नागपुरातील पेढीकडून स्वीडनमधील ग्राहकापर्यंत पोहोचलेल्या ‘पेप्टाइड’च्या निमित्ताने ‘संशोधनासाठी’च्या नावाखाली भारतातून परदेशी ग्राहकापर्यंत पोहोचणार्या उत्पादनांवर नेमके कोणते नियंत्रण असते, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
नागपूर ते स्वीडन व्यवहारातून काय समोर आले?
स्वीडनमधील ग्राहकाने नागपुरातील पेढीकडून ‘एमओटीएस-सी’सह पेप्टाइडच्या कुप्या खरेदी केल्या. त्यासाठी पंजाबमधील बँक खात्यात ९० हजार रुपये जमा केल्याचीही नोंद आहे. त्यामुळे पंजाब-नागपूर-स्वीडन अशी व्यवहाराची साखळी समोर येते. मात्र, यावरून संघटित आंतरराष्ट्रीय तस्करीचे जाळे असल्याचा संशय निर्माण झाला आहे. परंतु त्यासाठी उत्पादनाचा मूळ स्रोत, पुरवठादार, खरेदी-विक्रीची कागदपत्रे आणि परदेशात माल पाठवण्याची प्रक्रिया तपासावी लागेल. ९० हजार रुपये मूल्याचा माल सीमाशुल्क तपासणी टाळण्यासाठी केवळ २०० अमेरिकी डॉलरचा दाखवण्यात आल्याचा आरोपही आहे. त्यामुळे या सीमापार व्यवहाराचा संपूर्ण माग काढणे महत्त्वाचे ठरते.
‘संशोधनासाठी’ मुक्त विक्री करता येते का?
केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या नियामक व्यवस्थेत नवीन आणि संशोधनाधीन औषधांसाठी स्वतंत्र प्रक्रिया आहे. नवीन औषधे व नैदानिक चाचणी नियम, २०१९मध्ये नवीन किंवा संशोधनाधीन औषधांची आयात, उत्पादन आणि मानवी चाचणीसाठी परवानगीची चौकट निश्चित करण्यात आली आहे. बाजारात एखाद्या उत्पादनाला ‘रिसर्च पेप्टाइड’ म्हटले जात असले, तरी तेच त्याच्या कायदेशीर मान्यतेचे प्रमाण ठरत नाही. त्यातील पदार्थ कोणता, तो कशासाठी वापरला जाणार आहे आणि त्यासाठी आवश्यक मान्यता किंवा परवानगी घेतली आहे का, हे तपासणे आवश्यक ठरते.
‘केवळ निर्यातीसाठी’च्या कुप्यांचे महत्त्व काय?
तपासात इंजेक्शनसाठी वापरल्या जाणार्या पाण्याच्या ३० मिलिलिटरच्या ९ हजार, १० मिलिलिटरच्या ९८४ आणि अन्य १० मिलिलिटरच्या १९ अशा एकूण १० हजार तीन कुप्या आढळल्या. त्यावर ‘केवळ निर्यातीसाठी’ असा उल्लेख होता. त्यातील दोन नमुने मुंबईतील शासकीय प्रयोगशाळेच्या तपासणीत गुणवत्ता निकषांवर अप्रमाणित ठरले. केवळ ‘निर्यातीसाठी’ असा उल्लेख केल्याने सर्व औषधविषयक नियमांतून सरसकट सूट मिळत नाही.
बनावट लेबल आणि कंपनीच्या पत्त्याबाबत कायदा काय सांगतो?
औषधाच्या गुणवत्तेइतकीच त्याच्या उत्पादकाची खरी ओळखही महत्त्वाची आहे. औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा, १९४०च्या कलम १७-ब मध्ये ‘स्प्युरियस’ म्हणजे बनावट औषधाची व्याख्या करण्यात आली आहे. दुसर्या औषधाची नक्कल करणे, ते दुसर्या उत्पादकाचे असल्याचे भासवणे किंवा अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती अथवा कंपनीचे नाव उत्पादक म्हणून वापरणे अशा बाबी या व्याख्येत येऊ शकतात. या प्रकरणात अमेरिकेतील ‘पेप्टाइड सायन्सेस’च्या नावाचे लेबल व विश्लेषण प्रमाणपत्र बनावट असल्याचे संबंधित कंपनीने सांगितल्याचा उल्लेख तक्रारीत आहे. दुसरीकडे, उत्पादनांवर नवी मुंबईतील ‘डॉ. ग्लेक्स फार्माकेम’चा पत्ता होता; मात्र त्या पत्त्यावर अशी कंपनी अस्तित्वात नसल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचा दावा आहे.
औषध नियंत्रण यंत्रणेच्या यशाची कसोटी काय?
या प्रकरणाची सुरुवात भारतातील तपासणी यंत्रणेला उत्पादन सापडल्याने नव्हे, तर स्वीडनमधील ग्राहकाला गुणवत्तेबाबत संशय आल्याने झाली. उत्पादन परदेशी ग्राहकापर्यंत पोहोचल्यानंतर त्याची गुणवत्ता तपासली गेली आणि त्यानंतर भारतातील पुरवठासाखळीपर्यंत चौकशी पोहोचली. त्यामुळे आता पेप्टाइडचा मूळ उत्पादक कोण, पंजाबमधून नागपूरपर्यंत माल कसा आला, स्वीडनला तो कोणत्या प्रक्रियेतून पाठवला, प्रत्येक टप्प्यावर आवश्यक परवानग्या होत्या का, याचा माग काढावा लागेल. या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यानंतरच हा प्रकार एका व्यवहारापुरता होता की ‘संशोधनासाठी’च्या उत्पादनांच्या सीमापार विक्रीवर अधिक काटेकोर देखरेखीची गरज आहे, हे स्पष्ट होईल.
mahesh.bokade@expressindia.com
