NEET vs JEE Main Paper Leak Security Analysis : देशातील २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे भविष्य ठरवणारी यंदाची नीट परीक्षा रद्द करण्याची नामुष्की केंद्र सरकारवर ओढवली. पेपरफुटीचे आरोप झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले. नव्या परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका नेमक्या कुठे छापल्या जातात? त्यासाठी कोणती सुरक्षा व्यवस्था असते? छपाईमध्ये चूक झाल्यास काय प्रक्रिया राबवली जाते? तसेच ‘संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य’ (जेईई-मेन) तुलनेने अधिक सुरळीत कशी पार पडते? याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. त्याविषयीचा हा आढावा…

NEET प्रश्नपत्रिका कुठे छापल्या जातात?

पेपरफुटीच्या संशयावरून नीट-यूजी परीक्षाच वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर या प्रश्नपत्रिकांची छपाई नेमकी कुठे होते, असा प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका तयार करण्याची प्रक्रिया अत्यंत जटिल आणि गोपनीय असते. साधारणपणे नीट-यूजी प्रश्नपत्रिकांची छपाई नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (NTA) केली जाते. परीक्षेची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी या छापखान्यांची अचूक ठिकाणे अत्यंत गुप्त ठेवली जातात. मात्र, अलीकडच्या काळातील पेपरफुटीच्या प्रकरणांच्या तपासात काही विशिष्ट शहरांमध्ये ही छपाई झाल्याचे समोर आले आहे. या प्रश्नपत्रिकांची छपाई नाशिक, जयपूर, पश्चिम बंगाल, दिल्ली आणि गुजरात येथे केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

NEET ची प्रश्नपत्रिका कशी तयार केली जाते?

लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरवणाऱ्या नीटच्या प्रश्नपत्रिका तयार करण्याची प्रक्रिया अत्यंत गोपनीय आणि नियंत्रणाखाली पार पडते. त्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून देशभरातील वरिष्ठ प्राध्यापक, शास्त्रज्ञ आणि विषयतज्ज्ञांची एक गुप्त समिती स्थापन केली जाते. या सर्वांना कठोर गोपनीयता करारांतर्गत काम करावे लागते. संपूर्ण प्रश्नपत्रिका प्रक्रिया ‘National Council of Educational Research and Training’ (NCERT) च्या अभ्यासक्रमावर आधारित असते. त्यातील प्रश्न हे एकतर थेट NCERT पुस्तकातून विचारले जातात किंवा त्यावरील संकल्पनांवर आधारित असतात. प्रश्नपत्रिका तयार करताना सुरुवातीला विविध अवघड पातळींच्या हजारो प्रश्नांचा मोठा प्रश्नसंच तयार केला जातो. त्यानंतर त्यातून निवडक प्रश्न अंतिम प्रश्नपत्रिकेसाठी निश्चित केले जातात. या प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप कमीत कमी राखण्याचा प्रयत्न केला जातो. प्रश्नांची निवड करतानाही कमालीची गुप्तता पाळली जाते, जेणेकरून अंतिम प्रश्नपत्रिका परीक्षेच्या दिवसापर्यंत कोणालाही कळणार नाही.

NEET परीक्षेचे प्रश्न कसे ठरवले जातात?

नीट यूजीच्या प्रश्नपत्रिकेत संतुलन राखण्यासाठी त्यातील प्रश्न विविध प्रकारांत विभागले जातात. सुमारे ३० टक्के प्रश्न मूलभूत सिद्धांत आणि सूत्रांवर आधारित असतात, जेणेकरून सामान्य तयारी केलेले विद्यार्थीही ते सोडवू शकतील. त्याशिवाय सुमारे ५० टक्के प्रश्न संकल्पना आणि त्यांच्या वापरावर आधारित असतात. त्यामधून विद्यार्थ्याला विषय कितपत सखोल समजला आहे, याची चाचणी घेतली जाते. उर्वरित २० टक्के प्रश्न कठीण आणि विश्लेषणात्मक स्वरूपाचे असतात, ज्यातून गुणवत्तेनुसार अव्वल विद्यार्थ्यांची निवड केली जाते.

प्रश्नपत्रिकेच्या छपाईचे नियम काय?

नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे NEET प्रश्नपत्रिका छपाईसाठीचे नियम अत्यंत कडक मानले जातात. प्राप्त माहितीनुसार, उच्चस्तरीय लेखापरीक्षण (ऑडिट) आणि सुरक्षा तपासणीनंतरच निवडक मुद्रणालयांनाच छपाईचे काम दिले जाते. प्रश्नपत्रिकेची रचना, छपाई आणि पॅकिंग या प्रत्येक टप्प्यावर नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे अधिकारी उपस्थित असतात. प्रश्नपत्रिकेशी संबंधित काम सुरू असताना बाहेरील कोणालाही प्रवेश दिला जात नाही. त्याशिवाय छपाई केंद्रात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले असतात आणि त्यांचे फुटेज किमान एक वर्ष सुरक्षित ठेवले जाते. छापखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही मोबाईल फोन किंवा कॅमेरे आत नेण्यास परवानगी नसते. प्रश्नपत्रिका डिजिटल आणि एन्क्रिप्टेड स्वरूपात मुद्रणालयात पाठवली जाते. प्रत्येक पानावर स्वतंत्र युनिक कोड असतो, ज्यामुळे कोणतीही गडबड झाल्यास तिचा स्रोत शोधता येतो.

