Nepal Flood Survivors : नेपाळमध्ये पुरामुळे सर्वत्र विनाशाचे चित्र निर्माण झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत एक हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. याचदरम्यान जलविद्युत प्रकल्पातील दोन कर्मचारी बोगद्यात अडकून पडल्याची आणखी एक दुर्घटना घडली. तब्बल नऊ दिवसांनंतर बचाव पथकांना या दोन्ही कर्मचाऱ्यांना बोगद्यातून सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, पुराच्या पाण्याने भरलेल्या बोगद्यात सलग नऊ दिवस अडकून पडणे ही केवळ सहनशक्तीची परीक्षा नाही. अशा परिस्थितीत शरीर आणि मनाला मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो. कडाक्याची थंडी, अंधार, भूक, पाण्याची कमतरता, दूषित वातावरण, दुखापत आणि प्रचंड थकवा यामुळे शरीराची अवस्था खालावत जाते. त्याचवेळी सुटका होईल की नाही याची अनिश्चितता, भीती आणि एकटेपणाचा मानसिक आरोग्यावरही मोठा परिणाम होऊ शकतो.

नऊ दिवस बोगद्यात अडकलेलं शरीर किती यातना सहन करतं?

नेपाळच्या त्रिशूली भागालाही पुराचा तडाखा बसला. यादरम्यान त्रिशूली ‘३ अ’ जलविद्युत प्रकल्पाचे कर्मचारी कबीर महार्जन (४५) आणि संजय शाह (३०) हे दोघे तब्बल नऊ दिवस बोगद्यात अडकून पडले होते. नऊ दिवसांनंतर त्यांना जिवंत बाहेर काढण्यात आलं आहे. बोगद्यातून बाहेर आल्यानंतर शाह यांना लगेच बोलताही येत नव्हतं, तर महार्जन शुद्धीत होते. दोघांनाही तातडीने वैद्यकीय उपचारांसाठी नेण्यात आलं.

तब्बल नऊ दिवस बोगद्यात अडकूनही ते जिवंत राहिले म्हणजे त्यांच्या शरीरावर कोणताही परिणाम झाला नाही, असा निष्कर्ष काढता येत नाही. यादरम्यान बाह्य शरीरावर आणि शरीराच्या अंतर्गत कार्यांवरही त्याचा विपरीत परिणाम होतो. शारदा केअर-हेल्थसिटीचे इंटरनल मेडिसिन विभागाचे संचालक डॉ. चिराग टंडन यांच्या मते, दीर्घकाळ पाण्यात राहणं, ऑक्सिजनची कमतरता, शरीरातील पाण्याची घट आणि अन्न न मिळणं, यामुळे शरीरातील प्रत्येक महत्त्वाच्या अवयवावर मोठा ताण येतो.

सततच्या थंडीमुळे शरीराचं तापमान कमी होतं

बोगद्यात एखादी व्यक्ती सतत थंड पाण्याच्या संपर्कात राहिली तर तिच्या शरीरातील उष्णता वेगाने कमी होते. शरीराचं ३५ अंश सेल्सिअस तापमान जे सामान्य मानलं जातं, यापेक्षा खाली गेलं तर हायपोथर्मिया होतो.

डॉ. टंडन यांच्या मते, दीर्घकाळ पाण्यात राहिल्यामुळे हायपोथर्मियाचा धोका वाढतो. सतत ओलावा आणि त्वचेची सूज यामुळे त्वचेचंही नुकसान होऊ शकतं. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, २० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाच्या पाण्यात दीर्घकाळ राहिल्यास हायपोथर्मियाचा धोका वाढतो, त्यामुळे पाण्यात खूप वेळ अडकून पडल्यास थंडी वाजणे, अशक्तपणा, अस्पष्ट बोलणं, श्वासाचा वेग कमी होणं आणि गोंधळल्यासारखं होणं अशी लक्षणं दिसू शकतात.

पाण्यात अडकून राहिल्यास शरीर थंड पडतं. पण, संशोधनानुसार असंही समोर आलं की, शरीराचं तापमान कमी झाल्यामुळे स्नायूंची हालचाल आणि विचार करण्याची क्षमता कमी होऊ शकते. तीव्र हायपोथर्मियामुळे हृदय आणि मेंदूवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते.

डिहायड्रेशनची गंभीर परिस्थिती निर्माण होते

पुरामुळे बोगद्यात पाणी साचतं, या पाण्यात जर माणूस अडकला तर त्याला पिण्याचे पाणी तातडीने उपलब्ध होत नाही. पिण्यासाठी स्वच्छ पाणी न मिळाल्यास शरीरातील पाण्याचं प्रमाण हळूहळू कमी होतं, त्यामुळे रक्ताभिसरणावर परिणाम होतो. डॉ. टंडन यांच्या मते, शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास अशक्तपणा, चक्कर येणे, गोंधळाची स्थिती आणि रक्तदाब कमी होण्यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. शरीरात पाण्याची तीव्र कमतरता असेल तर त्याचा परिणाम अवयवांच्या कार्यावरही होऊ शकतो. यात आणखी एक अडचण असते. ती म्हणजे, थंडी आणि डिहायड्रेशन एकाच वेळी शरीरावर परिणाम करतात. पोहणं, चढणं, कोरडी जागा शोधणं किंवा एकाच जागी शरीराचा तोल सांभाळणं अशा क्रिया करणं कठीण होतं आणि यासाठी अतिरिक्त ऊर्जा आणि पाण्याची गरज भासते.

