NASA Artemis 2 Mission details and its impact on global space research including ISRO: अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था असलेल्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन म्हणजेच नासाने चंद्र मोहीम हाती घेतली आहे. येत्या काही वर्षांमध्ये चंद्राबाबत संशोधन कसे केले जाईल, याचा एक ‘रोडमॅप’ (नियोजन) नासाने तयार केला आहे. चंद्रावर एक कायमस्वरूपी तळ (बेस) उभारण्याचा नासाने निश्चय केला आहे.
अंतराळवीर चंद्रावरील तळावर अधूनमधून किंवा जास्त कालावधीसाठी वास्तव्य करू शकतील असा एक तळ नासा चंद्रावर उभारणार आहे. नासाकडून या आठवड्यात ‘आर्टेमिस-२’ हे मिशन लाँच केले जाणार आहे. या मिशनअंतर्गत नासाचे चार अंतराळवीर चंद्राच्या अगदी जवळ जाणार आहेत. या मिशनमुळे तब्बल पन्नास वर्षांनंतर मानव पुन्हा एकदा चंद्रावर पाऊल ठेवणार आहे. नासाचे चंद्र मोहिम असलेले ‘आर्टेमिस-२’ मिशन काय आहे? या मिशनने नासाला काय साध्य करायचे आहे? ते सविस्तर जाणून घेऊयात.
चंद्र मोहिमेचा उद्देश काय?
आगामी चंद्र मोहिमेबद्दल नासाकडून अनेक प्रश्नांची उकल करण्यात आली. नासाचे प्रशासक जेरेड आयझॅकमन यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. ५० वर्षांपूर्वी मानव चंद्रावर जाऊन आला आहे, त्यामुळे आता पुन्हा चंद्रावर जाण्याने काय साध्य होणार? असा प्रश्न आयझॅकमन यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना आयझॅकमन म्हणाले, “यावेळी मोहीमेचा उद्देश फक्त चंद्रावर पाऊल टाकणे व झेंडा रोवणे नाही. यावेळी चंद्रावर वास्तव्य करणे हा उद्देश आहे.” दरम्यान, सध्या जगातील अनेक देश व अंतराळ संशोधन संस्था चंद्र मोहीमेसाठी उत्सुक आहेत. ‘अपोलो कार्यक्रमा’अंतर्गत १९६९ ते १९७२ या तीन वर्षांच्या कालावधीत नासाने चंद्र मोहीम राबवल्या होत्या. त्यावेळी १२ अंतराळवीरांनी चंद्रावर पाय ठेवण्याची किमया करून दाखवली होती. नासाकडून आगामी काळात अनेक चंद्र मोहीम हाती घेतल्या जाणार आहेत. त्या मोहीम याआधी झालेल्या चंद्र मोहिमांपेक्षा वेगळ्या असतील असे नासाने सांगितले.
चंद्रावर कायमस्वरूपी तळ
अंतराळ युग सुरू झाल्यानंतर १२ वर्षांनी ‘अपोलो मिशन’अंतर्गत सहावेळा चंद्र मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यानंतर चंद्र मोहीमेसाठी अत्याधिक खर्च लागत असल्याने चंद्र मोहीम रखडल्या होत्या. पुरेसा निधी उपलब्ध होत नव्हता. १९७२ नंतर चंद्र मोहीमेकडे अंतराळ संशोधन संस्थांचे दुर्लक्ष झाले. त्यानंतर २००० मध्ये पुन्हा एकदा मानवाने चंद्राचा नव्याने अभ्यास व संशोधन करण्यास सुरूवात केली. चंद्राच्या कक्षेत फिरून माहिती गोळा करणारे अनेक ऑर्बिटर आकाशात पाठवण्यात आले आहेत. आता पुन्हा एकदा मानव चंद्रावर पाय ठेवण्यासाठी सज्ज झाला आहे. चंद्रावर लाँचपॅड (तळ) उभारून तिथे अंतराळवीर वास्तव्य करतील. त्यानंतर तिथूनच ते ब्रह्मांडात आणखी दूरवर पुढे जाऊन संशोधन करतील, असे नियोजन केले जात आहे.