चुकीच्या छपाईच्या प्रतींचे काय होते?

छपाईदरम्यान एखादी प्रत चुकीची छापली गेल्यास ती नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या निर्देशानुसार तात्काळ नष्ट केली जाते. सामान्यतः NEET साठी तीन स्वतंत्र प्रश्नसंच तयार केले जातात, जेणेकरून एका संचावर आधारित गैरप्रकार किंवा कॉपी टाळता येईल. छपाई पूर्ण झाल्यानंतर प्रश्नपत्रिका पूर्णपणे सीलबंद करून ‘स्ट्राँग रूम’मध्ये पाठवल्या जातात आणि त्यानंतर GPS ट्रॅकिंग असलेल्या वाहनांद्वारे परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचवल्या जातात. यादरम्यान प्रत्येक हालचालीची नोंद ठेवली जाते. परीक्षा केंद्रांवर निश्चित वेळेपूर्वी प्रश्नपत्रिका उघडण्यास परवानगी नसते आणि तेथेही अनेक स्तरांवर देखरेख ठेवली जाते.

NEET परीक्षेचा पॅटर्न कसा असतो?

नीट-यूजी परीक्षेत एकूण २०० प्रश्न असतात आणि त्यापैकी विद्यार्थ्यांना किमान १८० प्रश्न सोडवणे आवश्यक असते. त्यामध्ये भौतिकशास्त्र विषयाचे ४५, रसायनशास्त्राचे ४५ आणि जीवशास्त्राचे ९० प्रश्न असतात. प्रत्येक अचूक उत्तरासाठी विद्यार्थ्यांसाठी गुण दिले जातात; तर चुकीच्या उत्तरासाठी एक गुण वजा केला जातो. ही संपूर्ण प्रश्नपत्रिका ७२० गुणांची असते.

JEE Main मध्ये पेपरफुटीच्या घटना कमी का?

नीट-यूजी परीक्षेचे पेपर वारंवार कसे फुटतात आणि त्यात तुलनेत ‘संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य’ (जेईई-मेन) अधिक सुरळीत कशी पार पडते? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. तज्ज्ञांच्या मते, यामागचे मुख्य कारण या दोन्ही परीक्षांची रचना आणि व्यवस्थापनातील फरक आहे. नीट-यूजी परीक्षा अजूनही ऑफलाइन पद्धतीनेच घेतली जाते. त्यामुळे लाखो प्रश्नपत्रिका छापणे आणि त्या विविध शहरांमध्ये पोहोचवणे व सुरक्षित ठेवणे आवश्यक ठरते. या संपूर्ण प्रक्रियेत अनेक टप्प्यांवर पेपरफुटीचा धोका वाढतो. त्याउलट जेईई-मेन ही परीक्षा पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने घेतली जाते. प्रश्नपत्रिका सुरक्षित ठेवून परीक्षा सुरू होण्याच्या काही मिनिटांपूर्वीच ती डिजिटल पद्धतीने उघडली जाते. त्यामुळे आधीच प्रश्नपत्रिका चोरणे किंवा लीक करणे अत्यंत कठीण होते.

जेईई-मेन्सचे मॉडेल कसे वेगळे?

नीट यूजी परीक्षा देशभरात एकाच दिवशी आणि एकाच प्रश्नपत्रिकेसह घेतली जाते. त्यामुळे एखाद्या एकाच ठिकाणी पेपरफुटी झाली तरी संपूर्ण परीक्षेवर परिणाम होतो. याउलट जेईई-मेन परीक्षा अनेक दिवस आणि विविध शिफ्टमध्ये घेतली जाते. प्रत्येक शिफ्टमध्ये वेगवेगळे प्रश्न असतात. त्यामुळे एखाद्या केंद्रावर समस्या निर्माण झाली तरी संपूर्ण परीक्षेवर त्याचा परिणाम होत नाही. याशिवाय नीट यूजीसाठी सुमारे ४,७०० ते ५,००० परीक्षा केंद्रे उभारली जातात. त्यापैकी बहुतांश केंद्रे सामान्य शाळा आणि महाविद्यालयांमध्ये असतात, जिथे सुरक्षा व्यवस्था सर्वत्र समान दर्जाची नसते, तर जेईई-मेन परीक्षा मर्यादित आणि विशेष डिजिटल केंद्रांवर घेतली जाते. तिथे उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसारख्या अधिक सक्षम सुरक्षा सुविधा उपलब्ध असतात.

NEET परीक्षेचा पॅटर्न बदलणार का?

सततच्या वाद आणि पेपरफुटीच्या घटनांनंतर आता नीट-यूजी परीक्षा जेईई-मेन प्रमाणे ऑनलाइन पद्धतीने घेण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, परीक्षेची ही पद्धती स्वीकारल्यास प्रश्नपत्रिका फुटण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. मात्र, यामध्ये अनेक मोठी आव्हाने आहेत. ग्रामीण भागांमध्ये डिजिटल पायाभूत सुविधांचा, इंटरनेटची समस्या आणि संगणक सुविधा अजूनही अपुरीच आहे. त्याशिवाय दरवर्षी २० लाखांहून अधिक विद्यार्थी NEET परीक्षा देतात. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन परीक्षा आयोजित करणे हे मोठे आव्हानात्मक ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.