Neha Bora presence with Congress Leaders Discontent in NSUI : ऑल इंडिया स्टुडंटस असोसिएशनची (AISA) अध्यक्षा नेहा बोरा आणि त्यांची काँग्रेसच्या आंदोलनातील उपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. विशेषतः काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयूआयमध्ये याबाबत अस्वस्थता असल्याचे समजते.

सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने निघालेल्या विरोधकांच्या मोर्चात नेहा राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यांच्यासोबत चालताना दिसल्या. काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेही त्यांच्यासोबत पुढे येण्यासाठी धडपडत होते, मात्र नेहा बोराला महत्त्व मिळाल्याचे दृश्य आपण सर्वांनी पाहिले. एनएसयूआयमध्ये या मुद्द्यावर अंतर्गत चर्चा सुरू झाली आहे, असे पक्षाच्या अंतर्गत सूत्रांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.

नेहा ही भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्सवादी-लेनिनवादी) विद्यार्थी संघटनेची म्हणजेच ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनची (AISA) राष्ट्रीय अध्यक्षा आहे, त्यामुळे इंडिया आघाडीच्या मोर्चात प्रतिस्पर्धी विद्यार्थी संघटनेच्या नेत्याला एवढं महत्त्व का मिळालं, याबाबतीत एनएसयूआयमधील अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. काहींच्या मते, या सगळ्या घडामोडींमध्ये काँग्रेसने स्वतःच्या विद्यार्थी संघटनेला कमी लेखल्याचे दिसत आहे.

मात्र, काँग्रेसमधील काही नेत्यांनी नेहा बोराच्या उपस्थितीकेडे वेगळ्या नजरेने पाहिलं. हा काँग्रेसचा हुशारीचा निर्णय होता, असे काँग्रेसचे नेते म्हणाले. नाव न सांगण्याच्या अटीवर एका नेत्याने सांगितले की, सीजेपीने (CJP) आंदोलनांचं नेतृत्व आपल्याकडे वळवण्यापासून काँग्रेसला रोखता आलं आहे. नेहा बोरा ही सीजेपीच्या सुरुवातीच्या आंदोलनामध्ये सहभागी झाली होती. संयुक्त पत्रकार परिषदेतही तिची उपस्थिती होती. मात्र, आता ती काँग्रेसच्या नेतृत्वासोबत दिसल्याने या आंदोलनात ती काँग्रेस आणि इंडिया आघाडीसोबत असल्याचा संदेश मिळत आहे.

दरम्यान, राहुल गांधी गुरुवारी एनएसयूआय, युवक काँग्रेस आणि सेवा दलाच्या पदाधिकाऱ्यांची व समन्वयकांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चहापान करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली, त्यामुळे विद्यार्थी आणि युवा संघटनांच्या कार्यकर्त्यांशी राहुल गांधी काय संवाद साधणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.

तसेच काँग्रेस आणि इंडिया आघाडीची सीजेपी सोबतची जवळीक वाढताना दिसत आहे. जंतरमंतरला आंदोलनस्थळाचा दर्जा रद्द केल्यानंतर तिथे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या सीजेपीच्या प्रमुख नेत्यांना बुधवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. इंडिया आघाडीतील पक्षांनी या कारवाईचा निषेध केला आहे. मात्र, यामध्ये राहुल गांधी यांची भूमिका महत्त्वाची ठरली. यापूर्वी सीजेपीबाबत सावध भूमिका घेणाऱ्या राहुल गांधी यांनी आता आंदोलनात सहभागी असलेल्या विविध गटांना एकाच छताखाली आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

“विद्यार्थी, तरुण, पत्रकार आणि इंडिया आघाडी सगळ्यांचे झेंडे वेगवेगळे असले तरी उद्देश एकच आहे. आपल्या घटनात्मक हक्कांची मागणी करणाऱ्या नागरिकांचे प्रत्येक आंदोलन हे एकच आहे,” असं राहुल गांधी यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे, त्यामुळे सीजेपीच्या नेत्यांच्या अटकेचा निषेध करताना काँग्रेसनेही या व्यापक आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.

