Gen Z Slang Used in Parliament : नीट पेपरफुटी प्रकरण आणि परीक्षा सुधारणा विधेयकावरील चर्चेदरम्यान राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) तरुण मतदारांशी (Gen Z) थेट संवाद साधण्याची नवी रणनीती अवलंबल्याचे दिसून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे इन्स्टाग्राम रील्स आणि ‘F.R.I.E.N.D.S.’ शीर्षक गीताचा उल्लेख, बांसुरी स्वराज यांचे व्हायरल ‘मायक्रो क्लॅप्स’, श्रीकांत शिंदे यांनी वापरलेला ‘FOMO’ तसेच तेजस्वी सूर्या यांनी केलेला ‘Delulu’ असा जेन झी भाषेतील शब्दांचा वापर सत्ताधारी खासदारांकडून सातत्याने करण्यात आला. ‘जेन झी’शी कनेक्ट होण्यासाठी चर्चेदरम्यान त्यांचाच स्लँग अवलंबण्याचा भाजपचा प्रयत्न दिसत आहे.
नीट पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकारांमुळे देशभरातील तरुणांमध्ये रोष पाहायला मिळाला, सीजेपीने या प्रकारांविरोधात आंदोलन पुकारले. पेपरफुटीविरोधातील कायदा आणखी कडक करण्सास सीजेपीने सरकारला भाग पाडले आहे. याच पार्श्वभूमीवर संसदेतील परीक्षा सुधारणा विधेयकावरील चर्चेदरम्यान पारंपरिक राजकीय भाषेऐवजी जेन झीला परिचित असलेले इंटरनेट स्लँग वापरणाऱ्या तरुण खासदारांना पुढे केले जात आहे. विद्यार्थ्यांपर्यंत वेगळ्या पद्धतीने पोहोचण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न दिसत आहे.
पंतप्रधान मोदींचे इन्स्टाग्राम रील्स
नीट-युजी पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर देशभरात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणाऱ्या सेल्फी-स्टाईल इन्स्टाग्राम रील्सची मालिकाच देशवासियांना पाहायला मिळाली. त्यानंतर भाजपाने विद्यार्थ्यांची चिंता दूर करण्यासाठी सोशल मीडियावर आणखी एक मोहीम राबवली.
‘F.R.I.E.N.D.S.’ या लोकप्रिय मालिकेतील I’ll Be There For You हे शीर्षक गीत वापरून पंतप्रधान मोदींच्या छायाचित्रांची एक रील बनवण्यात आली, यातून भाजपाने विद्यार्थ्यांना संदेश दिला. ‘F.R.I.E.N.D.S… पंतप्रधान मोदी तुमच्यासोबत आहेत.’ परीक्षांबाबतच्या अलीकडील चिंता दूर करण्यासाठी सरकारने सर्वात कठोर पावले उचलली असून, पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत,’ असे भाजपाने एक्स (X) वरील पोस्टमध्ये म्हटले. ‘या सरकारसाठी देशातील तरुणांची स्वप्ने आणि त्यांचे कष्ट सर्वाधिक महत्त्वाचे आहेत. कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन केला जाणार नाही. आपल्या ध्येयावर टिकून राहा,’ असा संदेशही भाजपाने विद्यार्थ्यांना दिला.
बांसुरी स्वराज यांचे ‘मायक्रो क्लॅप्स’ आणि ‘Clocked It’
बांसुरी स्वराज यांनी परीक्षा सुधारणा विधेयकावरील चर्चेचे नेतृत्व केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीका करताना जेन झी भाषेचाही वापर केला. ‘काँग्रेसने धोरणात्मक पोकळी निर्माण केली होती. पण, जेन झीच्या भाषेत सांगायचं झालं तर मोदीजींनी ती Clocked it केली आणि त्यावर कायदेशीर तोडगा दिला,’ असे बांसुरी म्हणाल्या. हे बोलताना त्यांनी सोशल मीडियावर लोकप्रिय असलेली बोटांची हलकी टाळी (Micro Clap) वाजवण्याची स्टाईलही वापरली.
Clocked it म्हणजे एखादी गोष्ट अचूक ओळखणे किंवा मुद्द्यावर नेमके बोट ठेवणे असा त्याचा अर्थ होतो. बांसुरी स्वराज यांचे भाषण आणि त्यासोबत केलेले ‘मायक्रो क्लॅप्स’ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि मीम्सचा विषय ठरले. जेन झी कंटेंट क्रिएटर्स एखादा मुद्दा अधिक प्रभावी किंवा स्मार्ट वाटावा म्हणून अशा हावभावांचा वापर करतात, त्याच शैलीचा अवलंब त्यांनी केल्याचे अनेकांनी स्पष्ट केले.
