नागपूर महापालिकेच्या हॉटमिक्स विभागाने जुलै महिन्यात ६९८ खड्डे बुजवल्याचा दावा केला. ही आकडेवारी प्रभावी आहे. परंतु त्यानंतर महापालिकेच्या दहाही झोनमध्ये केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात डांबरी रस्त्यावर १,२८२ खड्डे आढळले. म्हणजे एका हाताने खड्डे बुजवण्याचा दावा आणि दुसऱ्या हाताने खड्ड्यांची नवी संख्या मोजण्याची किमया करण्यात आली. महापालिका रस्त्यावरील खड्डे बुजविते हे सत्य आहे. परंतु लगेच खड्ड्यांचे आकडेही पुढे येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कोण करते खड्ड्यांचे मोजमाप ?
नागपूर महापालिकेत लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली, नेहरूनगर, गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज, आशीनगर व मंगळवारी असे दहा झोन आहेत. प्रत्येक झोनच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यांनी रस्त्यांवरील खड्डे मोजून यादी हॉटमिक्स विभागाकडे पाठविण्याची पद्धत आहे. डांबरी रस्त्यांवर वर्षभर खड्ड्यांची मालिका सुरू असते. पावसाळ्यात त्याचे प्रमाण वाढते. महापालिकेतील एका निवृत्त सहायक आयुक्तांनी नाव छापण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार खड्डे मोजण्याची प्रक्रिया केलीच जात नाही. अधिकारी टेबलवर बसूनच आकडे तयार करून पाठवतात. खड्डे कुठल्या भागात आहे, याची पाहणी मात्र केली जाते. त्यावरून त्या भागातील खड्डे बुजविले जाते, असे त्यांनी नमुद केले.
महापालिकेची खड्ड्याची आकडेवारी खरी की खोटी?
२८ जुलै रोजी शहरात जोरदार पाऊस झाला. त्यापूर्वीही शहरात काही दिवस वगळल्यास जुलैमध्ये पाऊस पडला. याच महिन्यात महापालिकेच्या ‘हॉटमिक्स’ विभागाने २८ जुलैपर्यंत विविध झोनमध्ये ६९८ खड्डे बुजवण्याचा दावा केला. यात विभागाच्या नोंदीनुसार सर्वाधिक १६३ खड्डे नेहरूनगर झोनमध्ये बुजवण्यात आले. मंगळवारी झोनमध्ये १४४, धरमपेठमध्ये १०७, हनुमाननगरमध्ये ७८, धंतोलीत ७०, आशीनगरमध्ये ५२, सतरंजीपुरामध्ये २६, गांधीबागमध्ये १६ आणि लकडगंजमध्ये १३ खड्डे बुजवण्यात आले. आशीनगर व लकडगंज झोनमध्ये अनुक्रमे ५२ व १३ खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा करण्यात आला. मुळात याच झोनमध्ये सर्वाधिक डांबरी रस्ते आहे. खड्डे बुजविल्यानंतर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात आशीनगर झोनमध्ये १२५ खड्डे आढळून आले. महापालिकेच्या आकडेवारीला गणिताचा नियम लागू होतो की नाही, हा संशोधनाचा विषय ठरत असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
खड्डे बुजविताना कोणत्या चुका?
नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे क्षेत्र असलेल्या दक्षिण पश्चिम नागपूरमधील नागोबा चौकात महापालिकेच्या हॉटमिक्स विभागाने खड्ड्यांचे डांबरीकरण केले. ज्या खड्ड्यांचे डांबरीकरण करण्यात आले, तेथेच रस्त्यांवरील पावसाळी नालातील पाणी जमा झाले होते. परंतु महापालिकेच्या हॉटमिक्स विभागाने या खड्ड्यातील पाणी न काढता केवळ कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे घाईघाईने डांबरीकरण केले. महापालिकेच्या हॉटमिक्स विभागाने केलेले डांबरीकरण पाहता रस्ता दुरुस्तीची नेमकी व्याख्याच बदलल्याचे दिसते. रस्त्यावर साचलेले पाणी आणि डांबर यांचे नाते तसेही फारसे मैत्रीपूर्ण नसते, या चुका टाळायला हव्या, असे तज्ज्ञ सांगतात. मात्र महापालिकेच्या हॉटमिक्स विभागाने डांबर-पाण्याची ‘जोडी’ जमवून नागरिकांच्या संतापाच्या आगीत आणखी तेल ओतण्याचे काम केले.
दुचाकीधारकांना कोणता धोका?
नागोबा चौकात महापालिकेच्या हॉटमिक्स विभागाने केलेले डांबरीकरण पाहता रस्ता दुरुस्तीची नेमकी व्याख्याच बदलल्याचे दिसते. पाण्यात डांबरीकरण केल्याच्या काही काळानंतर डांबराचा थर कमकुवत होऊन त्यातील गिट्टी निघते आणि पुन्हा रस्त्यावरच पसरते. खड्डा बुजवण्याच्या नावाखाली नागरिकांच्या वाट्याला पुन्हा गिट्टी, धूळ आणि धोकादायक रस्ता येणार आहे. वाहनांच्या चाकाखाली ही गिट्टी उडून दुचाकीस्वारांसाठी धोका निर्माण करू शकते. विशेषतः पावसाळ्यात ब्रेक लावताना किंवा वळण घेताना रस्त्यावरील सैल गिट्टी वाहन घसरण्याचे कारण ठरू शकते. त्यामुळे काही मिनिटांच्या वरवरच्या डागडुजीचा परिणाम नागरिकांच्या सुरक्षिततेवर होणार आहे.
काय आहे डांबरी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची पद्धत?
नागपुरातील नागोबा चौकातील प्रकार महापालिकेच्या रस्ते दुरुस्तीच्या पद्धतीचा आरसा दाखवत आहे. खड्डा बुजवला, काम पूर्ण दाखवले, असा सध्या तरी महापालिकेचा शिरस्ता झाला. मुळात डांबरी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची एक पद्धत आहे. खड्ड्यातील कचरा, माती, धुळीचे कण आणि साठलेले पाणी पूर्णपणे काढून टाकले जाते. त्यानंतर खड्ड्याच्या कडा व्यवस्थित चौकोनी आकार देऊन तो सपाट केला जातो. त्यानंतर खड्ड्याला डांबराचा पातळ थर लावला जातो. त्यानंतर त्यात डांबर व गिट्टीचे मिश्रण भरून ते अर्धा इंच वर केल्यानंतर त्यावरून रोलरने घट्ट केले जाते. परंतु या पद्धतीऐवजी घाईने काहीही केले जात असल्याचे चित्र असून नागरिकांच्या करातून खर्च होणाऱ्या पैशांचा उपयोग टिकाऊ दुरुस्तीसाठी व्हावा, ही अपेक्षा नागरिक करीत आहेत.
rajesh.praykar@expressindia.com
