NASA Artemis 2 Moon Mission Launch schedule, live streaming links: अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने आर्टेमिस-२ ही चांद्र मोहीम हाती घेतली आहे. आर्टेमिस-२ मोहिमेत नासाचे चार अंतराळवीर चंद्राला प्रदक्षिणा करून पृथ्वीवर परतणार आहेत. दहा दिवसांच्या या मोहिमेसाठी नासाचे अंतराळवीर अंतराळयानातून आज (बुधवारी, १ एप्रिल) उड्डाण घेतील. तब्बल पन्नास वर्षांनंतर चंद्राच्या जवळ मानव जाणार आहे. याआधी १९७२ मध्ये झालेल्या अपोलो मोहिमेत मानवाने पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवले होते. नासाची आज सुरू होणारी चांद्र मोहीम नेमकं कशी असेल, पृथ्वीवरून चंद्राकडे अंतराळयान कसे जाणार आहे, त्याबाबत सविस्तर जाणून घेऊ.
चंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी किती दिवस लागणार?
आर्टेमिस-२ मोहिमेत अंतराळवीरांना चंद्राजवळ पोहोचण्यासाठी तीन ते चार दिवसांचा कालावधी लागणार आहे. अपोलो मोहिमेत देखील इतकाच कालावधी चंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी लागला होता. दरम्यान, मानवरहित यानांचा वापर करण्यात आलेल्या चांद्र मोहिमांसाठी काही आठवडे ते महिन्यांपर्यंतचा कालावधी लागतो. भारताच्या चांद्रयान-३ ला चंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी देखील बराच कालावधी लागला होता. चंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी दूरच्या मार्गांचा वापर केल्यास इंधन कमी लागते, तसेच मोहिमेत होणारा खर्चही परवडणारा असतो. तर चंद्रापर्यंत लवकर पोहोचता येईल असे मार्ग वापरल्यास शक्तिशाली रॉकेटचा वापर करावा लागतो. ते अधिक खर्चिकही असते.
नासाकडून सर्वात शक्तिशाली रॉकेटचा वापर?
आर्टेमिस-२ मोहिमेसाठी नासा एसएलएस रॉकेटचा (SLS Rocket) म्हणजेच स्पेस लाँच सिस्टिम रॉकेटचा वापर करत आहे. नासाकडे सध्या असलेले हे सर्वात शक्तिशाली रॉकेट आहे. दरम्यान, अपोलो मिशनसाठी ‘सॅटर्न व्ही रॉकेट’चा वापर करण्यात आला होता. ते देखील शक्तिशाली रॉकेट म्हणून ओळखले जाते.
नासाकडून आर्टेमिस मोहिमेसाठी वापरले जाणारे एसएलएस रॉकेट व ओरिऑन स्पेसक्राफ्ट हे नव्याने तयार करण्यात आले आहेत. २०२१ मध्ये आर्टेमिस-१ या मोहिमेत एसएलएस रॉकेट व ओरिऑन स्पेसक्राफ्टचा वापर प्रथम करण्यात आला होता. ते मिशन २५ दिवस चालले होते. त्या मिशनमध्ये अनेक प्रयोग करण्यात आले. आता पहिल्यांदाच एसएलएस रॉकेट व ओरिऑन स्पेसक्राफ्टमधून चार अंतराळवीर चंद्रापर्यंत जाणार आहेत. तसेच चंद्राला प्रदक्षिणा करून परतणार आहेत.
कसा असेल अंतराळयानाचा मार्ग?
चंद्राकडे जाण्याचा प्रवास सुरू करण्याआधी अंतराळयान पृथ्वीभोवती दोन प्रदक्षिणा करणार आहे. त्यानंतर चंद्राभोवती प्रदक्षिणा करून त्याचा पृथ्वीवर परतण्याचा प्रवास सुरू होईल. चंद्राभोवती फिरताना ओरिऑन स्पेसक्राफ्ट चंद्राच्या मागील बाजूस म्हणजेच जो भाग पृथ्वीवरून दिसत नाही, त्या भागावरून तब्बल ६५०० किमीचा प्रवास करणार आहे. अंतराळात हा आतापर्यंत केलेला सर्वाधिक प्रवास असेल. नासाला २०२८ मध्ये अंतराळवीरांना चंद्रावर उतरवायचे आहे. त्यासाठी या मोहिमेत सहभागी अंतराळवीर आवश्यक असलेले सर्वच प्रयोग करून पाहणार आहेत. दरम्यान, या मोहिमेत ते चंद्रावर उतरणार नाहीत.
