शिया दहशतवादी गट हिजबुलचा प्रमुख नेता हसन नसरल्लाह याचा इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मृत्यू झाला. हिजबुलनेही त्याला ‘शहीद’ म्हणत या घटनेला दुजोरा दिला आहे. बेरूतमध्ये इस्रायलने हवाई हल्ल्यात इतर हिजबुल नेत्यांनाही लक्ष्य केले. इस्रायलचे संरक्षणमंत्री योव गॅलंट यांनी या हल्ल्याचे इतिहासातील सर्वांत प्रतिरोधी उपाय म्हणून वर्णन केले. हिजबुलने हसन नसरल्लाह याच्या हत्येनंतर इस्रायलविरोधातील लढाई सुरूच राहील, असेही सांगितले आहे. नसराल्लाहच्या हत्येचा या प्रदेश, जग आणि भारतावर काय परिणाम होणार? ते जाणून घेऊ.

नसरल्लाह हा तीन दशकांपासून हिजबुलचे नेतृत्व करीत होता. इस्रायली सैन्याने त्याची हत्या केल्यानंतर या घटनेची तुलना अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनच्या हत्येशी केली जात आहे; ज्याची हत्या अमेरिकी लष्कराने पाकिस्तानमध्ये केली होती. इस्रायली हेलिकॉप्टर हल्ल्यामध्ये हिजबुलचा माजी प्रमुख अब्बास अल-मुसावीची हत्या झाल्यानंतर १९९२ साली हिजबुलची जबाबदारी नसरल्लाहकडे देण्यात आली होती. मागील अनेक काळात झालेल्या इस्रायली हल्ल्यांमधून नसरल्लाह बचावला होता. इस्रायलींना त्याचा ठावठिकाणा काही काळापासून माहीत होता. तो आपली जागा बदलण्याच्या आधी त्याला ठार मारणे, ही इस्रायलची योजना होती, अशी माहिती ‘न्यू यॉर्क टाइम्स’च्या वृत्तात नोंदवण्यात आली आहे.

हेही वाचा : Mpox in India: देशात मंकीपॉक्सचा धोका वाढतोय का? केंद्राने जारी केलेले नवीन नियम काय आहेत?

नसरल्लाहच्या नेतृत्वाखाली हिजबुलच्या सैनिकांनी २००० आणि २००६ च्या युद्धाच्या शेवटी इस्रायलला लेबनॉनमधून माघार घेण्यास भाग पाडले होते. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी दक्षिण इस्रायलमध्ये पॅलेस्टिनी अतिरेकी गट हमासने केलेल्या हल्ल्यांनंतर, नसरल्लाहने उत्तरेकडील इस्रायलवर हल्ले केले. लेबनॉनच्या सीमेजवळून सुमारे ६३ हजार इस्रायलींना बाहेर काढण्यात आले. इस्रायलला विरोध करणाऱ्या सशस्त्र गटांपैकी नसरल्लाह याच्या नेतृत्वाखालील हिजबुल हा आतापर्यंतचा सर्वांत शक्तिशाली गट आहे. त्याच्या हत्येमुळे इस्रायलला असलेला सर्वांत गंभीर लष्करी धोका आता संपला असल्याचे सांगण्यात येत आहे.

हिजबुलने हसन नसरल्लाह याच्या हत्येनंतर इस्रायलविरोधातील लढाई सुरूच राहील, असे सांगितले आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

१० दिवसांत इस्रायलकडून हिजबुलच्या वरिष्ठ नेतृत्वाचा नायनाट

दोन आठवड्यांपूर्वी लक्ष्यित पेजर आणि वॉकी-टॉकी स्फोटांमध्ये मोठ्या संख्येने वरिष्ठ हिजबुल नेते मारले गेले किंवा गंभीरपणे जखमी झाले. इस्रायलने सुमारे ३,५०० हिजबुल सदस्यांवर हल्ला केला होता. त्यात मध्यम ते वरिष्ठ स्तरीय नेतृत्वाचा समावेश होता. कर्नल ते जनरल या पदांवर असलेले हे नेते पेजर आणि वॉकी-टॉकीद्वारे सुरक्षितपणे संवाद साधत होते. इस्त्रायलने दक्षिण लेबनॉन आणि बेरूतमध्ये हवाई हल्ले सुरू केल्यानंतर हिजबुलला परत हल्ला करता आला नाही. या गटातील मोठमोठ्या नेत्यांच्या हत्या केल्या गेल्यामुळे ही वेळ आल्याचे सांगितले जात आहे. आदेश व नियंत्रणात्मक रचनेवर लक्षणीय परिणाम झाला असल्यामुळे हिजबुलमध्ये निर्णय घेण्याबाबत पोकळी निर्माण झाली आहे.

नसरल्लाहची हत्या इस्रायलसाठी किती महत्त्वाची?

