National Teachers Award 2026: कारगिलच्या उंच बर्फाळलेल्या महाकाय डोंगरांवर जेव्हा तोफांचे गोळे येऊन धडाधड आदळतात आणि आजूबाजूच्या खोऱ्यांतून कानठळ्या बसवणारे गोळीबाराचे आवाज ऐकू येतात, तेव्हा एका छोट्याशा अंधाऱ्या खोलीच्या कोपऱ्यात बसून एक शाळकरी मुलगा आजूबाजूला सुरू असलेल्या युद्धातल्या आवाजांकडे दुर्लक्ष करून, आपल्या वह्या-पुस्तकांमध्ये डोकं खुपसून अभ्यास करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होता. या मुलाचं नाव होतं मोहम्मद मुस्तफा कमाल. तथाकथित नव्वदीच्या दशकात राहणारी ही कुटुंबं हिंसाचार, गोळीबाराच्या तीव्र आवाजांची साक्षीदार होती. प्रत्येक दिवस मृत्यूला कवटाळून काढणारी ही कुटुंबं जगण्यासाठी संघर्ष करीत होती. अवेळी, मध्यरात्री तोफांच्या आवाजांमुळे जाग येणं आणि एका क्षणात आपलं राहतं घर युद्धाच्या तोंडी देऊन तात्पुरतं किंवा अनेकदा कायमच सुरक्षित छावण्यांमध्ये आपला जीव मुठीत घेऊन लपून राहणं, अशा परिस्थितीतील या वातावरणात सामान्य आयुष्य जगणं अशक्यप्राय होतं. नियमित शाळा भरणं तर लांबचीच गोष्ट, तूर्तास जरी जिवंत राहिलो तरी दुसरा दिवस बघायला मिळणार यातच ते सुख मानतात. या कठीण परिस्थितीत मुस्तफा यांचं संपूर्ण शालेय शिक्षण तरलं होतं. मात्र, संघर्षाच्या याच अग्नीत तावून-सुलाखून निघालेल्या अनुभवांनी मुस्तफा यांच्या संवेदनशील मनावर एक खोल आणि कायमस्वरूपी ठसा उमटवला. भविष्यात जेव्हा ते स्वतः शिक्षक बनले, तेव्हा याच अनुभवांनी त्यांच्या अध्यापन पद्धतीला एक आगळावेगळा आणि मानवी दृष्टिकोन दिला. शिक्षण म्हणजे केवळ चार भिंतींच्या आत बसून पुस्तकातील निर्जीव अक्षरं कोरणं नव्हे, तर आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या जिवंत जगाशी आणि वास्तव परिस्थितीशी ज्ञानाची नाळ जोडणं, हा विचार त्यांच्या मनात याच काळात पक्का झाला. आज वयाच्या ४१ व्या वर्षी मुस्तफा त्याच सीमावर्ती भागात शिक्षणाची एक नवी पहाट घेऊन आले आहेत.
एका बापाचा त्याग अन् क्रिकेटच्या स्वप्नावर सोडलेलं पाणी!
कारगिलजवळील वाखा या छोट्याशा गावात मुस्तफा यांचा जन्म झाला. मुस्तफा एका सामान्य गरीब कुटुंबात जन्मले. त्यांच्या आयुष्याला आकार देणारे शिल्पकार म्हणजे त्यांचे वडील हाजी मोहम्मद अली. हाजी मोहम्मद अली हे सरकारी हातमाग (handloom) विभागामध्ये कर्मचारी म्हणून काम करीत होते. जेव्हा मुस्तफा पुढच्या शिक्षणासाठी श्रीनगरला गेले तेव्हा मोहम्मद निवृत्त झाले होते. तीन मोठ्या बहिणी, एक लहान बहीण, मुस्तफा आणि आई अशा मोठ्या कुटुंबाचा संपूर्ण भार वडिलांच्या तुटपुंज्या पेन्शनवर येऊन पडला होता. नेहमीप्रमाणे घरात पैशांची चणचण असायची; मात्र वडिलांनी आपल्या मुलांवर आर्थिक संकटाची काळी सावली कधीही पडू दिली नाही. वडिलांच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि त्यांच्या खांद्यावर असलेल्या जबाबदाऱ्यांचा प्रचंड ताण यांची मुस्तफा यांना जाणीव होती. त्यामुळे श्रीनगरमध्ये राहत असताना त्यांनी स्वतःला अभ्यासात पूर्णपणे झोकून दिलं.
