NEET Paper Leak Protests Gen Z Movement & Student Protests History: गेल्या काही दिवसांत देशात एक अभूतपूर्व चित्र पाहायला मिळालं. एका बाजूला पेपरफुटीसारख्या अन्याय्य व्यवस्थेविरोधात कानाकोपऱ्यातून एकत्र आलेला, शांततापूर्ण मार्गाने रस्त्यावर उतरलेला ‘जेन-झी’ (Gen Z) तरुण वर्ग; तर दुसऱ्या बाजूला “स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, तर राष्ट्रहितासाठी समर्पण” असा सल्ला देणारी सत्ताधारी व प्रशासकीय यंत्रणा.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि विचारवंत डॉ. राजेश्वर कुमार पराशर यांच्या अलिकडच्या वक्तव्यांनी या आंदोलनाभोवतीच्या चर्चेला एक नवी दिशा दिली आहे. ‘तरुणांनी गीतारहस्य वाचून टिळकांचे विचार समजून घ्यावेत’ आणि ‘केवळ इच्छेने किंवा मनाला येईल ते करणे नव्हे’ या सल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो: विद्यार्थ्यांचा हा आक्रोश म्हणजे केवळ एकाग्रतेचा अभाव व भाषेचा घसरलेला स्तर आहे, की एका नव्या, सजग आणि उत्तरदायी लोकशाहीवादी भारताच्या सुरुवातीचा आशेचा किरण?
‘रील्स बनवणारी पिढी’ जेव्हा रस्त्यावर उतरते, तेव्हा सत्ता हलते!
वर्षानुवर्षे ‘जेन-झी’वर एकच शिक्का मारला गेला – “ही पिढी फक्त रील्स बनवणारी, मीम्स शेअर करणारी आणि ३० सेकंदांपेक्षा जास्त लक्ष न देणारी पिढी आहे!” टीकाकारांनी यांच्या क्षमतेवरच प्रश्न उपस्थित केले होते की, ही मुलं स्वतःच्या पलीकडे जनहिताचा विचार करू शकतील का? पण, या आंदोलनाने तो गैरसमज पार धुळीस मिळवला.
नीट (NEET) पेपरफुटीविरोधात उठलेल्या आंदोलनानंतर घडलेल्या राजकीय आणि प्रशासकीय घडामोडी हा केवळ एका घटनेचा भाग नाहीत; तर तो भारताच्या आधुनिक इतिहासातील विद्यार्थी चळवळीचा एक अभूतपूर्व टप्पा आहे. एका परीक्षेतील अन्यायाविरोधात व्यक्त होऊ लागलेला संताप हळूहळू शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि विश्वासाच्या मागणीचे प्रतीक बनला. कोचिंग हबमध्ये रात्रीचा दिवस करून अभ्यास करणाऱ्या या विद्यार्थ्यांनी हा मुद्दा थंड होऊ दिला नाही. ते रस्त्यावर उतरले, उपोषणाला बसले आणि त्यांनी ही लढाई जिवंत ठेवली.
त्यांचा संदेश अगदी साधा आणि स्पष्ट होता – “जर यंत्रणा विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त करत असेल, तर जबाबदार व्यक्तीला उत्तर द्यावंच लागेल!”
अन्यायाविरुद्धचा हा लढा नवीन नाही:
विद्यार्थ्यांच्या चळवळींनी नेहमीच इतिहास बदलला आहे. कारण- तरुणांकडे कोणतीही राजकीय सत्ता नसली तरी त्यांच्याकडे नैतिक अधिकारा (Moral Authority)ची एक मोठी ताकद असते. भारतातील ‘जेन-झी’ आता जगातल्या त्या सर्व तरुणांच्या यादीत सामील झाले आहेत, ज्यांनी सत्ताधाऱ्यांना ऐकायला भाग पाडले आहे.
पॅरिस (१९६८): विद्यापीठातील कडक आणि अन्यायकारक नियमांविरुद्ध उठलेला विद्यार्थ्यांचा आवाज इतका तीव्र झाला की, अवघ्या काही दिवसांत लाखो कामगार त्यांचा आधार बनले आणि संपूर्ण फ्रान्स ठप्प होऊन शिक्षण व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात बदल झाले.
