सध्या इंटरनेटवर एक लहान मुलांच्या बाहुलीने आणि त्याभोवती सुरू असलेल्या विकृत ‘ट्रेंड’ने जगभरात संतापजनक वातावरण निर्माण केले आहे. ‘स्ट्रेस रिलीफ’च्या उद्देशाने नजरेत विकली जाणारी ही ‘नताशा डॉल’ आज जागतिक स्तरावर वर्णद्वेष (racism) आणि मानवी संवेदनशीलतेच्या मर्यादांवर प्रश्नचिन्ह उभे करीत आहे.
कशी आहे ही ‘नताशा डॉल’?
नताशा ‘स्क्वीश डॉल’ ही तिला दाबल्यावर पुन्हा आपल्या मूळ आकारात येणारी प्लास्टिक किंवा मऊ रबरासारख्या (thermoplastic rubber) साहित्यानं बनलेली एक बाहुली आहे. मात्र, ही बाहुली सामान्य नाही, तर तिचा रंग गडद काळा असून, तिची ठेवण आफ्रिकन किंवा कृष्णवर्णीय लोकांसाठी बनवण्यात आली आहे.
साधं खेळणं वादाचा विषय कसा बनला?
चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (जसे की Douyin आणि RedNote)वर एका ब्लॉगरनं गंमत म्हणून या बाहुलीला आपली मुलगी मानलं आणि तिचं नाव ‘नताशा’ ठेवलं. एकदा व्हिडीओ शूट करताना ती बाहुली त्याच्या हातातून खाली पडली आणि तिचा आकार वेडावाकडा झाला. हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि इथूनच एका अत्यंत विकृत ट्रेंडला सुरुवात झाली.
‘व्ह्युज’ आणि ‘लाइक्स’साठी हपापलेल्या कन्टेन्ट क्रिएटर्सनी या बाहुलीचा छळ करायला सुरुवात केली. व्हिडीओजमध्ये या कृष्णवर्णीय बाहुलीला:
- जमिनीवर पायदळी तुडवणे
- भिंतीवर किंवा जमिनीवर जोरात आपटणे
- तिचे पाय आणि तोंड अमानुषपणे ताणणे
- काही व्हिडीओजमध्ये तर सुया आणि सुऱ्या टोचून तिचे लचके तोडणे
असे हिंस्त्र प्रकार कॅमेऱ्यासमोर करून, ते ‘मनोरंजन’ म्हणून विकले जाऊ लागले.
जगभरात याविषयी संताप पसरण्यामागचे कारण काय?
हाँगकाँग आणि जगभरातील कृष्णवर्णीय समुदायाने यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. तज्ज्ञांच्या मते, याचे लहान मुलांवर अत्यंत घातक मानसिक परिणाम होत आहेत. जेव्हा कृष्णवर्णीय मुले इंटरनेटवर त्यांच्यासारख्याच दिसणाऱ्या एका बाळाला मारहाण होताना आणि फेकून देताना पाहतात, तेव्हा ‘हे जग आपल्याकडे याच नजरेने पाहते,’ अशी न्यूनगंडाची भावना त्यांच्या मनात घर करू शकते.
हाँगकाँगमध्ये राहणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या एका अभिनेत्रीने आपला अनुभव सांगताना म्हटले, “मी एका लहान मुलीला सुपर मार्केटमध्ये या बाहुलीचे डोळे टोचताना आणि तिला मारताना पाहिले. विचारल्यावर ती म्हणाली, ‘याने माझा ताण कमी होतो.’ एका काळ्या रंगाच्या बाळाला त्रास देऊन कोणाचा ताण कसा कमी होऊ शकतो?”
प्रशासन यावर काय कारवाई करतेय?
हा वाद वाढल्यानंतर चीनच्या ग्राहक संरक्षण संघटना आणि बाजार नियामक यंत्रणांनी (State Administration for Market Regulation) याची दखल घेतली. हे व्हिडीओ अल्पवयीन मुलांसाठी हिंस्त्र आणि घातक असल्याचे सांगत अनेक प्लॅटफॉर्मवरून हे व्हिडीओज हटवण्यात आले आहेत. चीनमधील अनेक शाळांमध्ये या बाहुलीवर बंदी घालण्यात आली आहे. तरीही काही ऑनलाइन शॉपिंग साईट्सवर ही बाहुली अजूनही छुप्या पद्धतीने उपलब्ध असल्याची शक्यता आहे.
डिजिटल युगात ‘लाइक्स’ मिळविण्यासाठी आपण किती खाली घसरणार आहोत? मनोरंजन आणि विकृतीमधील रेषा कधी पुसट झाली, याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आता आली आहे. खेळणी ही मुलांमध्ये प्रेम आणि जिव्हाळा निर्माण करण्यासाठी असतात; कोणाचा द्वेष करण्यासाठी नाही, हेच या ‘नताशा डॉल’च्या वादाने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
