Netaji Bose Great Escape Inspiration from Shivaji Maharaj: नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२९ वी जयंती (२३ जानेवारी) साजरी केली जात आहे. अशाच एका वाढदिवसाच्या महिन्यात नेताजींनी राष्ट्रहितासाठी ब्रिटीशांच्या डोळ्यात धूळफेक करून स्वतःची नजर कैदेतून सुटका करून घेतली होती. या घटनेचा उल्लेख इतिहासात ‘द ग्रेट एस्केप’ असा केला जातो. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका या प्रसंगाची आठवण होते, असे अनेक इतिहास अभ्यासक नमूद करतात. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या वैचारिक आणि रणनीतिक मांडणीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचा सखोल अभ्यास केला होता. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी शिवाजी महाराजांना स्वराज्य, लष्करी शिस्त आणि परकीय सत्तेविरोधातील संघर्षाचे आदर्श मानले होते. ही भूमिका त्यांच्या भाषण आणि लेखनातून दिसून येते. त्याच पार्श्वभूमीवर नेताजींची ‘द ग्रेट एस्केप’ म्हणजे नेमके काय, याचाच घेतलेला हा आढावा.
…आणि सुभाषचंद्र बोस नाहीसे झाले
१९४१ साली जानेवारी महिन्यात कलकत्त्यातील (आताचे कोलकाता) बोस कुटुंबाच्या घराच्या एका खोलीच दार पडदा ओढून झाकून ठेवलेलं होतं. त्या पडद्यामागे एक व्यक्ती व्याघ्रासनावर पद्मासन घालून बसली होती. चेहऱ्यावर दाढी, समोर चंडीचा ग्रंथ आणि अखंड योगसाधनेत लीन असलेल्या या व्यक्तीवर ब्रिटिशांची करडी नजर होती. ती व्यक्ती दिवसातून एकदाच दूध आणि फळांचा अल्पोपहार घेत होती. हे कुणा साधू-संन्यासाचं वर्णन वाटत असलं तरी ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून खुद्द नेताजी सुभाषचंद्र बोस होते. मात्र, १७ जानेवारीच्या सकाळी पडद्यामागे काहीच हालचाल झाली नाही. आदल्या रात्रीचे अन्नही तसेच पडून होते. शेवटी पडदा बाजूला करण्यात आला. एल्गिन रोडवरील घरातून नेताजी सुभाषचंद्र बोस नाहीसे झाले होते, अशी नोंद पोलिसांच्या स्पेशल ब्रँचच्या अहवालात करण्यात आली.
भारताच्या निर्मितीकडे टाकलेले पाऊल
वयाची ४४ वर्षे पूर्ण होण्याच्या काहीच दिवस आधी, १७ जानेवारी रोजी पहाटे १.३० वाजता नेताजी आपला पुतण्या सिसिरकुमार बोस यांच्यासह घराबाहेर पडले. सिसिरकुमार बोस यांनी नेताजींना आपल्या जर्मन ‘वॉंडरर’ सेडान कारमधून बिहारमधील गोमो (आताचे झारखंड) येथे नेले. नेताजींनी या प्रवासाला ‘पलायन’ न म्हणता, नव्या भारताच्या निर्मितीकडे टाकलेले महान पाऊल असे संबोधले होते. देशद्रोहाच्या खटल्याची सुनावणी सुरू असतानाच नेताजींसारख्या थोर राष्ट्रीय नेत्याने ब्रिटिशांच्या नजरेआडून पलायन केल्यामुळे ब्रिटिश अधिकारी अक्षरशः तोंडावर आपटले.
मोहम्मद झियाउद्दीन
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ज्या रेल्वेतून प्रवास केला ती भारतातील पहिली (१ यूपी हावडा-दिल्ली ईस्ट इंडियन रेल्वे मेल) मेल/ एक्सप्रेस होती. त्या गाडीत प्रवाशांमध्ये मोहम्मद झियाउद्दीन नावाची एक व्यक्तीही होती. पठाणी लांब कोट, पायजमा आणि अर्धचंद्राकृती चष्मा घातलेल्या त्या व्यक्तीकडे कोणाचेही लक्ष गेले नाही, तेच वेशांतर केलेले सुभाषचंद्र बोस होते.

