Nepal Disasters Reasons : नेपाळमध्ये महाप्रलय आल्याने हाहाकार माजला आहे. या विनाशकारी प्रलयामागे केवळ एकच कारण नाही, तर त्यामध्ये हिमालयातील बर्फ, खडक आणि पाण्याच्या हालचालींनी एकामाागोमाग एक संकटे उभी केली आणि काही वेळातच पुराने अनेक भागांना तडाखा दिला. प्राथमिक माहितीनुसार, रासुवा भागातील या आपत्तीमागे हिमकडा किंवा हिमनद्या वितळणे, भूस्खलन किंवा त्यातून तयार झालेले तात्पुरते तलाव फुटणे यापैकी एक कारण असू शकतं. नेमकं कारण शोधण्यासाठी अजून तपास सुरू आहे. पण, नेपाळसाठी ही घटना काही वेगळी किंवा अनपेक्षित नाही. भूकंप, भूस्खलन, हिमस्खलन, अचानक येणारे पूर आणि हिमनद्यांशी संबंधित घटना एकमेकांना कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे एका संकटातून दुसरे संकट निर्माण होते आणि डोंगराळ भागात त्याचा परिणाम काही मिनिटांत मोठ्या आपत्तीत बदलू शकतो.

बुधवारी नेपाळच्या रासुवा जिल्ह्यातील भोटेकोशी-लेंदे खोऱ्यात अचानक मोठा पूर आला. या पुरामुळे अनेक घरे, रस्ते आणि पूल वाहून गेले. महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या दुर्घटनेत १६० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून, शेकडो जण अद्याप बेपत्ता आहेत.

सुरुवातीच्या अहवालांमध्ये भूकंपामुळे हिमस्खलन होऊन हा पूर आला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, सॅटेलाईट चित्र आणि भूगर्भीय माहितीनुसार, या आपत्तीमागे हिमकडा/ बर्फाचा मोठा भाग कोसळणे आणि त्यानंतर माती-दगडांचा प्रवाह निर्माण होणे हे कारण असण्याची शक्यता अधिक दिसून येत आहे.

यामध्ये मोठा प्रश्न हा आहे की, नेपाळमध्ये वारंवार अशा आपत्ती का घडतात? त्यामागील १० कारणे समजून घेऊयात?

१. भूगर्भीय हालचालींचे संकट

भारतीय भूभागाखालील मोठा भूस्तर (प्लेट) उत्तरेकडे सरकत आहे. तो युरेशियन भूस्तरावर आदळत असल्याने हिमालयाच्या भागात आजही जमिनीखाली हालचाली आणि ताण निर्माण होत असतात. भारतीय प्लेट दरवर्षी सुमारे २० ते २१ मिलिमीटर वेगाने युरेशियन प्लेटच्या दिशेने सरकत आहे. सुमारे पाच कोटी वर्षांपूर्वी सुरू झालेली ही प्रक्रिया आजही सुरू आहे. त्यामुळे हिमालयाच्या खालील भूस्तरावर सतत ताण निर्माण होत राहतो.

याच कारणामुळे नेपाळ हा भूकंपप्रवण देश आहे. २०१५ मध्ये आलेल्या गोरखा भूकंपाने जवळपास नऊ हजार लोकांचा बळी घेतला होता. या भूकंपाने आणखी एक धोका स्पष्ट केला. डोंगराळ भागात भूकंप झाला की, केवळ जमिनीलाच हादरे बसत नाहीत, तर भूस्खलन होऊ शकते, नद्यांच्या प्रवाहात अडथळे येऊ शकतात, पूल आणि इमारती कोसळू शकतात आणि अनेक गावांचा एकमेकांशी असलेला संपर्क तुटू शकतो.