मुस्तफा यांना विख्यात क्रिकेटपटू बनायचं होतं. क्रिकेट केवळ त्यांचा छंद नव्हता, तर तो त्यांचा आत्मा होता. श्रीनगरच्या मैदानांवर नेट्समध्ये सराव करणाऱ्या मुलांना पाहून त्यांचंही मन तिथे धाव घेत होतं. जेव्हा त्यांनी चौकशी केली, तेव्हा समजलं की, त्या खासगी क्रिकेट अकादमींचं शुल्क खूपच जास्त प्रमाणात होतं. आपल्या वडिलांच्या महिन्याच्या सेवानिवृत्तिवेतनापेक्षाही त्या अकादमीचे शुल्क जास्त होते. मग मुस्तफा यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपल्या या आवडीला मनातल्या मनात कायमचं मारून टाकलं. आर्थिक गरिबीमुळे स्वतःला ज्या संधी मिळाल्या नाहीत, त्या संधी सीमावर्ती भागातील इतर गरीब मुलांना मिळवून देण्यासाठी त्यांनी शिक्षकी पेशा निवडला.
युद्धाच्या भयाण अवशेषांचे रूपांतर प्रयोगशाळेत कसे घडले?
शिक्षण पूर्ण झाल्यावर मुस्तफा यांनी कारगिलच्या दुर्गम भागात अध्यापनाचं कार्य सुरू केलं. २०२१ ते २०२६ या पाच वर्षांच्या कालावधीत त्यांनी ‘गव्हर्न्मेंट मॉडेल मिडल स्कूल, ग्रोंग पाश्कुम’ या शाळेत इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याची जबाबदारी स्वीकारली. ही शाळा ज्या परिसरात उभी होती, त्या परिसरानं ऐतिहासिक अशा कारगिल युद्धाच्या झळा सोसल्या होत्या. शाळेच्या विस्तीर्ण मैदानावर आणि आवारात सैन्यानं १९९९ च्या युद्धादरम्यान शत्रूच्या गोळीबारापासून बचाव करण्यासाठी काही तात्पुरते बंकर उभारले होते. हे बंकर वर्षानुवर्षे धूळ खात, ओसाड आणि निरुपयोगी अवस्थेत पडून होते. सर्वसामान्यपणे लष्करी बंकर हे जमिनीच्या आत उभे किंवा खंदकासारखे खणलेले असतात. परंतु, ग्रोंग पाश्कुममधील हे बंकर वाळूच्या पोत्यांची भक्कम तटबंदी करून, आडव्या रचनेमध्ये जमिनीवर तयार करण्यात आले होते. काळाच्या ओघात त्या वाळूच्या पोत्यांवर मातीचे थर साचले होते आणि त्या बंकरांना एखाद्या गूढ, अंधाऱ्या नैसर्गिक गुहेचा आकार प्राप्त झाला होता. अनेक वर्षं त्या जागेकडे कोणीही फिरकत नव्हते; तिथे केवळ कचरा साचला होता. एके दिवशी शाळेच्या आवारात फेरफटका मारताना मुस्तफा यांच्या नजरेस हे बंकर पडले. बहुतांश लोकांसाठी ते केवळ युद्धाचे भयाण अवशेष होते; मात्र मुस्तफा यांच्या मनात एक कल्पना आकार घेऊ लागली जर हे बंकर एखाद्या गुहेसारखे दिसत असतील, तर या ओसाड पडलेल्या जागेचा वापर मुलांसाठी एक आगळीवेगळी प्रयोगशाळा तयार करण्यासाठी का करू नये?
