‘नासा’ या अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेने ५० हून अधिक वर्षांनी हाती घेतलेल्या चांद्रमोहिमेस १ एप्रिल रोजी फ्लोरिडात आरंभ झाला. चार अंतराळवीरांना घेऊन ओरायन यानाने भरारी घेतली. या दहा दिवसांच्या आर्टेमिस – टू मोहिमेत अंतराळवीर चंद्राच्या समीप जाऊन परततील, तेथे उतरणार नाहीत.

अंतराळवीर कोण?

आर्टेमिस – टू मोहिमेमध्ये तीन अमेरिकी आणि एका कॅनेडियन अंतराळवीराचा समावेश आहे. या दहा दिवसांच्या मोहिमेत हे चौघे चंद्राला प्रदक्षिणा घालून पृथ्वीकडे परततील. चंद्राच्या पृष्ठभागावर ते उतरणार मात्र नाहीत. मोहिमेचे महत्त्व म्हणजे, १९७२मधील अपोलो १७ मोहिमेनंतर प्रथमच मानव पृथ्वीपासून इतक्या दूरवर जात आहे. आर्टेमिस – टू यशस्वी ठरली, तर या दशकाच्या अखेरीस चंद्रावर पुन्हा मानव पाठवण्याविषयी निर्णय घेतला जाईल.

मोहीम प्रमुख रीड वाइजमन, वैमानिक व्हिक्टर ग्लोव्हर, मोहीम तज्ज्ञ ख्रिस्तिना कॉख हे तिघे अमेरिकेचे आहेत, तर जेरेमी हॅन्सेन हे कॅनडाचे आहेत. या मोहिमेत काही बाबी प्रथमच घडत आहेत. व्हिक्टर ग्लोव्हर हे चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणारे पहिले गौरेतर अंतराळवीर, तर ख्रिस्तिना कॉख पहिल्या महिला अंतराळवीर ठरतील. जेरेमी हॅन्सेन हे यापूर्वी कधीच अंतराळात गेलेले नाहीत. शिवाय चांद्रमोहिमेतील ते पहिले बिगर-अमेरिकी ठरले. मात्र, वाइजमन आणि कॉख या दोघांनाही आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात राहण्याचा अनुभव आहे.

मोहिमेचे स्वरूप काय?

डिसेंबर १९७२ नंतर म्हणजे ५४ वर्षांनी प्रथमच मानव चंद्राच्या इतक्या समीप जात आहे. मात्र आर्टेमिस – टू मोहिमेची तुलना ‘नासा’च्या १९६८मधील अपोलो मोहिमेशी केली जात आहे. त्या मोहिमेतही अंतराळवीरांना चंद्राच्या समीप नेले गेले. त्यावेळी चंद्रावर प्रत्यक्ष उतरण्यासंबंधी गुंतागुंतीचा, उतरण्याच्या ठिकाणांचा अभ्यास केला गेला आणि संबंधित अंतराळवीर पृथ्वीकडे परतले. चंद्रावर १९६९मध्ये प्रत्यक्ष मानव उतरवण्यासाठी ती मोहीम अत्यंत महत्त्वाची ठरली होती.

आर्टेमिस – टू च्या माध्यमातून चंद्रावर उतरण्याच्या नवीन जागांविषयी पाहणी आणि संशोधन केले जाईल. त्यातून भविष्यातील चांद्रमोहिमा आणि त्याही पुढे जाऊन चांद्रवसाहतींविषयी नियोजन, संशोधन अपेक्षित आहे. येत्या सोमवारी म्हणजे ६ एप्रिल रोजी या मोहिमेसाठी वापरलेले ओरायन यान चंद्राच्या समीप जाईल. तेथून ते चंद्राच्या दूरस्थ बाजूकडे प्रवास करेल. तसे करताना ते पृथ्वीपासून २,५२,७९९ मैल किंवा ४,०६,८४०.५ किलोमीटरवर जाईल. आजवर इतक्या दूर कोणताही मानव गेलेला नाही. मोहिमेच्या अखेरीस म्हणजे १० एप्रिल रोजी प्रशांत महासागरात सॅन दियेगोजवळ अंतराळवीरांना घेऊन येणारी कुपी उतरवली जाईल. चंद्राजवळ पोहोचल्यानंतर विविध प्रकारचे प्रयोग हाती घेतले जातील. उपकरणांपासून ते अंतराळवीरांच्या शारीरिक क्षमतांशी संबंधित हे प्रयोग असतील. 

नव्याने चांद्रमोहिमेची गरज का?

अमेरिका आणि तत्कलानी सोव्हिएत रशिया यांच्यात १९५०च्या दशकाच्या अखेरीस आणि १९६०च्या दशकात अंतराळ स्पर्धा तीव्र होती. अंतराळात यान पाठवणे, मानव पाठवणे आणि प्राणी पाठवणे या तिन्ही मोहिमांत सोव्हिएत रशियाने आघाडी घेतली. तेव्हा चांद्रमोहिमेमध्ये आपण पुढे असले पाहिजे, असे त्यावेळच्या अमेरिकी शासकांना, शास्त्रज्ञांना वाटत होते. त्याची मूळ प्रेरणा अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची होती.

‘नासा’च्या चांद्रमोहिमांअंतर्गत जुलै १९६९ ते डिसेंबर १९७२ या काळात १२ अंतराळवीरांना चंद्रावर उतरवण्यात आले. तेव्हा अंतराळ स्पर्धा आपण जिंकली असे मानून अमेरिकेने नंतरच्या काळात अत्यंत खर्चिक अशा चांद्रमोहिमा जवळपास गुंडाळल्याच. विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात चांद्रमोहिमांचे पुनरुज्जीवन करण्याचे ठरले. त्यांच्यानंतर जो बायडेन प्रशासनानेही आर्टेमिस प्रकल्प सुरू ठेवला. गतशतकाच्या मध्यावर अमेरिकेसमोर सोव्हिएत रशियाचे आव्हान होते. यावेळी असे आव्हान चीनचे असेल. कारण सन २०३०मध्ये मानव चंद्रावर उतरवण्यासाठी चीननेही जय्यत तयारी सुरू केली होती. पण चीनशी स्पर्धा करण्यासाठी नव्हे, तर भविष्यकालीन प्रकल्पांसाठी चांद्रमोहिमांचे पुनरुज्जीवन आवश्यक आहे, असे ‘नासा’तर्फे स्पष्ट करण्यात आले.

भविष्यात चंद्रावर मानव कधी?

‘नासा’च्या बरोबरीने स्पेसएक्स, ब्लू ओरिजिन अशा खासगी कंपन्याही अंतराळ यान बनावटीच्या क्षेत्रात जोमाने पुढे आल्या आहेत. प्रस्तुत आर्टेमिस – टू मोहीमही अशा अनेक कंपन्यांच्या संयुक्त भागीदारून पुढे आली. आता पुढील वर्षी आर्टेमिस – थ्री मोहीम हाती घेतली जाईल. या मोहिमेतून आणखी काही प्रयोग केले जातील. ते यशस्वी ठरल्यास २०२८मध्ये आर्टेमिस – फोर आणि आर्टेमिस – फाइव्ह अशा दोन मोहिमांच्या माध्यमातून चंद्रावर मानव उतरवण्याचे प्रयत्न केले जातील. हे वर्ष ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळाचे अखेरचे वर्ष असेल. चंद्रावर पुन्हा मान उतरवण्याची त्यांची जाहीर महत्त्वाकांक्षा त्यावेळी पूर्ण होऊ शकेल.

siddharth.khandekar@expressindia.com