पार्कलँड, अमेरिका (२०१८) : शाळेतील गोळीबाराच्या भीषण दुर्घटनेनंतर तिथल्या विद्यार्थ्यांनी ‘मार्च फॉर एव्हर लाइव्ह्ज’ चळवळ उभारली आणि अमेरिकेतील सर्वांत शक्तिशाली ‘गन लॉबी’विरुद्ध देशातील राजकारण बदलायला भाग पाडलं.
चिली आणि दक्षिण आफ्रिका : चिलीमध्ये मोफत शिक्षणासाठी विद्यार्थ्यांनी वर्षानुवर्षं लढा दिला; तर दक्षिण आफ्रिकेच्या #FeesMustFall आंदोलनानं सरकारला फीवाढ मागे घ्यायला भाग पाडलं.
देश वेगळे होते, मुद्दे वेगळे होते; पण “आम्ही लहान आहोत म्हणून आमचा आवाज दाबला जाऊ शकत नाही ही भावना एकच होती.”
भारताच्या इतिहासातही हे घडलं आहे का?
विद्यार्थ्यांनी राजकारणाची दिशा बदलण्याची ही भारतामधली पहिलीच वेळ नाही. यापूर्वी घडलेली अशा स्वरूपाची आंदोलने खालीलप्रमाणे :
गुजरातचं नवनिर्माण आंदोलन (१९७४) : वसतिगृहातील जेवणाच्या वाढत्या दरांविरुद्ध विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनानं इतकं उग्र रूप धारण केलं की, तत्कालीन मुख्यमंत्री चिमणभाई पटेल यांना राजीनामा द्यावा लागला.
बिहारचं जेपी आंदोलन : या नवनिर्माण आंदोलनाच्या ठिणगीतूनच पुढे जयप्रकाश नारायण (जेपी) यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन जन्माला आलं, ज्यानं स्वतंत्र भारताच्या लोकशाहीची दिशाच बदलून टाकली.
ही पहिलीच ‘डिजिटल नेटिव्ह’ मैदानी लढाई!
- या नीट पेपरफुटीविरोधातील आंदोलनाचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे याचे नेतृत्व करणारे चेहरे! हे सर्व जेन-झी पिढीत जन्मले आहेत. त्यातली बहुतांश मुलं आधी कधीही कोणत्याही राजकीय रॅलीत गेली नव्हती. हे चेहरे पारंपरिक विद्यार्थी संघटनांमधून आलेले नव्हते; तर कोटा, दिल्ली किंवा गल्लीबोळांतील कोचिंग क्लासेसमधून आलेले सामान्य विद्यार्थी होते.
- त्यांनी इन्स्टाग्राम, टेलिग्राम, व्हॉट्सॲप व X (ट्विटर) या समाजमाध्यमाद्वारे संघटन केलं; पण त्यांनी एक गोष्ट मात्र पक्की ओळखली होती आणि ती म्हणजे केवळ सोशल मीडियावर व्यक्त केलेल्या संतापानं संस्थांच्या धोरणांमध्ये बदल होत नाहीत, तर त्यासाठी प्रत्यही रस्त्यावर उतरावंच लागतं.
- त्यांनी मीम्स, विनोद आणि आंदोलन यांचा असा काही सुरेख मेळ घातला की, विषयाचं गांभीर्य कमी होऊ न देता, त्याबाबतचा संदेश थेट तेट मार्मिक अशा पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचला.
इंटरनेटवर जन्मलेल्या या पिढीनं दाखवून दिलं की, ते डिजिटल आक्रोशाला मैदानावरील क्रांतीत बदलू शकतात.
सत्ताधाऱ्यांचा रोष, ‘गीतारहस्य’ अन् राष्ट्रीय कर्तव्याचा सल्ला
आंदोलन पेटलं की व्यवस्थेकडून नेहमी दोन पावलं उचलली जातात – आधी सुधारणांचं आश्वासन देणं आणि नंतर आंदोलकांच्या हेतूवर प्रश्न उपस्थित करणं. अलीकडेच, अमित शाह यांनी तरुणांना ‘गीतारहस्य’ वाचण्याचे आवाहन केले, तर अजित डोभाल यांनी ‘स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे’ अशी आठवण करून दिली. या सल्ल्यांमागे एक मोठे द्वंद्व दडले आहे: प्रस्थापित यंत्रणेला वाटतं की तरुणांनी शिस्त व कर्तव्याच्या चौकटीत राहावं; तर तरुणांच्या मते यंत्रणेला उत्तरदायी बनवण्यासाठी प्रश्न विचारणं हेच त्यांचं मुख्य कर्तव्य आहे!
