नासा या अमेरिकी अंतराळ संशोधन सस्थेने ५४ वर्षांनंतर मानवी सहभाग असलेली ‘आर्टेमिस- टू’ ही चांद्रमोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत चार अंतराळवीरांना घेऊन ‘ओरायन’ या यानाने नुकतीच अंतराळात भरारी घेतली. ‘आर्टेमिस- टू’ ही मोहीम केवळ विज्ञान व संशोधनापुरतीच मर्यादित नाही, तर ती अमेरिका आणि चीन यांच्यातील अंतराळ स्पर्धेचा भाग आहे. चंद्रावर वर्चस्व मिळवण्यासाठी दोन्ही देश चांद्रमोहिमा आखत असून त्यातून ही अंतराळ स्पर्धा निर्माण झाली आहे.

‘आर्टेमिस- टू’ मोहीम

‘आर्टेमिस- टू’ मोहिमेंतर्गत १ एप्रिल रोजी फ्लोरिडा येथील केनेडी अंतराळ केंद्रातून ओरायन हे यान अंतराळात झेपावले. तीन अमेरिकी आणि एक कॅनेडियन अंतराळवीराचा समावेश असलेली ही चांद्रमोहीम १० दिवसांची आहे. या मोहिमेंतर्गत अंतराळवीर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार नाहीत, पण चंद्राच्या समीप जाऊन परतणार आहेत.

चंद्राजवळ पोहोचल्यानंतर विविध प्रयोग हाती घेण्यात येणार आहेत. ओरायन यान चंद्राच्या दूरस्थ बाजूने प्रवास करणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून चंद्रावर उतरण्याच्या नवीन जागांविषयी पाहणी व संशोधन केले जाणार आहे. पुढील दोन वर्षांत चंद्रावर प्रत्यक्ष मानव उतरवण्याची मोहीम हाती घेण्यात येणार असून त्यासाठी सध्याची मोहीम महत्त्वाची आहे.

‘आर्टेमिस- टू’ मोहिमेद्वारे अंतराळ स्पर्धा?

शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि सोव्हिएत संघ यांच्यात अंतराळ तंत्रज्ञान, उपग्रह आणि मानवी अंतराळ मोहिमांमध्ये सरस ठरण्यासाठीची एक प्रदीर्घ भू-राजकीय रस्सीखेच होती. दोन्ही देश विविध अंतराळ मोहिमा आखून अंतराळात आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र तत्कालीन सोव्हएत संघ म्हणजेच आताच्या रशियाची जागा चीनने घेतली असून चीन गेल्या काही वर्षांपासून विविध चांद्रमोहिमा हाती घेत आहे. त्यामुळे अमेरिका आणि चीन यांच्यात अंतराळ स्पर्धा सुरू आहे.

अमेरिकेने सध्या हाती घेतलेली आर्टेमिस- टू मोहीम केवळ विज्ञान आणि संशोधनापुरती मर्यादित नाही. ही अमेरिका आणि चीन यांच्यातील एका अत्यंत महत्त्वाच्या अंतराळ स्पर्धोचाच भाग आहे. अमेरिका आणि चीन केवळ नवनवीन शोध लावण्यासाठीच नव्हे, तर अंतराळ क्षेत्रात आपले तांत्रिक श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी चंद्रावर झेप घेत आहेत.

दोन महासत्तांमधील ही स्पर्धा कशी रंगली?

अंतराळाकडे कुतूहलाने बघणाऱ्या माणसाला आपण अंतराळात प्रवास करावा असे वाटायला लागले आणि एका नव्या युगाचा प्रारंभ झाला. २० व्या शतकात विज्ञान व तंत्रज्ञानाने प्रगतीची मोठी झेप घेतली आणि अंतराळ क्षेत्रही मानवासाठी खुले झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि सोव्हिएत संघ यांच्यात सुरू असलेल्या शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही महासत्तांमध्ये एकमेकांवर हरप्रकारे कुरघोडी करण्यासाठी सुप्त स्पर्धा सुरू झाली. प्रत्येक क्षेत्रात वर्चस्व मिळविण्याचा या दोन्ही देशांचा प्रयत्न होता, त्यात अंतराळ क्षेत्रही मागे नव्हते.

