भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) स्वदेशी बनावटीची नाविक (NavIC) ही दिशादर्शक प्रणाली विकसित केली आहे. ही प्रणाली कार्यरत झाल्यापासून तिला अडचणींचा सामना करावा लागत आहे. भारतात प्रामुख्याने वापरली जाणारी जीपीएस (GPS) दिशादर्शक प्रणाली अमेरिकेची आहे. त्यामुळे भारताने स्वदेशी नाविक विकसित केले. नाविक प्रणाली व्यवस्थितपणे कार्यरत ठेवणाऱ्या एका उपग्रहात बिघाड झाल्याचे इस्रोने सांगितले आहे. उपग्रहातील अटोमिक क्लॉकमध्ये बिघाड झाला आहे. अटोमिक क्लॉक स्थितीशी संबंधित माहिती (पोझिशनिंग डेटा) पाठवण्याचे काम करते. या माहितीच्या आधारे दिशा, नकाशा, सर्वेक्षण व बांधकामांशी संबंधित माहिती अचूक मिळते. ही माहिती ज्यामुळे मिळते त्या अटोमिक क्लॉकमध्येच बिघाड झाल्याचे समोर आले आहे.

नाविक दिशादर्शक प्रणालीसाठी माहिती पुरवण्याचे काम इस्रोच्या पाच उपग्रहांद्वारे केले जाते. त्यापैकी एका उपग्रहातील अटोमिक क्लॉकमध्ये बिघाड झाला आहे. याबाबत इस्रोने माहिती दिली. IRNSS-1F उपग्रहाला १३ मार्च २०२६ रोजी दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. या उपग्रहातील अटोमिक क्लॉकमध्ये बिघाड झाला आहे. परंतु, तरीही हा उपग्रह वन वे ब्रोडकास्ट मेसेजिंग सर्व्हिस पुरवणार आहे, असे इस्रोने म्हटले आहे. अटोमिक क्लॉक हे उपग्रहातून पोझिशनिंग डेटा पाठवणारे महत्वाचे उपकरण आहे. पोझिशनिंग डेटाचा वापर नेव्हिगेशन, मॅपिंग, सर्वेक्षण करणाऱ्या मोबाईल अॅप्समध्ये केला जातो. नाविक या नावानेच ओळखले जाणारे IRNSS काय आहे, त्यात आतापर्यंत कोणत्या समस्या आल्या याबाबत जाणून घेऊयात.

IRNSS किंवा NavIC काय आहे ?

नाविकलाच IRNSS (Indian Regional Navigation Satellite System) या नावाने देखील ओळखले जाते. नाविक दिशादर्शक प्रणालीसाठी सात उपग्रह भारताच्या आकाशात सोडण्याचे नियोजन होते. उपग्रह ज्यावेळेस पूर्ण क्षमतेने काम करतात, त्यावेळी नाविक प्रणाली अचूक माहिती देते. परंतु, आता यातील एका उपग्रहात बिघाड झाला आहे. अमेरिकेच्या जीपीएस प्रणालीचा भारतातील वापर कमी व्हावा म्हणून स्वदेशी बनावटीचे नाविक इस्रोने विकसित केले. नाविक प्रणाली ही भारतातील दऱ्याखोऱ्यांमध्ये, जंगलांमध्ये जीपीएसपेक्षा अचूक दिशादर्शनाचे काम करते. त्याचे कारण म्हणजे याचे उपग्रह हे भारतीय उपखंडावरील आकाशात सोडण्यात आले आहेत. भारत तसेच भारताच्या अवतीभवतीच्या १५०० किमी भागातील पोझिशनिंग डेटा देण्याचे काम नाविक करते. नाविकचा फुलफॉर्म नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टेलेशन (NavIC-Navigation with Indian Constellation) असा आहे.’

पोझिशनिंग डेटा पाठवण्याचे काम किती उपग्रह करतात?