राजीनामा हा शेवट नाही, ही तर सुरुवात आहे!
शिक्षामंत्र्यांचा राजीनामा हा या आंदोलनाचा विजय वाटू शकतो; पण त्यामुळे शिक्षण व्यवस्थेतील मूळ आजार बरा झालेला नाही. अजूनही अनुत्तरित असलेले अनेक मोठे प्रश्न कायम आहेत, ते खालीलप्रमाणे :
- नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) पुन्हा विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकू शकेल का?
- भविष्यात अशी पेपरफुटी रोखण्यासाठी वेळेत कठोर कायदे आणि सुधारणा होतील का?
- देशातील लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा वाटेल का की, त्यांचं भविष्य नशिबावर किंवा सेटिंगवर नाही, तर ते मेहनतीवर ठरेल?
या प्रश्नांची उत्तरंच ठरवतील की, हे आंदोलन फक्त एक क्षणिक विजय ठरतो की मोठ्या शिक्षण सुधारणेची नांदी!
प्रत्येक पिढीची एक ओळख :
इतिहासातील प्रत्येक पिढीची ओळख एका मोठ्या प्रसंगाने ठरते. पॅरिसच्या तरुणांसाठी ती ‘स्वातंत्र्य’ होती, पार्कलँडसाठी ‘सुरक्षा’ होती, १९७४ च्या तरुणांसाठी ‘सुशासन’ होती.
आणि आजच्या भारतीय ‘जेन-झी’साठी ती ओळख बनली आहे, ‘विश्वासा’ची.
हा विश्वास की, परीक्षेची रचना गुणवत्तेचा सन्मान करील.
हा विश्वास की, संस्था त्यांच्या चुकांची जबाबदारी घेईल.
आणि हा विश्वास की, जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीत तरुण जेव्हा एकत्र येतात, तेव्हा सत्ताधाऱ्यांना मान झुकवावीच लागते.
पुण्याच्या विचारपीठावरून जेव्हा गृहमंत्र्यांनी तरुणांना लोकमान्य टिळकांच्या ‘गीतारहस्य’चे वाचन करण्याचा सल्ला दिला, तेव्हा तो सल्ला या आंदोलनाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो. कारण, लोकमान्य टिळकांनी ‘गीतारहस्य’मधून निष्काम कर्मयोग आणि अन्यायाविरुद्धचा लढा हेच श्रेष्ठ धर्म असल्याचे स्पष्ट केले होते. टिळकांनीच देशाला शिकवले होते की, “अन्यायाचा प्रतिकार करणे आणि व्यवस्थेला जागे करणे हेच खरे राष्ट्रहित आहे.”
आजचा ‘जेन-झी’ जेव्हा नीट पेपरफुटीविरुद्ध शांततेने, अहिंसेने आणि ठामपणे रस्त्यावर उतरतो, तेव्हा तोसुद्धा एका अर्थाने टिळकांच्या याच विचारसरणीचा वारसा पुढे चालवत असतो. स्वैराचार आणि लोकशाही अधिकार यातील फरक या पिढीला उत्तम ठाऊक आहे; म्हणूनच त्यांनी हिंसेचा मार्ग न निवडता ‘सत्याग्रहाचा’ मार्ग निवडला.
ज्या पिढीवर ‘फक्त अल्गोरिदम आणि रील्समध्ये रमणारी पिढी’ म्हणून टीका केली जायची, तिनं संपूर्ण देशाला दाखवून दिलं आहे की, खरी राष्ट्रभक्ती म्हणजे डोळे मिटून अन्याय सहन करणे नव्हे, तर देशाच्या संस्थांना अधिक पारदर्शक आणि मजबूत बनवण्यासाठी प्रश्न विचारणे ही आहे. ‘जेन-झी’ने दाखवून दिले आहे की, इतिहास नेहमी त्यांचाच राहिला आहे ज्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आहे, आणि आज त्यांनी आपला इतिहास स्वतः लिहिण्यास सुरुवात केली आहे!
