NASA discovers a hidden Cold War era city: ग्रीनलॅण्डच्या हिमाच्छादित बर्फाखाली लपलेले एक रहस्यमय शहर हे हिमयुद्धाच्या कालखंडातील एक गुप्त ठेवा आहे, या शहराचा शोध NASA- नासाच्या शास्त्रज्ञांनी घेतला आहे. स्पेस डॉट कॉमने (Space.com) दिलेल्या वृत्तानुसार २०२४ च्या एप्रिल महिन्यात नासाच्या गल्फस्ट्रीम III विमानाने ग्रीनलॅण्डच्या बर्फाची खोली मोजण्यासाठी रडारचा वापर केला, त्यामुळे विस्मरणात गेलेल्या कॅम्प सेंच्युरी या अमेरिकन लष्करी तळाचे अवशेष उघडकीस आले आहेत.
हिमयुद्धाचा गुप्त प्रकल्प: प्रोजेक्ट आइसवर्म What Was Project Iceworm?
१९६० च्या दशकात बांधलेला कॅम्प सेंच्युरी (Camp Century) हा प्रोजेक्ट आइसवर्म नावाच्या गुप्त प्रकल्पाचा भाग होता. या प्रकल्पाचा उद्देश ग्रीनलॅण्डच्या उत्तरेकडील २,५०० मैल (४,०२३ किमी) लांब बर्फाखाली असलेल्या बोगद्यांमध्ये अण्वस्त्र- लष्करी क्षेपणास्त्रे (IRBM) लपवून ठेवणे आणि सोव्हिएत संघावर हल्ला करण्यासाठी क्षेपणास्त्रे तयार ठेवणे हा होता. नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीचे (JPL) वैज्ञानिक चॅड ग्रीन यांनी सांगितले की, “आम्ही बर्फाचा पाया शोधत होतो आणि अचानक कॅम्प सेंच्युरीचे अवशेष समोर आले. सुरुवातीला ते काय आहेत, हे आम्हाला कळले नाही.” नव्या डेटामध्ये या गुप्त शहरातील संरचना अगदी स्पष्ट दिसत आहेत, या पूर्वी त्या एवढ्या स्पष्ट कधीच दिसल्या नव्हत्या.”
कॅम्प सेंच्युरीची रचना आणि त्याचा इतिहास/ About Camp Century
कॅम्प सेंच्युरी १९५९ मध्ये बांधण्यात आले होते. हे बर्फाखालील बोगद्यांमध्ये तयार करण्यात आले होते, ज्यामध्ये अण्वस्त्रांसाठी जागा होती. मात्र, अधिकचा खर्च आणि बोगद्यांच्या कोसळण्याच्या धोक्यामुळे १९६७ साली ते सोडून देण्यात आले. हा प्रकल्प पूर्णत्वास पोहोचला नाही, परंतु त्याच्या अवशेषांचा शोध आता नासाने नवीन तंत्रज्ञानाद्वारे घेतल्यानंतर इतिहासाचा भाग झालेला हा प्रकल्प पुन्हा चर्चेत आला आहे.
बदलत्या हवामानाचे नवीन संकट
ग्रीनलॅण्डमधील वितळणारे बर्फ नव्या धोक्यांचा इशारा देत आहे. कॅम्प सेंच्युरीमध्ये शस्त्रे, इंधन आणि इतर प्रदूषक आहेत, जी आता जगासमोर उघड होण्याचा धोका निर्माण झाला आहे. २०१७ साली अमेरिकन सरकारने हवामान बदलामुळे होणारा धोका मान्य केला आणि डेन्मार्क व ग्रीनलॅण्डच्या अधिकाऱ्यांनी यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
हवामान बदलाचा परिणाम आणि समुद्र पातळीचा धोका
वैज्ञानिकांनी इशारा दिला आहे की, ग्रीनलॅण्ड येथील बर्फाच्या वितळण्यामुळे अन्य गंभीर परिणाम होऊ शकतात. JPL चे वैज्ञानिक अॅलेक्स गार्डनर सांगतात, “बर्फाची सखोल माहिती मिळाल्याशिवाय बर्फाचा समुद्रातील उष्ण प्रवाह आणि वातावरणावर कसा प्रतिसाद असेल हे समजणे कठीण आहे. यामुळे समुद्र पातळी वाढीच्या दराचा अंदाज लावणे खूपच कठीण होते.”
भविष्यासाठी एक महत्त्वपूर्ण शिकवण
सध्या कॅम्प सेंच्युरी हिमयुद्धाच्या काळाची आठवण करून देते आणि पृथ्वीच्या बर्फाच्छादनांवरील हवामान बदलाच्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी ती वैज्ञानिकांसाठी एक नवी संधीही आहे. नासा या संशोधनातून उष्णतामान वाढीच्या परिणामांवरील भविष्यातील अभ्यासासाठी डेटा गोळा करत आहे. कॅम्प सेंच्युरी फक्त भूतकाळाचा तुकडा नसून बदलत्या हवामानाचे परिणाम समजून घेण्यासाठी एक जागतिक महत्त्वाचा आधार ठरला आहे.
अधिक वाचा: Chewing Gum Waste: च्युइंगम ठरतंय पर्यावरणासाठी घातक!; चघळलेल्या च्युइंगमचं नंतर काय होतं?
निष्कर्ष
कॅम्प सेंच्युरीचा शोध हा केवळ हिमयुद्धाच्या काळातील एक गुप्त ठेवा उघड करणारा ऐतिहासिक शोध नाही, तर तो आजच्या काळातील बदलत्या हवामानाच्या गंभीर परिणामांची जाणीवही करून देतो. हा शोध नासाच्या प्रगत तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करतो, त्यामुळे पृथ्वीच्या बर्फाच्छादनांवरील तापमानवाढीचे परिणाम अधिक स्पष्टपणे समजले जात आहेत. कॅम्प सेंच्युरीच्या अवशेषांमुळे भूतकाळातील तंत्रज्ञान, रणनीती, आणि लष्करी इतिहास यांची ओळख होते, तसेच भविष्यातील हवामान संकटांच्या धोका व्यवस्थापनासाठी विज्ञानाला एक नवी दिशा मिळते. ग्रीनलॅण्डच्या वितळणाऱ्या बर्फामध्ये लपलेल्या या धोक्यांनी शास्त्रज्ञ आणि सरकारांना त्वरित उपाययोजना करण्याचे महत्त्व पटवून दिले आहे. हा शोध केवळ इतिहासप्रेमींना रोमांचित करणारा नाही, तर भविष्यातील पर्यावरणीय धोके आणि त्यावरील उपायांची गरज याकडे लक्ष वेधणारा आहे. हवामान बदलाशी सामना करण्यासाठी आणि भूतकाळातील चुका टाळण्यासाठी वैज्ञानिक संशोधनावर भर द्यावा लागेल, हेच कॅम्प सेंच्युरीचा हा शोध अधोरेखित करतो.