Why the Nanjing Massacre Still Fuels China-Japan Tensions: गेल्या काही आठवड्यांपासून चीन आणि जपानचे राजनैतिक प्रतिनिधी आणि सरकारी प्रवक्ते एकमेकांवर कठोर शब्दात टीका करत आहेत. जपानच्या पंतप्रधान साने ताकाइची यांनी, “चीनने तैवानवर हल्ला केल्यास जपान लष्करी पद्धतीने प्रतिसाद देईल,” असे म्हटल्यापासून हा तणाव अधिकच वाढला आहे. जपान आणि चीन यांच्यातील तणावाचे मूळ कारण तैवान नाही. हा संघर्ष गेले काही वर्षे सतत सुरू आहे. यामागे ऐतिहासिक आणि सामरिक स्पर्धा तसेच गुंतागुंतीचा इतिहासही आहे.
चीन आणि जपानमध्ये संघर्ष का सुरू आहे? (Why Are China and Japan in Conflict Today?)
काही दिवसांपूर्वीच चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या गुओ जियाकून यांनी म्हटले होते की, “उजव्या विचारसरणीच्या जपानी गटांच्या भडक वक्तव्य करणाऱ्या विधानांना सहन केल्यास भूतकाळातील लष्करवाद पुन्हा जागा होईल आणि आशियातील जनतेला पुन्हा धोक्याच्या वळणावर आणून ठेवेल.” त्यांनी दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानी सैन्याने केलेल्या विनाशकारी हल्ल्यांचा आणि सामूहिक हत्यांचा उल्लेख करत सांगितले की “नानजिंग नरसंहारात ३ लाखांहून अधिक लोकांची हत्या झाली.” १३ डिसेंबर १९३७ रोजी घडलेली ही घटना युद्धकाळातील सर्वांत भयंकर अत्याचारांपैकी एक मानली जाते. या घटनेच्या स्मृतिदिनी चीनमधील जपानी दूतावासाने आपल्या नागरिकांना सुरक्षिततेचा इशारा जारी केला आहे.
नानजिंगमध्ये नेमके काय घडले? ही घटना जपान आणि चीन यांच्यातील द्वंद्वासाठी कारणीभूत का मानली जाते?
नानजिंग नरसंहार: नेमके काय घडले? (What Was the Nanjing Massacre?)
१९३० च्या दशकात जपान विस्तारवादी साम्राज्य झाले होते. १९३१ साली त्यांनी चीनच्या ईशान्येकडील मंचुरिया प्रदेशावर ताबा मिळवला होता. त्यामुळे १९३७ साली जपान आणि चीन यांच्यात युद्धाचा भडका उडाला. बीजिंगजवळील मार्को पोलो ब्रिज परिसरात दोन्ही सैन्यांमध्ये चकमक झाली आणि मोठा संघर्ष सुरू झाला. जपानी सैन्याने मुद्दाम ही घटना घडवून आणल्याचे सांगितले जाते, जेणेकरून चीनवर मोठा लष्करी हल्ला करता येईल. त्या वेळी नानजिंग (नानकिंग) हे चीनच्या राजधानीचे ठिकाण होते. १९३७ साली डिसेंबरच्या सुरुवातीपासून जपानी सैन्याने नानजिंग शहरावर भीषण हल्ला करण्यास सुरुवात केली. १२ डिसेंबरला चिनी सैन्य यांगत्से नदीच्या काठावर मागे हटले आणि १३ डिसेंबरला शहर जपानच्या ताब्यात गेले. त्यावेळी चीनचे बहुसंख्य सैन्यदल शांघायमध्ये तैनात असल्याने नानजिंगकडे पुरेशी शक्ती नव्हती.
रेप ऑफ नानकिंग (What Happened During the Rape of Nanking?)
यानंतर सहा आठवड्यांत कुप्रसिद्ध नानजिंग नरसंहार किंवा ‘रेप ऑफ नानकिंग’ घडला. चीनच्या म्हणण्यानुसार, ३ लाख सैनिक आणि नागरिकांची हत्या झाली आणि सुमारे २०,००० महिलांवर बलात्कार झाले (Iris Chang,1997).
जपानी सैनिकांचे अत्याचार आणि परदेशी साक्ष
- त्या काळी शहरात काही परदेशी ख्रिश्चन मिशनरी आणि पाश्चात्त्य पत्रकार उपस्थित होते. त्यांच्या प्रत्यक्ष साक्षींमुळे या अत्याचारांचे भयंकर तपशील समोर आले (Iris Chang,1997). ‘द गार्डियन’चे पत्रकार हॅरॉल्ड टिम्पर्ली यांनी एका मिशनरीचा उल्लेख केला, या मिशनरीने तलावात ५० नागरीकांचे मृतदेह पाहिले.
- अनेक ठिकाणी नागरिकांना मशीनगनने ठार मारण्यात आले. त्या काळात नानजिंगमध्ये उपस्थित असलेल्या काही पाश्चात्त्य मिशनऱ्यांना आणि पत्रकारांना जपानी सैनिक चिनी महिलांवर अत्याचार करताना दिसले. परिस्थिती इतकी गंभीर होती की, त्यांनी प्रत्यक्ष हस्तक्षेप करून सैनिकांना महिलांपासून दूर खेचून वाचवण्याचा प्रयत्न केला.
- “अनेक छायाचित्रांमध्ये नदीत तरंगणारे मृतदेह दिसतात, तसेच काही ठिकाणी जपानी सैनिक मृतदेहांसोबत किंवा छाटलेलं धड हातात धरून पोझ देताना दिसतात.”

