मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थाबाहेर हनुमान चालिसाचे पठण करण्याचा इशारा दिल्यानंतर अपक्ष खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांना देशद्रोहाच्या आरापोखाली अटक करण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी न्यायालयाने त्यांना जामीन देत सुटका केली आहे. खासदार नवनीत राणा गुरुवारी १३ दिवसांनी तुरुंगातून बाहेर आल्या. तुरुंगातून सुटल्यानंतर नवनीत राणा वैद्यकीय तपासणीसाठी लीलावती रुग्णालयात पोहोचल्या. येथील तपासणीनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नवनीत राणा यांचे वकील दीप मिश्रा यांनी यासंदर्भात माहिती दिली. नवनीत राणा स्पोंडिलोसिस या आजाराने त्रस्त असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली होती. मात्र हा स्पोंडिलोसिस आजार नक्की आहे तरी काय जाणून घेऊया…

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

अँकिलोझिंग स्पोंडिलोसिस (एएस) हा सांध्यांना सूज आल्यामुळे जडणारा एक वातविकार आहे, जो प्रामुख्याने पाठीच्या मणक्यावर आणि सॅक्रॉइलिक जॉइंट्स म्हणजे आपला मणका जिथे पेल्व्हिसशी जोडला जातो त्या भागावर परिणाम करतो. यामुळे पाठीचा खालचा भाग, हिप आणि पेल्व्हिक भागात वेदना होतात. भारतामध्ये सध्या सुमारे १०.६५ लाख लोकांना या आजाराचे निदान झाले आहे, व ग्लोबल डेटाच्या ताज्या अभ्यासानुसार हे प्रमाण २.९५ टक्‍के इतक्या वार्षिक वाढीच्या गतीने वाढेल असा अंदाज आहे. या आजाराविषयी असलेल्या अज्ञानामुळे ६९ टक्‍के रुग्णांच्या बाबतीत चुकीचे निदान केले जाते किंवा त्यांना आपल्या आजाराची माहितीच नसते. यातून हा आजार अधिक गंभीर स्वरूप धारण करतो.

(हे ही वाचा: विश्लेषण: काय आहे ‘व्हाईट गोल्ड’? ज्यासाठी रशियाने युक्रेनवर केलाय हल्ला)

र्हुमॅटोलॉजिस्ट, एमआरसीपी, एफआरसीपी, सीसीटी-हृमॅटोलॉजी, पुण्याचे डॉ. प्रवीण पाटील सांगतात, “हृमाटॉइड आर्थ्रराइटिससारख्या स्नायू व अस्थिंशी संबंधित आजाराच्या तुलनेत अँकिलोझिंग स्पोंडिलोसिसच्या निदानास विलंब होण्याचे प्रमाण अधिक आहे. निदानाला विलंब झाल्याने हृमॅटोलॉजिस्टकडे जाऊन आजारावर उपचार सुरू करण्यासही उशीर होतो. म्हणूनच या प्रश्नी जागरुकता निर्माण करणे अधिक महत्त्वाचे झाले आहे. निदानास उशीर झाल्यास अनेक प्रकारची लक्षणे दिसून येऊ लागतात आणि त्यामुळे अधिकच्या गुंतागुंती निर्माण होऊ शकतात.”

स्पोंडिलोसिसविषयी काही महत्त्वाची तथ्ये जाणून घेऊया म्हणजे हा आजार व त्यावरील उपचारपद्धती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येईल.

१.अँकिलोझिंग स्पोंडिलोसिस हा एक इन्फ्लेमेटरी म्हणजे सूज आल्याने होणारा आजार आहे. हा आजार सांध्यांची नैसर्गिकपणे झीज झाल्याने उद्भवत नाही तर शरीरामध्ये दुर्धर स्वरूपाची दाहकारक स्थिती निर्माण झाल्याने, अर्थात सूज आल्याने होतो. तसेच या आजारामध्ये होणा-या वेदना या तुम्ही आपल्या सांध्याची हालचाल थांबवली की अधिकच वाढतात आणि सुजेमुळे होणा-या या वेदना सकाळच्या वेळी अधिक तीव्रतेने जाणवतात. आपली रोगप्रतिकारशक्ती गफलतीने पाठीच्या मणक्यातील सांध्यांवर हल्ला करू लागल्याने हा आजार उद्भवतो.

(हे ही वाचा: विश्लेषण: आईस्क्रीममुळे शरीराला खरंच थंडावा मिळतो का? जाणून घ्या)

२.कालपरत्वे मणक्याची हाडे एकमेकांना चिकटली जाऊ शकतात. काही लोकांच्या बाबतीत स्पोंडिलोसिसमुळे सांध्याच्या झालेल्या हानीमुळे सूज येणे, हाडांची झीज किंवा हाड वाढणे अशाप्रकारची लक्षणे दिसून येतात. मात्र इतरांच्या बाबतीत मणक्यांतील चकत्यांवर आणि पाठीच्या हाडांतील लिगामेन्ट्सवर कॅल्शियमचा थर साचतो व त्यामुळे मणके एकमेकांना चिकटतात. यातून ‘बांबूसारख्या मणक्या’ची स्थिती निर्माण होत जाते व रुग्णांना पाठीची हालचाल करणे अशक्य होऊन बसते. मात्र लवकर झालेले निदान आणि एएसवरील आक्रमक उपचारपद्धती यांच्या मदतीनेही प्रक्रिया रोखता किंवा मंदावता येते.

