विश्लेषण : अँजिओप्लास्टी म्हणजे काय? नारायण राणेंवर करण्यात आलेल्या ‘स्टेंट अँजिओप्लास्टी’त नेमकं काय केलं जातं?

अँजिओप्लास्टी का करायची?, ती कशी केली जाते?, स्टेंट म्हणजे काय?, त्यांचा वापर कसा केला जातो? अँजिओप्लास्टी केल्यानंतर काय होतं?, काय काळजी घ्यायची असते?

What is Angioplasty Surgery
What is Angioplasty Surgery: भारतामध्येसुद्धा १९८५ पासून या पद्धतीचा उपयोग करणे सुरू झाले (फाइल फोटो सौजन्य रॉयटर्स)

Narayan Rane Undergoes Angioplasty: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर लीलावती रुग्णालयामध्ये शुक्रवारी अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्यांची प्रकृती स्थिर असून दोन दिवसांमध्ये रुग्णालयातून त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. राणे यांच्यावर याआधी २००९ मध्ये अँजिओप्लास्टी झाली होती. राणे यांच्यावर अँजिओग्राफी केल्यावर रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या आढळून आल्या. त्यानंतर ज्येष्ठ डॉक्टर के. मॅथ्यू यांनी राणेंवर अँजिओप्लास्टी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, नारायण राणे नियमित तपासणीसाठी लिलावती रुग्णालयात आले होते. यावेळी अँजिओग्राफी करण्यात आली असता काही ब्लॉक आढळले. यानंतर शुक्रवारी साकळी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. लिलावती रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, नारायण राणे यांना दोन स्टेंट्सची (हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमण्या आणि रक्तवाहिन्या दाबल्या जाऊ नये म्हणून बसवला जाणार जाळीसारखा छोटा गोलाकार तुकडा) गरज असून यामधील एक बसवण्यात आला आहे. तर दुसरा स्टेंट नंतर बसवण्यात येणार आहे. हल्लीच्या काळात हृदयविकारावरच्या उपचारांमधला महत्त्वाचा भाग म्हणजे अँजिओप्लास्टी. (What Is Coronary Angioplasty And Stent Insertion) ती का करायची?, ती कशी केली जाते?, स्टेंट म्हणजे काय?, त्यांचा वापर कसा केला जातो? अँजिओप्लास्टी केल्यानंतर काय होतं?, काय काळजी घ्यायची असते?, याबद्दल सर्वांना माहीत असलीच पाहिजे. याचसंदर्भात डॉ. गजानन रत्नपारखी यांनी लिहिलेल्या एका माहितीपर लेखामधून हृदयावर होणाऱ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या शस्त्रक्रीयांसंदर्भात सविस्तर जाणून घेऊयात…

कोरोनरी अँजिओप्लास्टी
१९७७ साली डॉ. ग्रुंझिग यांनी मनुष्याच्या कोरोनरी आर्टरीची अँजिओप्लास्टी यशस्वीरीत्या करून दाखवली. त्यानंतर अँजिओप्लास्टी या पद्धतीचा वापर यशस्वीपणे मानवामध्ये होऊ लागला. भारतामध्येसुद्धा १९८५ पासून या पद्धतीचा उपयोग करणे सुरू झाले, पण खऱ्या अर्थाने याचा भरपूर वापर १९९० च्या नंतरच सुरू झाला.

कोरोनरी अ‍ॅन्जिओग्राफी या तपासणीमध्ये जर कोरोनरी आर्टरीला अवरोध (Block) असल्याचे निदर्शनास आले. या अवरोधाची (Block) ट्रीटमेंट म्हणजे प्रत्येक वेळी बायपास सर्जरीच करावी लागते, असे नाही. गेल्या १५ वर्षांपासून कमी त्रासदायक, कमी विच्छेदन लागणारी औषधोपचार पद्धती (Treatment Modality) विकसित झाली असून तिचे नाव आहे.

