Navasachi Gauri Majhi Abhay Jodhpurkar National Award: गणेशोत्सवाच्या काळात घरात गौरी आगमनाची तयारी सुरू आहे. गौरीच्या स्वागतासाठी घरात हळदी-कुंकवाची पावले उमटवली जात आहेत, आरतीचं ताट सजतं आहे, मुखवट्याची पूजा केली जात आहे, साडी नेसवली जात आहे… नेमक्या याच लगबगीत रेडिओवर ‘नवसाची गौरी माझी’ हे गाणं सुरू होतं. आजी क्षणभर गौरीच्या मुखवट्यावरून मायेने हात फिरवते, आईचे डोळे पाणवतात, मुलगी गालातल्या गालात हसते. हे दृश्य यंदा महाराष्ट्रातल्या हजारो घरात घडलं आणि आता याच गाण्याने अभय जोधपूरकर यांना गुजरातमधील एकता नगर येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचे ‘रजतकमळ’ मिळवून दिले आहे.’ 

‘घरत गणपती’ या मराठी चित्रपटातील हे गाणं मनाला इतकं का भिडलं? थेट राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत कसं पोहोचलं? या यशामागचं कारण काय आहे हे समजून घेऊया.

बालपणीच्या आठवणी कशा जाग्या झाल्या?

मानसशास्त्रात एक संकल्पना आहे – ‘इन्व्हॉलेंटरी मेमरी.’ एखादा वास, चव किंवा सूर अचानक आपल्या मनातील जुन्या आठवणीला किंवा भावनेला उजाळा देतो. गणपती हा महाराष्ट्रीयन समाजासाठी केवळ एक सण नसून, तो उदबत्तीचा सुगंध, उकडीच्या मोदकांची वाफ आणि त्यावर सोडलेली तुपाची धार, दुर्वांची माळ, नैवेद्याचं जेवण, ढोल-ताशांचा आवाज, मंगळागौरीचा रंगलेला खेळ – ही आपल्या प्रत्येकाच्या लहानपणीची सुंदर आठवण बनली आहे. 

‘नवसाची गौरी माझी’ हे गाणं नुसतं ऐकलं जात नाही; ते अनुभवलं जातं, कारण ते थेट बालपणाच्या आठवणींना स्पर्श करतं आणि हीच गोष्ट या गाण्याला इतर हिट गाण्यांपेक्षा वेगळी ठरवते. याचं कारण असं की, ते दरवर्षी त्याच घरात, त्याच क्षणी परत येतं आणि प्रत्येक वेळी तितकंच खरं आणि प्रसन्न वाटतं. 

लाखो घरांना जोडणारा ‘अदृश्य धागा’ कोणता?

समाजशास्त्रज्ञ एमिल दर्कहाइम यांनी ‘कलेक्टिव्ह इफर्व्हसन्स’ ही संकल्पना मांडली होती. या संकल्पनेनुसार जेव्हा एखादा समूह एकाच वेळी एकच भावनिक अनुभव घेतो, तेव्हा त्या समूहातील भावनिक बंध अधिक घट्ट होतात. गणेशोत्सवात लाखो मराठी कुटुंब एकाच काळात एकाच भावनेतून जात असतात ते म्हणजे गौरी-गणपतीचं आगमन. प्रत्येकाच्या घरात जेव्हा हे एकच वातावरण अनुभवलं जात असतं, तेव्हा या गाण्यामुळे एक अदृश्य धागा निर्माण होतो. हे गाणं फक्त काही यमकांची बांधणी उरत नाही, तर ते एका सामायिक सांस्कृतिक स्मृतीचा भाग बनतं, ज्यात प्रत्येक जण एकाच वेळी तीच हुरहूर, तोच आनंद अनुभवतो. 

सोशल मीडियावर लोक आपापल्या घराच्या सजावटीचे व्हिडीओज या गाण्यासोबत शेअर करतात, तेव्हा हा एकत्रित अनुभव अजून विस्तारतो.

हिंदी आणि दाक्षिणात्य भाषिक पार्श्वभूमी असताना ‘हा’ आवाज लोकप्रिय का झाला? 