कालका ते नेताजी एक्सप्रेस
सुरुवातीला कालका मेल ही रेल्वेगाडी हावडा आणि दिल्लीदरम्यान धावत असे. पुढे हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या कालका शहराला रेल्वेमार्गाने जोडण्यात आल्यानंतर या गाडीला ‘कालका मेल’ असे नाव मिळाले. तत्कालीन राजधानी कलकत्त्याहून ब्रिटिश अधिकाऱ्यांना उन्हाळी राजधानी शिमला येथे ने-आण करण्याचे काम ही गाडी करत असे. २०२१ साली सुभाषचंद्र बोस यांच्या सन्मानार्थ या गाडीचे नाव बदलून ‘नेताजी एक्सप्रेस’ ठेवण्यात आले. आता येत्या एप्रिलमध्ये भारताच्या हावडा-दिल्ली मार्गावर अखंडपणे धावणार्या या गाडीला १६० वर्षे पूर्ण होणार आहेत.
पेशावर ते बर्लिन व्हाया मॉस्को
गोमो येथून निघाल्यानंतर काही दिवसांतच नेताजींनी ‘फ्रंटियर मेल’ या दुसऱ्या गाडीने पेशावरकडे प्रवास केला. नेताजी ब्रिटिश भारताच्या हद्दीबाहेर पोहोचल्यानंतरच २६ जानेवारी रोजी कलकत्त्यातील त्यांच्या घरातून नेताजी अचानक नाहीसे झाल्याची बातमी जगाला समजली. कालका मेलमध्ये बसल्यानंतर अवघ्या दहा दिवसांत नेताजी ब्रिटिश भारताच्या हद्दीबाहेर असलेल्या काबूलला पोहोचले. ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकच्या नेत्यांच्या मदतीने मार्च १९४१ पर्यंत नेताजी मध्य आशियातील सोव्हिएत प्रजासत्ताकांमधून प्रवास करत मॉस्कोला पोहोचले. त्यानंतर अवघ्या महिन्याभरात ते बर्लिनमध्ये पोहोचले.

नेताजींचा काँग्रेसशी दुरावा : १९४१ साली भारत सोडण्यामागचं कारण
१९४१ च्या सुरुवातीला नेताजी सुभाषचंद्र बोस राजकीय कोंडीत अडकले होते. दुसऱ्या महायुद्धात काँग्रेसने अनिच्छेने ब्रिटिशांच्या बाजूने उभं राहणं बोस यांना मान्य नव्हतं. काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा, फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना आणि ब्रिटिशांविरोधातील तडजोड न करणारी भूमिका यामुळे ते थेट ब्रिटिश गुप्तचर यंत्रणेच्या रडारवर आले. अटक, कारावास आणि नजरकैद ही त्याची परिणती होती.
…म्हणून भारत सोडण्याचा निर्णय
इतिहासकार पीटर वॉर्ड फे यांच्या मते, कायदेशीर मार्ग निष्फळ ठरल्यानंतर बोस यांनी उपोषणाचं अस्त्र वापरलं. ते आजारी पडून मृत्युमुखी पडू नयेत, या भीतीने ब्रिटिशांनी त्यांना एल्गिन रोडवरील घरी नजरकैदेत ठेवलं. पण दुसऱ्या महायुद्धामुळे बदललेल्या जागतिक राजकारणात भारताचं स्वातंत्र्य थांबवून ठेवता येणार नाही, असा बोस यांचा ठाम विश्वास होता. म्हणूनच १९४१ साली भारत सोडण्याचा त्यांचा निर्णय घेतला. त्याचा संबंध पुढील रणनीतिशी होता म्हणूनच त्याला पलायन म्हणता येत नाही, तर तो स्वातंत्र्यलढ्याचा पुढचा, धाडसी टप्पा होता.