कोरोनरी अँजिओप्लास्टी नेमकं करतात काय?
यामध्ये कोरोनरी अ‍ॅन्जिओग्राफी-प्रमाणेच मांडीच्या धमनीमधून गाइडिंग कॅथेटर (Guiding Catheter) नामक नळी कोरोनरी आर्टरीच्या मुखाजवळ ठेवण्यात येते. या Catheter  मधून एक सूक्ष्म अशी वायर (Guiding Wire) पुढे सरकवतात. गाइडिंग वायर ही अत्यंत सूक्ष्म, स्टीलपासून बनलेली वायर असून तिचा पृष्ठभाग गुळगुळीत केलेला असतो. तिचा व्यास ०.०१४ इंच इतका छोटा असतो. तिची लांबी १८० सेंमी असते आणि तिचा सुरुवातीचा भाग हा फारच लवचीक व आर्टरीला इजा न करणारा असतो. वेगवेगळय़ा गुणवत्तेच्या गायडिंग वायर (उदा. Soft, Intermediate and Hard) उपलब्ध असून अवरोधप्रमाणे तिची निवड हृदयरोगतज्ज्ञ करतात. या वायरची हालचाल एक्स-रे स्क्रीनिंग मशीनमध्ये व्यवस्थित दिसते आणि बाहेरून या वायरच्या सुरुवातीच्या भागाची हालचाल नियंत्रित करण्यात येते. अशाच नियंत्रित हालचाली करून हृदयरोगतज्ज्ञ ही वायर अवरोध असलेल्या आर्टरीमध्ये शेवटपर्यंत आत ढकलण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून ही वायर अवरोधापलीकडे जाऊन स्थिरावेल. मग या वायरच्या साहाय्याने या वायरवरूनच डायलेटेशन कॅथेटरनामक एक छोटी नळी अवरोधापर्यंत (Block- पर्यंत) नेण्यात येते. या कॅथेटरच्या पुढील टोकास एक लांबूळका फुगा असतो (Baloon Dilation Catheter) एक्स-रे स्क्रीनिंगच्या साहाय्याने समोरच्या मॉनिटरवर बघून हा बलून अवरोध जिथे आहे, त्या योग्य ठिकाणी ठेवून त्याला फुगवण्यात येते. काही वेळानंतर मग फुग्यातील दाब कमी करण्यात येतो. असे दोन.. तीन वेळा करण्यात येते.

अवरोध हा मुख्यत: चरबीने बनलेला असल्यामुळे या बलूनद्वारे दाबला जातो व आर्टरी पूर्ववत होऊ शकते. मग वायर, बलून कॅथेटर आणि गाइडिंग कॅथेटर काढून घेण्यात येतात. अवरोध हा कडक असेल, कॅल्शियमयुक्त असेल तर बलून जास्त दाबाने फुलवतात किंवा एक विशिष्ट पद्धतीचा बलून वापरतात, त्याला कटिंग बलून म्हणतात. याच्या पृष्ठभागावर सूक्ष्म असे ब्लेड लावण्यात आलेले असतात, जेव्हा हा बलून फुलवण्यात येतो तेव्हा या ब्लेडद्वारे कडक अवरोध कापला जातो आणि मग तेथे अँजिओप्लास्टी केली जाते. वेगवेगळय़ा साइजचे आणि गुणवत्तेचे बलून उपलब्ध असून अवरोधानुसार डॉक्टर त्याची निवड करतात.