अभय जोधपूरकर मुळात हिंदी, तमिळ आणि कन्नड चित्रपटसृष्टीत आपल्या मधुर आवाजासाठी ओळखले जातात. पण, या गाण्यातला त्यांचा आवाज केवळ काहीतरी वेगळीच अवर्णनीय भावना व्यक्त करत आहे. त्यांच्या आवाजात कुठेही अतिरंजितपणा नाही, कुठलाही अनावश्यक ताण नाही. मानसशास्त्रात याला ‘पॅरासोशल इंटिमसी’ म्हणतात – म्हणजे ऐकणाऱ्याला वाटतं की हे गाणं खास आपल्यासाठीच गायलं गेलंय. हे गाणं जरी गौरीच्या सौंदर्याचं आणि तिच्या स्वभावाचं वर्णन असलं, तरी ते घरच्या गौरीचं म्हणजेच घरच्या स्त्रीला उद्देशून केलं जात आहे. या वर्णनातून डोळ्यांसमोर उभे राहणारे गौरीचे रूप आणि घरच्या स्त्रीमुळे घराला येणारे घरपण, श्रोत्याला या गाण्याशी वैयक्तिक पातळीवर जोडते. गंमत म्हणजे, मराठी मातृभाषा नसतानाही जोधपूरकर यांनी शब्दांचे उच्चार आणि भावनांचे चढउतार इतक्या नेमकेपणाने साधले की मूळ मराठी श्रोत्यालाही ते गाणं ‘आपल्या माणसाने गायल्यासारखं’ वाटलं – हीच त्यांच्या गायकीची खरी ताकद आहे.

‘सॉफ्ट लाँच’, ‘हार्ड लाँच’च्या युगात हे गाणं एवढं का चाललं?

आजची पिढी नात्यांची घोषणा एक तर लपूनछपून इशारे देत करते (सॉफ्ट लाँच) किंवा सोशल मीडियावर मोठा गाजावाजा करत (हार्ड लाँच). अशा काळात ‘नवसाची गौरी माझी’ वेगळी ठरते, कारण ती कुठल्याही दिखाव्याशिवाय, गौराईच्या रूपकातून एक नातं, एक श्रद्धा आणि कुटुंबाची स्वीकृती साजरी करते. यात कुठलाही स्टेटस अपडेट नाही, कुठलीही इन्स्टाग्राम पोस्ट नाही फक्त एक साधी, प्रामाणिक भावना आहे आणि कदाचित म्हणूनच, गाजावाजाच्या युगातही हे गाणं इतकं मनाला भिडतं कारण ते काहीही ‘दाखवत’ नाही; ते फक्त ‘अनुभवायला’ देतं. जिथे आजची तरुण पिढी नात्यांना फिल्टर्समधून आणि कॅप्शन्समधून मांडायला शिकली आहे, तिथे हे गाणं आठवण करून देतं की खरी भावना कुठल्याही जाहिरातीशिवाय स्वतःच पोहोचते.

राष्ट्रीय पुरस्कार का मिळाला?

राष्ट्रीय पुरस्काराची निवड समिती नेहमी एका त्रिसूत्रीचा शोध घेते :  

भावनिक आवाका (Mass Emotional Connect)

तांत्रिक कौशल्य (Technical Vocal Skill)

सांस्कृतिक मुळं (Cultural Rootedness)

‘नवसाची गौरी माझी’ या तिन्ही निकषांवर अचूक बसतं. एकीकडे गाणं गणेशोत्सवाच्या भावनिक गाभ्याला स्पर्श करतं, दुसरीकडे जोधपूरकर यांची गायकी तांत्रिकदृष्ट्या निर्दोष आहे आणि तिसरीकडे हे गाणं मराठी मातीतल्या परंपरेशी घट्ट जोडलेलं आहे. 

चित्रपट आणि गाण्याचं नातं : 

गाण्याच्या यशामागे केवळ चाल किंवा शब्द नाहीत, तर त्या मागचा संपूर्ण भावनिक संदर्भही तितकाच महत्त्वाचा आहे. ‘घरत गणपती’ या चित्रपटानेही घरगुती नात्यांची, श्रद्धेची आणि परंपरेची गोष्ट सांगितली आणि त्या कथानकाला हे गाणं आपल्या स्वरांनी अधिक जिवंत करतं. चित्रपट आणि गाणं एकमेकांना पूरक ठरले आणि प्रेक्षकांनी दोघांनाही मनापासून स्वीकारलं.