चंद्रावर मानवाला कायमस्वरूपी अधिवास करता येईल, अशा सुविधा चंद्रावर उभारण्याचे ध्येय नासाने ठेवले आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (इंटरनॅशनल स्पेस स्टेशन) जसे उभारण्यात आले आहे, तसेच तळ चंद्रावर उभारण्यासाठी नासा प्रयत्नशील आहे. चंद्रावर राहता येईल अशी व्यवस्था उभी करण्यासाठी नासाला सलग काही चंद्र मोहीम कराव्या लागतील. त्याद्वारे चंद्रावर रोबोट, उपकरणे, इंधन व इतर आवश्यक साहित्य न्यावे लागेल. चंद्रावर मानवाला दीर्घकाळ वास्तव्य करता येईल अशी व्यवस्था नासाला उभारायची आहे.
या आठवड्यात चार अंतराळवीर मोहिमेवर जाणार
चंद्रावर तळ उभारण्याच्या मोहिमेला नासाने ‘आर्टेमिस कार्यक्रमा’अंतर्गत याआधीच प्रारंभ केला आहे. २०२२ मध्ये मानवरहित ‘ओरिऑन’ नावाचे स्पेसक्राफ्ट सोडण्यात आले होते. हे स्पेसक्राफ्ट चंद्राभोवती फिरून पुन्हा पृथ्वीवर आले. त्यानंतर आता या आठवड्यात सुरू होणाऱ्या मोहिमेअंतर्गत नासा चार अंतराळवीरांना चंद्राच्या अगदी जवळ नेणार आहे. २०२८ मध्ये चंद्रावर मानवी पाऊल पुन्हा ठेवण्याचा नासाचा निर्धार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपण्याआधी नासा चंद्रावर पाऊल ठेवेल, असे आयझॅकमन म्हणाले. नासा दर सहा महिन्याला एक मानवरहित किंवा मानवांसहित स्पेसक्राफ्ट चंद्र मोहिमेसाठी पाठवणार आहे.

ISS सारखे असेल चंद्रावरील तळ?
पृथ्वीपासून चंद्र जवळपास ४ लाख किमी अंतरावर आहे. तर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) पृथ्वीपासून ४०० किमी अंतरावर आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक पुढील तीन ते चार वर्षात निरूपयोगी ठरणार आहे. या स्थानकाने अंतराळ संशोधनात महत्वाची भूमिका बजावली आहे. भारत, चीन व इतर काही देश येत्या काळात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासारखी यंत्रणा आकाशात पाठवणार आहेत. सध्याचे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक बदलून त्याऐवजी दुसरे पाठवण्याचा विचार नासाने केलेला नाही. नासा मंगळ मोहिमेअंतर्गत अणुऊर्जा अवकाशात पाठवणार आहे. मंगळावरील ‘स्पेस रिएक्टर-१ फ्रिडम मिशन’साठी नासाने अणुऊर्जा घेऊन जाणारे स्पेसक्राफ्ट विकसित केले आहे.
भारताचे स्वप्न
नासाने चंद्रावर मानवी पाऊल ठेवण्यासाठी १९६९ मध्ये ‘अपोलो ११’ मिशन हाती घेतले होते. तेव्हा पहिल्यांदा मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले होते. त्यावेळी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो अस्तित्वात नव्हती. या ऐतिहासिक घटनेनंतर एका महिन्यात भारतीय अंतराळ संशोधन उभारण्यात आली. आज इस्रो चंद्रावर मानवाला पाठवण्यासाठी एका स्वतंत्र मोहिमेवर काम करत आहे.
दरम्यान, चंद्रावर मानवाला पाठवण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. भारत, चीन व जपान हे देश त्यासाठी वेगाने पाऊलं उचलत आहेत. रशिया मात्र चंद्रमोहिमेबाबत सध्या निरस आहे. युरोपातील काही देश देखील प्रयत्न करत आहेत. चीनने २०३० पर्यंत, तर भारताने २०४० पर्यंत मानवाला चंद्रावर पाठवण्याचे ध्येय ठेवले आहे. दरम्यान, नासाच्या चंद्रमोहिमेत इस्रो देखील एका कराराअंतर्गत भूमिका बजावत आहे. नासा व इस्रोने काही अंतराळ मोहिम एकत्रितपणे केल्या आहेत. त्यामुळे नासा सध्या करत असलेल्या चंद्रमोहिमेचा इस्रोला भारताच्या चंद्रमोहिमेत फायदा होऊ शकतो.