स्टेंटचा वापर
ज्या ठिकाणी आर्टरीमध्ये अवरोध आहे त्या ठिकाणी आधी बलून अँजिओप्लास्टी केली जाते. त्यानंतर त्याच जागी अवरोधाच्या आकारमानाप्रमाणे स्टेंट निवडला जातो आणि बलून अँजिओप्लास्टी प्रमाणेच त्या ठिकाणी स्टेंट बसवण्यात येतो. वेगवेगळय़ा साइजचे स्टेंट्स उपलब्ध आहेत. हे स्टेंट्स बलून डायलेटेशन कॅथेटरच्या बलूनवर मशीनद्वारे फिट बसवलेला असतो. बलून फुलवला तर स्टेंटसुद्धा आकाराने मोठा होतो आणि जेव्हा बलूनमधील दाब कमी करून बलून काढून टाकण्यात येतो. स्टेंट हा त्याच ठिकाणी फुललेल्या अवस्थेत आर्टरीमध्ये फिट बसतो कारण तो लवचीक पदार्थाने बनलेला नसतो आणि आर्टरीसुद्धा पुन्हा त्या ठिकाणी छोटी होऊ शकत नाही, कारण स्टेंट असे होऊ देत नाही म्हणजे त्या आर्टरीमध्ये पुन्हा आर्टरीच्या लवचीकतेमुळे अवरोध निर्माण होऊ शकत नाही. ही प्रक्रिया पण अत्यंत सुरक्षित असून फक्त अर्ध्या तासामध्ये पूर्ण होऊ शकते आणि रुग्णाला दोन दिवसांत सुट्टी करण्यात येऊ शकते.

स्टेंट अँजिओप्लास्टीच्या मर्यादा
स्टेंट हा मेटलचा बनला असल्यामुळे जेव्हा तो आर्टरीमध्ये बसवण्यात येतो तेव्हा रक्तातील रक्तपेशी (platelets) त्याला चिकटतात आणि पुन्हा अवरोध होण्याची शक्यता १५-२० टक्के एवढी असते. तसेच बलून आणि स्टेंटच्या दाबामुळे रक्तवाहिन्याच्या आतील पापुद्रय़ाला भेगा किंवा छोटे काप पडू शकतात. त्या जखमांमुळे तेथे रक्तवाहिन्यांची पेशी वाढून पुन्हा अवरोध होऊ शकतो. त्यामुळे योग्य आकाराचा स्टेंट निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच बलूनमध्ये दाबसुद्धा योग्य असाच देणे अत्यावश्यक आहे. हे सर्व बघून शास्त्रज्ञांनी स्टेंटमध्ये पुन्हा सुधारणा केल्यात. या स्टेंटना मग काही विशिष्ट पदार्थाचा मुलामा देण्यात येतो. जेणे करून पुन्हा अवरोध होण्याचे प्रमाण कमी होईल, या स्टेंट्सला ‘कोटेड स्टेंट्स’ (coated stents) म्हणतात आणि मुलामा देण्यात उपयोगी असणाऱ्या रसायनांना.. पदार्थाना (coating material) म्हणतात. कार्बन (carbon coated stents), हिऱ्यांची पावडर (Diamond coated stents), प्लॅटिनियम (Platinium coated stents) आणि काही औषधे जसे.. Heparin coated stents, Hirudin coated stents, इत्यादी. हे सर्व पदार्थ रसायने, औषधे रक्तपेशींना स्टेंटवर चिकटण्यास परावृत्त करतात आणि पुन्हा अवरोध (Block) होण्याचे प्रमाण कमी होते. तरीपण हे सर्व करूनसुद्धा (Restenosis) पुन्हा अवरोध होण्याचे प्रमाण ५ ते १० टक्के असू शकते.

१० वर्षांपूर्वी एक नवीन प्रकारचा स्टेंट शोधण्यात आला आहे. यात स्टेंटवर काही औषधांचा मुलामा लावण्यात येतो. हे औषध मग कोरोनरी आर्टरीमध्ये हळूहळू प्रमाणात रिलीज होते, जेणे करून ज्या ठिकाणी स्टेंट बसविण्यात आला आहे, त्या ठिकाणी रक्तपेशी आणि रक्तवाहिन्यांच्या पेशींची वाढच होणार नाही आणि तेथे पुन्हा अवरोध होणार नाही, अशा प्रकारच्या स्टेंट्सना (Drug Eluting Stents) (Medicated Stent) असे म्हणतात आणि या स्टेंटचे पुन्हा ब्लॉक होण्याचे प्रमाण तीन ते चार इतके कमी आहे. या स्टेंटचा वापर भारतातसुद्धा सुरू करण्यात आला असून त्यांचे रिझल्ट भारतातसुद्धा चांगले आहेत. या ‘स्टेंटवर’ सिरोलिमस नावाचे औषध लावलेले आहे. सिरोलिमस औषध कॅन्सरविरोधी म्हणून वापरण्यात येते. यामुळे पेशींची अनावश्यक वाढ होत नाही. जेव्हा हे औषध स्टेंटमधून कोरोनरी आर्टरीमध्ये झिरपते तेव्हा तेथील पेशींच्या अनावश्यक वाढीला आळा बसतो आणि पुन्हा अवरोध होत नाही. ‘डॉ. पॅट्रिक सेरीज’ यांनी या मेडिकेटेड स्टेंट सर्वप्रथम वापरण्यास सुरुवात केली.

