Pune accident Nawale bridge पुण्यातील नवले पुलावर गुरुवारी (१३ नोव्हेंबर) सायंकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १३ हून अधिक जण गंभीर जखमी झाले. साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून आणि ब्रेक नादुरुस्त होऊन हा अपघात झाला. अवजड साहित्य घेऊन कंटेनर साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. नवले पुलावरील सेल्फी पॉइंटजवळ कंटेनर चालकाच्या वाहनाचे ब्रेक निकामी झाले.

परिणामी त्याने रांगेत असलेल्या पुढील वाहनांना धडक देण्यास सुरुवात केली. जवळपास छोट्या मोठ्या मिळून १० ते १२ वाहनांना कंटेनरने उडवल्यामुळे वाहनांना आग लागली. दोन कंटेनरच्या धडकेत एक कार चेपली गेल्यामुळे त्यातील प्रवाशांना गाडीतून बाहेर पडता आले नाही, त्यामुळे त्यांचा होरपळून जागीच मृत्यू झाला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच पुणे शहर पोलिस आणि पुणे अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

पुणे शहराचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी इतर पोलिस अधिकाऱ्यांसह घटनास्थळाला भेट दिली. नोव्हेंबर २०२२ मध्येही असाच एक अपघात झाला होता, ज्यात तब्बल २५ वाहनांना धडक देण्यात आली होती. पुणे शहरातील अपघातप्रवण ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून ओळखल्या गेलेल्या १९ रस्त्यांच्या यादीत नवले पूल हा सर्वात धोकादायक रस्ता राहिला आहे. या रस्त्यावर सातत्याने अपघात होत असतात, त्यामागील कारणे काय? अपघातांची मालिका कधी थांबणार? अधिकारी, तज्ज्ञ काय सांगतात? जाणून घेऊयात….

नवले पुलावर अपघात होण्याची कारणे काय?

पुणे शहरातील ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून ओळखल्या गेलेल्या १९ रस्त्यांच्या यादीत नवले पूल हा सर्वात धोकादायक रस्ता मानला जात आहे. या १९ ठिकाणी २०२१ मध्ये एकूण २०० अपघात, १०६ मृत्यू आणि १२६ गंभीर जखमींच्या घटनांची नोंद झाली होती. गुरुवारी संध्याकाळी कात्रज-देहू रोड बाह्य वळणावरील नवले पुलावर झालेल्या भीषण अपघाताने हा परिसर एक प्रकारचा ‘मृत्यूचा सापळा’ असल्याचा प्रवाशांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. नव्या कात्रज बोगद्यापासून पुलाकडे येणाऱ्या रस्त्यावर असलेला तीव्र उतार (स्लोप) हे बहुतांश अपघातांचे मूळ कारण आहे. सध्या या रस्त्याचा उतार सुमारे ४.३ टक्के आहे.

तज्ज्ञांच्या मते तो ३ टक्के किंवा त्याहून कमी असावा. वाहतूक तज्ज्ञ, वारंवार प्रवास करणारे लोक आणि परिसरातील रहिवासी यांनी वारंवार होणाऱ्या अपघातांबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे आणि या भागात जीवितहानी टाळण्यासाठी रस्ते अभियांत्रिकीमध्ये मोठे बदल करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले आहे, असे वृत्त ‘द टाईम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) एका अधिकाऱ्याने ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला सांगितले की, “शिंदेवाडी बोगद्यातून बाहेर पडल्यापासून नवले पुलाकडे येईपर्यंत सलग उतार आहे. त्यामुळे, ट्रक आणि कंटेनरचे चालक इंधन वाचवण्यासाठी अनेकदा वाहने ‘न्यूट्रल’मध्ये चालवतात. अनेक प्रकरणांमध्ये असे आढळले आहे की, ‘न्यूट्रल’मध्ये असताना ब्रेक्सचा सतत वापर केल्याने ब्रेक फेल होतात आणि अपघात होतात,” असे ते म्हणाले. नोव्हेंबर २०२२ मध्येही असाच एक अपघात झाला होता, ज्यात २५ वाहनांचे नुकसान झाले होते आणि २० लोक जखमी झाले होते.

