NASA Artemis 2 Mission: अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था नासाने आर्टेमिस-२ ही चांद्रमोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत नासाचे चार अंतराळवीर १ एप्रिल रोजी चंद्राच्या अत्यंत जवळ जाऊन १० एप्रिल रोजी पृथ्वीवर परतणार आहेत. नासाने १९६९ ते १९७२ दरम्यान अपोलो मिशन अंतर्गत पहिल्यांदा चांद्रमोहीम राबवली होती. त्यावेळी नासाच्या अंतराळवीरांच्या रूपाने मानवाने पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवले होते. यावेळी चंद्रावर फक्त झेंडा रोवून परतणे हा उद्देश नसल्याचे नासाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. चंद्रावर काही आठवडे, काही महिने किंवा काही वर्षे राहता येईल अशी व्यवस्था उभी करण्याच्या दृष्टीने नासा प्रयत्न करत आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागावर तळ उभारण्याची तयारी नासा करत आहे. त्यासाठी आर्टेमिस मिशनचा वापर नासाकडून केला जाणार आहे. परंतु, चंद्रावर वास्तव्य करताना कोणत्या आव्हानांचा सामना मानवाला करावा लागू शकतो? नासा आर्टेमिस – २ मिशनमधून नेमकं काय करू इच्छित आहे? त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

आर्टेमिस – १ नंतर आर्टेमिस -२ मिशन सध्या सुरू

नासाकडून २०२२ मध्ये आर्टेमिस – १ मिशन लाँच करण्यात आले होते. त्यावेळी मानवरहित स्पेस लाँच सिस्टिम (SLS Rocket) रॉकेट आणि ऑरिऑन हे अंतराळयान चंद्राच्या अगदी जवळ जाऊन पृथ्वीवर परतले होते. नासाचे मिशन यशस्वी झाल्यानंतर आता आर्टेमिस – २ मिशनमध्ये मानवासहित स्पेस लाँच सिस्टिम रॉकेट व ऑरिऑन अंतराळयान चंद्राच्या जवळ गेले आहे. ते दहा दिवसांची चांद्रमोहीम यशस्वी करून १० एप्रिल रोजी पृथ्वीवर अंतराळवीरांना घेऊन परतणार आहे.

आर्टेमिस -२ अंतर्गत कोणत्या गोष्टींचा अभ्यास?

चंद्रावर मानवाला किंवा अंतराळवीरांना वास्तव्य करायचे झाल्यास त्यांना आवश्यक असलेल्या काही गोष्टींचा अभ्यास आर्टेमिस – २ मिशनमध्ये केला जाणार आहे. त्यात जीवन रक्षक प्रणाली (लाइफ सपोर्ट सिस्टिम), मार्ग शोधणारी यंत्रणा (नेव्हिगेशन), अति थंड किंवा अति उष्णतेपासून बचाव कसा करायचा (थर्मल प्रोटेक्शन), अंतराळात दूर वर जाऊन संशोधन करणे (डिप स्पेस ऑपरेशन्स) या गोष्टी मानवासाठी चंद्रावर वास्तव्य करताना कशा साध्य होतील, याबाबत आर्टेमिस – २ मिशनमध्ये गेलेले अंतराळवीर अभ्यास करणार आहेत. नासा चंद्रावर कायमस्वरूपी तळ उभारण्याची तयारी करत आहे. त्यासाठी जवळपास २० अब्ज अमेरिकन डॉलर (१.८५ लाख कोटी रूपये) खर्च करण्याची नासाची तयारी आहे. चंद्रावर तळ उभारल्यास अंतराळवीर तेथे संशोधन करतील. मंगळ मोहिमेच्या दृष्टीने चंद्रावरील तळ भविष्यात महत्वाचे ठरेल अशी दूरदृष्टी नासाने ठेवली आहे.

चंद्रावर मानवी शरीराला सर्वाधिक धोका?