मेडिकेटेड स्टेंट्सच्या मर्यादा :
मेडिकेटेड स्टेंट्स (Medicated Stents) मुळे जरी पुन्हा अवरोध होण्याचे प्रमाण ३ ते ५ टक्क्यांवर आले असले तरी मेडिकेटेड स्टेंटचेसुद्धा काही तोटे आहेत.
१) ते धातूने बनलेले असल्यामुळे ते आयुष्यभर हृदयाच्या रोहिणीत राहतात.
२) अशा रुग्णांना आयुष्यभर रक्त पातळ करण्याच्या गोळय़ा (Blood Thinner) खाव्या लागतात. नाहीतर धातू असल्यामुळे रक्ताच्या गुठळय़ा बसून स्टेंट बंद होऊ शकतो.
३) जर पुन्हा अवरोध निर्माण झाला आणि सर्जरीची आवश्यकता लागली तर स्टेंटच्या ठिकाणी ग्राफ्ट (Graft- नवीन रोहिणी) जोडणे शक्य होत नाही.
४) जगातील ५-८ टक्के लोकांना स्टेंटच्या धातूची अ‍ॅलर्जी (Nicket Alloy Allergy) असू शकते.
हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन शास्त्रज्ञांनी एक विरघळणारा स्टेंट (बायोरिसॉर्बेबल व्हॅस्क्युलर स्कॅफॉल्ड Bioreabsorbable Vascular Scafold- BVS) निर्माण केला आहे. याचे संशोधन २००६ पासून सुरू झाले असून काही वर्षांपासून तो चलनात आला आहे. भारतातसुद्धा गेल्या काही महिन्यांपासून वापरात येतो आहे.
बायोरिसॉर्बेबल व्हॅस्क्युलर स्कॅफॉल्ड (BVS) हा हृदयाचा रक्तवाहिनीचा अवरोध दूर करण्याचा अत्याधुनिक उपचार आहे. छोटय़ा धातूच्या जाळीच्या नळीसारखी BVS  ची रचना असते. अवरोध असलेली रोहिणी मोकळी करून हृदयाच्या स्नायूकडे रक्तप्रवाह पुन्हा प्रस्थापित करण्याचे कार्य बीव्हीएस करते. एकदा रोहिणी (Artery) स्वबळांवर उघडी राहायला लागली की बीव्हीएस हळूहळू विरघळतो, संभवत: रक्तवाहिनी पुन्हा नैसर्गिकरीत्या काम करू लागते. (Auto Regulation).
बी.व्ही.एस. (BVS) हा इतर वैद्यकीय साधनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पदार्थापासून तयार केला जातो. (उदा. विरघळणारे टाके) बीव्हीएस दोन वर्षांत विरघळून जातो आणि रोहिणीला नैसर्गिकरीत्या काम करता येते. (Positive Romodeling) बीव्हीएस मुळे पुन्हा अवरोध होण्याचे प्रमाण १% पेक्षा कमी आहे. कारण यात धातू नसल्यामुळे धातूमुळे होणारे पुनर्वरोध टाळता येते. ज्याप्रमाणे ‘मोडलेला’ हात प्लॅस्टरमध्ये बसवून त्याचे संरक्षण केले जाते आणि हाड जुळल्यानंतर प्लॅस्टर काढले जाते. त्याचप्रमाणे बी.व्ही.एस. (BVS) तुमच्या रक्तवाहिनीला ती स्वत:हून खुली राहीपर्यंत आधार देतो आणि नंतर तो विरघळून जातो. बीव्हीएस किंवा डिझॉल्व्हिंग कदाचित भविष्यात हृदयविकाराच्या रुग्णाला मिळालेले वरदान आहे.

