Nature Conservation Day 2026 highlights the rising climate change impact on human survival across the globe. २८ जुलै रोजी साजरा होणारा ‘निसर्ग संवर्धन दिन’ हा केवळ एक प्रतीकात्मक उपक्रम उरलेला नसून, तो मानवी अस्तित्वावर उभा ठाकलेला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण घेतो तो प्रत्येक श्वास, पितो ते पाणी आणि खातो ते अन्न या सर्वांचा उगम निसर्गाच्या परिसंस्थेत दडलेला आहे; मात्र वाढती जंगलतोड आणि हवामान बदलामुळे ही यंत्रणा कोलमडत चालली आहे.
निसर्गव्यवस्थाच धोक्यात
प्रत्येक श्वास, पाणी आणि अन्न या सर्वांचा उगम निसर्गाच्या परिसंस्थेमध्येच आहे आणि निसर्गातील परिसंस्था मानवाने निर्माण केलेल्या नाहीत. जंगलं प्राणवायू तयार करतात, पाणथळ प्रदेश पूराचे पाणी साठवतात, मधमाशा पिकांचे परागीभवन करतात, खारफुटी वादळांपासून किनाऱ्यांचे संरक्षण करते आणि सुपीक मातीतच अन्ननिर्मिती शक्य असते. मात्र जंगलतोड, प्रदूषण, हवामानबदल आणि नैसर्गिक स्रोतांच्या बेसुमार वापरामुळे ही संपूर्ण निसर्गव्यवस्थाच धोक्यात आली आहे.
पृथ्वीची ‘लाईफ सपोर्ट सिस्टम’
२८ जुलैला साजरा होणारा ‘निसर्ग संवर्धन दिन’ हा केवळ प्रतीकात्मक पर्यावरणदिन नाही. तर तो आपल्याला एक अस्वस्थ करणारा प्रश्न विचारतो आहे; निसर्ग नष्ट होत असताना मानवजात पृथ्वीवर किती काळ टिकाव धरू शकेल? वैज्ञानिकांचे उत्तर अगदीच सुस्पष्ट आहे, निसर्गाशिवाय या भूतलावर टिकाव धरणे माणसाला शक्य नाही. निसर्ग म्हणजे केवळ सौंदर्य नव्हे; ती पृथ्वीची ‘लाईफ सपोर्ट सिस्टम’ आहे, याचं भान माणसाने बाळगणं आवश्यक आहे. आपण निसर्गाकडे अनेकदा डोंगर, नद्या, धबधबे, जंगलं आणि वन्यजीव या सौंदर्याच्या रूपात पाहतो. पण पर्यावरणशास्त्रज्ञांच्या दृष्टीने निसर्ग म्हणजे पृथ्वीची सतत कार्यरत राहणारी यंत्रणाच आहे.

मोबदला न घेता परिसंस्था आपल्यासाठी काय करतात?
जंगलं वातावरणातील कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात, नद्या आणि पाणथळ प्रदेश पाण्याचे नैसर्गिक शुद्धीकरण करतात, मधमाशा, फुलपाखरं तसेच परागीभवन करणारे इतर कीटक अन्नपिकांच्या उत्पादनात महत्त्वाची भूमिका बजावतात. खारफुटी आणि प्रवाळभित्ती किनाऱ्यांना वादळांपासून संरक्षण देतात तर, मातीतील सूक्ष्मजीव पोषकद्रव्यांचे विघटन करून खतनिर्मिती करतात, त्याबळावर आपण शेती करतो.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अंदाजानुसार, जगातील अर्ध्याहून अधिक अर्थव्यवस्था थेट किंवा अप्रत्यक्षपणे निसर्गावर अवलंबून आहे. म्हणजे अर्थव्यवस्था आणि निसर्ग हे दोन वेगळे विषय नसून एकाच साखळीचे भाग आहेत.
तंत्रज्ञान परिसंस्था निर्माण करू शकत नाही
मोबाईल, संगणक किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता अनेक कामं करू शकतात; पण श्वास घेण्यासाठी आवश्यक वातावरण, पिण्याचे पाणी आणि अन्न निर्माण करणारी परिसंस्था आजवरचे कोणतेही तंत्रज्ञान निर्माण करू शकलेले नाही. म्हणूनच निसर्गाची काळजी घेणे आवश्यक आहे.
अतिवृष्टी आणि पूर
निसर्गाचा ऱ्हास हा भविष्यातील धोका नाही; तर त्याची चिन्हं आताच स्पष्टपणे दिसत आहेत. अतिवृष्टी आणि पूर अधिक तीव्र होत आहेत. कमी वेळात कोसळणारा प्रचंड पाऊस, अचानक येणारे पूर, उष्णतेच्या लाटा आणि दुष्काळ या घटनांची तीव्रता वाढताना दिसते आहे. जंगलं आणि पाणथळ प्रदेश नष्ट झाल्यावर जमिनीची पाणी शोषण्याची क्षमता कमी होते आणि आपत्तींचा फटका अधिक गंभीर होतो. बेसुमार शहरीकरण झालेल्या मुंबईसाठी ही मोठीच आव्हानात्मक समस्या आहे.
