गुन्हेगार कितीही चतुर आणि चलाख असला तरीही तो कायद्याच्या कचाट्यातून सुटत नाही. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करूनही कधी ना कधी त्याचे बिंग फुटतेच. त्याचाच प्रत्यय नवी मुंबईत घडलेल्या एका घटनेतून आला. ऐरोली परिसरात राहणाऱ्या एका ४० वर्षीय महिलेचे विवाहबाह्य संबंध होते. त्यात पती अडसर ठरत असल्यामुळे गेल्या वर्षी ९ ऑगस्ट २०२५ रोजी तिने प्रियकराच्या मदतीने झोपेतच पतीचा गळा आवळला. त्यानंतर धारदार चाकूने सपासप वार करून त्याची निर्घृणपणे हत्या केली. या घटनेची कोणालाही कुणकूण लागू नये म्हणून तिने मृतदेहाचे तुकडे तीन तुकडे केले आणि चादरीत गुंडाळून रात्रीच्या अंधारात घनदाट जंगलात फेकून दिले. अखेर तब्बल ११ महिन्यानंतर या भयानक हत्याकांडाचा उलगडा झाला. गेल्या आठवड्यात (१३ जुलै) नवी मुंबई पोलिसांनी आरोपी महिलेसह तिच्या प्रियकराला गजाआड केले. या पार्श्वभूमीवर हे प्रकरण नेमके कसे उघडकीस आले? त्याविषयी…
प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बळीराम सूर्यनाथ कुशवाह (वय ५०) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुनीता कुशवाह हिच्यासह तिचा प्रियकर राहुल दशरथ प्रजापती यांना अटक केली आहे. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता दोघांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेमुळे ऐरोलीसह संपूर्ण नवी मुंबई शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत बळीराम हा उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील कोठीलवा गावचा रहिवासी होता. काही वर्षांपूर्वी तो कामानिमित्त आपल्या पत्नी आणि मुलांना घेऊन नवी मुंबईतील ऐरोली भागात स्थायिक झाला. याच काळात त्याची पत्नी सुनीताचे घणसोली येथील रिक्षाचालक राहुल प्रजापती याच्याशी प्रेमसंबंध जुळले. बळीराम कामावर गेल्यानंतर राहुल हा त्याच्या घरी नेहमीच येत होता. कालांतराने सुनीताच्या विवाहबाह्य संबंधाची कुणकूण बळीरामला लागली आणि त्याने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली.
मृतदेहाचे तुकडे करून जंगलात फेकले
पती बळीराम विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरत असल्याने सुनीताने प्रियकराच्या मदतीने त्याच्या हत्येचा कट रचला. ९ ऑगस्ट २०२५ रोजी तिने आपल्या मुलांना नातेवाईकांच्या घरी पाठवून दिले. त्यानंतर रात्रीच्या सुमारास तिने प्रियकराला फोन करून घरी बोलावून घेतले. त्यानंतर गाढ झोपेत असलेल्या बळीरामची दोघांनीही गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर सुनीताने आपल्या पतीचा धारधार शस्त्राने गळा चिरून खून केला. या घटनेची कोणालाही कुणकूण लागू नये म्हणून आरोपींनी बळीरामच्या मृतदेहाचे मुंडके, धड आणि पाय असे तीन तुकडे केले. त्यानंतर हे तुकडे पोत्यांमध्ये आणि चादरींमध्ये गुंडाळून राहुलच्या ऑटो-रिक्षातून गवळी देव टेकडी परिसरातील जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन फेकून दिले. या हत्याकांडानंतर सुनिताने तिचे वडिलोपार्जित घर भाड्याने दिले आणि आपल्या मुलांसह नवी मुंबईतील घणसोली भागात राहायला आली. हा संपूर्ण गुन्हा एप्रिल महिन्यापर्यंत लपून राहिला होता.
