Neha Bora One Piece T-Shirt : दिल्लीत शनिवारी पार पडलेल्या आंदोलनात नेहा बोरा हिने घातलेला टी-शर्ट चर्चेचा विषय ठरला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात तरुणांनी रस्त्यावर उतरत हल्लाबोल केला. मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी (SIR) प्रक्रियेत अनियमितता असल्याचा आरोप करत आंदोलकांनी निवडणूक आयोगाला घेरले आणि ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीही केली.
मतदार याद्यांतून लाखो लोकांची नावे वगळली गेली, हा लोकशाहीवरचा हल्ला आहे, असा आरोप करत विद्यार्थ्यांसह विरोधकही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. गेले काही दिवस राजधानी दिल्ली आंदोलनांमुळे पेटून उठली आहे. यातच विशेष चर्चा होतेय ती विद्यार्थी आंदोलनाचा प्रमुख चेहरा बनलेली नेहा बोरा आणि तिच्या टी-शर्टची. शनिवारी १० ऑक्टोबरला दिल्लीतील आंदोलनात नेहा बोराने लाल कलरचे टी शर्ट परिधान केले होते, ज्यावर लिहिलं होतं ‘वन-पीस’. याच टी-शर्ट मागे एक रंजक इतिहास आहे, त्यातून कोणता संदेश दिला जात आहे? जाणून घेऊ या विश्लेषणातून
ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या अध्यक्षा नेहा बोराने परिधान केलेल्या टी-शर्टवर ‘वन पीस’ या जपानी मंगा मालिकेतील समुद्री डाकूंचं चिन्ह होतं. आशियातील काही देशांमध्ये हे चिन्ह आधीपासूनच तरुणांच्या आंदोलनांचं प्रतीक बनलं आहे. दिल्लीतील आंदोलनातही घोषणा, फलक आणि झेंडे यापलीकडे याच चिन्हाच्या टी-शर्टची चर्चा रंगली आणि ते मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील झाले.
नेहा बोराने घातलेलं टी-शर्ट प्रतिकात्मक ठरलं ते ‘वन पीस’ चिन्हामुळे. गवताची टोपी घातलेल्या कवटीसह वन पीस हे लिहिले जाते. जागतिक स्तरावरील आंदोलनांमध्ये या चिन्हाला विशेष महत्व आहे. हे चिन्ह ॲनिमेच्या चाहत्यांमध्ये प्रसिद्ध असलं, तरी आता या चिन्हाला राजकीय अर्थही जोडला गेला आहे. आशियातील काही देशांमध्ये तरुणांनी आंदोलनांदरम्यान हेच चिन्ह वापरलं आहे. भारतात जुलैमध्ये जंतरमंतरवरील आंदोलनात देखील या चिन्हाचे टी-शर्ट लक्षवेधी ठरले. आता नेहा बोराने एसआयआरविरोधातील आंदोलनात घातलेल्या टी-शर्टच्या निमित्ताने त्याचा संदर्भ जाणून घेण्यास उत्सुक असालच.
‘वन पीस’ चिन्हाची कहाणी
‘वन पीस’ ही जपानी मंगा मालिका एइचिरो ओडा यांनी दिग्दर्शित केली. १९९७ मध्ये या मालिकेचं प्रकाशन सुरू झालं. तिची कथा मंकी डी. लुफी आणि त्याच्या ‘स्ट्रॉ हॅट पायरेट्स’ या सहकाऱ्यांभोवती फिरते. हे सर्वजण ‘वन पीस’ नावाचा रहस्यमय खजिना शोधण्यासाठी प्रवास करत असतात.
या गटाच्या झेंड्यावर कवटी, तिच्या मागे दोन क्रॉस केलेली (एकमेकांना छेदणारी) हाडे असतात आणि कवटीवर लुफीची ओळख असलेली स्ट्रॉ हॅट दिसते. समुद्री डाकूंची ओळख दर्शवणाऱ्या अशा झेंड्याला ‘जॉली रॉजर’ म्हटलं जातं. ‘वन पीस’ मालिकेत हा झेंडा लुफी आणि त्याच्या सहकाऱ्यांची ओळख आहे. मालिकेतील प्रमुख पात्र असलेला लुफी अनेकदा सामान्य लोकांवर अन्याय करणाऱ्या शक्तिशाली व्यक्तींना आव्हान देतो. वेगवेगळ्या प्रसंगांत त्याची टोळी हुकूमशाही वृत्तीच्या सत्ताधाऱ्यांविरोधात उभी राहते आणि लोकांना त्यांचे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मदत करते.
लुफीचं ध्येय इतरांवर राज्य करणं नाही, तर समुद्रावरील सर्वांत स्वतंत्र व्यक्ती बनणं आहे. त्यामुळे स्वातंत्र्य, स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार, सहकाऱ्यांप्रतींची निष्ठा आणि मनमानी सत्तेविरोधात आवाज उठवणं हे विषय मालिकेत वारंवार समोर येतात. मात्र, या कथेकडे नेमक्या कोणत्या दृष्टिकोनातून पाहावं, याविषयी कोडं निर्माण होतं. बिझनेस स्टँडर्डच्या वृत्तानुसार, वाचकांनी या कथेतून काय अर्थ घ्यायचा, हे त्यांच्यावरच सोडण्याची भूमिका मालिकेचे निर्माते/दिग्दर्शक एइचिरो ओडा यांनी घेतली.
मात्र, हा झेंडा फडकवणारी प्रत्येक व्यक्ती राजकीय विचारसरणीचीच असेल असं नाही. मग ‘वन पीस’मधील एका काल्पनिक समुद्री टोळीची ओळख असलेला झेंडा जगभरातील आंदोलनांमध्ये इतका लोकप्रिय कसा झाला?
याचं एक कारण म्हणजे वन-पीस मालिकेचा जगभरातील चाहतावर्ग. सप्टेंबर २०२५ पर्यंत ‘वन पीस’ चिन्हाच्या जगभरात ५० कोटींहून अधिक टी-शर्टवर प्रती छापल्या गेल्या होत्या, असे वृत्त दी गार्डियन दिली होती. ॲनिमे मालिका, ॲनिमेटेड चित्रपट आणि नेटफ्लिक्सवरील लाइव्ह-अॅक्शन मालिकेमुळे वन-पीस प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध झाली. आंदोलनांमध्ये निषेध दर्शवण्यासाठी ‘स्ट्रॉ हॅट पायरेट्स’चा हा झेंडा वापरला जातो. या मालिकेशी परिचित असलेले लोक कोणत्याही स्पष्टीकरणाशिवाय निषेधाची भावना समजू शकतात.
सोशल मीडियामुळे या झेंड्याला आंदोलनांचं प्रतीक बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. बिझनेस स्टँडर्डच्या वृत्तानुसार, राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यासाठी तरुणांमध्ये ॲनिमेतील पात्रं, प्रसंग आणि संवादांचा वापर वाढला आहे. सत्ताधाऱ्यांविषयीचा राग, व्यवस्थेबद्दलची नाराजी किंवा अन्यायाविरोधातील भावना व्यक्त करण्यासाठी तरुण मीम्स आणि छोटे व्हिडीओ तयार करतात. अशा वेळी ‘वन-पीस’ मधील हा झेंडा केवळ एका मालिकेची ओळख राहत नाही, तर तो प्रस्थापित व्यवस्थेला प्रश्न विचारणाऱ्या लोकांसाठी एकत्र येण्याचं प्रतीकही बनतो.
