NEET UG Paper Leak : देशातील ‘नीट’ सारख्या सर्वांत महत्त्वाच्या प्रवेश परीक्षेचा पेपर फुटणे ही गंभीर घटना असल्याने संपूर्ण परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. यापूर्वी प्रश्नपत्रिकांच्या वाहतुकीदरम्यान किंवा परीक्षा केंद्रांवर पेपर फुटल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र, यावेळी पेपर सेटिंग विभागातूनच पेपर फुटल्याचे समोर आल्याने हे प्रकरण गंभीर वळणावर पोहोचले आहे.

सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, नीट यूजी २०२६ चा पेपर परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचवण्याची सुरक्षित प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच एनटीएच्या (NTA) गोपनीय समजल्या जाणाऱ्या पेपर सेटिंग विभागातूनच प्रश्नपत्रिका लीक झाली. एनटीएमधील तीन विषयांच्या तज्ज्ञांनी संस्थेच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींचा फायदा घेत प्रश्नपत्रिका बाहेर काढल्याचा आरोप सीबीआयने केला आहे.

तज्ज्ञांनी पेपर कसा फोडला?

सीबीआयने आरोपपत्रात नमूद केले की, या प्रकरणातील मुख्य आरोपी पी. व्ही. कुलकर्णी (रसायनशास्त्र), मनीषा मांढरे (वनस्पतिशास्त्र) व मनीषा हवालदार (भौतिकशास्त्र) यांना एनटीएच्या पेपर सेटिंग प्रक्रियेत अधिकृतपणे प्रवेश देण्यात आला होता. प्रवेशासाठी दिल्या गेलेल्या व्यवस्थेचा कथितपणे गैरवापर करून पेपर बाहेर काढण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

पेपराच्या भाषांतर प्रक्रियेदरम्यान तज्ज्ञांना रफ कामासाठी कोरे कागद दिले जात होते. सीबीआयच्या आरोपानुसार, रसायनशास्त्राच्या तज्ज्ञाने याच कागदांचा वापर करून, रसायनशास्त्रातील सर्व १३५ प्रश्नांची थोडक्यात माहिती छोट्या चिठ्ठ्यांवर लिहून घेतली. मग या चिठ्ठ्यांच्या माध्यमातून पेपरमधील टिपून घेतलेली माहिती बाहेर पोहोचवण्यात आली.

सीबीआयने आरोपपत्रात असेही नमूद केले की, मॉडरेशनच्या प्रक्रियेदरम्यान तज्ज्ञांनी एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांमधील संबंधित परिच्छेद, आकृत्या आणि प्रश्नांवर पद्धतशीरपणे खुणा केल्या. अंतिम प्रश्नपत्रिकेच्या संचांची पाहणी करताना त्यांना बराच वेळ मिळाल्याने, संबंधित प्रश्न नंतर अचूकपणे पुन्हा लिहिता यावेत यासाठी त्यांनी ते प्रश्न लक्षात ठेवले, असे अहवालांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

एनटीएच्या सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी

सीबीआयच्या म्हणण्यानुसार, एनटीएच्या मुख्यालयातील सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटींमुळे प्रश्नपत्रिकेची माहिती बाहेर नेणे शक्य झाले. गोपनीय विभागात काम करणाऱ्या तज्ज्ञांवर पुरेशी देखरेख नसल्याचे तपासात समोर आले आहे.

तज्ज्ञांच्या तपासणीची व्यवस्थाच नव्हती
गोपनीय आणि सुरक्षित विभागात प्रवेश करताना किंवा बाहेर पडताना विषयतज्ज्ञांची झडती घेण्याची किंवा त्यांची तपासणी करण्याची कोणतीही ठोस व्यवस्था एनटीएने केलीच नव्हती. त्यामुळे हाताने लिहिलेल्या चिठ्ठ्या सहजपणे बाहेर नेणे शक्य झाले, असा सीबीआयचा आरोप आहे.

गोपनीय कक्षाकरिता स्वतंत्र सीसीटीव्ही प्रणालीची उणीव
एनटीएकडे गोपनीय अशा या विभागातील हालचालींवर थेट लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र सीसीटीव्ही नियंत्रण कक्षही नव्हता. त्यामुळे गोपनीय कक्षात तज्ज्ञ काय करीत होते, याची माहिती सुरक्षा कर्मचाऱ्यांना वेळेवर मिळाली नाही.

एकाच तज्ज्ञाला संपूर्ण पेपर संच पाहण्याची मुभा
कोणत्याही एकाच तज्ज्ञाला अंतिम पेपरचा संपूर्ण संच पाहता येऊ नये, अशी सुरक्षा व्यवस्था असणे अपेक्षित होते. मात्र, एनटीएने एकाच तज्ज्ञाला प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये सहभागी होण्याची मुभा दिली. त्यामुळे काही तज्ज्ञांना परीक्षेच्या चारही अंतिम पेपरांच्या संचांमधील सर्व प्रश्न पाहण्याची पूर्ण संधी मिळाली, असा सीबीआयचा आरोप आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिकांची गोपनीयता भंग झाली.

पेपर बाहेर कसा पोहोचला आणि पैशांचा व्यवहार कसा झाला?

सीबीआयच्या आरोपपत्रानुसार, तज्ज्ञांनी पेपरमधील माहिती बाहेर काढल्यानंतर एका संघटित नेटवर्कच्या माध्यमातून ती माहिती पुढे पोहोचवण्यात आली. संबंधित तज्ज्ञांनी प्रश्नांची माहिती पुण्यासह काही शहरांमधील कोचिंग सेंटर चालवणाऱ्यांना आणि निवृत्त प्राध्यापकांना दिल्याचा आरोप आहे.

त्यानंतर या प्रश्नांची माहिती एकत्र करून, निवडक विद्यार्थ्यांसाठी ‘गेस पेपर’ तयार करण्यात आले. परीक्षा होण्याच्या काही आठवडे आधी हे प्रश्न व्हॉट्सअॅप, टेलिग्राम आणि काही गुप्त कोचिंग वर्गांमधून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्याचे सीबीआयच्या तपासात समोर आले आहे.

या व्यवहारात मध्यस्थांनी अंतर्गत सूत्रांना पाच लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर हे प्रश्न गरजू विद्यार्थ्यांना विकू, त्यांच्याकडून यापेक्षा कैक पटींनी अधिक पैसे घेतले जात होते.

थेट एनटीएच्या गोपनीय विभागातूनच पेपरफुटी झाल्याचा आरोप आणि त्यानंतर झालेला पैशांचा व्यवहार यांमुळे प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे. या पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर एनटीएला ३ मे रोजी होणारी परीक्षा रद्द करावी लागली आणि संपूर्ण परीक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले.