समाजमाध्यमांवर केलेल्या एका पोस्टमुळे इराणमधील २३ वर्षीय तरुणीला थेट फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या घटनेने संपूर्ण जगभरात संतापाची लाट उसळली असून अनेकांनी इराण सरकारवर टीका करण्यात सुरुवात केली आहे. नजमेह अमिनी असे या तरुणीचे नाव असून यावर्षी जानेवारीमध्ये तिला अटक करण्यात आली होती. गेल्या वर्षभरात इराणमध्ये जवळपास ६०० जणांना फाशी देण्यात आल्याचे ओस्लोस्थित मानवाधिकार संघटनेच्या अहवालातून उघडकीस आले आहे. या पार्श्वभूमीवर कोण आहे नजमेह अमिनी? तिच्यावर नेमका आरोप काय? इराणी न्यायालयाने तिला थेट मृत्युदंडाची शिक्षा का सुनावली? त्याविषयीचा हा आढावा…
इराणमध्ये जानेवारी महिन्यात सरकारविरोधी आंदोलने करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी हजारो आंदोलकांची धरपकड करून त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखले केले होते. त्यापैकी बहुतांश आंदोलकांना आतापर्यंत फाशी देण्यात आल्याचे समजते. नजमेह अमिनी या तरुणीलाही पोलिसांनी या आंदोलनादरम्यान अटक केली होती. इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अटकेपूर्वी इराणी सायबर पोलीस तिच्या ऑनलाइन हालचालींवर सातत्याने पाळत ठेवून होते. ७ ऑक्टोबर रोजी ‘खोरासान’ या वृत्तपत्राने अमिनीला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आल्याचे वृत्त दिले. इराणच्या खोरासान येथील रझावी फौजदारी न्यायालयाच्या सहाव्या खंडपीठाने हा निर्णय दिल्याचे सांगितले जाते. सुरुवातीला वृत्त प्रसिद्ध करताना अमिनीचे पूर्ण नाव जाहीर करण्यात आले नव्हते. त्याऐवजी तिच्या नावातील केवळ आद्याक्षरांचा वापर करण्यात आला होता. अटकेनंतर अमिनीला ईशान्य इराणमधील मशहद शहरातील वकीलाबाद मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते.
नजमेह अमिनीवर नेमका आरोप काय?
इराणमध्ये आंदोलने सुरू असताना अमिनीने समाजमाध्यमांवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने शिया इस्लाममध्ये अत्यंत आदरणीय मानल्या जाणाऱ्या ‘बारा निष्पाप इमाम’ यांच्याविषयी अपमानास्पद टिप्पणी केली होती. याच पोस्टच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून अमिनीला अटक केली होती. त्यानंतर ‘सब-उल-नबी’ (पैगंबर मुहम्मद यांचा अपमान करणे) या गंभीर कलमांतर्गत तिच्यावर खटला चालवण्यात आला. इराणी न्यायाधीश जवाद असियान-यज्द यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या खटल्याची सुनावणी झाली. जवळपास आठ महिने चाललेल्या या सुनावणीत अमिनीने ‘बारा निष्पाप इमाम’ यांच्याविषयी अपमानास्पद टिप्पणी करून ईशनिंदेच्या कायद्याचे उल्लंघन केल्याचा युक्तिवाद सरकारीपक्षातर्फे करण्यात आला, तर बचावपक्षाने ही एक नकळत झालेली चूक असून अमिनीला माफी देण्याची विनंती केली. यादरम्यान न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला आणि अमिनीला थेट फाशीची शिक्षा सुनावली.
