अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गुरुवारी पहाटे त्यांच्या निधनाचे वृत्त समोर येताच संपूर्ण देशभरात शोककळा पसरली. नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनयाने अनेकांच्या मनावर छाप उमटवली होती; पण त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांच्या पलीकडेही त्यांच्या व्यक्तिमत्वाची एक वेगळी बाजू होती. पडद्यावर अनेकदा कणखर आणि बाणेदार भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याचे प्रत्यक्ष आयुष्यात भारतीय लष्कराबद्दल अतोनात प्रेम होते. १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘प्रहार: द फायनल अटॅक’ या चित्रपटासाठी नाना यांनी सैन्याचे खडतर प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर १९९९ मधील कारगिल युद्धादरम्यान त्यांनी प्रत्यक्ष युद्धभूमीवर जवानांसोबत तब्बल ६० दिवसही घालवले होते.
काही वर्षांपूर्वी नाना पाटेकर यांनी कारगिलमधील आपल्या अनुभवाबद्दल खुलासा केला होता. त्या संघर्षाच्या काळात भारतीय सैन्यदलातील जवानांबरोबर प्रवास करताना आपण त्यांच्या एका तुकडीत कसे सहभागी झालो होतो, याची माहिती त्यांनी दिली होती. आज नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांचा भारतीय सशस्त्र दलांशी असलेला हा वेगळा आणि फारसा चर्चेत न आलेला संबंध पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नाना पाटेकर यांनी अनेकदा भारतीय सैन्याविषयी असलेला आदर उघडपणे व्यक्त केला होता. २०२४ मध्ये एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी कारगिल संघर्षादरम्यानच्या अनुभवांवर सविस्तर भाष्य केले होते. तत्कालीन संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्याकडून विशेष परवानगी मिळवून आपण सैनिकांसोबत सुमारे ६० दिवस प्रत्यक्ष युद्धभूमीत कसे घालवले होते, याचा खुलासा त्यांनी मुलाखतीतून केला होता.
नाना पाटेकर यांचे कठोर लष्करी प्रशिक्षण
नाना पाटेकर यांचे भारतीय सशस्त्र दलांशी असलेले नाते केवळ त्यांच्या चित्रपटांतील भूमिकांपुरते मर्यादित नव्हते. लष्कराशी जोडल्या गेलेल्या त्यांच्या या अनोख्या बंधाची सुरुवात १९९१ मधील ‘प्रहार: द फायनल अटॅक’ या चित्रपटाच्या तयारीपासून झाली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन खुद्द नाना पाटेकर यांनीच केले होते आणि त्यात त्यांनी ‘मेजर प्रताप चौहान’ ही गाजलेली भूमिका साकारली होती. विशेष बाब म्हणजे, या भूमिकेसाठी नाना यांनी बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्रीच्या रेजिमेंटल सेंटरमध्ये जवानांसोबत अत्यंत खडतर प्रशिक्षणही घेतले होते. इंडिया टुडेने १९९२ मध्ये दिलेल्या वृत्तानुसार लष्करी अधिकाऱ्याची भूमिका साकारण्यासाठी नाना यांनी अत्यंत कठीण शारीरिक प्रशिक्षण घेतले होते. या चित्रपटानंतरही त्यांचा भारतीय प्रादेशिक सैन्यदलाशी (टेरिटोरियल आर्मी) संबंध कायम होता. पुढे नानांना टेरिटोरियल आर्मीचे अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आणि त्यांना मानद लेफ्टनंट कर्नल ही पदवीही प्रदान करण्यात आली.
नाना पाटेकर यांचा कारगील युद्धात सहभाग
१९९९ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात कारगिल युद्ध सुरू झाले. त्यावेळी नाना पाटेकर यांना प्रत्यक्ष रणभूमीवर सैनिकांसोबत राहण्याची इच्छा होती. त्याकरिता परवानगी मिळवण्यासाठी त्यांनी थेट तत्कालीन संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांची भेटही घेतली होती. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या भेटीची आठवण सांगताना नाना म्हणाले होते की, सुरुवातीला संरक्षण मंत्र्यांनी मला थेट लष्करात सहभागी होण्यास नकार दिला होता. एखाद्या सामान्य नागरिकाला थेट सैन्यासोबत पाठवता येत नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यावर आपण आधीच कमांडो प्रशिक्षण पूर्ण केले असून माझ्याकडे प्रत्यक्ष शस्त्रे हाताळण्याचा अनुभव आहे. तसेच राष्ट्रीय स्तरावर रायफल नेमबाजीत मी भाग घेतल्याचे संरक्षण मंत्र्यांना सांगितले होते. अखेर माझा हा निर्धार पाहून जॉर्ज फर्नांडिस यांनी मला प्रत्यक्ष युद्धक्षेत्रात जाण्याची परवानगी दिली होती.
