Nestlé baby formula may contain dangerous toxin: जागतिक अन्न आणि पोषण उद्योगातील आघाडीची कंपनी नेस्ले सध्या गंभीर अन्नसुरक्षा संकटाला सामोरी जात आहे. बाळाच्या दूध पावडरमध्ये विषारी घटक आढळण्याच्या शक्यतेमुळे कंपनीने तब्बल २५ देशांमध्ये बालक पोषण उत्पादनांच्या काही बॅचेस परत मागवल्या आहेत. या परत मागवलेल्या बॅचेस केवळ व्यावसायिक दृष्टीनेच नव्हे, तर सार्वजनिक आरोग्य, ग्राहकांचा विश्वास आणि जागतिक अन्नसुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर याबाबत भारतीय पालकांमध्ये स्वाभाविक चिंता निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर एकूणच परिस्थितीचा घेतलेला हा आढावा.

नेमका मुद्दा काय आहे?

नेस्ले या कंपनीने स्पष्ट केले आहे की, त्यांच्या SMA, BEBA आणि NAN या लहान बाळांसाठीच्या दूध पावडरच्या ठरावीक बॅचेसमध्ये सेर्युलाइड हा विषारी घटक मिसळलेला असण्याची शक्यता आहे. सेर्युलाइड (Cereulide) हा Bacillus cereus नावाच्या जीवाणूच्या काही विशिष्ट प्रकारांमुळे तयार होणारा विषारी पदार्थ (toxin) आहे. विशेष म्हणजे हा विषारी घटक उकळत्या पाण्याने, स्वयंपाक प्रक्रियेत किंवा पावडरपासून दूध तयार करताना नष्ट होत नाही, असे ब्रिटनच्या फूड स्टँडर्ड्स एजन्सीने (FSA) स्पष्ट केले आहे.

परत मागवलेल्या बॅचेसचे प्रमाण बरेच मोठे आहे

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे की, परत मागवलेल्या बॅचेसचे प्रमाण बरेच मोठे आहे. युरोपमधील अनेक देशांसह तुर्कीये, अर्जेंटिना, यूके, आयर्लंड, जर्मनी, फ्रान्स, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, चीन, हाँगकाँग आणि न्यूझीलंडसारख्या बाजारपेठांमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. ऑस्ट्रियाच्या आरोग्य मंत्रालयाच्या मते, ही नेस्लेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना आहे. यात १० हून अधिक कारखान्यांमध्ये तयार झालेल्या ८०० पेक्षा जास्त उत्पादनांचा समावेश आहे. मात्र नेस्लेने अद्याप अधिकृत आकडेवारी जाहीर केलेली नाही.

Award Banner

दूषित घटक कुठून आला?

नेस्लेने दिलेल्या माहितीनुसार, एका प्रमुख पुरवठादाराकडून मिळालेल्या अ‍ॅरॅचिडॉनिक अ‍ॅसिड (ARA) तेलामध्ये गुणवत्ता समस्या आढळली आहे. ARA तेल हे बालक पोषण उत्पादनांमध्ये मेंदूच्या विकासासाठी महत्त्वाचे मानले जाते. या घटकाचा वापर विविध उत्पादन केंद्रांमध्ये झाल्याचे तपासात समोर आले असून नेदरलँड्समधील एका कारखान्यात प्रथम धोका लक्षात आला. पुढील तपासणीत हा कच्चा माल नेदरलँड्सबाहेरील अनेक ठिकाणी वापरला गेल्याचे डच अन्नसुरक्षा प्राधिकरण NVWA ने सांगितले.

आरोग्याच्या दृष्टीने धोका किती गंभीर?

सेर्युलाइडमुळे होणारी अन्नविषबाधा ही विशेषतः लहान बाळांसाठी धोकादायक ठरू शकते. नेस्लेच्या अधिकृत निवेदनानुसार, या विषारी घटकामुळे सतत उलटी, अतिसार, पोटात मुरडा आणि अशक्तपणा अशी लक्षणे दिसू शकतात. ही लक्षणे साधारणपणे ३० मिनिटांपासून ६ तासांच्या आत दिसून येतात. दिलासादायक बाब म्हणजे, आतापर्यंत कोणत्याही देशात अशा आजाराची प्रकरणे उघडकीस आलेली नाहीत. तरीही, बालकांच्या आरोग्याशी संबंधित बाब असल्याने खबरदारीला प्राधान्य देण्यात आले आहे.

