अल्पवयीनांना पबमध्ये प्रवेश मिळावा यासाठी आधार कार्डावरील जन्मतारखेतच फेरफार केला जात असल्याचा प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. हा प्रकार केवळ एखाद्या पबपुरता मर्यादित आहे की त्यामागे बनावट आधार तयार करणारे व्यापक जाळे आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. आधारमधील माहितीमध्ये फेरफार करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झाला असल्याचा पोलिसांचा दावा असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे.

नागपुरात नेमके काय घडले ?

नागपूरच्या माउंट रोडवरील रिपल पबमध्ये अल्पवयीन मुलांना प्रौढ दाखवण्यासाठी त्यांच्या आधार कार्डवरील जन्मतारखेत फेरफार केल्याचा प्रकार समोर आला. पोलिसांनी या प्रकरणात दोघांना अटक केली. चौकशीदरम्यान अन्य काही पबची नावे समोर आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामध्ये ‘झिरो डिगी’, ‘बॅरल’, ‘वेअर हाऊस’, ‘लूअसो’ आदींचा समावेश असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. यामुळे शहरात बनावट आधार कार्ड किंवा आधारवरील माहितीमध्ये फेरफार करणारे जाळे सक्रिय आहे का, याचा तपास महत्त्वाचा ठरला आहे. मात्र, संबंधित पबचा या प्रकारात प्रत्यक्ष सहभाग होता, असा निष्कर्ष तपास पूर्ण होण्यापूर्वी काढता येणार नाही.

पबमध्ये प्रवेशासाठी वयोमर्यादा काय ?

पब किंवा मद्यालयात प्रवेश आणि मद्यसेवनासाठी वयासंबंधी विविध कायदेशीर अटी आहेत. मद्याच्या प्रकारानुसार लागू असलेल्या वयोमर्यादेचे पालन करणे संबंधित प्रतिष्ठानांसाठी आवश्यक असते. मद्यालय अथवा पबच्या प्रवेशासाठी वयाची किमान १८ ते २१ वर्षे पूर्ण झालेली असावीत, असा नियम आहे. कायद्याने बीअरच्या बाबतीत २१ वर्षे आणि व्हिस्की मद्यासाठी किमान २५ वर्षांची वयोमर्यादा निश्चित केली आहे. त्यामुळे ग्राहकाचे वय निश्चित करण्यासाठी ओळखपत्राची पडताळणी करणे महत्त्वाचे ठरते. आधार, पॅन, वाहन परवाना किंवा पासपोर्ट यांसारख्या ओळखपत्रांच्या आधारे वयाची खातरजमा केली जाते. एखाद्या व्यक्तीचे वय संशयास्पद वाटल्यास प्रवेश नाकारणेही व्यवस्थापनाला शक्य आहे. त्यामुळे बनावट किंवा फेरफार केलेले ओळखपत्र स्वीकारले गेले असल्यास पडताळणीची प्रक्रिया आणि व्यवस्थापनाची भूमिका तपासणे आवश्यक ठरते.

आधारमधील जन्मतारखेत फेरफार कसा झाला ?

रिपल पब प्रकरणातील सर्वांत महत्त्वाचा तपासाचा मुद्दा हा आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आधारवरील जन्मतारखेत फेरफार करण्यासाठी जनरेटिव्ह एआय साधने आणि ‘माय आधार’ ॲपचा वापर झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, आधारच्या अधिकृत नोंदीत प्रत्यक्ष बदल झाला होता की केवळ बनावट स्वरूपाचे दस्तऐवज तयार करण्यात आले होते, याची तांत्रिक तपासणी महत्त्वाची ठरणार आहे. कारण एखाद्या अल्पवयीनाचे वय वाढवून दाखवण्यासाठी ओळखपत्रात फेरफार करणे आणि आधारच्या अधिकृत डेटाबेसमध्ये बदल करणे या दोन वेगळ्या बाबी आहेत.

हा प्रकार केवळ पबच्या प्रवेशापुरता मर्यादित आहे का?

हा तपासाचा मुख्य प्रश्न आहे. अल्पवयीनांना पबमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी जन्मतारखेत फेरफार केला असेल, तर त्या प्रक्रियेत आणखी किती जण सहभागी होते, याचा शोध घेणे आवश्यक आहे. पबचे प्रवेश रजिस्टर, ग्राहकांनी सादर केलेली ओळखपत्रे, सीसीटीव्ही चित्रण, संगणकीय नोंदी आणि संबंधित कर्मचाऱ्यांचे जबाब यांची पडताळणी केल्यास या प्रकाराचे स्वरूप स्पष्ट होऊ शकते. विशेषतः एकाच पद्धतीने अनेक अल्पवयीनांची वयोनोंद बदलली गेली आहे का, याची तपासणी महत्त्वाची ठरणार आहे.

पब व्यवस्थापनाची जबाबदारी काय ?