योजना एका रात्रीत ठरलेली नव्हती
काय करायचे हा प्रश्न नेताजींसमोर नव्हताच… तर कसे करायचे हा तो प्रश्न होता. ब्रिटिशांच्या नजरकैदेतून निसटायचे असेल, तर तो डाव शिस्तबद्ध, अचूक आणि भुलवणारा असायलाच हवा होता. भारतातून बाहेर पडण्याची नेताजी सुभाषचंद्र बोस यांची योजना एका रात्रीत ठरलेली नव्हती. कुटुंबीय सांगतात की, १९३९ पासूनच त्यांचा पलायनाचा विचार मनात पक्का होता. वेशांतर हा त्याचा डावाचा भाग होता. चेहऱ्यावरची ओळख पटवणारी खूण, डाव्या कानाखालचा तीळ काढून टाकण्यासाठी त्यांनी शस्त्रक्रियाही करून घेतली. पुढे पठाणी पोशाख, जाड लोकरीचे कपडे आणि ‘फेझ’ टोपी’ सगळं काही आखीव होते.
कुटुंबीय आणि मोजक्या सहकाऱ्यांवर विश्वास
१९४० साली सुटका झाल्यानंतर त्यांनी जाणीवपूर्वक एकांत स्वीकारला. दाढी वाढवली, अध्यात्मिक साधनेच्या नावाखाली भेटी टाळल्या. एकही चूक परवडणारी नव्हती. म्हणूनच विश्वास ठेवला तो मोजक्या कुटुंबीयांवर आणि काही निवडक सहकाऱ्यांवरच. फॉरवर्ड ब्लॉकचे मियाँ अकबर शाह, अबाद खान आणि भगत राम तलवार यांनी या कार्यात निर्णायक मदत केली. जानेवारी १९४१ मध्ये, घरातून निघण्याच्या काही आठवडे आधीच मियाँ अकबर शाह यांनी कलकत्त्यात येऊन सगळ्या शक्यता तपासल्या होत्या.
स्वातंत्र्यलढ्याला एक वेगळे वळण मिळाले
त्या निर्णायक रात्री नेताजी मात्र आश्चर्यकारकरीत्या शांत होते. खोलीतून बाहेर पडण्यापासून ते काही दिवसांनी भारतीय सीमेपलीकडे जाण्यापर्यंत प्रत्येक तपशील आधीच ठरलेला होता. सिसिरची निवडही योगायोग नव्हती. ब्रिटिशांच्या नजरेत ‘अदृश्य’ असलेला, विश्वासू आणि दीर्घ प्रवास झेपवण्याची ताकद असलेला चालक याच गुणांमुळे तो या ऐतिहासिक मोहिमेचा भाग ठरला आणि याच शांत, काटेकोर नियोजनातून भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला नवे वळण मिळाले.
एका शांत प्रवासामागची थरारक योजना : नेताजींचा पलायनाचा क्षणोक्षणी आखलेला डाव
कलकत्त्याहून गोमोपर्यंतचा तो कारप्रवास केवळ सुमारे ३०० किलोमीटरचा नव्हता, तर तो होता ब्रिटिश सत्तेला दिलेला थेट आणि जबरदस्त धक्का. सिसिरकुमार बोस यांच्या गाडीने नेताजी सुभाषचंद्र बोस त्या रात्री उत्तरेकडे निघाले. थंडी होती, रस्ते ओस होते आणि वातावरण तणावाने भरलेले होते.
गोमोचा पर्याय
पुढचा थांबा हा धनबाद होता. कारण तिथे नेताजींचे पुतणे अशोकनाथ बोस कोळसा खाण क्षेत्रात अधिकारी म्हणून कार्यरत होते. गोमोपासून धनबाद अवघ्या ३० किलोमीटरवर आहे आणि गोमो येथूनच नेताजी कालका मेलमध्ये बसणार होते. आसनसोल आणि धनबादसारखी मोठी शहरे आधी विचारात होती, पण पोलिसांची जास्त हालचाल आणि ओळख पटण्याची शक्यता लक्षात घेऊन ते पर्याय बाद करण्यात आले. गोमो… लहान, शांत आणि कमी लक्ष वेधणारे, हाच योग्य पर्याय ठरला.
