नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) ३ मे रोजी घेतलेली नीट-यूजी (NEET-UG) परीक्षा रद्द केल्याची घोषणा मंगळवारी (१२ मे) केली. २२.०५ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. नीट-यूजी चा पेपर फुटल्याचे संशयित पुरावे मिळाल्यानंतर एनटीएकडून हा निर्णय घेण्यात आला. इतिहासात पहिल्यांदाच नीट-यूजी परीक्षा रद्द झाली आहे. वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी ही प्रवेश पूर्व परीक्षा आहे. राजस्थान मधील पोलिसांना व्हॉट्सअ‍ॅपवर ‘गेस पेपर’ची पीडीएफ व्हायरल झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तपासाची चक्रे फिरवली. व्हॉट्सअ‍ॅप मेसेजवर “Forwarded Many Times” असे टॅग होते. ‘गेस पेपर’ची पीडीएफ दोन-एक जणांपर्यंतच पोहोचली असेल, असा पोलिसांना संशय होता. परंतु, या मेसेजच्या उगमाचा शोध घेत असताना ‘पेपर फुटी’ची व्याप्ती मोठी असल्याचे राजस्थानच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुप (SOG) ला आढळून आले.

कसा फुटला पेपर?

या पेपर फुटीचा तपास करणाऱ्या राजस्थान स्पेशल ऑपरेशन ग्रुपच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘प्रायव्हेट माफिया’ नावाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पेपर पोस्ट करण्यात आला होता. या ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी ५ हजार रूपयांपासून पुढे रक्कम भरण्यात आली होती. या ग्रुपच्या अ‍ॅडमिनकडून पेपर कोणालाही शेअर करू नका अशा सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु, तरीही पेपर ग्रुपच्या बाहेर इतर ठिकाणी शेअर करण्यात आला, अशी माहिती स्पेशल ऑपरेशन ग्रुपच्या अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकरणाचा तपास मंगळवारी केंद्रीय अन्वेषण ब्यरो अर्थात सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे.

नाशिक कनेक्शन काय?

प्राथमिक तपासावरून पेपर हा महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातून फुटला असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. नाशिक पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या शुभम खैरनार (३०) याला ताब्यात घेण्यात आले आहे. नीट-यूजी परीक्षेच्या काही दिवस आधी त्याने प्रश्नपत्रिका मिळवली होती व ती पुढे शेअर केली होती.

नाशिक शहर पोलीस उपायुक्त किशोर काळे म्हणाले, शुभमची चौकशी केल्यानंतर त्याने प्रश्नपत्रिका पुण्याच्या एका सहकाऱ्याने मिळवल्याचे सांगितले. पुण्यातील संशयिताने हार्ड कॉपी स्वरूपात प्रश्नपत्रिका मिळवली होती. त्यानंतर त्याने ती सॉफ्ट कॉपी स्वरूपात शेअर केली. सॉफ्ट कॉपी ही गेस पेपरची आहे की नीट-यूजी परीक्षेची मूळ प्रश्नपत्रिका आहे, याचा तपास सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

“शुभम खैरनार हा मागील वर्षी भोपाळमध्ये बॅचलर ऑफ आयुर्वेदचे (बीएएमएस) शिक्षण घेत होता. तसेच तो नाशिकमध्ये त्याच्या कुटुंबाबरोबर राहतो. त्याला ताब्यात घेण्याबाबत माहिती आम्हाला राजस्थानच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपकडून मिळाली. त्यानंतर आम्ही त्याला ताब्यात घेऊन गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणले. प्राथमिक चौकशीतून तो पेपर लिक प्रकरणाशी संबंधित असल्याचे दिसून येते. आम्ही त्याला आता सीबीआयकडे सोपवत आहोत”, अशी माहिती काळे यांनी दिली. तसेच नाशिकमधून पेपर फुटल्याची अफवा तथ्यहीन असून पेपरची छपाई नाशिकमध्ये झाली नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

नाशिकचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चौहान म्हणाले, “ओळख पटू नये म्हणून आरोपीने केस कापले होते. तांत्रिक विश्लेषण आणि पोलीस तपासामुळे त्याला शोधून पकडणे शक्य झाले.” शुभमने पेपर १० लाख रूपयांना खरेदी केला व पुढे तो १५ लाख रूपयांना विकल्याचा संशय पोलीस अधिकाऱ्यांना आहे. गुडगावमधील काही लोकांना पेपर शेअर केल्याचा आरोप शुभमवर आहे. त्यानंतर तो पेपर राजस्थान, केरळ, बिहार, उत्तराखंड, जम्मू काश्मीर आणि इतर राज्यांमध्ये पोहोचला. पेपर ज्यांना मिळाला त्यात मुख्यत: विद्यार्थी व करिअर मार्गदर्शकांचा समावेश आहे.