अंतराळवीर किती वाजता झेपावणार चंद्राकडे, थेट प्रक्षेपण कसे पाहाल?
आर्टेमिस-२ मोहिमेअंतर्गत चार अंतराळवीर आज (१ एप्रिल) चंद्राकडे झेपावणार आहेत. अमेरिकेच्या प्रमाण वेळेनुसार १ एप्रिल रोजी संध्याकाळी ६ वाजून २४ मिनिटांनी उड्डाण घेतले जाईल. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुसऱ्या दिवशी पहाटे म्हणजे २ एप्रिल रोजी पहाटे ३ वाजून २४ मिनिटांनी हे उड्डाण होणार आहे. दोन तास आधी याचे थेट प्रक्षेपण NASA+ आणि NASA TV या चॅनेलवर तसेच नासाच्या युट्यूब चॅनेलवरही दाखवले जाईल. त्यात ओरिऑन स्पेसक्राफ्ट आणि एसएलएस सिस्टिम अत्यंत जवळून दाखवली जाणार आहे. नासाची ही मोहीम दहा दिवसांची असेल.
अंतराळयान या मोहिमेत पृथ्वीपासून एकूण ४ लाख १७१ किमी दूर जाणार आहे. तर ११ लाख २ हजार ४०० किमीचा एकूण प्रवास पृथ्वीवर परतण्यापर्यंत अंतराळयान करेल. १० एप्रिल रोजी अंतराळयान पृथ्वीवर परतणार आहे. पॅसिफिक महासागरात अंतराळवीर उतरतील. किमीच्या बाबतीत अपोलो १३ मिशनचा रेकॉर्ड आर्टेमिस-२ मोहिमेत मोडला जाणार आहे.
आर्टेमिस -२ मोहिमेतील अंतराळवीर कोण आहेत ?
आर्टेमिस-२ मिशन अंतर्गत चार अंतराळवीर चंद्राभोवती प्रदक्षिणा मारून पृथ्वीवर परतणार आहेत. रेड वाइजमन हे कमांडर असणार आहेत. तर व्हिक्टरी ग्लोवर हे पायलट असतील. तसेच ख्रिस्टिना कोच व जेरेमी हॅन्सेन हे दोघे मिशन स्पेशलिस्ट असणार आहेत. या मोहिमेनंतर ख्रिस्टिना कोच या चंद्राच्या कक्षेत जाऊन आलेल्या पहिल्या महिला अंतराळवीर ठरतील. दरम्यान, खराब वातावरण किंवा तांत्रिक कारणांमुळे मोहिम पुढे ढकलण्याची वेळ आली तर १० एप्रिल ही मोहीमेची पुढील तारीख निश्चित करण्यात आली आहे.
चांद्र मोहिमेचा उद्देश काय?
आगामी चांद्र मोहिमेबद्दल नासाकडून अनेक प्रश्नांची उकल करण्यात आली. नासाचे प्रशासक जेरेड आयझॅकमन यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. ५० वर्षांपूर्वी मानव चंद्रावर जाऊन आला आहे, त्यामुळे आता पुन्हा चंद्रावर जाण्याने काय साध्य होणार? असा प्रश्न आयझॅकमन यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना आयझॅकमन म्हणाले, “यावेळी मोहीमेचा उद्देश फक्त चंद्रावर पाऊल टाकणे व झेंडा रोवणे नाही. यावेळी चंद्रावर वास्तव्य करणे हा उद्देश आहे.” दरम्यान, सध्या जगातील अनेक देश व अंतराळ संशोधन संस्था चंद्र मोहीमेसाठी उत्सुक आहेत. ‘अपोलो कार्यक्रमा’अंतर्गत १९६९ ते १९७२ या तीन वर्षांच्या कालावधीत नासाने चंद्र मोहीम राबवल्या होत्या. त्यावेळी १२ अंतराळवीरांनी चंद्रावर पाय ठेवण्याची किमया करून दाखवली होती. नासाकडून आगामी काळात अनेक चंद्र मोहीम हाती घेतल्या जाणार आहेत. त्या मोहीम याआधी झालेल्या चंद्र मोहिमांपेक्षा वेगळ्या असतील असे नासाने सांगितले.
