राज्यभर नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना नारायण राणे यांचे तळ कोकण आणि रवींंद्र चव्हाण यांची डोंबिवली हे एकनाथ शिंदे, भाजपमधील वादाचे केंद्र ठरले. कणकवली, कुडाळमध्ये राणे यांचे थोरले पुत्र निलेश यांचा चव्हाणांशी थेट सामना पहायला मिळाला, तर कल्याण डोंबिवलीत शिंदे यांचे खासदार पुत्र डाॅ. श्रीकांत यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न भाजपने केला. दोन्ही ठिकाणी शिंदेसेनेतील मोहरे पळविणे, आक्रमक व्यूहरचना करणे, यंत्रणांचा पुरेपूर वापर करणे या कारणांमुळे दोन्ही मित्रपक्षांमध्ये टोकाचे वाद दिसून आले. निवडणुक संपली आणि महायुतीतील हा संघर्ष मिटत असल्याचे चित्र अलिकडे दिसू लागले आहे. चव्हाण-शिंदे पुन्हा एकत्र व्यासपीठावर दिसू लागले आहेत, तर एकमेकांच्या पक्षातील प्रवेशबंदीचा तहदेखील या दोन पक्षात होताना दिसतो आहे. गोड गोड मैत्रीच्या आणाभाका दोन्ही बाजूंनी पुन्हा एकदा घेतल्या जात असल्या तरी ठाणे-रायगड जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले नवी मुंबई शहर येत्या काळात या दोन पक्षातील नव्या संघर्षाचे केंद्र ठरेल असेच सध्याचे चित्र आहे.

नवी मुंबई युतीला अपवाद कसा ठरेल?

मागील तीन दशकांपासून नवी मुंबईत गणेश नाईक यांची येथील महापालिकेवर एकहाती सत्ता राहिली आहे. या काळात जुन्या आणि नव्या अशा दोन्ही शिवसेनेबरोबर नाईक यांचा सतत संघर्ष पहायला मिळाला. नाईकांचे सुरुवातीचे राजकारण हे शिवसेनेच्या पठडीतील असले तरी सन २००० पासून ते शरद पवार यांच्या समवेत राहिले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकांआधी ते भाजपवासी झाले. या २५ वर्षांच्या काळात त्यांचे शिवसेनेसोबत फारसे सख्य राहिलेले नाही. एकनाथ शिंदे यांच्या पद्धतीची शिवसेनेला तर नाईकांना मान्यच नाही. शिंदे यांचे गुरू पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांची कार्यपद्धतीही नाईकांना फारशी मान्य नव्हती. त्यामुळे काहीही झाले तरी नवी मुंबईत युती नकोच असे नाईकांचे मत आहे. नवी मुंबईत शिंदे यांच्याशिवाय भाजपची एकहाती सत्ता सहज येऊ शकते असा नाईकांचा दावा आहे. तसा त्यांनी तो वरिष्ठांपुढेही मांडला आहे. त्यामुळे मुंबई, ठाण्यात कुठेही युती करा, नवी मुंबईत युती नकोच अशीच त्यांची भूमिका असते.

नाईक-शिंदे वाद नेमका काय?

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून नगरविकास मंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे राहीले आहे. या काळात नाईकांच्या सत्तास्थानाला वेळोवेळी धक्का लावण्याचा प्रयत्न या विभागाकडून झाला आहे. नवी मुंबई महापालिकेतील बदल्या, बढत्या, महत्त्वाचे निर्णय, कंत्राटी कामांमध्ये ठाण्याचा प्रभाव राहिला आहे. सिडकोमार्फत शहरातील मोक्याचे भूखंड विकले जात असल्याची टीका यापूर्वीच नाईक यांनी केली आहे. महापालिकेला मंजूर झालेला पाण्याचा कोटा इतरत्र वळविला जात असल्याच्या तक्रारी आहेत. शिवाय कल्याण तालुक्यातील १४ गावांचे लोढणे नवी मुंबईवर टाकले गेल्याने नाईक नाराज आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत कोणत्याही चर्चेविना नगरविकास विभागाने हे निर्णय घेतल्याचा आरोप त्यांनी यापूर्वी केले आहे. महापालिकेत नाईक समर्थक माजी नगरसेवकांची कामे होत नसल्याच्या तक्रारी यापूर्वी केल्या गेल्या होत्या. शिवाय नवी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी आवश्यक प्रभाग रचनेतही ठाणेकरांच्या सांगण्यावरून घोळ घातला गेल्याचा आरोप नाईक कुटुंबियांनी केला होता. हा वाद इतका टोकाला पोहचला आहे की युती झालीच तरी हे दोन पक्ष एकमेकांच्या पायात पाय घालणारच नाहीत याची शाश्वती कुणालाही