भूकंप झाला की, संकट तिथेच थांबत नाही. जोरदार भूकंपामुळे हिमनद्या, डोंगरकडे आणि आधीच कमकुवत झालेले उतार अस्थिर होऊ शकतात. त्यातून हिमस्खलन किंवा भूस्खलन होऊन नदीचा प्रवाह अडू शकतो आणि काही काळासाठी तलावसदृश स्थिती निर्माण होऊ शकते. हे तात्पुरत्या स्वरूपाचे तलाव फुटले की, पाणी, माती आणि दगडांचा मोठा प्रवाह खालच्या भागात वेगाने येऊ शकतो. त्यामुळे हिमालयात दिसणारी एकच आपत्ती प्रत्यक्षात एकामागोमाग एक घडणाऱ्या अनेक नैसर्गिक घटनांची साखळी असू शकते.

२. पाण्याचा वेग वाढवणारी भौगोलिक रचना

दी इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, नेपाळमध्ये जगातील काही सर्वाधिक उंच पर्वतांसोबतच अरुंद आणि खोल दऱ्या आहेत. या दऱ्या नैसर्गिक ‘फनेल’सारखे काम करतात. त्यामुळे डोंगरातून वेगाने खाली येणाऱ्या जलप्रवाहाला पसरायला फारशी जागा मिळत नाही. मग ते पाणी अरुंद मार्गात एकवटते आणि त्याची विध्वंसक ताकद आणखी वाढते.

हिमालयात अचानक आलेला पूर केवळ पाणीच घेऊन येत नाही, तर तो त्याच्या प्रवाहात दगड, मोठे खडक, झाडे, माती, बर्फ आणि बांधकामाचा ढिगाराही वाहून येतो. त्यामुळे हा पूर मैदानी भागात हळूहळू वाढणाऱ्या पुरापेक्षा पूर्णपणे वेगळा असतो. पाणी, चिखल आणि दगडांचा हा प्रचंड प्रवाह इतक्या वेगाने खाली येतो की, नदीकाठच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी फारच कमी वेळ मिळतो.

३. हिमालयाचं वाढतं तापमान

हिमालयातील संकटांची तीव्रता वाढविणारा आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे हवामानबदल. हिंदुकुश हिमालयातील तापमान वाढत असल्याने हिमनद्या वेगाने वितळत आहेत आणि मागे सरकत आहेत. २०२६ च्या ICIMOD च्या अहवालानुसार, २००० नंतर हिमनद्यांमधील बर्फ कमी होण्याचा वेग जवळपास दुप्पट झाला आहे.

हिमनद्यांमधील बर्फ वितळल्याने पुरस्थिती निर्माण होऊ शकते. हिमनद्या वितळल्यावर त्यातून येणारे पाणी डोंगरांमध्ये साचून राहू शकते, त्यामुळे तात्पुरते तलाव तयार होतात. असे तात्पुरते तलाव अचानक फुटले, तर मोठ्या प्रमाणात पाणी खाली येऊन पूरस्थिती (GLOF) निर्माण होऊ शकते.

४. हिमतलावांचा वाढता धोका

नेपाळमध्ये हिमतलावांची संख्या मोठी आहे. २०२० मध्ये संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने केलेल्या पाहणीत कोशी, गंडकी व कर्णाली या नदीखोऱ्यांमध्ये ३,६२४ हिमतलाव आढळले. त्यापैकी ४७ तलाव धोकादायक ठरू शकतात. त्यामध्ये तिबेटमधील २५, नेपाळमधील २१ आणि भारतातील एक इतक्या हिमतलावांचा समावेश होता.

मात्र, केवळ हिमतलावांची संख्या मोजून धोका लक्षात येत नाही. हिमनद्या वितळत असताना त्यामुळे नवीन तलाव तयार होऊ शकतात, त्यांचा आकार काही वर्षांत वाढू शकतो आणि ते अचानक नाहीसेही होऊ शकतात. त्यामुळे आज धोकादायक नसलेला किंवा अस्तित्वात नसलेला हिमतलाव काही काळाने मोठ्या आपत्तीचे कारण ठरू शकतो.

