Nana Patekar Real Life Roles: नाना पाटेकर आपली प्रत्येक भूमिका वास्तववादी पद्धतीने साकारत, असे गौरवोद्गार त्यांच्या अभिनयासाठी नेहमीच काढले जातात. त्यांचा खर्जातला आवाज, बोलके डोळे, अर्थपूर्ण पॉजेसने भारलेली संवादशैली त्यांच्या व्यक्तिरेखांना जिवंतपणा मिळवून देत असे. मग ती व्यक्तिरेखा अगदी सुरवातीच्या काळातल्या ‘अंकुश’मधल्या रवी या अँग्री यंग मॅनची असो किंवा अगदी दशकभरापूर्वी आलेल्या ‘नटसम्राट’च्या गणपतराव बेलवलकरांची, नानांच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांनी समरसून दाद दिली. एरवी काल्पनिक व्यक्तिरेखांना आपल्या वास्तवदर्शी अभिनयातून जिवंत करणाऱ्या नानांनी काही खऱ्याखुऱ्या, वास्तविक व्यक्तिरेखांनाही पडद्यावर साकारलं, ज्यांचं गारुड आजतागायत सिनेरसिकांच्या मनावर कायम आहे.

१. नथुराम गोडसे

करियरच्या अगदी सुरुवातीच्या काळात टीव्ही, नाटकं, सिनेमा अशा सर्वच क्षेत्रात नानांची मुशाफिरी सुरू होती. ‘पुरुष’ या गाजलेल्या नाटकातल्या त्यांच्या खलनायकी भूमिकेचं कौतुक होत होतंच. अशातच त्यांना ‘लॉर्ड माउंटबॅटन : द लास्ट व्हॉईसरॉय’ या ब्रिटीश टीव्ही मालिकेत काम करायची संधी चालून आली. १९८६मध्ये आलेल्या या मालिकेत नानांनी गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसेची भूमिका साकारली होती. या मालिकेत निकोल विल्यम्सन, ए. के. हंगल, इयान रिचर्डसन अशा दिग्गज कलाकारांची फौज होती. त्यामुळे नानांच्या वाट्याला आलेली नथुरामाची भूमिका ही अवघ्या काही सेकंदांची आणि दीड वाक्याची असली तरी, त्याकाळच्या इतक्या दिग्गज कलाकारांसोबत काम करण्यासाठी नानांची झालेली निवड त्यांच्या सुरुवातीच्या काळातल्या अभिनयाच्या दर्जाबद्दल पुरेशी बोलकी ठरते. हा दर्जा नानांनी शेवटपर्यंत राखला.

२. राकेश मारिया

नानांच्या वर्दीतल्या व्यक्तिरेखा हा एक स्वतंत्र चर्चेचाच विषय आहे. एकीकडे जनसेवेचं कर्तव्य आणि दुसरीकडे कार्यालयीन कामकाजात गुंतलेल्या खाकी वर्दीच्या अधिकाऱ्यांमधलं माणूसपण नानांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांसमोर आणलं. त्यांनी साकारलेल्या वर्दीतल्या व्यक्तिरेखा या टिपिकल हिरोगिरीऐवजी वर्दीतल्या माणसाभोवती केंद्रित होत्या. त्यासाठी नानांनी घेतलेली मेहनतही विलक्षण स्वरूपाचीच होती.

‘प्रहार’मध्ये लष्करी अधिकाऱ्याची भूमिका साकारण्यासाठी नानांनी तीन वर्षे सैनिकी प्रशिक्षण तर घेतलंच, पण त्याचबरोबर १९९९च्या कारगिल युद्धातही ‘मराठा लाईट इन्फंट्री’कडून आपला सक्रीय सहभाग नोंदवला होता. देशसेवेबद्दलची त्यांची ही तळमळ प्रकर्षाने जाणवली ती त्यांनी २६/११च्या हल्ल्याबद्दल दिलेल्या एका प्रतिक्रियेतून. दिग्दर्शक राम गोपाल वर्माने या दुर्दैवी घटनेवर तयार केलेल्या ‘द अटॅक्स ऑफ २६/११’ या सिनेमात नानांनी तत्कालीन सहपोलीस आयुक्त (गुन्हे) राकेश मारिया यांची व्यक्तिरेखा साकारली होती. सिनेमाच्या जडणघडणीचे किस्से सांगताना, नानांनी आपण त्यावेळी मुंबईत नसल्याचं आणि टीव्हीवर हल्ल्याचं चित्रण पाहताना असहाय्य वाटल्याचं माध्यमांना सांगितलं. कधीकाळी प्रत्यक्ष जीवनात अंगावर वर्दी घातलेल्या नानांची ती हतबलता, असहाय्यता आणि त्यातून आलेला उद्वेग राम गोपाल वर्माने त्याच्या सिनेमामध्ये व्यवस्थित टिपला आणि नानांच्या खात्यात आणखी एका अजरामर भूमिकेची नोंद झाली.

