Nepal Flash Flood Gorkha: नेपाळमधल्या गोरखा जिल्ह्यात ११ ऑक्टोबरला बुढी गंडकी नदीला अचानक पूर आल्याने मोठे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेमुळे हिमालयीन पट्ट्यातील वाढत्या नैसर्गिक धोक्यांविषयी आणि भारताच्या पर्वतीय राज्यांवरील संभाव्य परिणामांविषयी पुन्हा चिंता व्यक्त केली जात आहे.

नेपाळमधल्या गोरखा जिल्ह्यात ११ ऑक्टोबरच्या पहाटे बुढी गंडकी नदीला अचानक पूर आला. या पुरात पाणी, चिखल, महाकाय धोंडे व राडारोडा वेगाने वाहत आला आणि नदीकाठच्या वस्त्यांमध्ये घुसला. त्यामुळे तिथल्या पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान झालं. प्राथमिक माहितीनुसार, सिऊरीबासच्या वरच्या भागात झालेल्या भूस्खलनामुळे चुमके खोला हा प्रवाह अडवला गेला होता. तसेच, चेकंपारजवळचा तात्पुरता बांध फुटल्यामुळे खालच्या भागात पाण्याचा प्रचंड लोंढा एकदम उसळला असावा, असाही संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय.

नेपाळमधल्या या ताज्या घटनेने संपूर्ण हिमालयीन पट्ट्यात अचानक येणाऱ्या पुरांविषयी पुन्हा एकदा धोक्याचा इशारा दिलाय. वितळत चाललेल्या हिमनद्या, निसरडे डोंगरउतार आणि माती-दगडांचे सैल ढिगारे यांमुळे अशा भागांत प्रचंड विनाशकारी प्रवाह निर्माण होऊ शकतात. नेपाळमध्ये आलेल्या या ताज्या पुरामागे नेमके काय कारण होते, हे जाणून घेण्यासाठी ‘दी इंडियन एक्सप्रेस’ने तज्ज्ञांशी संवाद साधला.

गोरखामध्ये महापूर कशामुळे आला?

पाणी आणि राडारोडा अचानक एकत्रपणे वाहून येणं, हेच या पुराचं तात्कालिक कारण असल्याचं दिसतं; पण ही नेमकी प्रक्रिया कशी घडली, हे अद्याप निश्चितपणे सिद्ध झालेले नाही.

उत्तराखंडमधल्या डेहराडूनच्या वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिऑलॉजीचे हिमनदी तज्ज्ञ मनीष मेहता यांनी ‘दी इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना सांगितले की, त्यांचा प्राथमिक अंदाज समोर आलेले व्हिडीओ आणि बातम्यांवर आधारित आहे. ही घटना हिमनदीच्या तलावाचा बांध फुटल्यामुळे (जीएलओएफ) किंवा दरडमिश्रित हिमस्खलनामुळे घडल्यासारखी वाटते. अर्थात, पुराच्या मूळ कारणाबाबतचा हा कोणताही अंतिम निष्कर्ष नाही, हेही त्यांनी स्पष्ट केलं.

या पुरात इतक्या मोठ्या प्रमाणावर चिखल आणि दगडधोंडे कुठून येतात?

मेहता यांनी स्पष्ट केले की, धूप आणि हिमनद्यांच्या भूतकाळातल्या हालचालींमुळे हिमालयाच्या उंचावरील भागात सैल माती आणि दगडांचे प्रचंड साठे तयार झालेले आहेत. हिमनद्या गाळ वाहून आणून साठवून ठेवतात. तसेच धूप आणि हवामान बदलांमुळे डोंगरांचे कडे कमकुवत होऊन सतत ढासळत राहतात. ते पुढे म्हणाले, “तापमान वाढत चाललंय, बर्फ वितळतोय. बर्फ वितळला, की खडक आणि बर्फातली पकड सुटू लागते.”

पर्वतांच्या वरच्या खोऱ्यांत साचलेला हा सैल राडारोडा पावसामुळे किंवा पाण्याचा अचानक लोंढा आल्यामुळे वाहू लागतो, असे त्यांनी सांगितले. हा पाण्याचा लोंढा जसा दरीतून खाली सरकतो, तसा तो वाटेत येणारा अधिकचा गाळ, दगड आणि झाडंझुडपं स्वतःसोबत ओढून नेतो. त्यामुळे पाण्याचं रूपांतर चिखल आणि दगडांच्या घट्ट लाटेत होतं.