नाविक प्रणालीसाठी पोझिशनिंग डेटा पाठवण्याचे काम सध्या IRNSS-1B, 1C, 1F, 1I आणि NVS-01 या पाच उपग्रहांद्वारे केले जात होते. त्यातील IRNSS-1F च्या अटोमिक क्लॉकमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे आता चार उपग्रहांना नाविकला माहिती पुरवण्याचे काम करावे लागणार आहे. दरम्यान, यातील काही उपग्रह जुने झाले आहेत. IRNSS-1A हा उपग्रह इस्रोने २०१३ मध्ये सोडला होता. हा उपग्रह आता बंद पडला आहे. त्याद्वारे माहिती मिळणे बंद झाले आहे. सध्या कार्यरत असलेल्या उपग्रहांपैकी IRNSS-1I हा उपग्रह नवीन आहे. तो २०१८ मध्ये पाठवण्यात आला होता.

NVS-02 ला काय झाले?

नाविकसाठी काम करणाऱ्या उपग्रहांच्या समूहात NVS-02 या सेकंड जनरेशन उपग्रहाला इस्रोकडून पाठवण्यात आले होते. इलेक्ट्रिक फेल्युअरमुळे हा उपग्रह त्याच्या कक्षेत जाऊ शकला नाही. इस्रोचे हे मिशन अयशस्वी ठरले होते. त्यावेळी इस्रोवर टीका झाली होती. नेव्हिगेशन कॉन्स्टेलेशनशी संबंधित मिशनमध्ये उशीर होत असल्याचे ताशेरे कम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडियाने इस्रोवर ओढले होते. इस्रोच्या एका प्रकल्पासाठी मंत्रिमंडळाने २०० कोटी रूपये २००६ मध्ये मंजूर केले होते, परंतु, तो प्रकल्प २०१७ मध्ये सुरू करण्यात आला. यावरून इस्रोवर टीका झाली होती. दरम्यान, नाविकचा वापर सध्या विमान वाहतूक, शिपिंग, रेल्वे आणि काही नवीन मोबाइलमध्ये केला जातोय. काही नवीन मोबाइलमध्ये असणाऱ्या चीपसेट्समध्ये नाविक, जीपीएस आणि रशियन ग्लोनास्स या दिशादर्शक प्रणाली दिल्या जात आहेत.

कोणकोणत्या देशांकडे आहे स्वत:ची ‘जीपीएस’ प्रणाली?

जगात फक्त ग्लोबल नेव्हिगेशन डेटा पुरवणाऱ्या फक्त चार सॅटेलाइट सिस्टिम्स आहेत. अमेरिकेचे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम (जीपीएस), रशियाचे ग्लोनास्स (GLONASS), युरोपचे गॅलिलियो आणि चीनचे बेईदौ ( Beidou) या चार प्रणाली पृथ्वीवरील नेव्हिगेशन संबंधित माहिती पुरवण्याचे काम करतात. जीपीएस, ग्लोनास्स आणि गॅलिलियो यांच्यासाठी २० हून अधिक उपग्रह काम करतात. पृथ्वीच्या मध्य कक्षात जवळपास २० हजार किमी उंचीवर हे उपग्रह काम करतात. चीनच्या बेईदौ प्रणालीसाठी ४० पेक्षा जास्त उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडण्यात आले आहेत. त्यातील काही उपग्रह पृथ्वीपासून ३५ हजार किमी उंचीवर आहेत. जगात कोणत्याही कानाकोपऱ्यातील माहिती पुरवण्याचे काम हे उपग्रह त्यांच्या दिशादर्शन प्रणालीसाठी करतात.

NavIC ला प्रोत्साहन का दिलं जात आहे?

विविध गोष्टींबाबत आत्मनिर्भर – स्वयंपुर्ण व्हायचा प्रयत्न केला जात आहे, तसे धोरण केंद्र सरकाने आखले आहे, त्याचप्रमाणे GPS वरील अवलंबित्व पुर्णपणे कमी करण्याचा भारताचा प्रयत्न आहे. संरक्षण क्षेत्राच्या वापरानंतर आता नागरी सेवांमध्येही जास्तीत जास्त प्रमाणात NavIC चा वापर केला जावा, देशातील विविध उद्योगांनी- विभागांनी यासाठी प्रयत्न करावेत यासाठी आता पावले सरकारकडून उचलायला सुरुवात झाली आहे. NavIC प्रणालीचा सहजतेने वापर होण्यासाठी तशी उपकरणे ही भारतीय उद्योगांकडून विकसित करण्याचा प्रयत्न आता सुरु झाला आहे.