मायक्रो क्लॅप म्हणजे नेमकं काय?
एखादा मुद्दा ठामपणे मांडल्यानंतर मोठ्याने टाळ्या वाजवण्याऐवजी, बोटांच्या टोकांनी हलक्या आणि वेगाने दिली जाणारी टाळी म्हणजे ‘मायक्रो क्लॅप.’ काही वर्षांपूर्वीपर्यंत हा हावभाव कॉर्पोरेट कार्यक्रमांपुरता मर्यादित होता. मात्र, आता तो सोशल मीडियावरील जेन झी संस्कृतीचा भाग बनला आहे. एखाद्याच्या मुद्द्याशी सहमती दर्शवायची असेल, एखादा डायलॉग ‘माइक ड्रॉप’ ठरला असेल किंवा समोरच्याला उपरोधिक प्रतिसाद द्यायचा असेल तर हा मायक्रो क्लॅप मोठ्या प्रमाणावर वापरला जातो, त्यामुळे हा केवळ टाळीचा प्रकार राहिलेला नाही, तर इंटरनेटवरील संवादाची एक वेगळी ‘बॉडी लँग्वेज’ बनली आहे.
श्रीकांत शिंदेंचा ‘FOMO’ आणि ‘Delulu’ उल्लेख
विधेयकावरील चर्चेदरम्यान शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनीही विरोधकांवर निशाणा साधण्यासाठी जेन झीमध्ये लोकप्रिय असलेल्या शब्दांचा वापर केला. विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू झाले तेव्हा विरोधक Missing In Action (MIA) होते, असा आरोप त्यांनी केला.
विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू झाल्यानंतर पहिल्या ३७ दिवसांत विरोधी पक्षाचा एकही नेता जंतरमंतरवर पोहोचला नाही, तेव्हा हे नेते कुठेच दिसत नव्हते. मात्र, आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतरच ते सक्रिय झाले असा दावा शिंदे यांनी केला. ‘विरोधकांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी नव्हे, तर Fear of Missing Out (FOMO) मुळे आंदोलनात उडी घेतली. विद्यार्थी आपल्या बाजूने येतील असा त्यांचा समज होता, पण तो केवळ delulu (भ्रामक समज) ठरला, अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी केली आहे.
तेजस्वी सूर्या यांचाही ‘Delulu’वरून विरोधकांवर निशाणा
‘परीक्षेतील पेपरफुटीच्या मुद्द्यावर तरुण मतदार विरोधकांच्या बाजूने उभे राहतील असा समज करून घेण्याइतका मोठा delulu दुसरा नाही,” अशी टीका तेजस्वी सूर्या यांनी केली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा राजकीय फायदा घेता येईल हा केवळ विरोधकांचा भ्रम असल्याचा दावा त्यांनी केला. विद्यार्थ्यांना घोषणाबाजी नको, तर परीक्षा व्यवस्थेत ठोस आणि दीर्घकालीन सुधारणा हव्या आहेत असे सूर्या यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी मागील सरकारांवरही टीका करत, पेपरफुटी आणि कॉपी रोखण्यासाठी प्रभावी कायदा करण्यास त्यांना अपयश आल्याचा आरोप केला. तसेच, विद्यार्थी आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतरच विरोधक सक्रिय झाले. विरोधकांना आंदोलनातून बाहेर राहण्याची भीती म्हणजेच FOMO (Fear of Missing Out) आहे, म्हणूनच त्यांनी या मुद्द्यावर घमासान केले असा टोलाही त्यांनी लगावला.
एनडीएने जेन झी ची भाषा का स्वीकारली?
परीक्षा सुधारणा विधेयकावरील चर्चा ही थेट लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांशी संबंधित होती, त्यामुळे कायदेशीर आणि संसदीय भाषेत बोलण्याऐवजी, सोशल मीडियावर लोकप्रिय असलेले शब्द आणि हावभाव वापरून तरुणांपर्यंत पोहोचण्याची रणनीती एनडीएने आखल्याचे दिसून आले आहे.
‘Delulu’, ‘FOMO’, ‘Clocked It’ यांसारखे शब्द आणि ‘मायक्रो क्लॅप’सारखे हावभाव हे इन्स्टाग्राम रील्स, यूट्यूब शॉर्ट्स आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगाने व्हायरल होणारे घटक मानले जातात, त्यामुळे संसदेतील गंभीर आणि तांत्रिक चर्चा तरुणांना समजेल अशा भाषेत मांडण्याचा एनडीएचा प्रयत्न दिसून आला. तसेच याबद्दलचे छोटे-छोटे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होतील, याचीही एनडीए नीट काळजी घेतेय हे दिसून आले.
