Nehru Pahalgam Visit: एप्रिल महिन्यात पहलगाम येथे केलेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी २६ निष्पाप नागरिकांना ठार मारले. याच पहलगाम ठिकाणाचे देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी एक खास कनेक्शन आहे.
मे १९६४ मध्ये नेहरूंचे निधन झाले. त्याच्या ११ महिने आधी ते जम्मू आणि काश्मीरमधील पर्यटनस्थळी १० दिवस सुटीसाठी गेले होते. त्यादरम्यान ते त्यांची मुलगी इंदिरा गांधी यांच्यासोबत पहलगाम येथेही गेले होते. ही नेहरूंची अखेरची सुट्टी होती.
पहलगाम त्या काळीही पर्यटकांसाठी एक आवडते ठिकाण होते. १९४३ मध्ये आलेल्या ‘काश्मीर : द प्लेग्राउंड ऑफ आशिया’ या पुस्तकात सच्चिदानंद सिन्हा यांनी पहलगामचे वर्णन केले आहे. सिन्हा यांनी पुस्तकात पाइन जंगलामधून दोन मैलांवर असलेल्या बैसरनचाही उल्लेख केला. ही तीच दरी आहे, जिथे २२ एप्रिलला दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.
सुट्टी आणि काही राजकीय कामे
जून १९६३ दरम्यान पंतप्रधानांसमोर अनेक मोठी आव्हाने होती. ते वाढत्या राजकीय आव्हानांना, त्यांच्या बिघडत्या तब्येतीला आणि १९६२ च्या चीनसोबतच्या युद्धानंतरच्या परिस्थितीला तोंड देत होते. १८ जून १९६३ रोजी नेहरू श्रीनगरला पोहोचले. त्यांच्यासोबत इंदिरा गांधी आणि त्यांचे दोन नातू, राजीव गांधी व संजय गांधी होते. हे सर्व जण श्रीनगरमधील चश्मे शाही गेस्ट हाऊसमध्ये राहिले. श्रीनगरला पोहोचल्यावर पहिल्याच दिवशी सकाळी नेहरूंनी गेस्ट हाऊसमध्ये राज्यमंत्री, राज्य विधानसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, तसेच विधान परिषदेचे अध्यक्ष यांच्यासोबत चहापानाची बैठक घेतली होती.
श्रीनगरमध्ये असताना नेहरूंनी नॅशनल कॉन्फरन्सच्या कार्यकर्त्यांशीही वार्तालाप केला होता. पंतप्रधान म्हणाले होते की, काश्मीरमध्ये चीन-पाकिस्तान युती पाकिस्तानसाठी उपयुक्त ठरणार नाही. श्रीनगरहून नेहरू सुमारे ९० किमी अंतरावर असलेल्या ते पहलगामलादेखील गेले होते. मात्र, तिथे पंतप्रधानांनी अनेक राजकीय कार्यक्रमांपासून दूर राहणेच पसंत केले. २१ जून रोजी नेहरूंनी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री नीलम संजीव रेड्डी यांना पत्र लिहिले होते. त्यांनी आश्वासन दिले होते की, त्यावेळी रेड्डी यांना त्यांच्या पदावरून काढून टाकले जाईल अशा काही अफवा निराधार आहेत. नेहरूंनी रेड्डी यांना पत्र लिहून अफवांबद्दल दिलगीर असल्याची भावना व्यक्त केली होती.
नेहरूंनी पहलगाममध्ये ओडिशाचे मुख्यमंत्री बिजू पटनायक यांच्यासोबतही बैठक घेतली होती. पटनायक यांनी २४ जून रोजी मंत्रिमंडळाच्या नियोजित फेरबदलावर चर्चा करण्यासाठी नेहरूंची भेट घेतली होती.