रासुआ भाटेकोशी भागात जुलै २०२५ मध्ये अशीच घटना घडली होती. तिबेटमधील एका हिमतलावामुळे पूर आल्याने रासुवा-भोटेकोशी परिसराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या पुरात काही लोकांचा मृत्यू झाला; तर पूल आणि जलविद्युत प्रकल्पांचेही नुकसान झाले. त्यानंतर अवघ्या १४ महिन्यांनी याच भागाला पुन्हा मोठ्या पुराचा तडाखा बसला आहे.

५. आपत्तीची एक साखळी

नेपाळमधील २६ ऑगस्टच्या दुर्घटनेकडे केवळ पूर म्हणून पाहता येणार नाही. हिमनदी किंवा हिमकड्यांचा बर्फ आणि दगडांचा मोठा भाग कोसळला असण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यातून मोठ्या प्रमाणात माती-दगडांचा ढिगारा नदीत आला आणि नदीचा प्रवाह अडला. परिणामी पाणी साठत गेले आणि त्यामुळे तयार झालेले तलाव फुटले आणि अखेरीस पाणी, माती आणि दगडांचा प्रचंड लोंढा खालच्या भागात वेगाने पोहोचला.

सुरुवातीच्या काही अहवालांमध्ये भूकंपामुळे भूस्खलन झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, नंतर भूगर्भीय अभ्यासात आणि अमेरिकेच्या यूएस जिओलॉजिकल सर्वेक्षणाच्या विश्लेषणातून भूकंपाऐवजी हिमतलावाचा काही भाग कोसळल्याचे अधिक संकेत मिळाले. या सर्वांमध्ये नेपाळमधील असुरक्षितता कायम आहे. तापमानवाढीमुळे अस्थिर झालेले पर्वत, तीव्र उतार आणि वेगाने वाहणाऱ्या नद्या यांची साखळी शेवटी नदीकाठच्या लोकांसाठी मोठ्या संकटात बदलते.

६. मान्सूनचा वाढता धोका

नेपाळ दक्षिण आशियाई मान्सूनच्या थेट प्रभावाखाली येतो. मुसळधार पाऊस झाला की, डोंगरांचे उतार पाण्याखाली आल्याने कमकुवत होतात. त्यामुळे भूस्खलनाचा धोका वाढतो. भूस्खलनामुळे नदीचा प्रवाह अडू शकतो आणि त्यानंतर अचानक पूर येण्याची शक्यता निर्माण होते. नेपाळचा डोंगराळ आणि अवघड भूभाग या संकटाची तीव्रता आणखी वाढवतो. जागतिक बँकेनेही नेपाळमधील पूर आणि भूस्खलनाचा धोका वारंवार अधोरेखित केला आहे.

हवामानबदलामुळे मान्सूनचा स्वभावही बदलत आहे. २०२६ मध्ये ICIMOD ने हिंदुकुश हिमालयात तापमानवाढीसोबतच मान्सून अधिक अनिश्चित होत असल्याचा इशारा दिला आहे. त्यासोबतच तापमानही वाढत आहे. या दोन्ही बदलांमुळे डोंगराळ भागात अचानक पूर येण्याचा धोका वाढू शकतो.

७. नेपाळला भूस्खलनाचा कायमस्वरूपी धोका

हिमालय हा तुलनेने नवा आणि सतत भूगर्भीय हालचाली सुरू असलेला पर्वतरांगांचा भाग आहे. त्यामुळे येथील डोंगरउतार आधीपासूनच अस्थिर असतात. त्यात मुसळधार पाऊस, भूकंप, रस्ते बांधकाम, जंगलतोड, जमिनीच्या वापरातील बदल, मातीची धूप आणि हिमनद्या मागे हटणे अशा घटकांमुळे भूस्खलनाचा धोका आणखी वाढतो.