अल्पवयीन व्यक्तीला प्रवेश देणे किंवा मद्य उपलब्ध करून देणे टाळण्यासाठी पबच्या व्यवस्थापनाने वयाची खातरजमा करणे अपेक्षित आहे. त्यामुळे संशयास्पद ओळखपत्र सादर झाले असताना त्याची पडताळणी कशी करण्यात आली, हा तपासाचा महत्त्वाचा भाग आहे. एखाद्या बनावट दस्तऐवजावर व्यवस्थापनाने जाणूनबुजून प्रवेश दिल्याचे पुरावे आढळल्यास त्यांची जबाबदारी निश्चित करण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मात्र, त्यासाठी पोलीस तपासातून संबंधितांची भूमिका आणि हेतू स्पष्ट होणे आवश्यक आहे.

अल्पवयीनांच्या सुरक्षेचा मुद्दा का गंभीर ?

१८ वर्षांखालील मुलांच्या सुरक्षेशी संबंधित कायदेशीर तरतुदी कठोर आहेत. त्यामुळे अल्पवयीनांना खोटे वय दाखवून अशा ठिकाणी प्रवेश मिळवून देण्यात आला असल्यास केवळ मद्यसेवनाचा प्रश्न राहत नाही, तर त्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित गंभीर प्रश्न निर्माण होतात. या प्रकरणातून अल्पवयीन मुलींचे खरे वय लपवून त्यांचा गैरवापर किंवा शोषण केले जात होते का, अशी शक्यताही तपासाच्या कक्षेत येऊ शकते. मात्र, अशा बाबींचा निष्कर्ष पुराव्यांच्या आधारेच काढता येईल. ‘पोक्सो’ कायद्याच्या तरतुदी लागू होतात का, हेही तपासातून संबंधित कृत्य सिद्ध झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

बनावट आधारमुळे राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न कसा निर्माण होतो ?

आधारवरील ओळख आणि लोकसंख्याशास्त्रीय माहितीमध्ये बेकायदेशीर फेरफार होत असल्यास त्याचे परिणाम केवळ पबच्या प्रवेशापुरते मर्यादित राहतीलच असे नाही. अशा प्रकारच्या गैरवापराचा विस्तार इतर कारणांसाठी होऊ शकतो का, याची तपासणी आवश्यक आहे. विशेषतः बनावट ओळखपत्र तयार करण्याचे जाळे व्यापक असल्याचे तपासात आढळल्यास त्याचे अन्य ठिकाणी किंवा अन्य गैरप्रकारांशी संबंध आहेत का, हा प्रश्नही महत्त्वाचा ठरेल. मात्र, राष्ट्रीय सुरक्षेला प्रत्यक्ष धोका निर्माण झाला आहे, असा निष्कर्ष सध्या काढता येणार नाही. त्यासाठी तपासातून ठोस पुरावे समोर येणे आवश्यक आहे.

पोलिसांची भूमिका काय ?

शहराचे सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या म्हणण्यानुसार, आधारधारकाची लोकसंख्याशास्त्रीय माहिती बदलणे, त्यात फेरफार करणे किंवा वय बदलण्याचा प्रयत्न करणे हा ‘यूआयडीएआय’च्या नियमांनुसार दंडनीय प्रकार आहे. या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या नोंदींची बारकाईने तपासणी केली जात आहे. आधारवरील जन्मतारखेत फेरफार करण्यामागे नेमकी पद्धत कोणती, त्यात किती जण सहभागी आहेत आणि संबंधित पब किंवा प्रतिष्ठानांची भूमिका काय होती, याचा तपास केला जात आहे. प्रतिष्ठानांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे पुरावे आढळल्यास त्यानुसार कारवाई केली जाईल, अशी पोलिसांची भूमिका आहे.

पुढचा तपास कशावर ?

या प्रकरणाचा खरा आवाका स्पष्ट करण्यासाठी बनावट आधारची निर्मिती, जन्मतारखेत फेरफार, पबमधील प्रवेशाची प्रक्रिया आणि संबंधित व्यक्तींचे परस्पर संबंध या सर्व बाबींची सांगड घालावी लागणार आहे. एकाच पद्धतीने अनेक ठिकाणी फेरफार झाले आहेत का, अल्पवयीनांना प्रवेश देण्यामागे कोणाची भूमिका होती आणि या प्रकारातून अन्य गैरप्रकार घडले का, याची उत्तरे तपासातूनच स्पष्ट होतील. त्यामुळे सध्या हा प्रश्न केवळ ‘अल्पवयीनांना पबमध्ये प्रवेश कसा मिळाला?’ एवढाच राहिलेला नाही. ओळखपत्रातील एका जन्मतारखेच्या फेरफारामागे नेमके किती मोठे जाळे आहे, हे उलगडणे पोलिसांसमोरचे खरे आव्हान ठरले आहे.

anand.kasture@expressindia.com