Nashik Jilha Kaydyacha Balekilla Trend : नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कार्यालयाबाहेरील दृश्य आता सर्वांच्याच परिचयाचे झाले आहे. एखाद्या सराईत गुन्हेगाराला पोलीस ठाण्याच्या बाहेर आणले जाते. कधी तो लंगडत असतो; तर कधी त्याला दोन्ही बाजूंनी पोलिसांनी आधार दिलेला असतो. त्यानंतर कॅमेऱ्यासमोर उभ्या केलेल्या आरोपीच्या तोंडातून ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ असे घोषवाक्य वदवून घेतले जाते. गेल्या पाच-सहा महिन्यांत असे अनेक प्रकार घडले असून, आता ही पद्धत राज्यातील इतर ठिकाणीही दिसू लागली आहे. यादरम्यान पोलिसांच्या या कारवाईवर अनेकांनी बोट उठवण्यास सुरुवात केली आहे. त्याविषयीचा हा आढावा…

राज्यभरात पोलिसांची ‘बालेकिल्ला’ मोहीम

काही दिवसांपूर्वी ठाण्यातील मुंब्रा पोलीस ठाण्याबाहेरचा एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत गुन्हेगारीला खतपाणी घालणाऱ्या रील्स तयार केल्याप्रकरणी पोलिसांनी काही तरुणांना कॅमेऱ्यासमोर माफी मागायला लावली. हे तरुण ‘ठाणे जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ अशी घोषणा देताना दिसून आले. त्याच धर्तीवर अकोल्यातील पोलिसांनीही आरोपींचे ‘Before-and-After’ (कारवाईपूर्वी आणि नंतरचे) व्हिडीओ समाजमाध्यमांवर अपलोड करण्यास सुरुवात केली. त्याबाबत मुंब्रा येथील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, यापूर्वीही अशा प्रकारच्या रील्स करणाऱ्यांवर आम्ही कारवाई करीत होतो. मात्र, व्हिडीओ शूट करण्याची पद्धत आणि ‘कायद्याचा बालेकिल्ला’ हा संदर्भ नाशिक पोलिसांच्या शैलीतून घेण्यात आला आहे.

‘बालेकिल्ला’ घोषणा नेमकी आली कुठून?

नाशिक पोलिसांच्या या व्हायरल ट्रेंडवर समाजमाध्यमांवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यावर भाष्य करताना राज्याच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे महानिरीक्षक मनोज कुमार शर्मा यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, अशा प्रकारचे व्हिडीओ तयार करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या अधिकृत सूचना देण्यात आलेल्या नाहीत. त्याचबरोबर पोलिसांच्या अशा कृतींना प्रोत्साहनही दिले जात नाही. दुसरीकडे नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी हा ट्रेंड सुरू केल्याचे उघडपणे मान्य केले. त्यांच्या मते, बालेकिल्ला ही घोषणा प्रत्यक्षात आरोपींनीच दिली होती.

आणखी वाचा : एआयमुळे तब्बल १२,००० भारतीयांच्या नोकऱ्या गेल्या; ओरॅकलने कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात का केली? कारण काय?

नाशिकचे पोलीस आयुक्त काय म्हणाले?

काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये टवाळखोर तरुणांनी नाशिकला ‘गुन्हेगारीचा बालेकिल्ला’, असे संबोधले होते. त्यानंतर पोलिसांनी त्या तरुणांचा शोध घेतला आणि तेच वाक्य उलट अर्थ देऊन वापरले. इथूनच आम्हाला हे घोषवाक्य मिळाले. त्यानंतर अशा गुन्ह्यांमध्ये अटक झालेल्या प्रत्येक आरोपीकडून ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ असे म्हणवून घेतले जाते. म्हणजेच हे शहर कायदा आणि सुव्यवस्थेचा मजबूत बालेकिल्ला आहे, असे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्पष्ट केले. नाशिकमध्ये पोलिसांनी सुरू केलेल्या ‘वॉक ऑफ शेम’ (अपमानास्पद धिंड) या कारवाईला सामोरे जाणाऱ्या गुन्हेगारांची यादी खूपच मोठी आहे. या कारवाईत केवळ गल्लीबोळातील गुंडच नव्हे, तर गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे तरुण आणि राजकीय वजन असलेले नेतेही सामील आहेत.