अंतराळात विविध मोहिमा आखण्यावरून दोन्ही देशांत निर्माण झालेली तीव्र स्पर्धा म्हणजे अंतराळ स्पर्धा. १९६० मध्ये अंतराळात यान पाठवणे, मानव व प्राणी पाठवणे यांमध्ये रशियाने आघाडी घेतल्यानंतर अमेरिकेने चंद्रावर थेट मानव उतरवण्याची मोहीम हाती घेतली आणि ती यशस्वी करून दाखवली. २० जुलै १९६९ रोजी ‘अपोलो ११’ मोहिमेद्वारे नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पहिले पाऊल टाकले. त्यानंतर तीन वर्षांत १२ अंतराळवीरांना चंद्रावर उतरवण्यात आले. केवळ चंद्राचा अभ्यास, संशोधन करणे हाच या मोहिमांचा हेतू नव्हता, तर दोन महासत्तांमध्ये असलेल्या तीव्र स्पर्धेतून या मोहिमा घडत गेल्या.

चीनबरोबर अमेरिकेची अंतराळ स्पर्धा?

शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि सोव्हिएत संघ यांच्यात तांत्रिक वर्चस्वासाठी झालेली स्पर्धा आणि अंतराळ संशोधनात नेतृत्व मिळवण्यासाठी अमेरिका व चीन यांच्यातील सध्याची चुरस यांच्यात साम्य आढळते. चीनने या स्पर्धेसाठी चंद्राला केंद्रबिंदू मानले आहे आणि अमेरिकेच्या आधी चंद्रावर मानव पाठवण्यासाठी ते उत्सुक आहेत. चीनला हे लक्षात आले आहे की आजची अंतराळ कामगिरी केवळ विज्ञानापुरती मर्यादित नाही, तर ती जागतिक दृष्टिकोन घडवण्यासाठीही आहे.

नव्या चांद्रमोहिमांमध्ये सध्याच्या युगातील तांत्रिक श्रेष्ठत्वाची संकल्पना नव्याने परिभाषित करण्याची क्षमता आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून चीन स्वत:च्या महत्त्वाकांक्षी चांद्रमोहिमा आखत आहे. चिनी चंद्रदेवतेच्या नावावरून ‘चांगई’ मोहिमा चीन आखत असून हा अत्यंत तपशीलवार आणि पद्धतशीरपणे विकसित केलेला कार्यक्रम आहे.

‘आर्टेमिस’ कार्यक्रमांतर्गत अमेरिका २०२८ मध्ये चंद्रावर मानवी अवतरण करण्याची योजना आखत आहे, तर चीन २०३० मध्ये संभाव्य अवतरणाचे लक्ष्य ठेवत आहे. चांगई मोहिमांची दिसून आलेली प्रगती दर्शविते की चीन साधारणपणे आपल्या नियोजित वेळेत काम पूर्ण करू शकला आहे, तर आर्टेमिस कार्यक्रमाला अनेकदा विलंब झाला आहे. काही विश्लेषकांच्या मते, चंद्रावरील संशोधनात चीनच्या प्रगतीशी बरोबरी साधण्यासाठी अमेरिका आर्टेमिस कार्यक्रमाला गती देत असावी.

अंतराळ स्पर्धेतून काय साध्य होणार?

अमेरिका आणि चीन दोघेही चंद्राकडे केवळ तांत्रिक श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचे एक पाऊल म्हणून पाहात नाहीत, तर अधिक व्यापक धोरणात्मक उद्दिष्टांसाठी एक व्यासपीठ म्हणून पाहतात, जिथे अजेंडा केवळ प्रतिष्ठेपुरता मर्यादित न राहता त्यात वैज्ञानिक संशोधन, खनिज शोध आणि अखेरीस मानवी वसाहतींची स्थापना यांचा समावेश होतो. चीनने अमेरिकेच्या आधी आपले अंतराळवीर चंद्रावर यशस्वीरीत्या उतरवले, तर तो अंतराळ क्षेत्रात तांत्रिक श्रेष्ठत्वाचा एक शक्तिशाली प्रतीकात्मक संदेश देईल.

आजच्या डिजिटल युगात, जिथे समाजमाध्यमे धारणा घडवण्यात मदत करते, अशा कामगिरीचे मोठे पडसाद उमटतील. मात्र चीनने अद्याप चंद्रावर मानवी उड्डाण मोहीम राबवलेली नाही आणि ‘आर्टेमिस-टू’च्या यशस्वी प्रक्षेपणामुळे अमेरिकेने या उदयोन्मुख चंद्र स्पर्धेत एक प्रकारे सुरुवातीची आघाडी घेतली आहे.