सकाळी सातच्या सुमारास सिसिरकुमार बोस कार घेऊन बंगल्यावर पोहोचले. नेताजींना मात्र मुद्दामच बंगल्यापासून जवळपास एक मैल आधी उतरवण्यात आले. वाट दाखवून दिली. जेणेकरून कुणालाही दोघांतील नात्याचा संशय येऊ नये. काही वेळातच ‘एक विचित्र पाहुणा’ आल्याची बातमी नोकराने दिली. भेटपत्रावर नाव होते… मोहम्मद झियाउद्दीन, ट्रॅव्हलिंग इन्स्पेक्टर, एम्पायर ऑफ इंडिया लाइफ इश्युरन्स कंपनी. वेशांतर इतके परिपूर्ण होते की, ओळख पटवणे जवळजवळ अशक्य होते. घरातील मुस्लिम नोकरांनाही त्या पठाणी विमा प्रतिनिधीत काहीच वेगळे वाटले नाही.

धनबादजवळील बारारी येथील बंगल्यावर पुढचा दिवस जणू रंगमंचावरच्या नाटकाचा अंक होता. नेताजी पाहुण्यासारखे वावरले. बसले, बोलले, चहा घेतला, विश्रांती घेतली. घरातील नोकरचाकरांना संशय येऊ नये म्हणून संभाषणे मुद्दाम इंग्रजीतच केली जात होती. प्रत्येक हालचाल आखलेली, प्रत्येक शब्द मोजून.
नाटकाचा शेवटचा अंक
संध्याकाळ होताच जणू नाटकाचा शेवटचा अंक सुरू झाला. जेवण लवकर आटोपले गेले. इंग्रजीत औपचारिक निरोप झाले. पाहुणा टॅक्सी पकडण्यासाठी पायी निघून गेला. साधारण अर्ध्या तासानंतर अंधाऱ्या रस्त्यावर गाडी पुन्हा थांबली आणि गोमोच्या दिशेने प्रवास सुरू झाला. त्याच वेळी नेताजींनी पेशावरमार्गे काबूल, तिथून मॉस्को आणि अखेरीस बर्लिनपुढचा आराखडा स्पष्ट केला. दिल्ली-कालका मेलमध्ये बसायचे, मात्र राजधानी टाळण्यासाठी दिल्ली गाठण्याआधीच उतरायचे आणि पुढे फ्रंटियर मेल पकडायची अशी योजना होती. काही दिवस तरी पलायनाची बातमी दडवून ठेवता आली, तर ब्रिटिश सरकारच्या आवाक्याबाहेर पोहोचता येईल आणि हा हिशेब तंतोतंत खरा ठरला. प्रत्यक्षात, नेताजी निघून गेल्यानंतर तब्बल नऊ दिवसांनी २७ जानेवारीच्या पहाटे त्यांच्या बेपत्ता होण्याची बातमी वृत्तपत्रांपर्यंत पोहोचली, तोपर्यंत ब्रिटिशांची पाळत निष्प्रभ ठरली होती.
…आणि स्वातंत्र्यलढ्याला मिळाले आंतरराष्ट्रीय व्यासपीठ
त्यानंतर रेल्वेने उरलेले काम केले. साम्राज्याची जीवनवाहिनी असलेली हावडा-दिल्ली मेल-कालका मेल-हिने साम्राज्याच्या ‘मोस्ट वाँटेड’ नेत्याला आपल्या डब्यातून उत्तर दिशेला नेले. पुढे फ्रंटियर मेल, मग काबूल, मध्य आशिया, मॉस्को आणि बर्लिन आणि तिथून भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळाले. आजही तीच कालका मेल धावत आहे. १८६६ मध्ये सुरू झालेली, देशाच्या जन्माआधीची ही ट्रेन आता १६० वर्षांचा अखंड प्रवास पूर्ण करत आहे. कधी काळी ब्रिटिश सत्तेची वाहक असलेली ही गाडी, एका अंधाऱ्या रात्री भारताच्या स्वातंत्र्याला नवे वळण देऊन गेली.
