नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील उधमाळ गावाने नैसर्गिकरित्या स्वच्छ आणि अंधारमय आकाशाच्या संवर्धनाच्या दिशेने पाऊल टाकले आहे. रात्रीच्या पर्यावरणाची पुनर्स्थापना आणि प्रकाश प्रदूषणापासून संरक्षणासाठी कार्यरत ‘डार्कस्काय इंटरनॅशनल’ या संस्थेकडून प्रमाणित होणारे उधमाळ हे भारतातील पहिले ‘डार्क स्काय समुदाय’ गाव ठरण्याच्या मार्गावर आहे.
वाढत्या प्रकाश प्रदूषणाचा त्रास काय आहे?
पृथ्वीवरील बहुसंख्य लोकसंख्या प्रकाश प्रदूषित आकाशाखाली राहत असल्याने अतिरिक्त कृत्रिम प्रकाश ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील चिंतेची बाब झाली आहे. जिथे नैसर्गिक अंधार असायला हवा, तिथे मानवनिर्मित प्रकाश पसरला आहे. त्याची तीव्रता आणि चकाकी डोळ्यांना अस्वस्थ करते. मानवी वस्ती असलेल्या भागांवरील रात्रीचे आकाश उजळणे, जिथे प्रकाशाची आवश्यकता नाही तिथेही त्याचा अतिक्रमणासारखा वापर होणे, यामुळे पर्यावरणातील नैसर्गिक दिवस-रात्र चक्रात व्यत्यय येत आहे. इमारतींवरील बाह्य व अंतर्गत रोषणाई, जाहिरात फलक, कारखाने, पथदिवे आणि प्रकाशमान क्रीडांगणे अशा अनेक घटकांमुळे प्रकाश प्रदूषणात भर पडत आहे.
हे प्रदूषण किती गंभीर आहे?
अब्जावधी वर्षांपासून संपूर्ण जीवसृष्टी पृथ्वीवरील दिवस-रात्रीच्या नैसर्गिक लयीवर अवलंबून आहे. ही लय वनस्पती आणि प्राण्यांच्या जैविक प्रक्रियांमध्ये अंतर्भूत आहे. मात्र, मानवाने रात्री कृत्रिम प्रकाशाने उजळल्याने हे नैसर्गिक चक्र विस्कळीत होत असल्याकडे ‘डार्कस्काय इंटरनॅशनल’ या संस्थेने लक्ष वेधले आहे. या प्रदूषणाचा उभयचर, पक्षी, सस्तन प्राणी, कीटक आणि वनस्पतींवर नकारात्मक, काही वेळा प्राणघातक परिणाम होतो. कृत्रिम प्रकाशामुळे समुद्री कासवांच्या पिल्लांच्या जगण्यावरही परिणाम होऊ शकतो. अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये अशी उदाहरणे आढळतात. कृत्रिम प्रकाशामुळे मानवी झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होऊन विविध आरोग्यविषयक समस्यांना हातभार लागू शकतो. गरजेपेक्षा अधिक प्रकाश देणे किंवा जिथे गरज नाही तिथे प्रकाशयोजना करणे म्हणजे ऊर्जेची उधळपट्टीच आहे. त्याचे आर्थिक आणि पर्यावरणीय परिणामही होतात. रात्री घराबाहेरील अतिरिक्त रोषणाईमुळे गुन्हेगारी कमी होते किंवा सुरक्षितता वाढतेच असे नाही, असे संस्थेने एका अभ्यासाचा दाखला देत म्हटले आहे. अनियंत्रित बाह्य प्रकाशामुळे ताऱ्यांचे दर्शनही झाकोळले जात आहे. त्यामुळे रात्रीबद्दलची मानवी धारणा बदलत असून नैसर्गिक रात्रीचे आकाश हा आपला वैश्विक वारसा असूनही तो नव्या पिढ्यांसाठी झपाट्याने अज्ञात होत आहे.
उधमाळ जगाच्या नकाशावर कसे आले?
