NASA Satellite Crash Earth Update : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जगभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच आणखी एका नव्या घडामोडीने जगभरातील लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. अमेरिकेच्या नासा या संशोधन संस्थेने अवकाशात सोडलेला एक उपग्रह तब्बल १४ वर्षांनंतर पृथ्वीवर परतणार आहे. हा उपग्रह पृथ्वीच्या दिशेने अतिशय वेगाने येत असल्याने संपूर्ण जगाचा अंत होणार असल्याची आवई उठली आहे. सध्या समाजमाध्यमांवर याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या पार्श्वभूमीवर हा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत नेमका कधी परतणार? त्यामुळे खरेच जीवितहानीचा धोका आहे का? त्याविषयीचा हा आढावा…
पृथ्वीवर परत येणारा उपग्रह कोणता?
अवकाशातून पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या या उपग्रहाचे नाव ‘Van Allen Probe A’ असे आहे. ६०० किलोहून अधिक वजनाचा हा उपग्रह जवळपास १४ वर्षांनंतर पृथ्वीवर परतणार असल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकेच्या संशोधन संस्थेने या उपग्रहाबाबत आधीच माहिती दिली आहे. हा उपग्रह शुक्रवारी (१३ मार्च) रात्री साधारण ७:४५ वाजता पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. मात्र, हा अंदाज २४ तासांपर्यंत मागे-पुढे होऊ शकतो, असे नासाच्या शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. ३० ऑगस्ट २०१२ रोजी नासाकडून ‘Van Allen Probe A’ आणि त्याचा जोडीदार ‘Van Allen Probe B’ या दोन उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले होते. पृथ्वीभोवती असलेल्या रेडिएशन बेल्ट्सचा (विकिरण पट्टे) अभ्यास करण्यासाठी हे दोन्ही उपग्रह अवकाशात सोडण्यात आले होते.
नासाच्या मोहिमेचा उद्देश काय होता?
पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे अडकून राहिलेल्या उच्च-ऊर्जा विकिरण कणांच्या वलयांचा अभ्यास करणे हे त्यामागचे मुख्य उद्दिष्ट होते. सुरुवातीला या मोहिमेचा कालावधी केवळ दोन वर्षांपुरताच मर्यादित होता; परंतु या उपग्रहांची क्षमता इतकी जबरदस्त होती की त्यांनी २०१९ पर्यंत आपले काम सुरूच ठेवले. या सात वर्षांच्या कालावधीत दोन्ही उपग्रहांनी अनेक महत्त्वाचे शोध लावले. विशेष म्हणजे तीव्र सौर हालचालींच्या वेळी तयार होणाऱ्या एका अस्थायी तिसऱ्या रेडिएशन बेल्टचा शोध या उपग्रहांनी लावला. या मोहिमेबाबत जॉन्स हॉपकिन्स अप्लाइड फिजिक्स लॅबच्या प्रकल्प व्यवस्थापक निलोफर मोसावी यांनी सांगितले की- या मोहिमेने अंतराळातील सर्वात धोकादायक क्षेत्रात विनाअडथळा काम करण्याचे सर्व विक्रम मोडले आहेत. ही मोहीम अत्यंत प्रतिकूल वातावरणात टिकून राहण्याच्या क्षमतेचे उत्तम उदाहरण आहे. याच प्रयोगशाळेतील प्रकल्प शास्त्रज्ञ साशा उखोरस्की यांनीही या मोहिमेला रेडिएशन बेल्टच्या भौतिकशास्त्राचे महत्त्व अधोरेखित करणारी मोहीम असेल म्हटले होते. नासाच्या या उपग्रहांनी लावलेल्या शोधाच्या आधारे सौर वाऱ्यांसह रेडिशयन संचार यंत्रणा, नेव्हिगेशन उपग्रह, वीज वितरण व्यवस्था तसेच अवकाशातील अंतराळवीरांवर होणारा परिणाम मोजणे आणि त्याचा अंदाज लावणे शक्य झाल्याचे सांगितले जाते.