काँग्रेसचा डाव्या विचासरणीकडे कल?

नेहाला मिळालेल्या महत्त्वामुळे काँग्रेसमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता पूर्णपणे निराधार नाही. राहुल आणि प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षात डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनांमधून आलेल्या नेत्यांना स्थान मिळत असल्याचे चित्र आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) संलग्न स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (AISF) या संघटनांमधून आलेल्या अनेकांनी अलीकडच्या वर्षांत काँग्रेसमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

यामध्ये AISA चे नेते आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे (JNUSU) माजी अध्यक्ष संदीप सिंह, मोहित पांडे आणि अकबर चौधरी यांना काँग्रेसमध्ये सामावून घेतले. संदीप सिंह पुढे प्रियांका गांधी वाड्रा यांच्या टीममध्ये सहभागी झाले. जेएनयूमध्ये एसएफआयचे नेतृत्व केलेले प्रसेनजित बोस हेही आता काँग्रेसमध्ये आहेत.

JNUSU चे आणखी एक माजी अध्यक्ष कन्हैया कुमार यांचे नेतृत्व AISF या संघटनेतून घडले. सध्या ते काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचे म्हणजेच एनएसयूआयचे प्रभारी आहेत. मात्र, अलीकडच्या आंदोलनांमध्ये कन्हैया कुमार यांना बाजूला सारलं जात आहे का असा प्रश्न उपस्थित होतो. जुलैमध्ये झालेल्या Gen Z आंदोलनानंतर सरकारविरोधी वातावरण असूनही दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी निवडणुकीत एनएसयूआयला एकही जागा जिंकता आली नाही. यामुळे कन्हैया कुमार यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत नेहा बोराची वाढलेली जवळीक आणि आयसाची एनएसयूआयबाबतची भूमिका यात मात्र विरोधाभास दिसतो. नेहा मंगळवारी इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेतही वक्ता म्हणून सहभागी झाली. मात्र, ती ज्या काँग्रेसच्या व्यासपीठावर दिसली, त्याच पक्षाच्या विद्यार्थी संघटनेला (NSUI) आयसाने ‘उजव्या विचारसरणीचे’ म्हणत टीका केली आहे. आयसाने आपल्या संकेतस्थळावर एनएसयूआयलादेखील भाजपाशी संबंधित अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) यांच्या रांगेत बसवले आहे.

एनएसयूआय आणि एबीव्हीपी या दोन्ही संघटना विद्यार्थी आणि सर्वसामान्यांच्या हिताविरोधात काम करतात, अशी टीका आयसाच्या जाहीरनाम्यात करण्यात आली. या संघटनांच्या विरोधात संघर्ष करत आयसाने आपली ओळख निर्माण केली, त्यामुळे बोरा यांची काँग्रेस नेतृत्वासोबतची जवळीक आणि आयसाची एनएसयूआयबाबतची स्पर्धा यामधून वेगळे समीकरण अधोरेखित होते.

आयसाच्या नेत्यांना महत्त्व देण्याबाबत काँग्रेसमधील काही नेत्यांना प्रश्न पडले आहेत. “एनएसयूआयसारखी मोठी विद्यार्थी संघटना पक्षाकडे असताना केवळ जेएनयूमध्ये प्रभाव असलेल्या आयसाच्या नेत्यांना पक्षात आणण्याची गरज काय? जेएनयूमधून डाव्या विचारांच्या लोकांना पक्षात घेऊनही एनएसयूआयला त्या विद्यापीठात आपलं स्थान निर्माण करता आलेलं नाही. मग या नेत्यांना पक्षात घेण्याचा फायदा काय?” असे प्रश्न एका नेत्याने उपस्थित केले.