उत्तराखंड ओपन युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ अर्थ अँड एन्व्हायर्नमेंटल सायन्सचे संचालक पी. डी. पंत यांनीही सोशल मीडियावर फिरणाऱ्या या पुराच्या फुटेजमधल्या गाळाच्या प्रमाणाकडे लक्ष वेधलंय. ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना पंत म्हणाले, “वाहून येणाऱ्या बारीक खडीचं आणि गाळाचं प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळेच अधिक नुकसान होतंय.” सोप्या भाषेत सांगायचं तर, केवळ पाण्याच्या प्रमाणावरून पुराचा धोका ठरत नाही. जड दगडधोंडे आणि घट्ट चिखल घेऊन वाहणारा पूर घरं, पूल आणि रस्त्यांवर प्रचंड आघात करतो.

गोरखामधल्या पुराची तुलना नेपाळमधल्या गेल्या महिन्यातल्या आपत्तीशी कशी करता येईल आणि भारताने याकडे लक्ष का दिलं पाहिजे?

समोर आलेल्या प्राथमिक व्हिडीओंचा विचार करता, ही ताजी घटना आधीच्या आपत्तीइतकी विनाशकारी वाटत नाही, असं मेहता म्हणाले. खोऱ्याची रुंदी आणि तिथल्या वस्त्यांचं स्थान यावरून हा फरक समजून घेता येऊ शकतो. ते म्हणाले, “मागच्या वेळी दरी अत्यंत अरुंद होती आणि लोक नदीच्या पात्रातच राहत होते.” सध्याच्या ठिकाणाशी तुलना करताना त्यांनी सांगितलं, की दरी रुंद असल्यामुळे पुराचं पाणी पसरण्याच्या पद्धतीवर फरक पडला असावा.

अशाच प्रकारचे धोके उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, लडाख, सिक्कीम व अरुणाचल प्रदेशसह संपूर्ण भारतीय हिमालयीन पट्ट्यातही अस्तित्वात आहेत. मात्र, प्रत्येक आपत्तीमागची मूळ प्रक्रिया ही एकमेकांपासून वेगळी असते.

  • २०१३ च्या केदारनाथ दुर्घटनेत अतिमुसळधार पाऊस, पूर आणि वाहून आलेला प्रचंड गाळ-ढिगारा यांचा समावेश होता. ढगफुटी आणि अतिवृष्टीमुळे आलेला महापूर या संदर्भातच केदारनाथ दुर्घटनेची नेहमी चर्चा होते. ढगफुटी म्हणजे विशिष्ट भागात कमी वेळेत झालेला अतिमुसळधार पाऊस असतो. तो जीएलओएफ किंवा दरड कोसळून झालेला बांध फुटण्यासारखा प्रकार नसतो.
  • २०२१ च्या चमोली दुर्घटनेमध्ये ऋषिगंगा खोऱ्यात बर्फ आणि खडकांचा प्रचंड मोठा कडा ढासळला होता, ज्यामुळे विनाशकारी प्रवाह निर्माण झाला. उंचावरील डोंगरकडा खचल्याने काही क्षणांत किती मोठी दुर्घटना घडू शकते आणि नदीकाठच्या प्रकल्पांसह जलविद्युत प्रकल्पांना कसा फटका बसू शकतो, हे या दुर्घटनेने दाखवून दिले होते.

पंत म्हणाले, “काश्मीरपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत आणि उत्तराखंडसह संपूर्ण हिमालयीन पट्ट्यात असे धोके निर्माण होऊ शकतात. हिमनद्या, निसरडे डोंगरकडे आणि अचानक येणाऱ्या पुराचा हा मोठा धोका हिमालयाच्या केवळ एका भागापुरता मर्यादित नाही.”

असे पूर वारंवार का येतायत? यात हवामानबदलाचा किती वाटा?

हिमालयीन धोके ज्या परिस्थितीत निर्माण होतात, ती परिस्थिती हवामान बदलामुळे बदलतेय; पण कोणत्याही एका विशिष्ट पुराचे कारण केवळ हवामानबदलच आहे, असे त्याने सिद्ध होत नाही. जसजसे तापमान वाढते, तसतशा हिमनद्या वितळून मागच्या बाजूने खचतायत. हिमनद्या मागे खचल्यावर तयार झालेल्या खळग्यांमध्ये पाणी साचू लागते. यातल्या अनेक तलावांचे पाणी हे हिमोढ अर्थात हिमनद्यांनी वाहून आणलेल्या वाळू, गाळ, गोटे आणि खडकांच्या साठ्यांमुळे अडवले जाते.

