हजारो वर्षांची परंपरा लाभलेल्या नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा पर्वास ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून ०२ मिनिटांच्या मुहूर्तावर प्रारंभ होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि १३ आखाड्यांचे प्रमुख साधू-महंत यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण होणार आहे. कुंभमेळ्यात जगभरातून १२ कोटी भाविक येण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रातील या कुंभमेळ्यास अतिशय भव्य, दिव्य स्वरूप देऊन नाशिक-त्र्यंबकेश्वरला देशाची प्रमुख आध्यात्मिक राजधानी बनवण्याची तयारी करण्यात आली आहे.

देशात कुंभमेळा कुठे, कधी भरतो?

समुद्रमंथनावेळी अमृताचे थेंब सांडल्याने प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर या चार ठिकाणी कुंभमेळा भरतो, असा पुराणात उल्लेख आहे. गुरू ग्रहाचा सिंह राशीत प्रवेश होतो, त्या कालावधीत नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये गोदाकाठावर कुंभमेळा भरतो. कुंभ राशीत गुरू आणि मेषेचा सूर्य असताना हरिद्वार येथे, मेषेचा गुरू व मकर राशीचा सूर्य असताना प्रयागराज येथे, तर सिंह राशीचा गुरू व मेष राशीचा सूर्य असताना उज्जैन येथे कुंभमेळा भरतो, असे नाशिक पुरोहित संघाच्या ‘श्री कुंभपर्व माहात्म्य’ पुस्तकात नमूद आहे. गोदावरी नदी दक्षिणवाहिनी आहे. या नदीच्या उगमस्थानी होणारा नाशिक-त्र्यंबकेश्वरचा कुंभमेळा हा एकमेव कुंभमेळा होय. हरिद्वार, उज्जैन व प्रयागराज या तीन ठिकाणी प्रवाही नदीतीरावर कुंभमेळा भरतो.

नाशिकचे कुंभस्थळ कसे बदलले?

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळा पूर्वी चक्रतीर्थ येथे भरत होता. सन १७९०मध्ये शाही (अमृत) स्नानासाठी मानावरून शैव आणि वैष्णवपंथीय साधूंमध्ये वाद झाला. यात १२ हजार साधूंना प्राण गमवावे लागले, असे सांगितले जाते. या वादावर तत्कालीन पेशव्यांनी (सवाई माधवराव पेशवे) वैष्णवपंथीयांनी नाशिक येथे, तर शैवपंथीयांनी त्र्यंबकेश्वर येथे स्नान करावे, असा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. तेव्हापासून नाशिक येथे रामकुंड आणि त्र्यंबकेश्वरमध्ये कुशावर्त तीर्थ येथे कुंभमेळा भरण्यास सुरुवात झाली. या निवाड्यामुळे स्नानाप्रसंगी शैव आणि वैष्णवपंथीय आखाडे, साधू-महंत थेट समोरासमोर येत नाहीत. वाद, संघर्ष टळला. नाशिक येथे वैष्णवपंथाचे तीन आखाडे असून त्र्यंबकेश्वरमध्ये शैवपंथीयांचे १० आखाडे आहेत. वैष्णवपंथीय साधू-महंत नाशिकच्या रामकुंडात आणि शैवपंथीय त्र्यंबकेश्वरमध्ये कुशावर्तात स्नान करतात. इगतपुरीतील कावनई आणि त्र्यंबकेश्वरलगतचे बेझे (चाकोरे) ही कुंभमेळ्याची मूळ ठिकाणे असल्याचे दावे काही साधू-महंत करतात.