जैवविविधतेचा वेगाने होत असलेला ऱ्हास
गेल्या काही दशकांत वन्यजीवांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे आजवरच्या अनेक जागतिक अभ्यासात लक्षात आले आहे. हा केवळ प्राण्यांच्या संरक्षणाचा प्रश्न नाही; जैवविविधता कमी झाली की, संपूर्ण परिसंस्था कमकुवत होते आणि हवामानबदल व पर्यावरणीय बदलांना तोंड देण्याची तिची क्षमता घटते.
पाण्याचे वाढते संकट
जगातील अनेक शहरांना आता लक्षात आले आहे की, केवळ धरणं आणि जलवाहिन्या म्हणजे पाण्याची खात्री नव्हे तर त्यासाठी जंगलांनी संरक्षित केलेले जलस्रोत अधिक महत्त्वाचे असतात. पाण्याची हमी तिथून येते. याचाच अर्थ, निसर्ग कमकुवत झाला की माणूस अधिक असुरक्षित होतो.
जंगल उभं राहणं फायदेशीर कशासाठी?
जेव्हा एखादा डोंगर आपल्याला हिरवागार दिसतो तेव्हा मुसळधार पावसात त्या जंगलातील झाडं पावसाचा वेग कमी करतात, माती घट्ट धरून ठेवतात त्यामुळे जमिनीची धूप होत नाही आणि पाणी जमिनीत मुरतं. त्या पाण्यामुळे विहिरी आणि झरे जिवंत राहातात, भूजल पातळी व्यवस्थित राहाते. आणि पाणी जमिनीत मुरल्याने खालच्या भागात अचानक पूर येण्याचा धोका कमी होतो.
वारेमाप वृक्षतोड झाली तर…
आता त्याच डोंगरांवर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली तर काय होऊ शकते, याचा अंदाज घेऊ. पाणी वेगाने डोंगरावरून खाली येईल आणि ते खाली येताना सोबत येणारी सुपीक माती वाहून जाईल. खालच्या बाजूस असलेल्या नद्या गाळाने भरतील, त्यामुळे धरणांची क्षमता कमी होईल आणि पर्यायाने खालच्या बाजूस असलेल्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होईल. त्यामुळेच आपण हे लक्षात घ्यायला हवे की, जंगल म्हणजे फक्त लाकूडफाटा नव्हे; तर ते पाणी साठवणारी बँकच आहे. एवढेच नव्हे तर जंगल म्हणजे मातीचे संरक्षण करणारी ढाल, हवामान नियंत्रित करणारी यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापनाची नैसर्गिक व्यवस्था आहे.
प्रेरणादायी उदाहरण- कोस्टा रिका : जंगलतोडीतून पुनरुज्जीवनाकडे
सुदैवाने संवर्धनाचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात, याची अनेक उदाहरणं जगात आहेत. १९८०च्या दशकात कोस्टा रिकामध्ये मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झाली होती. मात्र सरकारने संरक्षित क्षेत्रे, पर्यावरणीय सेवांसाठी आर्थिक प्रोत्साहन आणि कठोर संवर्धन धोरण लागू केले. आज त्या देशातील वनक्षेत्र लक्षणीय वाढले आहे, जैवविविधता पुनरुज्जीवित झाली आहे आणि निसर्ग पर्यटन हा अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार ठरला आहे. या उदाहरणातून लक्षात येते की, एरवी विकास विरुद्ध संवर्धन असे चित्र रंगवले जाते. मात्र दरखेपेस असे असतेच असे नाही.
खारफुटी म्हणजे वादळांविरुद्धची नैसर्गिक भिंत
सुंदरबनसह अनेक ठिकाणी भारतीय किनारपट्टीवर असलेल्या खारफुटीच्या जंगलांनी चक्रीवादळांच्या वेळेस नैसर्गिक भिंत म्हणून किनारी भागांचे संरक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जिथे खारफुटी टिकून आहे, तिथे मोठ्या सागरी लाटांचा परिणाम तुलनेने कमी होतो. २००४ च्या हिंदी महासागरातील त्सुनामीनंतर अनेक अभ्यासकांनी किनारी परिसंस्थांच्या संरक्षणात्मक भूमिकेकडे जगाचे लक्ष वेधले.
भारतासाठी निसर्गसंवर्धन का अत्यावश्यक? भारतासारख्या देशासाठी हा विषय केवळ पर्यावरणवादाचा नाही; तर तो अर्थव्यवस्था, आरोग्य आणि अन्नसुरक्षेचा प्रश्न आहे.