सुनीताने ११ महिने लपवला हत्येचा गुन्हा
बळीरामची ज्यावेळी हत्या झाली तेव्हा त्याचा भाऊ उत्तर प्रदेशातील आपल्या गावाकडे गेला होता. तिथून नवी मुंबईत परतल्यानंतर त्याने सुनीताकडे आपल्या भावाबद्दल विचारपूस केली. तेव्हा बळीराम हा आठडाभरापासून घरी आला नाही, असे म्हणत तिने उडवाउडवीची उत्तर देण्यास सुरुवात केली. अनेक दिवस उलटून गेल्यानंतरही बळीराम घरी येत नसल्याने त्याच्या भावाला चिंता सतावत होती. त्याने सुरुवातीला आपल्या भावाचा सगळीकडे शोध घेतला, गावाकडील नातेवाईकांकडे विचारपूस केली, तरीही त्याचा कुठेही थागपत्ता लागला नाही. दुसरीकडे- पती बेपत्ता होऊनही सुनीताच्या वागण्यात काही फरक जाणवत नव्हता. ती अगदी निवांतात राहत होती आणि फोनवरून सतत आपल्या प्रियकराशी बोलायची. यादरम्यान संशय अधिकच वाढत गेल्यामुळे बळीरामच्या भावाने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सुनीताला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता तिच्या जबाबात तफावत जाणवत होती. त्याशिवाय ती वारंवार जबाब बदलून राहण्याचे घरही बदलत होती. पोलिसांनी तांत्रिक तपास करून सुनीताच्या मोबाइलचे रेकॉर्ड चेक केले. त्यावेळी रिक्षाचालक राहुलशी तिचे अनैतिक संबंध असल्याचे स्पष्ट झाले.
हत्याकांडाचा छडा नेमका कसा लागला?
दरम्यान, पोलिसांनी सुनीतासह तिचा प्रियकर राहुल याला ताब्यात घेऊन विचारपूस केली. सुरुवातीला दोघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच दोघांनीही आपला गुन्हा कबुल केला. बळीरामचा भाऊ त्याच्या मूळ गावाहून येऊन त्याची विचारपूस करेपर्यंत हा खून अनेक महिने लपून राहिला होता. कौटुंबिक वादानंतर बळीराम घर सोडून गेला होता असे सुनीता सर्वांना सांगत होती. तिच्या या गोष्टीवर बळीरामचा भाऊ आणि त्याचे इतर नातेवाईक समाधानी नव्हते. त्यामुळे एप्रिल २०२६ मध्ये त्यांनी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात बळीराम हरवल्याची तक्रार दाखल केली होती. सखोल तपास केल्यानंतर रबाळे पोलिसांनी १० जुलै २०२६ रोजी सुनीता आणि राहुल याच्यावर गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेने आणि रबाळे पोलिसांनी जेव्हा सुनीताची कसून चौकशी सुरू केली, तेव्हा तिने एकापाठोपाठ एक अत्यंत धक्कादायक खुलासे केले. हत्येनंतर आरोपींनी घणसोली एमआयडीसी परिसरातील डोंगराळ जंगलात फेकले होते. पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेहाचे अवशेष ताब्यात घेतले आणि डीएनए (DNA Test) चाचणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले. आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता दोघांनाही पोलीस कोठडी सुनावण्यात आली. बळीरामची हत्या झाल्याचे उघडकीस येताच त्याच्या मूळ गावातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
सुनीताला कठोर शिक्षा देण्याची मागणी
सुनीता आणि तिचा प्रियकर राहुल यांनी बळीरामची हत्या करून मृतदेह जंगलात फेकल्याचा आरोप झाल्यानंतर गावकऱ्यांनी दोन्ही आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. मृत बळीरामची काकू सरस्वती देवी यांनी माध्यमांना सांगितले की, सुरुवातीला आम्हाला बळीराम बेपत्ता झाला इतकीच माहिती होती. मात्र, आता त्याची हत्या करणाऱ्या सुनीता आणि तिच्या प्रियकराला कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी. आरोपी सुनीता हिची आई कलावती देवी यांनीही मुलीच्या कृत्याचा तीव्र निषेध केला. माझ्या मुलीने जे कृत्य केले आहे, तिलाही त्याचप्रमाणे कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. कुटुंबातील सदस्य जेव्हा जावई बळीराम यांच्याबाबत विचारणा करत असत, तेव्हा सुनीता कधी ते कुठेतरी निघून गेल्याचे सांगायची, तर कधी ते आश्रमात गेल्याचे कारण देत होती. ती वरवर काळजी व्यक्त करत होती, मात्र प्रत्यक्षात काय घडले आहे, याची कोणालाही कल्पना नव्हती, असे त्यांनी माध्यमांना सांगितले. सुनीता आणि बळीराम यांचा विवाह १८ वर्षांपूर्वी झाला होता. सुनीताचे माहेर भाटपारराणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडेशर गावात असून, तिचे वडील राजकिशोर यांचे यापूर्वीच निधन झाले आहे. सध्या पोलिसांकडून सुनीता आणि तिच्या प्रियकराची सखोल चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे ऐरोली परिसरात संतापाचे वातावरण आहे.