मानवाधिकार संघटनेने व्यक्त केला संताप
केवळ समाजमाध्यमांवरील एका पोस्टमुळे एका तरुणीला थेट मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आल्याने इराणमधील मानवाधिकार संघटनेने तीव्र संताप व्यक्त केला आहे. संघटनेचे संचालक महमूद अमिरी-मोगद्दम यांनी तातडीने ही शिक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. समाजमाध्यमांवर व्यक्त केलेल्या मतांसाठी २३ वर्षीय तरुणीला मृत्युदंडाची शिक्षा सुनावणे ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. “इराणच्या कायद्यानुसार ईशनिंदेसाठी मृत्युदंडाची तरतूद आहे. २०२३ मध्येही अशाच आरोपांखाली दोन पुरुषांना फाशी देण्यात आली होती. मात्र, सध्याच्या प्रकरणात मृत्युदंडाची शिक्षा सुनावणे योग्य नाही. या शिक्षेमुळे तरुण महिलांनाही अशा कारवाईला सामोरे जावे लागू शकते. आंतरराष्ट्रीय समुदायाने वेळीच ठोस भूमिका घेतली नाही, तर या घटनांमध्ये आणखीनच वाढ होऊ शकते. त्यामुळे नजमेह अमिनीची शिक्षा रद्द करण्याची मागणी आंतरराष्ट्रीय समुदायाने करावी आणि सर्व प्रकारच्या फाशीच्या शिक्षांना तातडीने स्थगिती देण्याची मागणी करावी,” असे विनंती अमिरी-मोगद्दाम यांनी एका पोस्टद्वारे केली आहे. त्यांच्या या पोस्टला मोठा प्रतिसाद मिळाला असून अनेकांनी इराणी न्यायालयाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात सुरुवात केली.
नजमेह अमिनीचा युक्तिवाद काय होता?
न्यायालयातील सुनावणीदरम्यान नजमेह अमिनीने सरकारकडे माफीची मागणी केली. अनावधनाने आपल्याकडून समाजमाध्यमांवर पोस्ट शेअर केली गेल्याचे तिने सांगितले. तसेच पुन्हा अशी चूक कधीही होणार नसल्याने सांगत अमिनीने दयेची मागणी केली. मात्र, न्यायाधीशांनी तिचा हा बचाव फेटाळून लावत त्यावर कडक आक्षेप घेतला. जर ही चूक अनावधनाने झाली असेल तर ती ‘बारा निष्पाप इमाम’ यांच्याविषयीच का झाली? इराण सरकारऐवजी अमिनीने अमेरिका किंवा इस्रायलचा अपमान का केला नाही? असा सवाल न्यायाधीशांनी उपस्थित केला. यादरम्यान ईशनिंदेच्या प्रकरणात मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्याबरोबरच अमिनीला दुसऱ्या एका प्रकरणात १२ वर्षे, सहा महिने आणि एक दिवसाच्या कारावासाची शिक्षाही ठोठावण्यात आली. राष्ट्रीय सुरक्षेविरोधात काम करणे आणि इराणच्या सत्ताधारी व्यवस्थेविरोधात प्रचार करणे, यांसारखे आरोप तिच्यावर ठेवण्यात आले होते. या आरोपांवरील सुनावणी स्वतंत्रपणे करण्यात आली.
इराणमधील ईशनिंदेचा कायदा काय सांगतो?
इराणची कायदेशीर आणि राजकीय व्यवस्था इस्लामिक तत्त्वांवर आधारित आहे. त्यामुळे धार्मिक नियम आणि बंधने हा त्यांच्या न्यायव्यवस्थेचा मुख्य गाभा आहे. इराणच्या इस्लामिक दंड संहितेच्या कलम २६२ नुसार, पैगंबर मुहम्मद किंवा इतर कोणत्याही दैवी पैगंबराचा अवमान करणे हा मृत्यूदंडास पात्र असा गंभीर गुन्हा मानला जातो. याशिवाय शिया इस्लाममध्ये आदरणीय मानल्या जाणाऱ्या ‘बारा निष्पाप इमाम’ आणि ‘फातिमा झहरा’ यांच्याविषयी अपमानास्पद शेरेबाजी करणे यांचाही ‘सब्ब-अल-नबी’ या गुन्ह्यात समावेश होऊ शकतो. या गंभीर गुन्ह्यासाठीही थेट मृत्युदंडाची तरतूद आहे. मात्र, आरोपीने दबावाखाली, अनवधानाने, गैरसमजुतीतून, नशेत असताना किंवा रागाच्या भरात असे वक्तव्य केले असेल, तर कायद्यात काही अपवाद नमूद करण्यात आले आहेत. बोलताना चुकून शब्द निघून जाणे, त्या शब्दांचा अर्थ माहीत नसणे किंवा दुसऱ्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून गुन्हा केल्यास त्याला फाशीच्या शिक्षेतून सूट मिळू शकते. अशा प्रकरणात न्यायालयाच्या आदेशाने संबंधिताला चाबकाच्या ७४ फटक्यांची शिक्षा दिली जाते; पण नजमेह अमिनीच्या प्रकरणात न्यायालयाने यापैकी कोणतीही सूट मान्य न करता तिला थेट फाशीची शिक्षा ठोठावली आहे.