पंत यांनी सांगितलं की, हिमनदी मागे खचते तेव्हा मोकळ्या झालेल्या जागेत तलाव तयार होऊ शकतो. तसेच, हिमोढ हा काही पक्का दगडी बांध नसतो, तर तो सैल माती-दगडांनी बनलेला एक कच्चा अडथळा असतो. अशा कच्च्या बांधांची धूप होऊन ते फुटण्याची शक्यता असते. अशा वेळी पाण्याचा अचानक मोठा दाब आला, पाणी बांधावरून वाहू लागले किंवा बांध फुटला, तर खालच्या भागात प्रचंड वेगाने पाणी उसळते. सतत पडणारा किंवा मुसळधार पाऊसही यासाठी कारणीभूत ठरतो, याकडेही पंत यांनी लक्ष वेधले. भूस्खलनामुळे अडकून पडलेल्या राड्यारोड्यामागे किंवा तलावात पाण्याचा साठा अतिरिक्त प्रमाणात वाढल्यास, अचानक येणाऱ्या पुराचा धोका असतो.

तापमानवाढीचा डोंगरउतारांवर कसा परिणाम होतो?

ज्या भागात बर्फ खडक-मातीला घट्ट पकडून ठेवतो, तिथे तापमान बदलल्याने आणि बर्फ वितळल्याने डोंगरकडे अधिक कमकुवत होतात आणि ते कोसळण्याचा धोका वाढतो. हिमनद्या मागे खचण्यामागे हवामान बदल हाच सर्वांत मोठा घटक होता, असे पंत यांनी सांगितले. इंटरगव्हर्न्मेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजच्या अहवालांसह अनेक वैज्ञानिक संशोधनांनी हिंदुकुश हिमालय आणि इतर पर्वतीय भागांमधल्या हिमनद्या वेगानं नष्ट होत असल्याचं मत नोंदवलंय. त्यामुळे अशा दुर्घटना ज्या परिस्थितीत घडून येतात, ती परिस्थिती तापमानवाढीमुळे बदलत असल्याच्या निष्कर्षाला या संशोधनाने पुष्टी मिळते.

यावर उपाय काय?

उत्तराखंड आणि भारतातल्या इतर हिमालयीन पट्ट्यातल्या राज्यांसमोर धोकादायक तलाव आणि कमकुवत डोंगरउतार वेळेत ओळखणे हे मोठे आव्हान आहे. या बदलांवर सतत नजर ठेवणे आणि ती माहिती खालच्या भागातल्या लोकवस्त्यांपर्यंत वेळीच पोहोचवणे गरजेचे आहे, जेणेकरून लोकांना सावध होता येईल.

सॅटेलाईटद्वारे केलेल्या निरीक्षणातून तलावांचं मॅपिंग करणं, हिमनद्यांच्या वितळण्यावर नजर ठेवणं आणि त्या भूभागातले बदल ओळखणं शक्य आहे. मात्र, तलावातल्या पाण्याची पातळी अचानक वाढल्यास किंवा नैसर्गिक बांध फुटण्याच्या बेतात असल्यास, केवळ सॅटेलाईटद्वारे केलेल्या निरीक्षणातून रिअल-टाईम माहिती मिळण्याला मर्यादा येते. अशा वेळी जमिनीवर बसवलेले सेन्सर्स अत्यंत उपयुक्त ठरू शकतात. मेहता यांनी संपूर्ण हिमालयीन पट्ट्यात पूर्वसूचना देणारी प्रणाली उभारणं गरजेचं आहे, असे सांगितले.

“थोडक्यात सांगायचं तर, हिमालयीन भागात पूर्वसूचना देणारी प्रणाली उभारणं अत्यावश्यक आहे,” असे ते म्हणाले. एकदा का विनाशकारी प्रवाह सुरू झाला, की वस्त्यांचं रक्षण करणं अशक्य होतं. म्हणूनच ही यंत्रणा तातडीनं उभी करणं गरजेची आहे, असे त्यांनी सांगितले.

पंत यांनीही याच मुद्द्याला दुजोरा दिला. ते म्हणाले, की परिस्थितीनुसार सेन्सर्समुळे काही तास आधीच धोक्याचा इशारा मिळू शकतो. त्यामुळे प्रशासनाला धोकादायक भागातल्या वस्त्या सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. “किमान आपण खालच्या भागातल्या वस्त्यांना काही तास आधी सावध तरी करू शकू आणि त्यांना सुरक्षित स्थळी हलवू शकू,” असे ते म्हणाले.