अँजिओप्लास्टीचे फायदे
* अँजिओप्लास्टी ही औषधोपचार पद्धती अत्यंत सुरक्षित व कमी वेळात होणारी आहे. (अर्धा तास)
* यात कुठेही चिरफाड करण्याची आवश्यकता नसते, ना भूल (General Anesthesia) देण्याची आवश्यकता असते.
* रुग्ण हा पूर्ण वेळ शुद्धीवर असतो, त्यामुळे जनरल अ‍ॅनेस्थेशिया देण्याचे जे धोके असतात ते टाळता येतात. मुख्यत: वयस्कर लोकांमध्ये ही फारच उपयोगाची गोष्ट आहे.
* ज्यांना हृदयविकारासोबत बाकी आजारसुद्धा आहेत. उदा. दम्याचे विकार, किडनीचे आजार, हाडांचे आजार किंवा फार वयस्कर अशा लोकांना बायपास सर्जरीचा किंवा ४-६ तास अ‍ॅनेस्थेशियाचा त्रास होऊ शकतो. अशा रुग्णांना अँजिओप्लास्टी वरदान ठरू शकते.
* बायपास सर्जरीमध्ये लावण्यात आलेल्या ग्राफ्टमध्ये जर अवरोध निर्माण झाला तरी त्याचीसुद्धा अँजिओप्लास्टी करता येते, त्याला ग्राफ्ट अँजिओप्लास्टी असे म्हणतात.
* जर रुग्ण फारच सीरिअस असेल, शॉकमध्ये असेल किंवा हार्ट अ‍ॅटॅकमुळे त्याचा रक्तदाब कमी झाला असेल. अशा वेळी जर ज्या आर्टरीमुळे हार्ट अ‍ॅटॅक आला आहे, त्या आर्टरीची अँजिओप्लास्टी केल्यास रुग्ण वाचू शकतो किंवा त्याचा रक्तदाब स्थिर होऊ शकतो. Culprit Vessel Angioplasty याला असे म्हणतात.
* ज्यांना एक किंवा दोनच आर्टरीमध्ये मर्यादित अवरोध (Localised Discrete Block) आहे त्यांना अँजिओप्लास्टी फार उपयोगी असते. (Treatment of Choice)
* तरुण रुग्णांवर सहसा अँजिओप्लास्टी करण्यात येते. बायपास सर्जरी टाळता येत असल्यास टाळावी किंवा लांबवावी.
* अँजिओप्लास्टी दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदासुद्धा करता येते. परत परत केल्याने रुग्णाच्या जीविताला काही धोका होत नाही. पण परत परत जर बायपास सर्जरी करण्याचा प्रसंग आलाच तर धोका फार वाढतो.
* यात रक्त देण्याची आवश्यकता नसते. रुग्णाला २-३ दिवसांत सुट्टी करण्यात येते. बायपासच्या रुग्णाला कमीत कमी ८-१० दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवावे लागते आणि ३-४ बाटल्या रक्तपण द्यावे लागते.