अन्नसुरक्षा
भारतीय शेतीवर अवलंबून असलेला देश आहे, नियमित मान्सून, सुपीक माती, चांगली भूजल पातळी आणि
परागीभवन करणाऱ्या कीटक हे सारे आपल्यासाठी अत्यावश्यक आहेत. आणि हे सारे एकत्र म्हणजेच परिसंस्था. परिसंस्था ढासळली तर उत्पादन घटेल आणि शेतीचा खर्चही वाढेल. त्यामुळे देशाच्या अन्नसुरक्षेसाठी निसर्गाची ही परिसंस्था व्यवस्थित राखणे महत्त्वाचे आहे.
सार्वजनिक आरोग्य
झाडं आणि नैसर्गिक परिसंस्था हवा शुद्ध ठेवण्यास, तापमान कमी करण्यास आणि पाणी स्वच्छ राखण्यास मदत करतात. शहरांमधील वृक्षराजी उष्णतेच्या लाटांमध्ये तापमान कमी करण्याचं काम करते. सध्या अर्बन हीट आयलँड्समुळे शहरांमध्ये उष्मा वाढलेला दिसतो. तो कमी करायचा तर वृक्षराजी राखण्याला पर्याय नाही. सध्याच्या वाढलेल्या प्रदूषणाच्या काळात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थित राखायचे तर झाडांची भूमिका महत्त्वाची असेल.
संवर्धनापेक्षा आपत्तीनंतरचा खर्च अधिक
पूर, दुष्काळ आणि जमिनीची धूप यामुळे पायाभूत सुविधा, शेती, आरोग्य आणि पुनर्वसनावर प्रचंड खर्च होतो. अनेकदा आपत्ती आल्यानंतरचा खर्च हा संवर्धनाच्या खर्चापेक्षा कितीतरी पटींनी जास्त असतो.
‘माझ्यामुळे काय फरक पडणार?’
‘माझ्यामुळे काय फरक पडणार?’ हा विचारच सर्वांत धोकादायक आहे. पर्यावरणाचा ऱ्हास हा कोट्यवधी छोट्या निर्णयांचा परिणाम असतो; संवर्धनही तसंच घडतं. लाखो कुटुंबांनी अन्न वाया घालवणं कमी केलं,
एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळला, पावसाचं पाणी साठवलं, स्थानिक प्रजातींची झाडं लावली, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक वापरली आणि शाश्वत उत्पादनांना प्राधान्य दिलं तर परिसंस्था टिकण्याच्या दृष्टीने तो मोठा महत्त्वाचा भाग असेल. एक झाड किरकोळ वाटू शकतं; पण दहा लाख झाडांनी शहराचं तापमान, हवेची गुणवत्ता आणि जैवविविधता बदलू शकते.
भविष्यातील पिढ्या आपल्याला काय विचारतील?
भविष्यातील पिढी सध्याच्या पिढीला प्रश्न विचारेल की, नद्या का प्रदूषित होऊ दिल्या?, जंगलं नष्ट होत असताना तुमची पिढी शांत का राहिली? भीषण परिणाम माहिती असतानाही संसाधनांचा बेफाम वापर कसा होवू दिला? आपण किती उंच इमारती बांधल्या किंवा किती वेगवान तंत्रज्ञान विकसित केलं यापेक्षा श्वास घेण्याजोगी हवा, पिण्याजोगं पाणी आणि राहण्याजोगं हवामान पुढच्या पिढ्यांना दिलं का, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरेल.
निसर्ग मानवी अस्तित्वाचा केंद्रबिंदू व्हायला हवा…
आपण अनेकदा म्हणतो की, ‘निसर्ग वाचवा’. पण खरं पाहिलं तर निसर्ग मानवापेक्षाही कोटी वर्षे जुना आहे. उल्कापात, हिमयुगं आणि प्रचंड भूगर्भीय उलथापालथीतून तो पुन:पुन्हा उभा राहिला आहे. धोक्यात आहे ती मानवी संस्कृती, हे आपण लक्षात घ्यायला हवं. जंगलं आपल्याला श्वास देतात. नद्या पाणी देतात. माती अन्न देते. महासागर हवामान संतुलित ठेवतात. ही साखळी तुटली तर कोणतीही अर्थव्यवस्था, कोणतेही तंत्रज्ञान आणि कोणतीही राजकीय शक्ती मानवजातीचे भविष्य सुरक्षित ठेवू शकणार नाही. म्हणून निसर्गसंवर्धन म्हणजे झाडांना माणसांपेक्षा महत्त्व देणे नव्हे; तर झाडं, नद्या, माती, पक्षी, कीटक आणि महासागर यांच्या अस्तित्वातच माणसाचं अस्तित्व दडलेलं आहे, हे मान्य करणं होय. मानवजातीला पृथ्वीवर पुढील अनेक शतकं टिकून राहायचं असेल, तर निसर्गसंवर्धन हा पर्यावरणाचा विषय राहू नये; तो राष्ट्रीय विकास, सार्वजनिक आरोग्य आणि मानवी अस्तित्वाचा केंद्रबिंदू व्हायला हवा.
