाते?
समाजातील अनिष्ट प्रथा नष्ट करण्याच्या उद्देशाने बैल पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मारबत मिरवणूक काढण्यात येते. कृष्णाला मारण्यासाठी आलेली पुतना मावशीचे प्रतीक म्हणून काळी मारबत, तर पिवळी मारबत लोकांचे रक्षण करते, अशी आख्यायिका आहे. १८८५ मध्ये तराणे तेली समाजाच्या लोकांनी जागनाथ बुधवारी परिसरात पिवळी मारबत उत्सव समितीची स्थापना करून इंग्रजांच्या दडपशाही आणि अत्याचाराविरुद्ध पिवळी चळवळ सुरू केली. आता मात्र समाजातील सर्व संकटे, रोगराई आणि वाईट प्रवृत्ती दूर पळाव्यात व चांगल्या विचारांचे स्वागत व्हावे यासाठी मारबतीची मिरवणूक काढली जाते. बडग्या हा दरवर्षीच्या चालू घडामोडी, महागाई, भ्रष्टाचार किंवा सामाजिक वाईट प्रवृत्तींचे प्रतीक म्हणून तयार केला जातो. त्याला समाजसुधारणेचे व राजकीय विडंबनाच्या फलकाची जोड असते.
rajesh.praykar@expressindia.com