अँजिओप्लास्टीचे इतर प्रकार
Atherectomy Procedure (अ‍ॅथरेकटॉमी अँजिओप्लास्टी)
यामध्ये एक कॅथेटरवर बलूनच्या अध्र्या जागी स्कूप (Cutter Scoop) बसवण्यात आलेला असतो आणि अध्र्या भागावर बलून असतो जेव्हा बलून फुलवला जातो तेव्हा त्याच्या विरुद्ध भागातील अवरोध (Block) हा Scoop मध्ये अडकतो किंवा पकडला जातो आणि नंतर हा भाग कटरच्या (cutter) साहाय्याने कापून टाकण्यात येतो. नंतर या कॅथेटरची दिशा बदलून उरलेला अवरोध हळूहळू खरवडून कापून टाकला जातो. कापलेले तुकडे हे कॅथेटरच्या एका विशिष्ट कप्प्यात (Collection Chamber) जमा होतात. नंतर ही पूर्ण सिस्टीम काढून टाकण्यात येते. जर अवरोध फार कडक असतील तर या पद्धतीचा वापर करण्यात येतो. पण याचा वापर आजकाल फारच कमी प्रमाणात होतो.

Rotablation Angioplasty (रोटाब्लेशन अँजिओप्लास्टी)
यामध्ये गाइडिंग कॅथेटरवरून एक छोटासा ‘बर’ (भोवरा) अवरोध असलेल्या जागी नेतात. या ‘बर’ (हा फिरणारा भोवरा) १.२५ मि.मी. ते २.५ मि.मी. आकाराचा असून त्यावर हिऱ्याचे सूक्ष्म तुकडे बसवलेले असतात. हा भोवरा आर्टरीमध्ये गाइडिंग वायरवर एका विशिष्ट मशीनद्वारे मिनिटाला एक लाख ते दीड लाख रोटेशन्स या वेगाने फिरवला जातो. या वेगाने आणि ‘बर’वर बसवलेल्या हिऱ्यांच्या टोकदार तुकडय़ांमुळे अवरोधाचे अत्यंत सूक्ष्म असे तुकडे होऊन अवरोध नाहीसा होतो. हे अवरोधाचे तुकडे इतके छोटे असतात की ते हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधून वाहत निघून जातात. हे तुकडे रक्तपेशींच्या आकारासारखे असल्यामुळे ते सहजतेने रक्तासोबत वाहून जातात. जे अवरोध कॅल्शियममुळे कडक झालेले असतात, अशा स्थितीत Rotablation Angioplasty फारच उपयुक्त असते.

अँजिओप्लास्टीबद्दल गैरसमज
१) हार्ट अ‍ॅटॅक आल्याबरोबर अँजिओप्लास्टी करू नये किंवा रुग्णाला काही काळ स्थिरावल्यावरच ही करावी.
सत्य परिस्थिती : जितक्या लवकर अँजिओप्लास्टी केली जाईल, तितक्या लवकर रुग्ण स्थिरावतो आणि त्याला या प्रक्रियेचा जास्तीत जास्त फायदा होतो. त्याच्या हृदयाची कार्यक्षमता (Ejection Fraction) वाढते म्हणून (Early The Better) हार्ट अ‍ॅटॅक आल्यानंतर पहिल्या काही तासांत अँजिओप्लास्टी करणे हृदयासाठी फारच फायद्याचे आहे. या प्रक्रियेला ‘प्रायमरी अँजिओप्लास्टी’ असे म्हणतात.
हिचे रिझल्ट खूपच चांगले आहेत. विदेशात/ देशात पण ही प्रक्रिया नेहमीची झाली असून याद्वारे हृदयाची कार्यक्षमता नॉर्मल राहण्यास मदत होते आणि हृदयाला कमीत कमी क्षती होते.
२) अँजिओप्लास्टी ही टेम्पररी प्रक्रिया आहे. पुढे बायपास करावीच लागते.
सत्य परिस्थिती : ९०-९५ टक्के लोकांमध्ये अँजिओप्लास्टीचे यश हे आयुष्यभर राहते. उरलेल्या ५ ते १० टक्के लोकांमध्ये जर पुन्हा अवरोध झाल्यास त्यासाठी पुन्हा अँजिओप्लास्टी करता येते.
३) अँजिओप्लास्टी फार धोकादायक (Risky) प्रक्रिया आहे.
सत्य परिस्थिती : अँजिओप्लास्टी ही फार सुरक्षित प्रक्रिया आहे. हृदयरोगतज्ज्ञ ज्यांनी यात विशेष प्रावीण्य मिळवलेले आहे अशा तज्ज्ञ यांच्या हातून या प्रक्रियाची रिस्क अर्धा टक्क्यापेक्षाही कमी असते आणि सर्व सुविधांनी सज्ज असलेल्या हॉस्पिटलमध्ये ही रिस्क शून्य टक्के असते, असे म्हणायला हरकत नाही. महत्त्वाचे म्हणजे योग्य रुग्णाची निवड, योग्य साहित्याची निवड, चांगल्या हॉस्पिटलची निवड आणि निष्णात डॉक्टर यांचा संगम म्हणजे यशस्वी अँजिओप्लास्टी.

