Nana Patekar Rifle Shooting : अष्टपैलू अभिनेते नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड गेले आहेत. त्यांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास, रोखठोक व्यक्तिमत्त्व आणि त्यांचे सामाजिक कार्य हे आपण सारेच जाणतो. पण, या महान कलावंताने त्यांच्या आयुष्यात अनेक छंद जोपासले. पण, ‘प्रहार’ या चित्रपटात ‘मेजर चौहान’ची भूमिका साकारण्यासाठी रायफल हातात घेतलेल्या नानांना नंतर आयुष्यभरासाठी रायफल शूटिंगचा छंद जडला. याच छंदामुळे त्यांना व्यावसायिक नेमबाज म्हणून वेगळी ओळख मिळाली होती.

‘प्रहार’ चित्रपट आणि लष्कराचे खडतर प्रशिक्षण

१९९१ मध्ये ‘प्रहार’ चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्याचे खुद्द नाना पाटेकरांनी दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात त्यांनी ‘मेजर चौहान’ची भूमिका साकारली होती. ही लष्करी भूमिका साकारण्यासाठी नानांनी बेळगाव येथील मराठा लाइट इन्फंट्रीच्या रेजिमेंटल सेंटरमध्ये खडतर प्रशिक्षण घेतले होते. त्यांनी वेगवेगळे शस्त्र हाताळण्याचे आणि प्रत्यक्ष नेमबाजीचे प्रशिक्षण घेतले. अचूक लक्ष्य आणि शिस्त शिकवणाऱ्या या खेळाने नानांना अशी काही भूरळ घातली की त्यांना आयुष्यभरासाठी रायफल शूटिंगचा छंद जडला.

पुण्याच्या बालेवाडी रेंजवर तासनतास सराव

नाना पाटेकर यांनी वयाच्या चाळिशीत रायफल शूटिंगचा सराव करण्यास सुरुवात केली. पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील शूटिंग रेंजवर आणि महूमधील शूटिंग रेंजवर त्यांनी कसून सराव केला. तासन्‌तास जमिनीवर झोपून, रायफलचा बॅलेन्स सांभाळत अचूक निशाणा साधणे सोपे नव्हते, पण नानांनी चिकाटीने प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांनी ‘५० मीटर रायफल प्रोन’ (50m Rifle Prone) आणि ‘३०० मीटर बिग बोर रायफल’ या प्रकारांच्या स्पर्धेत सहभाग घेतला होता.

रायफल शुटिंगमध्ये राष्ट्रीय पदक!

वय वाढेल तसा लोकांचा खेळातील रस कमी होतो असे म्हटले जाते. मात्र, नाना पाटेकर यांनी वयाच्या उत्तरार्धात राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील नेमबाजी स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली.

२००४ मध्ये रौप्य पदक : इंदूरमधील बीएसएफच्या रेवती रेंजवर आयोजित करण्यात आलेल्या ४८ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत त्यांनी ३०० मीटर बिग-बोर प्रकारात रौप्य पदक (Silver Medal) पटकावले होते.

२००७ मध्ये कांस्य पदक : तीन वर्षांनंतर, २००७ मध्ये महाराष्ट्राच्या संघाचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी ५४९/६०० असे गुण मिळवत कांस्य पदक (Bronze Medal) जिंकले आणि वैयक्तिक क्रमवारीत १२ वे स्थान मिळवले.

राष्ट्रीय स्तरावरील या कामगिरीमुळे भारतीय राष्ट्रीय रायफल असोसिएशने नाना पाटेकर यांना ‘रेनॉन्ड शॉट’ (प्रख्यात नेमबाज) हा किताब दिला, ज्यामुळे त्यांना परदेशातून करमुक्त (Duty-Free) रायफल आयात करण्याची कायदेशीर परवानगी मिळाली होती. एका अभिनेत्यासाठी क्रीडा जगतातून मिळालेली ही सन्मानजनक पावती होती. रायफल शूटिंगमधील त्यांचा प्रवास इथेच थांबला नाही. त्यांनी वयाच्या साठीपर्यंत राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. त्यानंतरही त्यांनी आपला छंद जोपासला, देशभरातील वेगवेगळ्या शूटिंग रेंजवर जाऊन ते नेमबाजी करायचे. विशेष म्हणजे, जेव्हा जेव्हा ते चित्रपटांच्या आउटडोअर शूटिंगसाठी जायचे तेव्हा रायफल किट आणि साहित्य सोबतच ठेवत असत. आसपास कुठे शूटिंग रेंज दिसली की ते नेमबाजी सुरू करायचे.

नव्या पिढीचा पाठीराखा

नाना पाटेकर यांना याच छंदाच्या माध्यमातून समाजासाठी काहीतरी कऱण्याची संधी मिळाली. खेळातील बारकावे समजून घेतल्यानंतर त्यांनी काही नवोदित नेमबाजांना मदत करण्यास सुरुवात केली. भारताची स्टार नेमबाज आणि ऑलिम्पियन अंजली भागवत जेव्हा तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात होती, तेव्हा १९९३ मध्ये नानांनीच तिला तिची पहिली व्यावसायिक रायफल भेट दिली होती.

याशिवाय, आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या अनेक तरुण खेळाडूंच्या प्रशिक्षणाचा, शस्त्रास्त्रांचा आणि महागड्या काडतुसांचा खर्च नानांनी उचलला. अनेकदा ते बालेवाडी रेंजवर नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करताना दिसले आहेत.

एक समृद्ध व्यक्तिमत्व

नाना पाटेकर यांनी कलाक्षेत्रात यशाच्या शिखरावर असतानाही छंदासाठी स्वतःला झोकून दिले होते. रायफल शूटिंगमध्ये त्यांना राष्ट्रीय स्तरावरही बहुमान मिळाला. पडद्यावरील ‘मेजर चौहान’ प्रत्यक्ष आयुष्यातही रायफल शूटिंगमध्ये निपूण झाले, याच छंदाने त्यांच्या व्यक्तिमत्वाला नवी झळाळी दिली.