मग मुस्तफा यांनी क्षणाचाही विलंब न लावता, आपली कल्पना कृतीत रूपांतरित केली. त्यांनी आपले सहकारी आणि काही उत्सुक विद्यार्थ्यांच्या मदतीने बंकर्स स्वच्छ करून घेतले. त्यांनी थेट त्या ओसाड काळोख्या बंकरचे रूपांतर थेट ‘प्रागैतिहासिक प्रयोगशाळेत’ (Prehistoric Laboratory) केले. साधारणतः इतिहासासारखा रंजक विषय वर्गात वर्षे आणि इसवी सनावली फळ्यावर लिहून शिकवला जातो, त्यामुळे तो विषय क्लिष्ट आणि कंटाळवाणा वाटतो. आदिमानव कसा राहत होता, तो शिकार कशी करायचा, अग्नीचा शोध कसा लागला आणि तो गुहेत थंडी-वाऱ्यापासून स्वतःचं रक्षण कसं करायचा, हे पुस्तकात वाचून समजण्यापेक्षा प्रत्यक्ष गुहेसारख्या वातावरणात जाऊन अनुभवणं कितीतरी पटींनी प्रभावी ठरतं, हा मुस्तफा यांचा विचार होता. ते मुलांना त्या बंकरमध्ये घेऊन जाऊ लागले. तिथे गारगोटीचे दगड एकमेकांवर घासून ठिणगी कशी पडते, आदिमानवाचे दैनंदिन आयुष्य कसे होते, याची प्रात्यक्षिके त्या विद्यार्थ्यांसमोर केली जाऊ लागली. अंधाऱ्या बंकरमध्ये बसून जेव्हा मुलं हा इतिहास ऐकत आणि पाहत, तेव्हा त्यांच्या डोळ्यांसमोर हजारो वर्षांपूर्वीचा काळ जिवंत होत असे. परिणाम असा झाला की, ज्या मुलांना इतिहासाचा तास म्हणजे झोप काढण्याची वेळ वाटायची, तीच मुलं आता त्या तासाची आतुरतेनं वाट पाहू लागली. विद्यार्थ्यांचा वर्गातील सहभाग प्रचंड वाढला आणि ते कोणत्याही पाठांतराशिवाय ऐतिहासिक घटनांचं विश्लेषण करू लागले. भारत सरकारच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात (NEP) ज्या ‘अनुभवातून शिक्षणावर’ (Experiential Learning) सर्वाधिक भर दिला गेला आहे, ते धोरण मुस्तफा यांनी कोणत्याही मोठ्या अनुदानाशिवाय स्वतःच्या कल्पकतेनं प्रत्यक्ष जमिनीवर उतरवून दाखवलं होतं. केवळ इतिहासच नाही, तर समाजशास्त्र, राज्यशास्त्रासारखे विषयसुद्धा अशाच पद्धतीनं शिकवायला सुरुवात केली.
इतिहासाला मिळालेली ‘प्रात्यक्षकीय’ची पावती आणि चिमुरड्याचा तो दगड
मुस्तफा यांच्या अध्यापन प्रवासात दोन प्रसंग निरंतर प्रेरणा देणारे ठरले: एका विद्यार्थ्याने इतिहासाला विज्ञानासारखा ‘प्रात्यक्षकीय’ विषय मानून, त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीची केलेली प्रशंसा, आणि बालवाडीतील चिमुरड्यानं कुतूहलानं शोधून आणलेला एक अनोखा दगड, जो त्यांनी मुलांमधील उपजत शोधक वृत्तीचं प्रतीक म्हणून आजही घरात जपून ठेवला आहे. हे दोन्ही प्रसंग पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन मुलांमध्ये निर्माण झालेली जिज्ञासा आणि अनुभवातून शिकण्याचे यश अधोरेखित करतात.
सोनम वांगचुक यांची शाबासकी ते राष्ट्रपती भवनाचा सर्वोच्च सन्मान!
मुस्तफा यांनी लडाख शिक्षक संघटनेचं दशकभर नेतृत्व करीत दुर्गम भागातील शाळांचं चित्र पूर्णपणे बदललं. त्यांच्या या ‘तळागाळातील दृष्टिकोना’ची सोनम वांगचुक यांनी प्रशंसा केली आणि या कार्यासाठी त्यांना २०२१ चा लडाख राज्य पुरस्कार मिळाला. तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षकांनी AI आणि आधुनिक साधनांचं भान ठेवून विद्यार्थ्यांना घोकंपट्टीऐवजी स्वतंत्र विचार करायला शिकवलं पाहिजे, असा विचार मांडत त्यांनी NCERT व अभ्यासक्रम पुनर्रचनेतही मोलाचं योगदान दिलं. नुकतीच UPSC द्वारे वर्ग-२ व्याख्यातापदी निवड झालेल्या मुस्तफा यांना आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ने सन्मानित होणार असून, हा गौरव म्हणजे देशासाठी सक्षम व स्वाभिमानी पिढी घडवण्याची दुप्पट जबाबदारी असल्याचं ते प्रतीक आहे.