अँजिओप्लास्टी झाल्यानंतर पुढे काय?
* अँजिओप्लास्टीनंतर दोन दिवसांत रुग्णालयातून सुट्टी देण्यात येते. दोन-चार दिवस घरीच आराम केल्यानंतर अशा रुग्णाने आपल्या जीवनशैलीबद्दल विचार करावा आणि हृदयविकार का झाला, त्याची कारणमीमांसा करणे आवश्यक आहे. जी काही धोक्याची घटके (Risk Factors) आहेत त्यांना कमी करण्याचा प्रयत्न सुरू करावा.
* दररोज सकाळी योग्य असा व्यायाम करावा. या व्यायामाचे स्वरूप हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टरकडून आखून घ्यावे. डॉक्टर रुग्णाच्या वयाप्रमाणे, वजनाप्रमाणे आणि हृदयाच्या कार्यक्षमतेवरून त्याच्या व्यायामाचे स्वरूप ठरवतात. सकाळी उठून वेगाने चालण्याचा व्यायाम हा सर्व वयाच्या लोकांसाठी चांगला आहे.
* आपल्या शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करावा. वजन कमी करावे आणि कमरेचा घेर कमी करावा. यासाठी आहारात योग्य तो बदल करावा त्यासाठी हृदयरोगतज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञ यांची मदत घ्यावी. भरपूर फळे व भाज्या खाव्यात आणि आहारात कमी कॅलरीचे आणि कमी तेल-तुपाच्या पदार्थाचा समावेश करावा. कडधान्ये, कोंडय़ा-टरफलासह धान्य, डाळी खाव्यात. मासे, चरबीविरहित मांस थोडे आणि कधी कधी खाण्यास हरकत नाही. हिरव्या पालेभाज्या, लसूण, कांदा, काकडी, टोमॅटो, मुळा, बीट, गाजर यांचा भरपूर वापर जेवणात असावा.
* छंद जोपासा, खेळा, तणाव कमी करण्याचा प्रयत्न करावा. आनंदी राहा. मानसिक शांतता व स्थैर्य याचा हृदयरोग्यांना उत्तम फायदा होतो. त्यासाठी ध्यानधारणा, योगा या गोष्टींचा उपयोग करावा.
*शांत झोप शरीराला आवश्यक असते म्हणून रात्री ७ ते ८ तास छान झोप घ्यावी.
* धूम्रपान टाळा, तंबाखूचे सेवन बंद करा. मद्यपान टाळा, फास्ट फूड टाळा, चायनीज फूड टाळा.
* जेवणात मिठाचे प्रमाण कमी करावे, मसाल्यांच्या पदार्थाचा वापर कमी करावा.
* संताप, चिडचिड, वैताग, मत्सर, द्वेष, निराशा यांना सोबत बाळगू नका. सामाजिक असहिष्णुता व एकाकी राहणे टाळा. आनंदी राहा. समाधानी राहा.
* मधुमेह नियंत्रणात ठेवावा.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Narayan rane undergoes angioplasty what is coronary angioplasty and stent insertion scsg

Next Story
विश्लेषण : विद्यापीठ कायद्यातील बदलामागे आहे तरी काय?
फोटो गॅलरी