२६ जून रोजी नेहरूंनी पहलगामपासून सुमारे १२ किमी अंतरावर असलेल्या अरू खोऱ्याला भेट दिली. त्यांनी पहलगाममधून वाहणाऱ्या झेलमची उपनदी असलेल्या लीडर नदीचा मुख्य उगम असलेल्या कोलाहोई हिमनदीलाही भेट दिली होती. २८ जून रोजी नेहरू दिल्लीला परतले याबाबतचे वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने २९ जून १९६३ च्या अंकात दिले आहे.
श्रीनगरमध्ये सदर-ए-रियासत डॉ. करण सिंग आणि जम्मू-काश्मीरचे पंतप्रधान बक्षी गुलाम मोहम्मद यांनी नेहरूंना निरोप दिला. दिल्लीमध्ये विमानतळावर अर्थमंत्री मोरारजी देसाई, गृहमंत्री लाल बहादूर शास्त्री, अन्न व कृषिमंत्री एस. के. पाटील, वैज्ञानिक संशोधन व संस्कृती मंत्री हुमायून कबीर, कॅबिनेट सचिव एस. एस. खेरा या मान्यवरांनी पंतप्रधानांचे स्वागत केले.
नेहरूंसाठी कठीण काळ
जम्मू-काश्मीरमध्ये नेहरू सुटीसाठी गेलेले असतानाही त्यांच्या राजकीय अडचणींमध्ये मात्र वाढच होत होती. ते परतल्यानंतर परिस्थिती आणखी बिकट झाली. २६ जून रोजी नेहरू जम्मू-काश्मीरमध्ये असताना सिंचन व वीजमंत्री हाफिज मोहम्मद इब्राहिम आणि खाण मंत्री के. डी. मालवीय यांनी राजीनामे दिले होते. दिल्लीच्या पालम विमानतळावर उतरताना पत्रकारांनी नेहरूंना हे राजीनामे आणि त्यांच्या मंत्रिमंडळावर होणाऱ्या परिणामांबद्दल विचारले होते. त्यावेळी नेहरूंनी उत्तर दिले, “राजीनामा दिलेल्या मंत्र्यांचे खाते व्यवस्थापित करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. सध्या कोणालाही मंत्रिमंडळ विस्ताराची घाई नाही.”
१९६२ च्या जानेवारी-फेब्रुवारीमध्ये नेहरूंच्या काँग्रेस पक्षाने लोकसभेच्या ४९४ पैकी ३६१ जागा जिंकून तिसऱ्यांदा सत्ता मिळवली. त्याच वर्षीच्या अखेरीस झालेल्या भारत-चीन युद्धामुळे पंतप्रधानांना मोठा धक्का बसला. परिणामी त्यांच्या आरोग्याशी संबंधित समस्या आणखी वाढल्या. ऑगस्ट १९६३ मध्ये त्यांच्या सरकारला गांधीवादी व माजी काँग्रेस प्रमुख जे. बी. कृपलानी यांनी मांडलेल्या पहिल्या अविश्वास प्रस्तावाला सामोरे जावे लागले होते.
त्यांच्या वारसा व उत्तराधिकाराच्या चिंतेमुळे नेहरूंनी सप्टेंबर १९६३ मध्ये के. कामराज यांनी प्रस्तावित केलेली कामराज योजना सुरू केली. या योजनेंतर्गत केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे नेहरूंना केंद्र आणि राज्यांमध्ये काँग्रेस पक्ष आणि सरकारी संरचनांची पुनर्रचना करता आली. पक्ष आणि सरकारमध्ये महत्त्व गमावल्यामुळे बरेच जण नाराज झाले. त्यानंतर कामराज यांना काँग्रेस अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
नेहरूंची प्रकृती सतत ढासळत होती आणि जानेवारी १९६४ मध्ये भुवनेश्वर येथे झालेल्या एआयसीसी अधिवेशनादरम्यान पंतप्रधान नेहरू गंभीररीत्या आजारी पडले. अखेर २७ मे १९६४ रोजी त्यांचे निधन झाले.