ते म्हणाले, “त्यानंतर सुरक्षा सल्लागार, ‘सेव्ह लाईफ फाउंडेशन’ आणि स्थानिक प्रशासनाशी सल्लामसलत करून प्रतिबंधात्मक सुरक्षा उपाययोजना अमलात आणल्या गेल्या. या उपाययोजना केल्यानंतर अपघातांच्या संख्येत घट दिसून आली आहे,” असे अधिकाऱ्याने सांगितले. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे माजी सदस्य बाबा शिंदे यांनी सांगितले की, अवजड वाहने या मार्गावर अनेकदा अतिवेग पकडतात. अशा परिस्थितीत जर एखाद्या वाहनाचे ब्रेक निकामी झाले, तर मोठा अपघात होण्याची शक्यता वाढते. “आम्ही अनेक वर्षांपासून या मार्गाच्या रस्ते अभियांत्रिकीची तपासणी करून बदल करण्याची मागणी करत आहोत, पण या समस्येकडे आतापर्यंत गांभीर्याने पाहिले गेलेले नाही. या मार्गावरील उतार कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “आतापर्यंत अपघातप्रवण क्षेत्राजवळ केलेल्या सर्व उपाययोजना तात्पुरत्या आहेत, जसे की सूचनाफलक, रम्बल स्ट्रिप्स किंवा स्पीड अरेस्टर्स. या मार्गाचा आढावा घेण्यासाठी आणि सुधारणात्मक उपाययोजना सुचवण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती स्थापन करणे आवश्यक आहे. पुण्यात सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट (CIRT) सारख्या सुप्रसिद्ध संस्था आहेत. त्यांच्या प्रतिनिधींना या पॅनेलमध्ये समाविष्ट केले पाहिजे. प्रशासनाने उतार कमी करणे आणि तीव्र वळणे काढून टाकणे यांसारख्या दीर्घकालीन उपायांवर काम केले पाहिजे. अवजड वाहनांच्या चालकांना तीव्र उतार आणि वळणे हाताळणे कठीण होते.”

खडकवासलाचे आमदार भीमराव तापकीर म्हणाले की, ते या समस्येबद्दल वारंवार अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करत आहेत. “NHAI, PMRDA, वाहतूक पोलिस आणि PMC यांनी एकत्र काम करून सर्व्हिस रोड विकसित केले पाहिजेत आणि सुरक्षा उपाययोजना लागू केल्या पाहिजेत. उपाययोजना राबवण्याबाबत अनेक बैठका झाल्या आहेत. आम्ही पुन्हा प्रशासनाला सुरक्षा उपायांचा आढावा घेण्यास सांगू,” असे ते म्हणाले. नऱ्हे परिसरातील स्थानिक नेते धनंजय बेंकर यांनी सांगितले की, नवले पुलावर आतापर्यंत केलेल्या बहुतेक उपाययोजना अपघात रोखण्यात अयशस्वी ठरल्या आहेत. उतार टाळण्यासाठी पूल बांधण्याचा प्रस्ताव अजूनही प्रत्यक्षात आलेला नाही.

ते पुढे म्हणाले, “अधिकाऱ्यांनी रस्ते तज्ज्ञांच्या मदतीने पुन्हा एकदा संपूर्ण मार्गाचे ऑडिट (तपासणी) करून ठोस पाऊले उचलावीत. अपघातांमुळे केवळ जीवितहानीच होत नाही, तर कात्रज-देहू रोड बाह्यवळणाच्या या व्यस्त मार्गावरील वाहतुकीतही मोठे अडथळे येतात,” असे बेंकर म्हणाले. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यासाठी आणि तीव्र उताराची समस्या सोडवण्यासाठी एका सल्लागाराची नियुक्ती केली होती. इंडियन रोड्स काँग्रेस (IRC) च्या ३ टक्के किंवा त्याहून कमी मानकाप्रमाणे उताराची पुनर्रचना करणे हा प्रस्तावित उपायांपैकी एक होता. पुणे महानगरपालिकेने (PMC) या मार्गावर अपघातांची शक्यता कमी करण्यासाठी काही पुढाकार घेतला आणि पुलाच्या दोन्ही बाजूंना १२ मीटर रुंदीचे सर्व्हिस रोड बांधण्याचा निर्णय घेतला. रस्त्याच्या कामात कोणताही विलंब होऊ नये म्हणून मोठ्या पाणीपुरवठा पाईपलाईन्स आणि भूमिगत विद्युत केबल्स हलवण्याचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे, हे काम अजूनही चालू आहे.”