१५० हून अधिक विद्यार्थी, पालकांची चौकशी

राजस्थान स्पेशल ऑपरेशन ग्रुपने प्रति कोटा म्हणून ओळख निर्माण झालेल्या सीकर शहरात देखील मंगळवारी (१२मे) तपास केला. सीकर मध्ये नीट क्लासेस मोठ्या संख्येने आहेत. दरम्यान, राजस्थानमधील शेखावती येथे पेयिंग गेस्ट सुविधा चालवणाऱ्या एका व्यक्तीला केरळमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या त्याच्या मुलीने पेपर शेअर केला होता. त्यानंतर शेखावतीतील त्या व्यक्तीने इतरांना तो पेपर पुढे पाठवला. परीक्षा होण्याच्या काही दिवस आधी हा पेपर त्या व्यक्तीला मिळाला होता. स्पेशल ऑपरेशन ग्रुप या प्रकरणाचा तपास करत आहे.

स्पेशल ऑपरेशन ग्रुपचे (एसओजी) महासंचालक अजय पाल लांबा यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, १५० हून अधिक उमेदवार, त्यांचे मित्र आणि पालक यांची चौकशी करण्यात आली आहे. एसओजीने सीबीआयकडे ज्यांना पेपर मिळाला त्या १५० विद्यार्थी व ७० पालकांची नावे असलेली यादी सोपवली आहे. तसेच काही संशयितांना सीबीआयकडे सोपवल्याचे लांबा म्हणाले.

नीट-यूजी परीक्षेची मूळ प्रश्नपत्रिका गेस पेपर असल्याचे सांगून विकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा संशय लांबा यांनी व्यक्त केला आहे. अनेक जणांची चौकशी केल्यानंतर यामागे एक समूह (गँग) असल्याचे दिसून येते. आता या सगळ्या संशयितांची सीबीआय चौकशी करणार आहे. पेपरफुटीचे केंद्र राजस्थान आहे, असे म्हणणे चुकीचे ठरेल. राजस्थानमध्ये प्रश्नपत्रिका पोहोचण्याआधी ती गुडगावमध्ये पोहोचली होती. त्यामुळे या पेपरफुटीचे मूळ राजस्थानमध्ये नाही, असा दावा लांबा यांनी केला आहे. राजस्थानमध्ये यापूर्वी पेपरफुटीशी संबंधित असलेल्या गँगचा यात हात नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

पेपरफुटीच्या सर्वात पहिल्या तक्रारीकडे पोलिसांनी केले दुर्लक्ष, तक्रारदारच अडकला चौकशीच्या फेऱ्यात

पेपर व्हॉट्सअ‍ॅपवर शेअर होण्याची सुरूवात होताच राजस्थानमधील एका व्यक्तीने (व्हिसलब्लोअर – माहिती देणारा) पोलिस ठाणे गाठून याबाबत माहिती दिली होती. परंतु, पोलिसांनी त्याच्या तक्रारीला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्या व्यक्तीने एनटीएला लिखित स्वरूपात माहिती पाठवली. त्याच्या माहितीची पडताळणी एनटीएने केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. त्यानंतर राजस्थान पोलिसांच्या एसओजीने तपासाची चक्रे फिरवली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या माहिती देणारी ही व्यक्तीच चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे. या व्यक्तीकडे प्रश्नपत्रिका आली, त्यानंतर तिने ती प्रश्नपत्रिका पुढे शेअर केली. प्रश्नपत्रिका मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याने भीतीने त्या व्यक्तीने पोलीस ठाणे गाठले, अशी माहिती समोर आली आहे.

एनटीएचे डायरेक्टर जनरल अभिषेक सिंह मंगळवारी म्हणाले, व्हिसलब्लोअरने परीक्षेच्या आधीच व्हॉट्सअ‍ॅपवर पेपरशी संबंधित मेसेज मिळाल्याचे सांगितले. त्यानंतर त्या पेपर मधील काही प्रश्न हे मूळ प्रश्नपत्रिकेत असल्याचे त्या व्हिसलब्लोअरला आढळून आले.

अतिरिक्त पोलीस महासंचालक विशाल बन्सल यांनी जयपूर मध्ये माध्यमांना याबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, गेस पेपरमध्ये ४०० हून अधिक प्रश्न असल्याचे एसओजीने आधीच सांगितले आहे. त्यापैकी १२० प्रश्न हे नीट-यूजीच्या मूळ प्रश्नपत्रिकेत होते. हा गेस पेपर परीक्षेच्या काही आठवडे आधी किंबहुना महिनाभर आधीच विद्यार्थ्यांकडे होता, असे बन्सल म्हणाले. १५० पानांच्या पीडीएफ फाईलमध्ये ४०० हून अधिक प्रश्न त्या गेस पेपरमध्ये होते.