कुंभस्नानाचे महत्त्व

गुरूने सिंह राशीत प्रवेश केल्यानंतर नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ पर्वाला सुरुवात होते. या काळात पृथ्वीवरील सर्व तीर्थ, सर्व नद्या, देवता, ऋषिगण या ठिकाणी निवास करतात, असे पुरोहित सांगतात. सिंहस्थात पर्वणीच्या मुहूर्तावर स्नानाला विशेष महत्त्व असते. या दिवशी स्नान केल्यामुळे सर्व पापे धुतली जातात, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे हा मुहूर्त साधण्यासाठी भाविक मोठी गर्दी करतात. मुख्य तीन पर्वण्यांच्या दिवशी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणी साधू-महंतांची भव्य अमृत (शाही) मिरवणूक निघते. पूर्वी मिरवणुकीत हत्ती, उंटही सहभागी होत असत. कालांतराने त्यावर निर्बंध येऊन त्यांची जागा आलिशान रथ व मोटारींनी घेतली. या मिरवणुकीत प्रत्येक आखाड्याची क्रमवारी, स्नानाचा कालावधी निश्चित असतो. त्यानुसार साधू-महंतांचे स्नान झाल्यानंतर भाविकांना गोदावरीत डुबकी मारता येते.

ध्वजारोहणाची प्रतिष्ठा

भारतीय परंपरेत ध्वजाला केवळ एक चिन्ह नाही. तो धर्माचा दिग्दर्शक, संस्कृतीचा संरक्षक, परंपरेचा वाहक आणि सामूहिक चेतनेचा सजीव आविष्कार मानला गेल्याचे त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे मार्गदर्शक सदानंद टोके सांगतात. ध्वजाचा दंड स्थैर्याचे, तर त्यावरील पताका गतिशीलतेचे प्रतीक आहे. भूमीशी निष्ठेने जोडलेले अधिष्ठान आणि आकाशाकडे झेपावणारे शिखर यांतून जीवनमूल्यांचे जतन करीत उन्नतीच्या दिशेने वाटचाल करण्याचा संदेश प्रकट होतो, असेही त्यांनी म्हटले आहे.

कुंभपर्व २१ महिने

कुंभमेळ्यास ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी ध्वजारोहणाने सुरुवात होत आहे. तर समारोप २४ जुलै २०२८ रोजी ध्वजावतरणाने होईल. म्हणजे यंदाचा कुंभपर्व काळ २१ महिन्यांचा आहे. नाशिक व त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणी प्रथम आणि द्वितीय पर्वणी एकाच दिवशी अनुक्रमे २ ऑगस्ट आणि ३१ ऑगस्ट २०२७ रोजी आहे. यामुळे भाविकांची गर्दी विभागली जाईल, असा अंदाज काढला जातो. नाशिकमध्ये तृतीय पर्वणी ११ सप्टेंबर २०२७ रोजी, तर त्र्यंबकेश्वर येथे १२ सप्टेंबर २०२७ रोजी आहे. पावसाळ्यात सर्व पर्वण्या आहेत. पुढील पाच महिन्यांनी देशभरातील साधू-महंतांचे कुंभनगरीत आगमन होण्यास सुरुवात होईल.

देशाची प्रमुख आध्यात्मिक राजधानी

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यात १२ कोटी भाविक सहभागी होण्याचा अंदाज बांधून संपूर्ण नियोजन झाले आहे. तब्बल ३५ हजार कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांनी हा कुंभमेळा भारलेला असेल. देशातील कोणत्याही कुंभमेळ्यात आजवर झाला नाही, इतका खर्च या कुंभमेळ्यात होत आहे. प्राधिकरणाच्या माहितीनुसार, एकूण निधीपैकी साधू-महंतांच्या निवासव्यवस्थेसाठी उभारल्या जाणाऱ्या साधुग्राम म्हणजे तात्पुरत्या पायाभूत सुविधांसाठी १७ टक्के, तर उर्वरित ८३ टक्के निधी कायमस्वरूपी सुविधांवर खर्च होत आहे. नाशिक परिक्रमा मार्ग अर्थात रिंग रोड, नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्याचे विस्तारीकरण, नाशिकमध्ये २८ प्रमुख रस्ते व पूल, विमानतळ विस्तारीकरण, पाच रेल्वे स्थानकांचे नूतनीकरण, गोदाकाठावर नवीन घाट बांधणी अशी व्यापक कामे प्रगतिपथावर आहेत. या गुंतवणुकीतून नाशिक-त्र्यंबकेश्वरला देशाची प्रमुख आध्यात्मिक राजधानी म्हणून नावारूपास आणले जाणार असल्याचे कुंभमेळा प्राधिकरणाने म्हटले आहे.
aniket.sathe@expressindia.com