नेस्लेची भूमिका आणि उपाययोजना

नेस्लेने परत मागवलेला साठा खबरदारीचा उपाय म्हणून केलेली कृती असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. कंपनीने संबंधित संशय असलेल्या उत्पादनांचे वितरण थांबवले असून पर्यायी पुरवठादारांकडून ARA तेल घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच अनेक कारखान्यांमध्ये उत्पादन वाढवून नियमित उत्पादने बाजारात जलद गतीने पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, जेणेकरून पुरवठा साखळीवर मोठा परिणाम होणार नाही.

व्यावसायिक आणि बाजारातील परिणाम

या घटनेचा परिणाम नेस्लेच्या शेअर बाजारातील कामगिरीवरही झाला आहे. अवघ्या दोन व्यवहार सत्रांत कंपनीच्या शेअर्समध्ये ३ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. स्कायक्वेस्ट टेक्नॉलॉजी ग्रुपच्या आकडेवारीनुसार, ९२.२ अब्ज डॉलर्सच्या जागतिक बालक पोषण बाजारात नेस्लेचा जवळपास २५ टक्के वाटा आहे. त्यामुळे अशा प्रकारची घटना केवळ कंपनीसाठीच नव्हे, तर संपूर्ण उद्योगासाठी इशारा मानली जात आहे. याआधीही इतर कंपन्यांना लहान बालकांच्या दूध पावडरविषयक खटल्यांना सामोरे जावे लागले आहे, त्यामुळे या क्षेत्रातील जोखीम अधोरेखित होते.

भारतातील परिस्थिती नेमकी काय?

भारतीय पालकांसाठी सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, भारतामध्ये धोका आहे का? यावर नेस्ले इंडियाने स्पष्ट शब्दांत उत्तर दिले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, भारतात विक्री होणारी कोणतीही बालक दूध पावडर आयात केली जात नाही. भारतातील सर्व ब्रँड्सचे उत्पादन स्थानिक पातळीवर होते आणि परत मागवण्यात आलेल्या कोणत्याही बॅचेस भारतात विक्रीस उपलब्ध नाहीत. नेस्ले इंडियाने सांगितले की, भारतातील सर्व उत्पादने FSSAI आणि लागू असलेल्या सर्व नियमांचे पूर्ण पालन करतात, तसेच सखोल चाचणीनंतरच बाजारात आणली जातात. जागतिक स्तरावर उत्पादने परत मागवण्याच्या या घटनेशी भारताचा संबंध नाही, असे कंपनीने ठामपणे स्पष्ट केले आहे.

पालकांसाठी नेमका सल्ला काय?

नेस्लेने पालक आणि काळजीवाहूंना स्पष्ट मार्गदर्शन केले आहे. कोणतीही लक्षणे नसतील, तर घाबरण्याचे कारण नाही. मात्र ज्या देशांमध्ये साठा परत मागवला आहे, तिथे संबंधित उत्पादनांचा वापर तत्काळ थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बाळाच्या आरोग्याबाबत शंका असल्यास बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या, असेही कंपनीने सुचविले आहे.

Nestlé baby formula recall
अन्नबाधेची लक्षणे

नेस्लेने परत मागवलेल्या बॅचेस जागतिक अन्नसुरक्षेतील आव्हाने अधोरेखित करतात. विशेषतः बालक पोषण उत्पादनांच्या बाबतीत अत्यंत काटेकोर नियंत्रण, पुरवठादारांची तपासणी आणि पारदर्शकता किती आवश्यक आहे, हे या घटनेतून स्पष्ट होते. भारताच्या दृष्टीने सध्या परिस्थिती सुरक्षित असल्याचे अधिकृत स्पष्टीकरण असले, तरी पालकांचा विश्वास टिकवण्यासाठी सातत्यपूर्ण माहिती आणि देखरेख आवश्यक ठरणार आहे. जागतिक स्तरावर ही घटना उद्योगासाठी एक महत्त्वाचा धडा ठरणार आहे.