Son killed Father उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ एका हत्या प्रकरणामुळे चर्चेत आहे. एका मुलाने आपल्याच वडिलांची अत्यंत क्रूरतेने हत्या केली. नीट परीक्षेच्या ताणामुळे त्याने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. या हत्या प्रकरणामुळे तरुण मुलांच्या मनावर शैक्षणिक दबावामुळे होणाऱ्या परिणामांबाबत पुन्हा एकदा चिंता निर्माण केली आहे. अभ्यास आणि करिअरच्या अपेक्षांवरून वारंवार होणाऱ्या वादातून या मुलाने आपल्या वडिलांची हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेने अनेकांना हादरवून सोडले असून, ‘नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट’ (नीट)सारख्या स्पर्धात्मक परीक्षांचा दबाव एखाद्याला हिंसक वर्तनाकडे नेऊ शकतो का? पालकांनी मुलांचा मानसिक तणाव वाढू नये यासाठी काय करायला हवे? यावर सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
मुलावर वडिलांच्या हत्येचा आरोप
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २० फेब्रुवारी रोजी लखनऊच्या आशियाना भागात घडली. आरोपी अक्षत प्रताप सिंह याने वादानंतर आपल्या वडिलांची (मानवेंद्र सिंह) परवानाधारक रायफलने गोळ्या झाडून हत्या केली. वडील पॅथॉलॉजिस्ट आणि मद्य व्यावसायिक होते. चौकशीदरम्यान, किशोरवयीन मुलाने पोलिसांना सांगितले की, घरात वारंवार भांडणे व्हायची. नीटसारख्या वैद्यकीय स्पर्धा परीक्षांबाबत आपल्यावर सतत दबाव असल्याचे त्याने सांगितले. तपासात असे समोर आले की, गोळीबार केल्यानंतर त्याने अत्यंत क्रूर पद्धतीने हा गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला.
‘द टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितले की, त्याने वडिलांच्या मृतदेहाचे तुकडे करून, डोके, हात, पाय व धड वेगळे केले. धड स्लीपिंग बॅगमध्ये घालून घरातील निळ्या रंगाच्या ड्रममध्ये ठेवले होते. शरीराचे इतर भाग सादौनाजवळील एका निर्जन ठिकाणी फेकले होते. परंतु, मृत व्यक्तीचे डोके अद्याप सापडलेले नाही. पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने सुमारे १० लिटर रॉकेलची व्यवस्था केली होती आणि तो मृतदेह जाळणार होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, त्याआधीच पोलिसांनी त्याला अटक केली.
अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी त्याने वडील बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली आणि ते दिल्लीला गेल्याचा बनाव रचला. वडिलांनी आत्महत्या केल्याचेही त्याने काही लोकांना सांगितले. मात्र, त्याच्या जबाबातील विसंगती पोलिसांच्या लक्षात आली. सखोल चौकशीनंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. गुन्ह्याच्या वेळी त्याची बहीण तिथे हजर होती आणि तिला गप्प राहण्यासाठी धमकावण्यात आले होते. पोलीस उपायुक्त विक्रांत वीर म्हणाले, “त्याने रागाच्या भरात वडिलांवर गोळी झाडल्याची कबुली दिली आहे. शरीराचे भाग वेगवेगळ्या ठिकाणी टाकण्यात आले होते. आरोपी कोठडीत असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.”
‘नीट’सारख्या परीक्षेचा अतिरिक्त ताण हिंसेला कारणीभूत ठरू शकतो?
‘नीट’सारख्या परीक्षेच्या ताणामुळे सहसा कोणी हिंसक पावले उचलत नाही. ‘न्यूज १८’ने दिलेल्या वृत्तानुसार दुर्मीळ परिस्थितीत, अति ताण, राग आणि वैयक्तिक समस्या यांचे मिश्रण अशा हिंसक परिणामांसाठी कारणीभूत ठरू शकते. मानसशास्त्रज्ञ अनेकदा ‘फ्रस्ट्रेशन-अॅग्रेशन’ या सिद्धान्ताचा संदर्भ देतात. बहुतेक प्रकरणांमध्ये, हा राग गंभीर हिंसेकडे नेत नाही; परंतु जर एखाद्यामध्ये भावनिक नियंत्रणाचा अभाव असेल, तर त्याचे रूपांतर हिंसक वर्तनात होऊ शकते.