३. आजार सुरू होतानाच लक्षणांचा काळजीपूर्वक पाठपुरावा करून आणि तज्ज्ञांचा, एखाद्या संधीवाततज्ज्ञाचा सल्ला घेतला तर आपण या स्थितीवर वेळेवर आणि अचूक उपचार मिळवू शकतो. संधीवाततज्ज्ञ रुग्णांना सर्वाधिक मानवतील असे उपचारांचे पर्याय सुचवू शकतात. या उपचारांमध्ये बायोलॉजिकल थेरपींसारखी औषधे आणि जीवनशैलीतील बदल यांत समतोल साधला जातो.

४.स्पोंडिलोसिस तरुणपणीच होऊ शकतो. संधीवाताचा संबंध मध्यम वयाशी असतो असे आपल्याला वाटते, मात्र सूज आल्याने होणारा संधीवात पहिल्यांदा तरुण वयातही उद्भवताना दिसतो. Johns Hopkins Arthritis Center च्या मते तरुण वयात एएसचे दुखणे जडलेल्यांपैकी ८० टक्के रुग्णांना तिशी गाठण्याच्या आधीच आजाराची पहिली लक्षणे दिसू लागतात. जेमतेम ५ टक्के लोकांना पंचेचाळिशी किंवा त्याहूनही पुढे लक्षणे दिसतात. शरीराची चुकीची ढब, बैठी जीवनशैली आणि ताणतणाव यांच्यामुळे भारतातील तरुणांना या आजाराचा धोका अधिक आहे.

५.स्पोंडिलोसिस स्त्री व पुरुषांवर वेगवेगळा परिणाम होऊ शकतो. स्पोंडिलोसिस असलेल्या पुरुष रुग्णांमध्ये पाठीचा मणका आणि पेल्व्हिस या दुखण्याच्या सर्रास आढळून येणाऱ्या जागा आहेत. याच भागात आजार पहिल्यांदा दिसून येतो आणि तिथेच लक्षणे सर्वाधिक गंभीर असतात. याऊलट स्त्रियांच्या बाबतीत खांदे, पाय किंवा मानेच्या सांध्यांमध्ये वेदना जाणवतात. दाहकारक स्थितीचे रक्तातील निदर्शकही एएस असलेल्या स्त्री व पुरुषांमध्ये वेगवेगळे असते. एका अभ्यासाच्या निष्कर्षांनुसार स्पोंडिलोसिस असलेल्या पुरुषांच्या रक्तामध्ये दाहकारक स्थिती दर्शविणा-या घटकांची पातळी अधिक प्रमाणात वाढते. ही वाढ एएस असलेल्या स्त्रियांमध्ये तितक्या अधिक प्रमाणात दिसून येत नाही.

६.एएससाठी जनुकेही कारणीभूत ठरतात. विशेषत्वाने एचएलए-बी२७ हे जनुक एएस विकसित होण्याचा धोका वाढविणारे असल्याचे मानले जाते. मात्र एचएलए-बी२७ जीन चाचणी केल्याने निदानाची शक्यता फेटाळता येत नाही. एचएलए-बी२७ असलेल्या सुमारे २ टक्‍के लोकांना हा आजार होत असल्याचे स्पॉन्डिलायटिस असोसिएशन ऑफ अमेरिकाचे मत आहे तसेच एएस असलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये एचएलए-बी२७ जनुक असेलच असे नाही.

मुंबईच्या ग्लोबल हॉस्पिटलमधील कन्सल्टन्ट हृमॅटोलॉजिस्ट डॉ. समीर राज्याध्यक्ष म्हणाले, “बायोलॉजिक्स (अँटी-टीएनएफ व आयएल-१७ इन्हिबिटर्स)च्या आगमनाने एएसच्या व्यवस्थापनामध्ये मोठ्या सुधारणा झाल्या आहेत. या अँटी-टीएनएफ औषधांद्वारे केल्या जाणा-या उपचारांना महिला रुग्ण कमी प्रतिसाद देत असल्याचे दिसून येते. शरीराची लवचिकता आणि हालचालींचा आयाम वाढविण्यासाठी, शरीराची ढब सुधारण्यासाठी आणि ताठरपणा व वेदना कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करणे महत्त्वाचे आहे.”

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navneet rana suffers from spondylosis know the symptoms and remedies ttg
First published on: 05-05-2022 at 16:33 IST