इतका मोठा नरसंहार का झाला? प्रमुख कारणे (Why Did the Nanjing Massacre Occur?)
- वरिष्ठ लष्करी नेत्यांच्या नियंत्रणाचा अभाव: उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना आपल्या सैनिकांवर नियंत्रण ठेवण्यात मोठे अपयश आले.
- पुरवठ्याचा गंभीर अभाव: अन्न, साधने आणि संसाधने कमी पडल्यामुळे सैनिकांमध्ये लूटमार, हिंसा आणि अनियंत्रित हत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या.
- चिनी नागरिकांविषयी खोलवरचा वांशिक तिरस्कार: जपानी सैन्यात अनेक वर्षे वाढत गेलेला चिनी लोकांविषयीचा द्वेष आणि जातीय अहंकार, हिंसाचाराला अधिक क्रूर रूप देणारा घटक ठरला.
- सैनिकी शिस्तीचा झालेला ऱ्हास: पूर्वीपासूनच जपानी सैनिकांमध्ये शिस्त कमी होत होती. युद्धातील तणाव आणि नेतृत्वाच्या त्रुटींमुळे ही शिस्त जवळजवळ पूर्णपणे संपुष्टात आली.
युद्धानंतरची कारवाई (War Crimes Trials After World War II?)
१९४५ साली दुसरे महायुद्ध संपल्यानंतर टोकियोच्या आंतरराष्ट्रीय लष्करी न्यायाधिकरणाने या युद्धगुन्ह्यांची सुनावणी केली. नानजिंगमधील जपानी सैन्याचे प्रमुख कमांडर जनरल मात्सुई इवाने यांना जबाबदार धरून फाशी देण्यात आली.
चीन-जपान संबंधांमध्ये नानजिंगचे स्थान (How China Uses the Nanjing Massacre in National Memory?)
- १९४९ साली चीनमध्ये कम्युनिस्ट सत्ता स्थापन झाली. सुरुवातीच्या दशकांत नानजिंग नरसंहार हा सरकारी प्रचाराचा मुख्य मुद्दा नव्हता. माओ झेडोंग यांच्यासारख्या नेत्याच्या नेतृत्वाखाली राष्ट्र एकवटले गेले होते.
- परंतु त्यांच्या मृत्यूनंतर (१९७६) आणि ‘सांस्कृतिक क्रांती’नंतर चिनी समाजात मोठी अस्थिरता निर्माण झाली.
- १९७८ नंतर, आर्थिक उदारीकरण सुरू झाल्यावर, राष्ट्र एकसंध ठेवण्यासाठी नवीन इतिहासाधारित कथानकाची गरज भासू लागली. त्यानंतर युद्धकाळातील अत्याचारांचा उल्लेख वाढू लागला आणि राष्ट्रवादाची चौकट त्या आधारे बांधली गेली.
जपानची भूमिका आणि विवाद (Japan’s Official Position and Ongoing Controversies)
१९८०च्या दशकात जपानने आपल्या शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये युद्धगुन्ह्यांचे वर्णन कमी करून दाखवण्याचा प्रयत्न केला. या कृतीमुळे चीनमध्ये तीव्र निषेध आणि मोठी प्रतिक्रिया उमटली. जपानी सरकारने नानजिंगमध्ये झालेल्या हत्याकांडाची कबुली दिली आहे, मात्र ‘बळींची अचूक संख्या विविध मतांवर अवलंबून आहे’ असे सांगून, राजकीय दबाव आणि देशातील उजव्या विचारसरणीच्या गटांच्या प्रभावामुळे, त्यांनी पूर्णपणे स्पष्ट आणि निश्चित स्वीकृती देणे टाळले (Fogel, 2000).

घटना चीन-जपान संबंधांमध्ये आजही संवेदनशील का? (Why the Nanjing Massacre Still Affects China–Japan Relations?)
चीनच्या दृष्टीने नानजिंगची घटना ही त्यांच्या ‘शतकभराच्या अपमान’ या व्यापक ऐतिहासिक कथानकाचा एक महत्त्वाचा भाग आहे. ज्यामध्ये १९व्या शतकातील पाश्चात्त्य साम्राज्यांनी केलेली दडपशाही आणि त्यानंतरचे जपानी आक्रमण यांचा समावेश होतो. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी या इतिहासाचा उपयोग करून, पाश्चात्त्य देशांकडून होणारी चीनवरील टीका ही पुन्हा एकदा देशाला दबावाखाली ठेवण्याच्या प्रयत्नासारखी असल्याचे प्रतिपादन केले आहे.

२०१४: चीनचा राष्ट्रीय स्मृतिदिन
- २०१४ साली प्रथमच चीनने नानजिंग नरसंहाराचा राज्यस्तरीय स्मृतिदिन साजरा केला. शी जिनपिंग म्हणाले होते की, “या नरसंहाराला नाकारणाऱ्यांना इतिहास, ३ लाख मृतात्मे आणि शांतता प्रिय जगातील लोक परवानगी देणार नाहीत.”
- “इतिहासकार Rana Mitter (2013) यांच्या मते, या युद्धकालीन इतिहास वापर चीन आपल्या सध्याच्या ‘अहंमन्य नसलेल्या, शांततामूल्यांना बांधिल असलेल्या आणि सहअस्तित्वाकडे वाटचाल करणाऱ्या महाशक्ती’ या प्रतिमेला बळकटी देण्यासाठीही वापरतो(Mitter, 2013).”
Reference List
Chang, I. (1997). The Rape of Nanking. New York: Basic Books.
Fogel, J. A. (2000). The Nanjing Massacre in History and Historiography. Berkeley: University of California Press.
Mitter, R. (2013). Forgotten Ally: China’s World War II, 1937–1945. Boston: Houghton Mifflin Harcourt.
Tokyo War Crimes Tribunal records
Reputed global media archives (Guardian, NYT)