गुन्हेगारांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांचीच धिंड

आरपीआय नेते व माजी नगरसेवक प्रकाश लोंढे आणि त्यांची मुले, भाजपा पदाधिकारी मामा राजवाडे आणि अलीकडेच महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटकेत असलेला भोंदू अशोक खरातची पोलिसांनी अशाच प्रकार धिंड काढली आहे. गुन्हेगारांना जरब बसवण्यासाठी पोलिसांनी राबवलेल्या या मोहिमेचे आजवर अनेकांनी समर्थन केले आहे. मात्र, टीकाकारांच्या मते, ही कारवाई कायद्याचे उल्लंघन करणारी असून, सार्वजनिक अपमान करणारी ठरत आहे. दी इंडियन एक्स्प्रेसने अशा ५० हून अधिक व्हिडीओंचे विश्लेषण केले असता, काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. नाशिक पोलिसांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून गुन्हेगारांचे काही व्हिडीओ अपलोड केले गेले आहेत. मात्र, काही खासगी अकाउंट्सवरून ते वारंवार व्हायरल केले जात आहेत. या चित्रफितीत आरोपी गुन्हे शाखा कार्यालयाबाहेर अत्यंत अस्वस्थ दिसून येतात. काही जण चक्क कान पकडून उठाबशा काढताना आणि ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ अशी घोषणा देताना दिसतात.

गुन्हेगारी वाढीमागील सामाजिक कारणे

‘Before-and-After’ या पोलीस कारवाईच्या पद्धतीत व्हिडीओच्या पहिल्या भागात आरोपी गुन्हा करताना दाखवला जातो; तर दुसऱ्या भागात तोच आरोपी पोलिसांच्या ताब्यात माफी मागताना दिसतो. गेल्या दशकभरात नाशिक, सातपूर व अंबड यांसारख्या औद्योगिक पट्ट्यात वेगाने विकासकामे झाली आहेत. मात्र, झपाट्याने झालेले शहरीकरण आणि औद्योगिक क्षेत्रातील रोजगाराची घट यांचा फटका अनेक कुटुंबांना बसला आहे. सिडकोसारख्या भागात जिथे पूर्वी गिरणी कामगार राहायचे, तिथे आता बेरोजगार तरुणांमुळे टोळीयुद्ध आणि गुन्हेगारीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. हीच तरुण पिढी आता पोलिसांच्या या ‘कायद्याचा बालेकिल्ला’ मोहिमेचे मुख्य लक्ष्य ठरत आहे.

पोलिसांच्या मोहिमेचा नेमका उद्देश काय?

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये शहरात घडलेल्या एका हत्याकांडाच्या घटनेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकचा दौरा केला होता. कोणत्याही राजकीय दबावाशिवाय गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी आयुक्तांना दिले होते. त्यानंतर पोलिसांच्या या कारवाईने अधिक वेग घेतला. पोलीस आयुक्त कर्णिक यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, गुन्हेगारांनी तयार केलेल्या रील्समुळे तरुण पिढी भरकटत आहे. काही व्हिडीओंमध्ये तरुण मुले रस्त्यावरील गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्या रॅप गाण्यांवर रील्स तयार करतात. अशा लोकांमुळे प्रभावित होणाऱ्या तरुणांना त्यांच्या कृत्याचा शेवट काय होतो, हे आम्हाला दाखवून द्यायचे आहे. ते पुढे म्हणाले की, आम्ही सायबर पोलिसांना अशा रील्समधील लोकांचा शोध घेण्यास सांगितले असून, गंभीर प्रकरणांत गुन्हे दाखल केले जात आहेत.

हेही वाचा : Donald Trump on Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणातील ५ मुद्द्यांनी वाढवली जगाची चिंता; भारतासाठी धोक्याची घंटा?

पोलिसांकडूनच कायद्याचे उल्लंघन?

महिलांची छेडछाड आणि गुन्हेगारीला लगाम लावण्याच्या उद्देशाने नाशिक पोलिसांनी राबवलेल्या ‘कायद्याचा बालेकिल्ला’ या मोहिमेचे सुरुवातीला कौतुक झाले; पण आता मात्र कारवाईच्या या स्वरूपावर अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या अनेक व्हिडीओंमध्ये पोलिसांकडून संशयित गुन्हेगाराला बेदम मारहाण केली जात असल्याचे दिसून येत आहे. भद्रकाली पोलीस ठाण्यांतर्गत कठाडा परिसरातील असाच एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या अतिरेकी कारवाईवर अनेकांनी टीकेची झोड उठवली आहे. नियमानुसार पोलिसांना शारीरिक बळाचा वापर करण्यास परवानगी नसते.

पोलिसांनी फेटाळले मारहाणीचे आरोप

आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला न्यायमूर्ती कोठडीतील छळाबाबत विचारत असतात. आरोपींची सार्वजनिक धिंड काढणे काढल्याने कायद्याचे उल्लंघन होते, असे कायदेतज्ज्ञांचे मत आहे. यादरम्यान नाशिक पोलिसांनी आरोपींना मारहाणीचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. जेव्हा एका अधिकाऱ्याला विचारण्यात आले की, व्हिडीओमध्ये आरोपी लंगडताना का दिसतात? तेव्हा ते म्हणाले की, आम्हाला याबाबत कल्पना नाही… एक-दोन प्रकरणांत आरोपींच्या चपला तुटलेल्या होत्या आणि त्यामुळेच त्यांना व्यवस्थित चालता येत नव्हते.