चंद्रावर वास्तव्य करताना सर्वाधिक धोका मानवी आरोग्याला, शरीराला असणार आहे. मानवी शरीरातील प्रत्येक अवयव व प्रक्रियेला चंद्रावर आव्हान निर्माण होईल. चंद्रावरील वातावरणाशी जुळून घेणे सहज शक्य होणार नाही. शारीरिक, मानसिक, रासायनिक, जैविक बदलांचा सामना मानवी शरीराला करावा लागेल. तसेच चंद्रावर गुरूत्वाकर्षण कमी असते. पृथ्वीच्या तुलनेत चंद्रावर एक षष्ठांश (one-sixth) गुरूत्वाकर्षण असते. तसेच वैश्विक किरणांचे उत्सर्जन चंद्रावर मोठ्या प्रमाणात होते. तिथे तापमान अंत्यत थंड किंवा उष्ण असते. चंद्रावरील विषारी धूळ, एकटेपणा, झोपेचे चक्र विस्कळीत होणे आणि दीर्घकाळ बंदीवासात असल्यासारखी भावना या गोष्टींचा मानवाला चंद्रावर सामना करावा लागू शकतो.

चंद्रावर वैश्विक किरणांचा धोका अधिक

चंद्रावर वैश्विक किरणांचे उत्सर्जन होते. त्याचा परिणाम मानवाच्या डीएनएवर, रोगप्रतिकार शक्ती, श्वसन संस्था आणि मेंदूवर होण्याची शक्यता असते. गुरूत्वाकर्षण कमी असल्याने रक्ताभिसरण प्रक्रिया मंदावू शकते, शरीराला होणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यावर, चयापचय क्रियेवर, हाडांवर, मांसपेशींवर, रक्तवाहिन्यांवर, धमन्यांवर परिणाम होऊ शकतो.

मानवी शरीर चंद्रावरील वातावरणाशी जुळवून घेऊ शकते का?

मानवी शरीर हे बाहेरील परिस्थितीशी जुळवून घेण्यात तत्पर असते. त्यामुळे चंद्रावरील परिस्थितीशी देखील मानवी शरीर जुळवून घेऊ शकते, असा विश्वास खगोल शास्त्रज्ञांना वाटतो. परंतु, मानवी शरीराने चंद्राच्या परिस्थितीशी सकारात्मकतेने जुळवून घ्यावे यासाठी काही गोष्टींवर काम करण्याची आवश्यकता शास्त्रज्ञांना वाटते. मानवी शरीर निरोगी ठेवण्यात व्यायाम अत्यंत महत्वाची भूमिका बजावतो.

व्यायाम, आहारात बदल करावा लागेल का? ISS वर अंतराळवीर दोन तास व्यायाम का करतात?

आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात (International Space Station – ISS) काम करणारे अंतराळवीर दररोज दोन तास नियमितपणे व्यायाम करतात. व्यायाम केल्याने त्यांच्या मांसपेशींचे संरक्षण होते, हाडांची घनता कायम राहते. तसेच श्वसन प्रक्रिया सुरळीतपणे चालते. चंद्रावर देखील कोणते व्यायाम मानवासाठी महत्वाचे ठरू शकतात याबाबत शास्त्रज्ञांना अभ्यास करावा लागू शकतो. पृथ्वी बाहेरील परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी आहारात बदल करणे महत्वाचे ठरते. आहारात परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी बदल केल्याने हाडांचे आरोग्य, मांसपेशी, रोगप्रतिकार शक्ती आणि शरीर किरणांच्या उत्सर्जनाला कसा प्रतिसाद देते, या गोष्टींवर नियंत्रण ठेवता येते. चंद्रावर जाणाऱ्या अंतराळवीरांचा आहार सगळ्यांसाठी एकसारखाच असेल यावर शास्त्रज्ञ भर देऊ शकतात. तसेच मानवनिर्मित गुरुत्वाकर्षणाचा वापर चंद्रावर केला जाऊ शकतो. चंद्रावर हरितगृह उभारून अंतराळवीरांना आवश्यक असलेले पोषक तत्वे उत्पादन केली जाऊ शकतात.