सैन्यदलात गेल्यानंतर नाना यांचे घटले होते वजन
नाना पाटेकर यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी सुमारे ६० दिवस लष्करी जवानांसोबत घालवले आणि द्रास, लेह, कुपवाडा, बारामुल्ला आणि सोपोर यांसारख्या ठिकाणी प्रवास केला होता. याच काळात आपण लष्करातील क्विक रिअॅक्शन टीमचा (QRT) भाग झाल्याचेही नाना यांनी सांगितले होते. यादरम्यान लष्करासोबत असताना नेमके कोणते काम केले, असा प्रश्न विचारण्यात आला असता नाना यांनी लष्करी कारवाईशी संबंधित तपशील उघड करण्यास नकार दिला होता. या खडतर मोहिमेचा त्यांच्या शरीरावरही मोठा परिणाम झाला होता. प्रत्यक्ष सीमेवर जाताना नाना यांचे वजन ७६ किलो होते, तर तिथून परतले तेव्हा ते केवळ ५६ किलो झाले होते. म्हणजेच त्यांचे तब्बल २० किलो वजन घटले होते. या अनुभवाबद्दल सांगताना मला आनंद आहे की देशासाठी मी निदान एवढेतरी योगदान देऊ शकलो, अशी भावना नाना यांनी व्यक्त केली होती.
कारगिल युद्धादरम्यान सैन्यासोबत घालवला वेळ
कारगिल युद्धादरम्यान नाना पाटेकर भारतीय सैनिकांसोबत राहत असल्याचे वृत्त त्यावेळी इंडिया टुडेनेही दिले होते. ऑगस्ट १९९९ च्या एका वृत्तानुसार, नाना दोन आठवड्यांहून अधिक काळ सैनिकांबरोबर राहिले होते आणि ते एका पोस्टवरून दुसऱ्या पोस्टवर जात होते. या युद्धात जखमी सैनिकांची भेट घेणाऱ्या अनेक कलांकारांपेक्षा नाना यांचा अनुभव वेगळा होता. त्यांनी थेट संघर्षग्रस्त भागात जाऊन लष्करी जवानांसोबत वेळ घालवला होता. नाना पाटेकर यांच्या आयुष्यात त्यांचा लष्कराशी असलेला हा संबंध तुलनेने कमी चर्चेत राहिलेला आहे. त्या तुलनेत चित्रपटांमध्ये लष्करी अधिकारी तसेच कठोर व्यक्तिरेखा साकारलेल्या त्यांच्या भूमिकाच अनेकांच्या लक्षात राहिलेल्या आहेत. पडद्यावर दिसणारा नानांचा ‘रागीटपणा’ आणि अभिनय हा कुठल्याही ड्रामा स्कूलमधून आलेला नव्हता, तर तो त्यांनी खऱ्या आयुष्यात भोगलेल्या गरिबी आणि संघर्षातून जन्माला आला होता.
असा हा नटसम्राट काळाच्या पडद्याआड
‘प्रहार’ चित्रपटातील मेजर प्रताप चौहान यांची भूमिका साकारण्यासाठी नाना पाटेकर यांनी घेतलेल्या कठोर लष्करी प्रशिक्षणाचा त्यांच्या अभिनयावर मोठा प्रभाव पडला. या भूमिकेसाठी त्यांनी लष्करी प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर कारगिल युद्धादरम्यान सैनिकांशी आलेल्या त्यांच्या प्रत्यक्ष संपर्कामुळे सशस्त्र दलांशी असलेले त्यांचे नाते आणखी दृढ झाले. अनेकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या या नटसम्राटाने गुरुवारी पहाटे जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने चार दशकांहून अधिक काळाची प्रदीर्घ आणि प्रभावी कारकीर्द संपुष्टात आली. आपल्या दमदार आणि प्रभावी अभिनयाने नानांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली होती. ‘परिंदा’, ‘क्रांतिवीर’, ‘अग्निसाक्षी’, ‘अब तक छप्पन’, ‘वेलकम’ आणि ‘नटसम्राट’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. चित्रपटात जीव ओतून अभिनय करण्याची त्यांची शैली प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहील.