नाईक चव्हाणांपेक्षा वेगळे कसे?

एकनाथ शिंदे आणि रवींंद्र चव्हाण यांच्या अनेक दशके मैत्रीपूर्ण संबंध राहिले आहेत. कल्याण, डोंबिवली, ठाणे या शहरात भाजप आणि शिवसेना नैसर्गिक युतीत आहेत. त्यामुळे राज्यात काँग्रेस आघाडी सरकार असताना या पट्ट्यात शिंदे, चव्हाण आघाडीतील पक्षांबरोबर एकत्र लढत. डोंबिवलीतही शिंदे चव्हाण यांच्या मनाप्रमाणे राजकारण करत. पण डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या राजकारणातील महत्त्व वाढू लागले तसेच चव्हाण यांच्याशी त्यांचे खटके उडू लागले. कल्याण डोंबिवलीतील राजकारणात सध्या जे काही सुरू आहे ते शिंदे पुत्र आणि चव्हाण यांच्या वादाचे परिणाम आहेत. मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर चव्हाण एक पाऊल मागे गेल्याचे दिसले. नवी मुंबईत ‘महाशक्ती’चा निरोप आला तरी नाईक समर्थक सहजासहजी शिंदे यांच्याबरोबर समझोत्याचे राजकारण करतीलच असे नाही. लोकसभा निवडणुकीत शिंदेसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारात नाईक जातीने उतरले होते. मात्र अनेक प्रभागात त्यांच्या समर्थकांमधील नाराजी स्पष्टपणे दिसून आली होती. स्थानिक राजकारणात शिंदेसोबत समझोता करण्यास नाईकांचा विरोध आहे. नवी मुंबईत त्यांचे राजकारण अनेक अर्थाने स्वयंभू राहीले आहे. त्यामुळे चव्हाण आणि नाईक यांच्या राजकीय कार्यपद्धतीत बरेच अंतर पहायला मिळते.

शिंदेसेनेला नवी मुंबईत युती का हवीय?

मुंबईसह ठाण्यात जर युती होत असेल तर नवी मुंबईसारखे शहर का अपवाद असावे असे शिंदेसेनेतील अनेकांचे मत आहे. नवी मुंबई महापालिकेतील ६४ माजी नगरसेवक सध्या भाजपसोबत आहेत, तर ४८ नगरसेवकांचा आकडा हा एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. तसे पाहिले तर या दोन पक्षांनीच शहराचा सत्ता परीघ व्यापल्याचे हे निदर्शक आहे. युती झालीच तर १११ पैकी किमान ४८ जागा शिंदेसेनेला मिळतील हे स्पष्टच आहे. यापैकी जवळपास सर्वच जागांवर नाईकांचे समर्थक विरोधकाच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे नाईकांसह त्यांच्या समर्थकांनाही युती नको आहे. युती झाल्यास नाईकांना शिंदे यांच्या पक्षाविरोधात थेट प्रचारात उतरता येणार नाहीच. शिवाय ‘कमळा’चे चिन्हही त्यांच्या समर्थकांना मिळणार नाही. ही शिंदेसेनेला जमेची बाजू वाटते. युती झाली तरीही अनेक प्रभागांमध्ये एकमेकांचे उमेदवार पाडण्यासाठी दोन्ही पक्षातील नेत्यांचा कस लागेल हे स्पष्टच आहे. परंतु अनेक प्रभागांमधील लढाई शिंदेसेनेसाठी तुलनेने सोपी असेल या या पक्षाचे मत आहे.