‘ब्लॅक स्पॉट’चा अर्थ काय?

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (MoRTH) आणि इंडियन रोड काँग्रेसने निश्चित केलेल्या नियमांनुसार, गेल्या तीन वर्षांत ५०० मीटरच्या रस्ते पट्ट्यावर पाच किंवा त्याहून अधिक अपघात, ज्यात मृत्यू किंवा गंभीर जखमा झाल्या आहेत, अशा ठिकाणाला ‘ब्लॅक स्पॉट’ म्हटले जाते. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय रस्ते सुरक्षा समिती ही नोडल संस्था आहे, जी ब्लॅक स्पॉट्स आणि अपघात होण्याचा धोका कमी करण्यासाठी संबंधित भागधारक संस्थांनी केलेल्या सुधारणात्मक उपायांवर लक्ष ठेवते.

पुणे शहराचे पोलिस उपायुक्त (वाहतूक) विजयकुमार मगर यांनी २०२२ च्या अपघातानंतर म्हटले होते, “ब्लॅक स्पॉट्स आणि इतर अपघातप्रवण क्षेत्रांची ओळख पटवणे हे आपल्या रस्ते पायाभूत सुविधा अधिक सुरक्षित करण्याच्या दिशेने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. एकदा ब्लॅक स्पॉट ओळखला गेला की, केवळ स्थानिक वाहतूक पोलिस ठाणेच नाही, तर इतर भागधारक संस्थादेखील एकत्रित प्रयत्न करतात. रस्ते पायाभूत सुविधांमध्ये सुधारणात्मक बदल केले जाऊ शकतात, भूतकाळात अपघातांना कारणीभूत ठरलेल्या त्रुटी रोखण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात केले जाऊ शकते. २०२१ च्या अखेरीस ओळखल्या गेलेल्या अनेक ब्लॅक स्पॉट्समध्ये सुधारणात्मक उपाययोजना केल्यानंतर यावर्षी अपघातांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. परंतु, इतर अनेक ब्लॅक स्पॉट्ससाठी हे काम अजूनही प्रगतिपथावर आहे…”

२०२१ या वर्षातील पुणे शहरातील ब्लॅक स्पॉट्सच्या आकडेवारीनुसार, पुण्यात १९ ठिकाणी एकूण २०० गंभीर अपघात (मृत्यू किंवा गंभीर जखमा झालेले अपघात) नोंदवले गेले, ज्यात ८१ पुरुष आणि २५ महिलांसह १०६ लोकांचा मृत्यू झाला आणि १२६ लोक गंभीर जखमी झाले. ब्लॅक स्पॉट म्हणून सीमांकन केल्यानंतर, अवजड वाहनांसाठी वाहतुकीचे तास निश्चित करणे, वेगवेगळे मार्ग तयार करणे आणि अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करणे यांसारखे अनेक सुधारणात्मक उपाय केले गेले आहेत. काही ठिकाणी रस्ता रुंदीकरण करण्यात आले आहे. यावर्षी, या ठिकाणी कमी अपघात नोंदवले गेले आहेत,” असे विमानतळ वाहतूक विभागाचे प्रभारी निरीक्षक संतोष सोनवणे यांनी सांगितले.

अपघात होण्याची इतर संभाव्य कारणे

१) रस्त्याची रचना : रस्ता आणि बाह्यवळणदरम्यान असलेल्या तीव्र उतारामुळे अवजड वाहनांसाठी प्रवास करणे आव्हानात्मक ठरते.

२) जास्त रहदारी : पूल हा व्यस्त मार्ग आहे. नियमांचे उल्लंघन करणारी अवजड वाहने, नियमित वाहतूक आणि पादचाऱ्यांची सततची हालचाल अपघातांची शक्यता वाढवते.

३) चालकाचे वर्तन : मिळालेल्या माहितीनुसार, उतारावर इंधन वाचवण्यासाठी काही अवजड वाहनांचे चालक इंजिन बंद करतात, ज्यामुळे ब्रेक निकामी होऊन नियंत्रण सुटते.

४) अपुरी पायाभूत सुविधा : अपुऱ्या ‘रम्बल स्ट्रिप्स’, ‘रिफ्लेक्टर’ आणि वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेसे उपाय नसणे वारंवार अपघातांना कारणीभूत ठरते, असे ‘फ्री प्रेस जर्नल’च्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.