हमास, हिजबुल आणि येमेनमधील हुथी ‘ॲक्सिस ऑफ रेझिस्टन्स’चा भाग आहेत. हे सर्व इस्रायलविरोधी गट आहेत. इराणसमर्थित या सर्व गटांपैकी हिजबुल सर्वांत शक्तिशाली गट आहे. हिजबुलने गेल्या वर्षी हमासवर इस्रायलने केलेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर उत्तर इस्रायल व इस्रायलच्या ताब्यात असलेल्या ‘गोलान हाइट्स’वर आठ हजारहून अधिक रॉकेट सोडली गेली, वाहनांवर टँकविरोधी क्षेपणास्त्रे डागण्यात आली आणि स्फोटकांनी लष्करी लक्ष्यांवर हल्ले केले आहेत. नसरल्लाहची हत्या ही इस्रायलसाठी अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. हा हिजबुल नेतृत्वाचा नायनाट करण्याच्या इस्रायलच्या योजनेचा भाग आहे. इस्रायलने हमासचा राजकीय प्रमुख इस्माईल हनिया आणि ७ ऑक्टोबरच्या हल्ल्याची योजना आखणारा लष्करी कमांडर मोहम्मद देईफ यांचीही हत्या केली आहे. फक्त हमासचा प्रमुख नेता याह्या सिनवार अजूनही जिवंत आहे.

आता हिजबुलच्या भवितव्याचे काय?

नसरल्लाहची हत्या हा हिजबुलसाठी खूप मोठा धक्का आहे. इस्रायलचा कट्टर प्रतिस्पर्धी व हिजबुलचा मुख्य समर्थक या घटनेवर काय प्रतिक्रिया देतो, यावर बरेच काही अवलंबून आहे. नसरल्लाहच्या हत्येनंतर सर्वोच्च नेते इमाम खमैनी यांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. देशाचे नवे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी शपथ घेतल्याच्या एका दिवसानंतर तेहरानमधील सरकारी सेफ हाऊसमध्ये हनियाहची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे इराण आता कोणताही धोका पत्करू इच्छित नाही.

इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सद्वारे समर्थित, प्रशिक्षित व सुसज्ज असलेल्या लेबनॉनमध्ये सुमारे १,००,००० सदस्य असलेल्या हिजबुलसाठी हा महत्त्वाचा क्षण आहे. हिजबुल आता अधिक पेटण्याची शक्यता आहे. मात्र, आता इराण या गटाला पाठिंबा देत राहते की नाही, आणि नेत्यांच्या नवीन पिढीला तयार करण्यात मदत करते की नाही, यावर हिजबुलचे भविष्य आणि दिशा अवलंबून आहे. नसरल्लाहची हत्या हा त्याच्या इतिहासातील सर्वांत मोठा धक्का आहे आणि या गटाचे अस्तित्व टिकवणे हे सध्याचे प्राधान्य असेल.

लेबनॉनसाठीही हा महत्त्वाचा क्षण

हिजबुल गटाचे दहशतवादी व राजकीय, अशा दोन्ही प्रकारचे स्वरूप आहे. बेरूतमध्ये गड आणि ग्रामीण भागात त्यांचे तळ आहेत; जिथे या गटाने बोगद्यांचे जाळे तयार केले आहे आणि जबरदस्त लष्करी मालमत्ता जमा केली आहे. परंतु, हिजबुलला एकेकाळी लोकांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा होता, जो २०१९ पासून कमी झाला आणि लेबनीज लोकांच्या निषेधाचा सामना त्यांना करावा लागला.

सौदी अरेबिया, यूएई व कतार यांची महत्त्वाची भूमिका

सौदी अरेबिया, यूएई व कतार आता संघर्ष किती लवकर संपवता येईल याकडे लक्ष देत आहेत. ते इराणच्या पुढील वाटचालीकडे लक्ष देतील. इराण बदला घेण्याचा निर्णय घेईल की तणाव कमी करण्याच्या दृष्टीने हालचाली करील,यावरून पुढील बाबी ठरतील. रखडलेल्या ओलिस कराराबाबत निर्णय घेणे हे अनेक आव्हानांपैकी एक असेल. कारण- हमासच्या बंदिवासात अजूनही १०१ ओलिस आहेत. त्यापैकी काही मृत झाल्याची भीती आहे. त्यांचे परतणे संघर्षाच्या समाप्तीचे संकेत ठरू शकतात.

हेही वाचा : इस्रायलच्या हल्ल्यात हिजबुल प्रमुख ठार; कोण होता हसन नसरल्लाह? आता हिजबुलचे नेतृत्व कोण करणार?

भारतासाठी हा संघर्ष संपणे किती महत्त्वाचे?

पश्चिम आशियातील आपल्या भागीदारांप्रमाणे विशेषत: सौदी अरेबिया आणि यूएईप्रमाणे या परदेशांत लवकरच स्थिरता परत यावी, अशी भारताची इच्छा आहे. त्यामुळे भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉर यांसारख्या कनेक्टिव्हिटी उपक्रमांवर भर देऊ शकेल आणि त्याच्या समृद्धीवर काम करू शकेल. संघर्षाच्या सुरुवातीपासूनच भारताला पश्चिम आशियाई आणि आखाती प्रदेशांत राहणाऱ्या आणि काम करणाऱ्या सुमारे नऊ दशलक्ष भारतीयांच्या सुरक्षेचीही चिंता आहे. व्यापक संघर्षामुळे त्यांची सुरक्षितता धोक्यात येईल. भारतासाठी दुसरा चिंतेचा विषय म्हणजे भारतातील उर्जेसाठीच्या सुमारे दोन-तृतियांश कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू हे दोन्ही महत्त्वपूर्ण घटक पश्चिम आशियाई व आखाती प्रदेशांद्वारे पुरवले जातात आणि संघर्ष वाढल्यास त्या पुरवठ्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. भारत इस्रायलमधील आपल्या भागीदारांवर आणि येत्या आठवड्यात इराणच्या पुढील पावलांवर लक्ष ठेवून असेल.

Story img Loader