अन्न न मिळाल्यास शरीराच्या ऊर्जा प्रणालीत कसा बदल होतो?

अन्न न मिळाल्यास शरीर लगेच काम करणं थांबवत नाही. सुरुवातीला शरीर ऊर्जा मिळवण्यासाठी यकृतात साठवलेल्या कार्बोहायड्रेटचा वापर करतं. हा साठा कमी झाल्यानंतर शरीर चरबीचा वापर करायला लागतं. मात्र, दीर्घकाळ अन्नाचे सेवन न केल्यास शरीर ऊर्जा मिळवण्यासाठी प्रथिनं आणि स्नायूंचा वापर करतं, परिणामी त्यांचं विघटन होण्यास सुरुवात होते, त्यामुळे बोगद्यातून बाहेर आल्यानंतर व्यक्तीला प्रचंड अशक्तपणा आणि थकवा जाणवू शकतो. डॉ. टंडन यांच्या मते, नऊ दिवस पुरेसं अन्न न मिळाल्यामुळे थकवा, ताकद कमी होणं आणि स्नायूंचं नुकसान होऊ शकतं. जर बोगद्यात अडकलेल्या माणसाला सतत हालचाल करावी लागत असेल, तर याचे विपरीत परिणाम दिसू लागतात.

अशा संकटातून व्यक्ती बाहेर पडली तरी डॉक्टरांसमोर एक आव्हान असतं. पाच दिवसांपेक्षा जास्त काळ पुरेसं अन्न न मिळालेल्या व्यक्तीला कुपोषणाचा धोका असतो, त्यामुळे अशा व्यक्तीला अचानक भरपूर अन्न देण्याऐवजी वैद्यकीय देखरेखीखाली हळूहळू पोषण देणं गरजेचं असतं. कारण अचानक अन्न दिल्यास रिफीडिंग सिंड्रोमसारख्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात, त्यामुळे संतुलित आणि योग्यरीत्या त्यांना पोषण देणं गरजेचं असतं.

श्वास घेणंही आव्हान ठरू शकतं

बंदिस्त बोगद्यात वायूवीजनची (व्हेंटिलेशन) कमतरता असते, त्यामुळे तिथली हवा अधिक धोकादायक बनू शकते. हवेतील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कार्बन डाय ऑक्साइडचं प्रमाण आपोआप वाढतं. एकाच ठिकाणी अनेक लोक अडकले असतील आणि हवा खेळती नसेल तर हा धोका आणखी वाढतो.

कार्बन डाय ऑक्साइडचं प्रमाण वाढल्यास डोकेदुखी, श्वास घेण्यास त्रास आणि विचार करण्याची क्षमता कमी होऊ शकते. दीर्घकाळ असा संपर्क राहिल्यास मेंदूच्या कार्यावरही परिणाम होऊ शकतो, त्यामुळेच नेपाळमध्ये बचाव पथकांनी बोगद्यांमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्यांसाठी हवा पोहोचवण्याची व्यवस्था केली होती.

दूषित पाणी त्वचा आणि फुप्फुसांसाठीही धोकादायक

चिखल किंवा दूषित पाण्यात सतत राहिल्यामुळे त्वचेला इजा होऊ शकते. शरीरावर जखम असेल, तिचा दूषित पाण्यातील जीवाणूंशी संपर्क आला तर संसर्ग होण्याचा धोका वाढतो. पुराच्या पाण्यामुळे लेप्टोस्पायरोसिससारखा संसर्ग होऊ शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

आधीच भूक, डिहायड्रेशन, थंडी आणि झोपेच्या कमतरतेमुळे शरीर कमजोर झालं असेल तर अधिक गंभीर आजार होऊ शकतात. संसर्गाविरोधात शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा अतिशय तीव्र प्रतिक्रिया देऊ शकते. या स्थितीत शरीरातील ऊतींचं नुकसान होऊन अवयव निकामी होण्याचा धोका असतो. संसर्ग गंभीर पातळीवर पोहोचला तर मृत्यूही होऊ शकतो.

बोगद्यात अडकलेल्या व्यक्तीच्या मनावर काय परिणाम होतो?

