‘रेनमुंबई’ या वायदे कराराची संकल्पना काय?

मुंबईचा पाऊस आणि लोकल ट्रेनचे वेळापत्रक यांचे नाते जितके घट्ट, तितकीच मुंबईच्या पावसाची अनिश्चितता व्यापार्‍यांची चिंता वाढवणारी असते. परंतु, आता एनसीडीईएक्सने मुंबईतील पावसाच्या चढ-उतारांमुळे होणार्‍या आर्थिक नुकसानीपासून संरक्षण देण्यासाठी देशातील पहिले ‘वेदर डेरिव्हेटिव्ह’ कंत्राट सादर केले आहेत. सेबीची मान्यता प्राप्त हे कंत्राट २९ मे २०२६ पासून ट्रेडिंगसाठी खुले झाले.

काय आहे ‘रेनमुंबई’ कंत्राट?

‘एनसीडीईएक्स’चा हा नवा पॅरामेट्रिक वेदर डेरिव्हेटिव्ह मुंबई आणि परिसरातील पावसाच्या प्रमाणावर आधारित आहे. आता व्यापारी किंवा कंपन्या मुंबईत पडणार्‍या पावसाच्या अंदाजावर आधारित आर्थिक जोखीम व्यवस्थापन (हेजिंग) करू शकतील. आयआयटी मुंबईच्या सहकार्याने हे कंत्राट विकसित करण्यात आले असून, यासाठी भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) अधिकृत विदाचा आधार घेतला जाईल. जून ते सप्टेंबर या मोसमी पावसाच्या चार महिन्यांत मुंबईत सरासरीपेक्षा किती जास्त किंवा कमी पाऊस पडला, यावरून कंत्राटाचे मूल्य ठरेल. आयएमडीच्या कुलाबा आणि सांताक्रूझ येथील केंद्रांमधून येणारा पाऊस मापनाचा आकडा अंतिम मानला जाईल.

कंत्राटाचे मूल्य किती असेल?

कंत्राट मिलीमीटरमध्ये मोजले जाईल. एक मिमीचा फरक म्हणजे प्रति लॉट ५० रुपये असेल. म्हणजेच एक मिमीची घसरण किंवा वाढ यानुसार, ५० रुपये कमी-जास्त होतील. कमॉडिटी बाजारात खाते असणारी कोणतीही व्यक्ती यात व्यवहार करू शकते. यासाठी किमान १.१० लाख रुपयांची गुंतवणूक आवश्यक असेल. म्हणजेच १० टक्के मार्जिन अर्थात १० ते १२ हजार रुपयांत देखील हे व्यवहार करणे शक्य आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी १० ते रात्री ११:३० या वेळेत याचे व्यवहार करता येईल.

फायदा कोणाला होणार?

मुंबईत पावसामुळे अनेक व्यवसायांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. हा नवा पर्याय अशा संवेदनशील क्षेत्रांसाठी वरदान ठरेल. माल वाहतूकदार कंपन्यांना पावसामुळे वाहतूक ठप्प झाल्याने होणारे नुकसान भरून काढता येईल. पायाभूत सुविधा आणि बांधकाम कंपन्यांचे पावसामुळे काम रखडल्यास कामगार खर्च आणि वेळेचे होणार्‍या नुकसानाचे जोखीम व्यवस्थापन करता येईल. रोजच्या व्यवहारातली उदाहरणे द्यायची झाल्यास, शीतपेये आणि छत्री उत्पादक यांनादेखील लाभ होईल. थंड पेये बनवणार्‍या कंपन्यांचे जास्त पाऊस झाल्यास नुकसान होते, तर छत्री उत्पादकांना कमी पाऊस झाल्यास फटका बसतो. हे दोन्ही परस्परविरोधी व्यवसाय या कंत्राटाद्वारे आपली जोखीम कमी करू शकतील. तसेच कृषी कर्ज देणार्‍या बँकांना या माध्यमातून हवामान जोखमीचे व्यवस्थापन करणे सोपे जाईल.

आंतरराष्ट्रीय स्तरावर असे व्यवहार कुठे?

भारतासाठी पावसावर आधारित हे पहिलेच कंत्राट असले, तरी जागतिक स्तरावर शिकागो मर्कन्टाइल एक्सचेंजवर (सीएमई) अमेरिकेतील आणि युरोपमधील प्रमुख शहरांच्या हवामानावर (तापमान आणि पाऊस) आधारित फ्युचर्स कंत्राटांचे ट्रेडिंग गेल्या अनेक दशकांपासून यशस्वीपणे सुरू आहे. भारतासारख्या कृषीप्रधान आणि मान्सूनवर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी हे पाऊल भविष्यात फायदेशीर ठरेल. आगामी मान्सून हंगामात कंपन्या आणि ट्रेडर्स या ‘रेन फ्युचर्स’ला कसा प्रतिसाद देतात, यावर भारताच्या वेदर डेरिव्हेटिव्ह मार्केटचे भविष्य अवलंबून असेल.

बाजार किती मोठा होऊ शकतो?

‘रेनमुंबई’चे यश अखेरीस दोन बाबींवर अवलंबून असेल. पहिली, उद्योग क्षेत्र याचा खरोखर जोखीम व्यवस्थापनासाठी वापर करते का?, आणि दुसरी, या बाजारात पुरेशी तरलता निर्माण होते का? जर कॉर्पोरेट्स अर्थात कंपन्या आणि वित्तीय संस्था सक्रियपणे सहभागी झाल्या, तर भारतात हवामान वित्तीयकरणाचे नवे दालन खुले होऊ शकते. अन्यथा, हे उत्पादन मर्यादित ट्रेडिंगपुरतेच राहण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

gaurav.muthe@expressindia.com