‘न्यूज १८’च्या वृत्तानुसार परीक्षेचा ताण अनेकदा चिंता, नैराश्य आणि अगदी स्वतःला इजा करून घेण्याच्या विचारांना जन्म देतो. यासंबंधित विद्यार्थ्यांनी इतरांना इजा पोहोचवण्यापेक्षा स्वतःला हानी पोहोचवल्याच्या घटना अधिक प्रमाणात आढळतात. संशोधनानुसार, दबावामुळे चिडचिड आणि संताप वाढू शकतो. परंतु, त्याचे रूपांतर सहसा वादामध्ये होते; हत्येमध्ये नाही. भावनिक नियंत्रणाचा अभाव, प्रोत्साहनाचा अभाव यामुळे जोखीम वाढू शकते. जेव्हा विद्यार्थ्यांना आपण अडकलो आहोत, आपले कोणी ऐकत नाही किंवा आपल्यावर सतत टीका होत आहे, असे वाटते, तेव्हा त्यांचा ताण चुकीच्या मार्गांनी बाहेर पडू शकतो.
‘नीट’शी संबंधित काही दुर्मीळ घटना
परीक्षेच्या तणावाशी संबंधित काही घटना यापूर्वीही घडल्या आहेत. मार्च २०२५ मधील एका घटनेत, २० वर्षीय ‘नीट’च्या विद्यार्थ्याने ताण सहन होत नसल्याचे सांगत आपल्या आईची हत्या केली आणि वडिलांना जखमी केले होते. त्यानंतर आता ही १९ वर्षीय मुलाची घटना समोर आली आहे. या घटना अत्यंत दुर्मीळ आहेत. मुख्य म्हणजे भारतातील परीक्षेचा ताण इतरांविरुद्धच्या हिंसेपेक्षा विद्यार्थ्यांच्या आत्महत्येशी अधिक संबंधित आहे.
यावर उपाय काय?
तज्ज्ञांच्या मते, वेळीच केलेले समुपदेशन विद्यार्थ्यांना भीती आणि नैराश्याशी लढण्यास मदत करू शकते. ‘टॉक थेरपी’ आणि ‘सीबीटी’सारख्या पद्धती नकारात्मक विचारांचे व्यवस्थापन करण्यास मदत करतात. पालकांना अवास्तव अपेक्षा कमी करण्याचा आणि घरात सुरक्षित व आश्वासक वातावरण निर्माण करण्याचा सल्ला दिला जातो. भारतातील विद्यार्थी आधारासाठी iCall (9152987821)सारख्या हेल्पलाइनशी संपर्क साधू शकतात. अभ्यास करताना दीर्घ श्वास घेणे, थोडा वेळ चालणे आणि हलका व्यायाम यांसारख्या सोप्या पद्धतींमुळे मन शांत राहते. पुरेशी झोप, सकस आहार आणि सोशल मीडियाचा मर्यादित वापर हेदेखील महत्त्वाचे आहे, असे ‘न्यूज १८’च्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
कॅल्म आणि हेडस्पेससारखी अॅप्स ध्यान आणि श्वसनाचे व्यायाम शिकवतात. असे व्यायाम विद्यार्थी ब्रेकदरम्यान करू शकतात. मानसिक शक्ती वाढवण्यासाठी दररोज पाच ते दहा मिनिटांचे सत्र पुरेसे आहे. कुटुंबाशी बोलणे, फिरायला जाणे आणि स्क्रीनचा अतिवापर टाळणे यांसारख्या सवयींबरोबरच ही साधने वापरल्यास सर्वोत्तम परिणाम मिळतात.
‘नीट’च्या तयारीत पालकांची भूमिका?
तणाव कमी करण्यात पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मुलांचे म्हणणे ऐकून घेतल्यास, रँकऐवजी त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केल्यास आणि इतरांशी तुलना करणे टाळल्यामुळे मोठा फरक पडू शकतो. अभ्यासासाठी शांत जागा उपलब्ध करून देणे आणि नियमित जेवण व झोप यांची काळजी घेणेदेखील आवश्यक आहे. जर मुलांमध्ये सतत राग किंवा मुले लोकांपासून दूर राहू लागली, तर व्यावसायिक मदत घेणे गरजेचे आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, मुलाला हे जाणवून दिले पाहिजे की, त्याचे मूल्य केवळ परीक्षेच्या निकालावर अवलंबून नाही.