पाण्याने भरलेल्या बोगद्यात नऊ दिवस अडकून पडणं ही केवळ शारीरिक लढाई नसते. शारदा केअर – हेल्थसिटीच्या मानसोपचार विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. अभिनीत कुमार सांगतात की, सुरुवातीला व्यक्तीला तीव्र भीती आणि घबराट जाणवू शकते. अंधार, वाढतं पाणी, एकटेपणा आणि बचाव होईल की नाही याची अनिश्चितता यामुळे शरीराची ‘फाइट-ऑर-फ्लाइट’ प्रतिक्रिया सक्रीय होते, म्हणजेच स्वतःला वाचवण्यासाठी शरीर तातडीने प्रतिक्रिया देतं असतं.

मात्र, ही परिस्थिती अनेक दिवस कायम राहिली तर मनावर असामान्य असा ताण येऊ शकतो. भीतीमुळे आपल्याला थकवा येऊ शकतो, चिंता वाढू शकते किंवा असहायता जाणवू लागते. दिवस-रात्र कळण्यासाठी कोणतेही संकेत नसल्यामुळे व्यक्तीला वेळेचाही अंदाज लावणं कठीण होतं. तसेच अशा संकटकालीन परिस्थितीत झोपही लागत नाही. सूर्योदय-सूर्यास्त कळत नसतो, ठरलेली दिनचर्या नसते आणि सुटका कधी होईल याची खात्री नसते. त्यात भूक, डिहायड्रेशन, वेदना आणि त्यात थंडीची भर पडली तर विचार करण्याच्या आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.

यासंदर्भात भारतातील उत्तरकाशी बोगदा दुर्घटनेचा अनुभवही महत्त्वाचा ठरतो. २०२५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासात, १७ दिवस बोगद्यात अडकून राहिल्यानंतर वाचलेल्या ३३ कामगारांचे निरीक्षण करण्यात आले. त्यापैकी सुमारे एक तृतीयांश कामगारांनी सांगितले की, वेळ किती गेला याचा अंदाज त्यांना नव्हता. या समस्येमुळे संबंध झोप लागण्यात अडचण येतात आणि दिवसा अधिक झोप येते. अडकलेल्या कामगारांमध्ये आशा आणि चिंता या दोन्ही भावना दिसून आल्या.

मात्र, नेपाळमधील दोन्ही कामगारांनाही अगदी असाच अनुभव आला असेल, असा निष्कर्ष काढता येणार नाही. तरीही दीर्घकाळ बंदिस्त बोगद्यात राहण्याचा मानवी मनावर किती परिणाम होऊ शकतो, हे या अभ्यासातून निदर्शनास येतं.

आशा आणि दिनचर्या का महत्त्वाची ठरते?

अशा परिस्थितीत जिवंत राहण्यासाठी केवळ शरीराची ताकद पुरेशी नसते. डॉ. कुमार यांच्या मते, अत्यंत कठीण परिस्थितीत व्यक्ती छोट्या-छोट्या कामांवर लक्ष केंद्रित करू शकते, शरीराची ऊर्जा वाचवण्याचा प्रयत्न करते आणि तो कठीण प्रसगं छोट्या छोट्या टप्प्यांमध्ये विभागून परिस्थितीचा सामना करते.

कुटुंबाच्या आठवणी, सुटका होईल ही आशा आणि स्वतःला एखाद्या दिनक्रमात गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न व्यक्तीला मानसिकदृष्ट्या टिकून राहण्यास मदत करू शकतो. उत्तरकाशीच्या अभ्यासातही कामगारांनी बोगद्यात स्वतःची दिनचर्या तयार केल्याचं आढळलं. बाहेरच्या जगात दिवस-रात्र बदलत असताना बोगद्यात वेळेचे संकेत नसतात. अशा गोंधळाच्या परिस्थितही स्वतःची स्वतंत्र रचना तयार करणं मानसिक स्थैर्यासाठी महत्त्वाचं ठरू शकतं.

बचाव झाल्यानंतरही संकट संपत नाही

बोगद्यातून जिवंत बाहेर येणं हा सर्वात मोठा टप्पा असला, तरी वैद्यकीय संकट तिथेच संपत नाही. डॉक्टरांना शरीराचं तापमान, श्वासोच्छ्वास, रक्ताभिसरण, शरीरातील पाण्याचं प्रमाण, इलेक्ट्रोलाइट्स, किडनीचं कार्य, जखमा, संसर्ग आणि पोषणाची स्थिती तपासावी लागते.

अतिशय कमी तापमानामुळे हायपोथर्मिया झालेल्या व्यक्तीचं शरीर पुन्हा सामान्य तापमानावर आणताना विशेष काळजी घ्यावी लागते. म्हणजेच, अंधारात, थंडीत, भुकेल्या अवस्थेत आणि सुटकेच्या आशेवर अनेक दिवस काढून बोगद्याबाहेर आल्यास संकट लगेच संपत नाही. शरीर आणि मनाला त्या धक्क्यातून सावरण्यासाठी वैद्यकीय आणि मानसिक उपचार करणं महत्त्वाचं असतं.