पक्षातील आणखी एका नेत्याच्या मते, डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी नेत्यांच्या प्रभावी वक्तृत्वशैलीमुळे काँग्रेसचं नेतृत्व त्यांच्याकडे आकर्षित होतं, त्यामुळे हे नेते एनएसयूआयच्या सामान्य कार्यकर्त्यांपेक्षा अधिक अभ्यासू आणि वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ असल्याचं चित्र निर्माण होतं. हे नेते घोषणांची प्रभावी मांडणी करण्यातही तरबेज आहेत आणि एनएसयूआयच्या तुलनेत अधिक सक्रिय असतात, असेही या नेत्याने अधोरेखित केलं.

डाव्या विचारसरणीचा निवडणुकांमधील प्रभाव कमी होत असताना काँग्रेसने या विचारांच्या नेत्यांशी जवळीक का वाढवावी, असा प्रश्नही पक्षातील काही नेते उपस्थित करत आहेत. काँग्रेसला पुन्हा सर्वसमावेशक पक्ष म्हणून आपली ओळख मजबूत करायची आहे. त्यासाठी डाव्या धर्मविरोधी विचारसरणीशी सहमत नसलेल्या, विशेषतः पुराणमतवादी हिंदू मतदारांनाही पक्षाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा वेळी डाव्या विचारांच्या नेत्यांना अधिक महत्त्व देण्याची रणनीति कितपत योग्य आहे, याबाबत पक्षात मतभेद असल्याचे दिसते.

पक्षाचा जनाधार वाढवण्याचा प्रयत्न?

काँग्रेसमधील एका गटाला डाव्या विचारांच्या नेत्यांशी वाढणारी जवळीक सकारात्मक वाटत आहे. त्यांच्या मते, डाव्या विचारसरणीचे लोक काँग्रेसकडे येणं हे पक्षाचा सामाजिक जनाधार वाढत असल्याचं लक्षण आहे. सर्वसमावेशक पक्ष म्हणून काँग्रेसची ओळख मजबूत करण्यावर राहुल गांधी भर देत आहेत. आंदोलनांदरम्यान पोलिसांच्या कारवाईला बळी पडलेल्या तरुणांसोबत त्यांनी अनेकदा पत्रकार परिषदा घेतल्या आहेत. हे तरुण काँग्रेसचेच समर्थक असतील असे नाही. ‘जेन झी’ चर्चेच्या केंद्रस्थानी असताना नेहा बोरा यांच्यासारख्या उदयोन्मुख विद्यार्थी नेत्याला सोबत घेणं हा तरुणांशी जोडण्याचा प्रभावी मार्ग ठरू शकतो, असे काँग्रेसमधील एका नेत्याने नमूद केले.

आयसामध्ये काम केलेल्या दिल्लीतील एका प्राध्यापकाच्या मते, डाव्या विचारांच्या विद्यार्थ्यांची काँग्रेसकडे वळण्याची भूमिका बदलत्या परिस्थितीचा भाग आहे. उदारीकरण आणि सोशल मीडियाच्या काळात डाव्या विचारांच्या काही कार्यकर्त्यांमध्ये आपल्या समवयस्कांच्या तुलनेत मागे पडल्याची भावना निर्माण झाली होती, त्यामुळे हे कार्यकर्ते व्यापक राजकीय संधींच्या शोधात मुख्य प्रवाहातील राजकारणाकडे वळतात असेही या प्राध्यापकाने म्हटले.
सोशल मीडियामुळे एखादी व्यक्ती अल्पावधीत लोकप्रिय होऊ शकते किंवा तिची नकारात्मक प्रतिमाही तयार होऊ शकते. मुख्य प्रवाहातील राजकारणात आल्यावर मात्र मोठ्या व्यासपीठावर आपली भूमिका मांडण्याची संधी मिळते, असेही या प्राध्यापकाने नमूद केले, त्यामुळे नेहा बोराला काँग्रेसच्या नेतृत्वासोबत मिळालेलं स्थान हे केवळ एका आंदोलनापुरतं मर्यादित नसून, तरुण नेतृत्वाला सोबत घेऊन पक्षाचा जनाधार वाढवण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांचाही भाग म्हणून पाहिलं जात आहे