नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) घेतली जाणारी नीट-यूजी परीक्षा उद्या (रविवार, २१ जून) होणार आहे. याआधी ३ मे रोजी नीट – यूजीची परीक्षा जवळपास २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली होती. या परीक्षेच्या आधीच पेपर फुटल्याचे समोर आल्यानंतर एनटीएने परीक्षा रद्द केली होती. आता नीट – यूजीची पुनर्परीक्षा उद्या होणार आहे. पेपर फुटल्यामुळे नीट – यूजीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला होता.
नीट – यूजी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. केंद्र सरकारने परीक्षा घेण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. १७ जून रोजी एनटीएने विद्यार्थ्यांसाठी एक पोस्ट शेअर केली होती. त्यात म्हटले की, तुम्ही कठोर मेहनत घेऊन तयारी केली आहे. तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवण्याची वेळ आता आली आहे. शांत राहा, विश्रांती घ्या आणि तुमचे सर्वोत्तम देण्यावर लक्ष केंद्रीत करा, असा संदेश एनटीएने विद्यार्थ्यांना दिला. या परीक्षेशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी अतिरिक्त सतर्कता बाळगावी, असे निर्देश केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले आहेत. परीक्षा प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
भारतीय हवाई दलाच्या मदतीने देशभरात पोहोचली प्रश्नपत्रिका
नीट – यूजी पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिका देशभरात पोहोचवण्यासाठी भारतीय हवाई दलाची मदत घेण्यात आली. प्रश्नपत्रिकांना देशातील १८ विभागांमध्ये पोहोचवण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या विमानांनी मागील आठवड्यात जवळपास २०० हून अधिक उड्डाणे केली आहेत. १३ जून रोजी भारतीय हवाई दलाने प्रश्नपत्रिका देशभरात सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम नीट – यूजी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर पूर्ण झाली आहे. या मोहिमेत हवाई दलाचे एमआय – १७ हेलिकॉप्टर्स आणि वाहतूक विमानांचा वापर करण्यात आला होता.
भारतीय हवाई दलाने मोहीम हाती घेतल्यानंतर २०० हून अधिक उड्डाणे करण्यात आली. परीक्षेच्या आधी निश्चित केलेल्या ठिकाणांवर प्रश्नपत्रिका पोहोचावी याची खात्री करण्यात आली. संबंधित ठिकाणांवर प्रश्नपत्रिका पोहोचल्यानंतर पुनर्परीक्षेआधी त्या प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांवर पोहोचवल्या जाणार आहेत. प्रश्नपत्रिका सील केलेल्या आहेत. कडक बंदोबस्तात प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांवर पोहोचवल्या जातील, असे वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिले होते. “प्रश्नपत्रिका सुरक्षितपणे आणि वेळेवर देशभरात पोहोचाव्यात यासाठी भारतीय वायु दलाच्या विमानांची मदत घेण्यात आली”, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
पुनर्परीक्षेआधी टेलिग्रामवर बंदी का घालण्यात आली?
नीट – यूजी पुनर्परीक्षेआधी केंद्र सरकारने टेलिग्राम या मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे. परीक्षेबाबत होणारा गैरप्रकार रोखण्यासाठी टेलिग्रामवर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी २२ जून पर्यंत कायम राहणार आहे. तसेच टेलिग्रामचे मेसेज एडिटिंग फिचर देखील ३० जून पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश टेलिग्रामला देण्यात आले आहे. याबाबत एनटीएने ‘एक्स’वर माहिती दिली होती.
एनटीएने दिलेल्या माहितीनुसार, अनेक टेलिग्राम चॅनेल्स नीट – यूजी पुनर्परीक्षेचा पेपर उपलब्ध करून देण्याचा दावा करत होते. त्यासाठी ते विद्यार्थ्यांना पैशांची मागणी करत होते. पेपर लिक्ड नीट (PAPER LEAKED NEET), रि-नीट २०२६ (Re-NEET 2026) आणि पेपर माफिया (Private Mafia) या काही चॅनेल्सची नावे एनटीएने नमूद केली आहेत.
टेलिग्रामच्या मेसेज एडिटिंग फिचरचा वापर करून जुने मेसेज एडिट केले जात होते. जुन्या मेसेज मधील पीडीएफ फाइल बदलून त्या जागी पार पडलेल्या परीक्षेची पीडीएफ लावली जात असल्याचे एनटीएने म्हटले आहे. जुन्या मेसेजला एडिट केल्यानंतर पेपर आधीच फुटला होता, असा खोटा दावा केला जातो, असे एनटीएने म्हटले आहे. दरम्यान, टेलिग्रामवर घालण्यात आलेल्या बंदीला टेलिग्रामने विरोध केला आहे. सरकारच्या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. टेलिग्रामचे सीईओ पावेल दुरोव यांनी या बंदीला सरकारची एक चूक आहे, असे म्हटले आहे. तसेच यामुळे इतर लाखो टेलिग्राम वापरकर्त्यांना शिक्षा दिली जातेय, असाही आरोप त्यांनी केला.
प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांना ठेवले गुप्त ठिकाणी?
नीट – यूजी पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांना कडक सुरक्षा बंदोबस्तात आणि एका गुप्त ठिकाणी ठेवल्याची माहिती समोर आली आहे. तसेच पुनर्परीक्षेबाबत कठोर सुरक्षा उपाययोजना राबवल्या जात आहेत. या उपाययोजना नीट-यूजीची पुनर्परीक्षा होईपर्यंत लागू असणार आहेत. नीट – यूजी पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका तयार करण्याशी संबंधित सर्वांवर कडक निर्बंध लावण्यात आले. त्यांच्या इतरांशी असलेल्या संपर्कावर नियंत्रण ठेवण्यात आले. परीक्षा प्रक्रियेबाबत गुप्तता पाळण्यासाठी काही कडक नियमांचे पालन करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने याबाबत वृत्त दिले आहे.