३. डॉ. प्रकाश बाबा आमटे

१९८६मध्ये आलेल्या ‘अंकुश’च्या यशानंतर बॉलीवूडमध्ये आपलं बस्तान घट्ट बसवलेल्या नानांनी पुढे मोजक्याच पण उत्तम मराठी सिनेमांमध्ये काम केलं. त्यातलाच एक सिनेमा म्हणजे २०१४चा ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे : अ रिअल लाईफ हिरो’. रूढार्थाने, बायोपिक म्हणावा असा नानांच्या कारकिर्दीतला हा एकमेव सिनेमा. पूर्व महाराष्ट्रातल्या हेमलकसासारख्या दुर्गम, जंगली, आदिवासीबहुल भागात डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. साधना आमटे हे दाम्पत्य वैद्यकीय सेवेसोबतच आदिवासींच्या विकासासाठी गेली कित्येक दशकं कार्यरत आहे. त्यांचा जीवनप्रवास दाखवणाऱ्या या सिनेमात नानांनी साकारलेली डॉ. प्रकाश यांची भूमिका त्यांच्या कारकिर्दीतल्या महत्त्वाच्या भूमिकांपैकी एक आहे. नानांनी रंगवलेल्या खलनायकी, ग्रे शेडच्या अनेकानेक भूमिकांच्या अगदी उलट असलेल्या या भूमिकेने नानांचं वेगळेपण अधिक ठसठशीत केलं.

४. डॉ. बलराम भार्गव

२०२३ मध्ये आलेल्या विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द व्हॅक्सिन वॉर’ या सिनेमात नाना यांनी डॉ. बलराम भार्गव ही भूमिका साकारली होती. डॉ. भार्गव हे इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेचे माजी महासंचालक आहेत. डॉ. भार्गव लिखित ‘गोईंग व्हायरल’ या पुस्तकावर हा सिनेमा आधारलेला होता. या सिनेमात कोरोनाला निष्प्रभ करण्यासाठी तयार केलेल्या भारतीय लसीची गोष्ट सांगितली गेली होती. सिनेमाला बॉक्स ऑफिसवर जरी फारसं यश मिळालं नसलं, तरी नानांनी आपल्या अभिनय आणि संवादफेकीतून आपली स्वतंत्र छाप सिनेमावर सोडली.

या अशा वास्तव जीवनातल्या भूमिका नानांनी आपल्या अभिनयातून रुपेरी पडद्यावर अक्षरशः जिवंत केल्या. त्याचबरोबर, नानांनी काही अशा भूमिकाही साकारल्या, ज्या कागदोपत्री काल्पनिक असल्या, तरी त्यांना वास्तवाचा आधार होता. त्या त्या व्यक्तिरेखांच्या काल्पनिक आणि वास्तव जगातली सीमारेषा पुसट करण्यात नानांच्या अभिनयकौशल्याचा मोलाचा वाटा होता.

१. राघवेंद्र (राजेंद्र जक्कल)

सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात पुण्यात जोशी-अभ्यंकर हत्याकांड घडलं. पुण्यासह महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या या प्रकरणाने क्रौर्याचं एक वेगळंच रूप दाखवून दिलं. पुण्यातल्या काही कॉलेजकुमारांनी चालवलेल्या या खूनसत्रावर आधारित कथानक घेऊन दिग्दर्शक राजदत्त यांनी ‘माफीचा साक्षीदार’ या सिनेमाची घोषणा केली. पुढे काही कारणाने ते या सिनेमातून बाजूला झाले आणि दिग्दर्शनाची धुरा व्ही. रविंद्र यांच्या खांद्यावर आली. या सिनेमात नानांनी राजेंद्र जक्कल या हत्याकांडाच्या मुख्य सूत्रधारांपैकी एकावर आधारित असलेलं राघवेंद्र हे पात्र साकारलं होतं. नाकावर सरकलेल्या चष्म्यातून रोखलेली नजर, फ्रेंच दाढी, स्मार्ट पेहराव अशा अवतारातल्या राघवेंद्रची क्रूर बाजू नानांनी आपल्या अभिनयातून समर्थपणे दाखवून दिली.

२. साधू आगाशे (दया नायक)

‘तिरंगा’, ‘यशवंत’, ‘शागीर्द’, ‘द अटॅक्स ऑफ २६/११’, ‘आपला माणूस’, ‘ओ’रोमिओ’ अशा सिनेमांमध्ये नानांनी साकारलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखा बऱ्याच गाजल्या. पण त्याहून विशेष गाजली ती त्यांनी साकारलेली साधू आगाशे ही व्यक्तिरेखा. ‘अब तक छप्पन’ आणि ‘अब तक छप्पन २’ या दोन्ही सिनेमांमध्ये नानांनी साकारलेली ही एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलीस अधिकाऱ्याची भूमिका ही एसीपी दया नायक यांच्यावर बेतलेली होती. पोलिसी जीवनातल्या खाचखळग्यांचं वास्तवदर्शी चित्रण असलेल्या या सिनेमातली नानांची भूमिका विशेष लक्षवेधी ठरली. एकीकडे जीवाची, कुटुंबाची पर्वा न करता कर्तव्य बजावणं आणि दुसरीकडे एन्काऊंटर स्पेशालिस्टच्या नकोशा वाटणाऱ्या बिरुदासोबत जुळवून घेणं यातल्या अदृश्य दडपणाची तीव्रता नानांच्या साधू आगाशेने जाणवून दिली.

एखादं वास्तव दुनियेतलं पात्र पडद्यावर साकारताना त्याच्या बाह्य रूपाचा आज प्रकर्षाने विचार केला जातो. किंबहुना, ते पात्र कसं दिसतं, त्याच्या चेहऱ्याची, शरीराची ठेवण कशी आहे, त्याचा पेहराव कसा आहे यावरच ते पात्र साकारणाऱ्या कलाकाराचा बहुतांश वेळ खर्च होतो. सुदैवाने, नानांना कधी अशा बाह्य रूपाच्या बंधनांनी अटकाव केला नाही. प्रत्येक पात्र नाना समरसूनच जगले. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी वास्तव दुनियेतल्या त्या प्रत्येक पात्राला रुपेरी पडद्यावर एक स्वतंत्र अस्तित्व मिळवून दिलं. नानांना भावपूर्ण श्रद्धांजली.