आणखी वाचा : तरुणांमध्ये आतड्याचा कॅन्सरचा धोका का वाढतोय? तज्ज्ञांनी सांगितली १० महत्वाची कारणे; कशी घ्याल काळजी?
नासाचा उपग्रह पृथ्वीवर कसा येणार?
२०१९ मध्ये दोन्ही उपग्रहांचे इंधन संपल्यानंतर नासाने त्यांची मोहीम पूर्ण झाल्याचे घोषित केले होते, तेव्हापासून हे दोन्ही उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत निष्क्रिय अवस्थेत फिरत होते. सुरुवातीला नासाने हे उपग्रह २०३४ च्या सुमारास पृथ्वीवर परतणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, सध्या अपेक्षेपेक्षा जास्त सौर क्रियाकलाप होत असल्याने पृथ्वीचे वातावरण थोडे विस्तारले आहे, त्यामुळे कक्षेत फिरणाऱ्या उपग्रहांवर घर्षणाचा प्रभाव वाढला आहे. परिणामी या उपग्रहांचा अवकाशातील कालावधी कमी झाला असून Van Allen Probe A अपेक्षेपेक्षा आधी पृथ्वीच्या दिशेने येत आहे. दुसरीकडे- Van Allen Probe B हा उपग्रह २०३० पूर्वी पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करणार नाही, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हार्वर्ड-स्मिथसोनियन सेंटर फॉर ॲस्ट्रोफिजिक्सचे निवृत्त खगोलभौतिकशास्त्रज्ञ जोनाथन मॅकडॉवेल यांनी सांगितले की- हा उपग्रह लंबवर्तुळाकार कक्षेतून खाली येत आहे आणि त्याचा वेग ताशी सुमारे १७,००० मैल इतका प्रचंड आहे. इतक्या प्रचंड वेगामुळे आणि वातावरणातील बदलांमुळे उपग्रहाचे काही अवशेष उरल्यास ते नेमके कुठे पडतील, याचा अचूक अंदाज लावणे सध्या अशक्य आहे.
हेही वाचा : जगावर तेलसंकट असतानाही भारताने बांगलादेशात ५,००० टन डिझेल का पाठवले? कारण काय?
उपग्रह कोसळल्याने नुकसान होणार का?
पृथ्वीच्या दिशेने वेगाने येणाऱ्या उपग्रहामुळे सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण असले तरीही वैज्ञानिकांनी मात्र घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगितले आहे. नासाच्या मते, हा उपग्रह पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना त्यातील बराचसा भाग प्रचंड उष्णतेमुळे जळून खाक होईल. मात्र, काही छोटे घटक वातावरणातील हा प्रवास सोसून पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. खगोलभौतिकशास्त्रज्ञ जोनाथन मॅकडॉवेल यांनी न्यूयॉर्क टाइम्सशी बोलताना सांगितले की- सामान्य लोकांसाठी हे आकाशातील एका सुंदर प्रकाशझोतासारखे असेल. नशिबाने हा उपग्रह दिसल्यास तो पाहण्याचा आनंद घ्या आणि अजिबात काळजी करू नका. अंतराळातील वस्तू मानवावर पडण्याच्या घटना अत्यंत दुर्मीळ आहेत. १९९७ मध्ये अमेरिकेच्या तुळसा शहरात राहणाऱ्या एका व्यक्तीच्या खांद्यावर अवकाशातून सहा इंचाचा धातूचा तुकडा पडला होता. हा तुकडा Delta rocket चा भाग असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले. २००२ मध्ये उत्तर चीनमध्ये एका उपग्रह प्रक्षेपणांनंतर १० किलोचा ढिगारा पडला होता. यामध्ये एका सहा वर्षांच्या मुलाच्या डोक्याला आणि पायाला किरकोळ दुखापत झाली होती. नासाचा हा उपग्रह कोणाच्याही अंगावर पडण्याची शक्यता नसल्याचे वैज्ञानिकांनी स्पष्ट केले आहे.