अतिरिक्त कृत्रिम प्रकाशामुळे मानव, वन्यजीव आणि हवामानावर होणाऱ्या परिणामांबाबत जनजागृती करण्यासाठी ‘डार्कस्काय’ संस्था जगभरातील तारका उद्याने, समुदाय आणि अन्य ठिकाणांना प्रमाणित करून त्यांच्या संवर्धनासाठी मदत करते. जनजागृती, पाठपुरावा आणि संवर्धनाच्या माध्यमातून रात्रीचे नैसर्गिक वातावरण पूर्ववत करणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. प्रकाश प्रदूषण कमी करणाऱ्या विद्युत उत्पादनांना आणि प्रकाशयोजनांच्या रचनांनाही संस्थेकडून प्रमाणित केले जाते. ‘आंतरराष्ट्रीय गडद आकाश स्थळे’ कार्यक्रमांतर्गत संस्थेकडून अंधाऱ्या आकाशाच्या ठिकाणांचा शोध घेतला जातो. २००१मध्ये ॲरिझोना येथील फ्लॅगस्टाफला पहिले आंतरराष्ट्रीय ‘डार्क स्काय सिटी’ म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर संस्थेने जगभरातील २००हून अधिक ठिकाण प्रमाणित केली आहेत. सध्या सहा खंडांतील २२ देशांमध्ये एक लाख ६० हजार चौरस किलोमीटरपेक्षा अधिक संरक्षित भूभाग आणि रात्रीचे आकाश या उपक्रमांतर्गत समाविष्ट आहे. या यादीत नाशिक जिल्ह्यातील आदिवासीबहुल उधमाळ गावाचा समावेश करण्याचे नियोजन प्रगतिपथावर आहे.
ग्रामसभेचा ठराव, निधीही मंजूर
उधमाळचे नैसर्गिकरीत्या स्वच्छ आणि अंधारमय आकाश विद्यार्थ्यांसाठी अवकाश निरीक्षणाच्या दृष्टीने उपयुक्त ठरू शकते. हे लक्षात घेऊन उधमाळ ग्रामसभेने पेसा कायद्यांतर्गत अंधारमय आकाशाचे संवर्धन आणि जबाबदार बाह्य प्रकाशयोजनांना प्रोत्साहन देणारा ठराव मंजूर केला आहे. प्रकाश प्रदूषण कमी करण्यासाठी सुरक्षित, ऊर्जा कार्यक्षम आणि पर्यावरणस्नेही प्रकाशयोजनांचा अवलंब करण्यावर या उपक्रमात भर देण्यात आला आहे. या उपक्रमासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव आयुष प्रसाद यांनी आदिवासी उपयोजना २०२६-२७ अंतर्गत नावीन्यपूर्ण योजनेतून ४२.१४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. यातून रात्रीच्या आकाशाच्या गुणवत्तेचे मूल्यांकन, जबाबदार प्रकाशयोजना, जनजागृती कार्यक्रम तसेच स्थानिक युवकांचे प्रशिक्षण असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. राज्य शासनाच्या प्रस्तावित ‘राज्य डार्क स्काय धोरणा’शी हा उपक्रम सुसंगत आहे. रात्रीच्या आकाशाच्या संवर्धनाच्या क्षेत्रात नाशिक जिल्हा राज्यात अग्रणी भूमिका बजावेल, असा विश्वास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केला आहे.
खगोल पर्यटनाला चालना
भारतातील पहिले ‘डार्क स्काय गाव’ म्हणून उधमाळचा समावेश नाशिकला खगोल पर्यटन अर्थात ‘ॲस्ट्रो-टुरिझम’च्या नकाशावर आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. रात्रीचे गडद आकाश हे मानवाचे सर्वात प्राचीन शिक्षक मानले जाते. उधमाळचे आकाश जपल्याने विद्यार्थ्यांना आकाशाकडे पाहण्याची, खगोलशास्त्राविषयी जिज्ञासा निर्माण करण्याची, वैज्ञानिक प्रश्न विचारण्याची आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याची प्रेरणा मिळेल, असा प्रशासनाचा विश्वास आहे. रात्रीचे आकाश खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी उपयुक्त असून प्रकाश प्रदूषणाबाबत जागरूकता निर्माण करण्यास आणि रात्री सक्रिय असणाऱ्या प्राण्यांच्या संरक्षणासही मदत करते. नाशिक हे कुंभनगरी आणि धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून पूर्वापार परिचित आहे. कांदा व द्राक्ष उत्पादन-निर्यात, लढाऊ विमान निर्मिती, चलनी नोटांची छपाई आणि औद्योगिक क्षेत्रामुळे नाशिकला वेगळे स्थान आहे. देशाची ‘वाईन कॅपिटल’ म्हणूनही नाशिकची ओळख आहे. पर्यटन विकासात प्रशासनाने आता खगोल पर्यटनाच्या नव्या संकल्पनेवर लक्ष केंद्रित केले आहे. या माध्यमातून उधमाळ आणि परिसरातील गावांमध्ये नैसर्गिक वारसा जपत शाश्वत उपजीविकेच्या नव्या संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे.
aniket.sathe@expressindia.com