भूस्खलनामध्ये रस्ते पूर्णत: गाडले जाऊ शकतात, वीजपुरवठा खंडित होऊ शकतो, घरे उद्ध्वस्त होऊ शकतात किंवा नदीचा प्रवाहात अडथळा येऊ शकतो. अशा प्रकारे अडलेल्या प्रवाहाने नंतर मार्ग काढला तर मोठा पूर येऊ शकतो. त्यामुळे पर्वतांमध्ये सुरू झालेली एखादी छोटीशी दुर्घटनाही काही अंतरावर जाऊन मोठ्या आपत्तीत बदलू शकते.

८. अरुंद दऱ्यांमुळे वाढतो धोका

नेपाळच्या भौगोलिक रचनेमुळे वस्ती आणि बांधकामासाठी सपाट जमीन फारच कमी आहे. त्यामुळे अनेक गावे, रस्ते, पूल, जलविद्युत प्रकल्प आणि इतर पायाभूत सुविधा या डोंगरांमधील दऱ्या आणि नदीकाठच्या भागात उभ्या राहिल्या आहेत. त्यातच पूर आणि भूस्खलनाचा प्रवाहही याच मार्गाने जातो. त्यामुळे अशा भागांमध्ये वसलेल्या लोकांना आपत्तीचा धोका अधिक असतो.

दी इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, माणसांना राहण्यायोग्य खोरे अरुंद असल्याने एकाच ठिकाणी मोठी लोकसंख्या राहू शकते. त्यामुळे एखादी आपत्ती आली की, एकाच वेळी मोठ्या लोकसंख्येचा संपर्क तुटू शकतो आणि मदत पोहोचवणेही कठीण होऊ शकते. अलीकडच्या पुरात रस्ते, पूल, दळणवळण व्यवस्था आणि जलविद्युत प्रकल्पांचे नुकसान झाले. त्यामुळे होणारे नुकसान फक्त जीवितहानी आणि घरांच्या नुकसानीपुरता मर्यादित राहत नाही. एका आपत्तीमुळे बचावकार्यासाठी आवश्यक असलेले रस्ते, पूल आणि संपर्क व्यवस्थाही बंद पडू शकते.

९. बचावकार्यही मोठं आव्हान

मोठ्या आपत्तीनंतर डोंगराळ भूभागामुळे बचावकार्यात अडथळे येतात. भूस्खलनामुळे एखाद्या गावाकडे जाणारा एकमेव रस्ता बंद होऊ शकतो; तर पूल वाहून गेल्यास संपूर्ण दरीचा संपर्क तुटू शकतो. पुरासोबत वाहून आलेली माती आणि दगडांमुळे बचाव पथकांची वाहनेही प्रभावित भागापर्यंत पोहोचू शकत नाहीत. अशा परिस्थितीत हेलिकॉप्टर हा अनेकदा एकमेव पर्याय उरतो. मात्र, खराब हवामान, उंच डोंगर आणि हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी योग्य जागेचा अभाव यांमुळे हवाई बचावकार्यही कठीण होते. त्यामुळे ज्या भौगोलिक परिस्थितीमुळे विध्वंसक आपत्ती येते, त्याच परिस्थितीमुळे मदत आणि बचावकार्यालाही विलंब होतो.

१०. नैसर्गिक आपत्ती की मानवनिर्मित संकट?

नेपाळमधील आपत्तींकडे केवळ ‘नैसर्गिक संकट’ म्हणून पाहणे पुरेसे नाही. जागतिक बँकेच्या मते, भूकंप, पूर आणि भूस्खलनाच्या काळात कमकुवत बांधकाम आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे स्थिती अधिक बिकट होऊ शकते. वाढत्या शहरीकरणामुळे अनेक लोक शहराकडे वळत आहेत.

म्हणून नेपाळसमोर उद्भवणारे संकट केवळ नैसर्गिक आपत्तींमुळे निर्माण होत नाही. भूकंप, भूस्खलन, पूर आणि हिमनद्यांच्या प्रवाहातील बदल यांचा एकत्रित परिणाम त्यावर होतो. त्यात कमकुवत बांधकाम आणि अपुऱ्या पायाभूत सुविधा अशा बाबी जोडल्या गेल्या की, आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीची व्याप्ती आणखी वाढते.