Operation Safed Sagar : कारगिल युद्ध म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो भारतीय जवानांचा शौर्यपूर्ण संघर्ष. पण, या युद्धादरम्यान आकाशातही एक थरारक लढाई सुरू होती. भारतीय हवाई दलाने ‘ऑपरेशन सफेद सागर’च्या माध्यमातून हिमाच्छादित, उंच डोंगररांगांमध्ये पाकिस्तानी घुसखोरांविरोधात धाडसी हवाई कारवाया केल्या. नेटफ्लिक्सवरील ‘ऑपरेशन सफेद सागर’ या वेब सीरिजमधून याच हवाई मोहिमांची गाथा मांडण्यात आली आहे. या कारवाईत भारतीय हवाई दलाच्या अनेक स्क्वॉड्रन सहभागी झाल्या होत्या. त्यात ‘नंबर १७ गोल्डन अ‍ॅरोज’ स्क्वॉड्रनचाही समावेश होता. कारगिलच्या कठीण भौगोलिक परिस्थितीत अगदी रात्रीच्या वेळीही बॉम्बहल्ले करण्यात आले. मात्र, मालिकेत दाखवलेले हे थरारक प्रसंग प्रत्यक्षात किती खरे आहेत? ‘ऑपरेशन सफेद सागर’मध्ये नेमकं काय घडलं होतं? याबद्दल माजी हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

माजी हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ हे कारगिल युद्धावेळी ‘नंबर १७ स्क्वॉड्रन’चे कमांडिंग ऑफिसर होते. त्यांच्या नेतृत्वात मिग-२१ विमानांनी कारगिलमध्ये हवाई कारवाया केल्या. बी. एस. धनोआ यांनी इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधताना कारगिल युद्धातील हवाई मोहिमेदरम्यान पाकिस्तानी रडारच्या नजरेतून स्क्वॉड्रनने कशा प्रकारे बचाव केला, तसेच मोहिमेत जीपीएसमधील तांत्रिक त्रुटींचा सामना कसा केला, याबाबत माहिती दिली आहे.

रात्रीच्या वेळी एवढ्या उंचीवर बॉम्बहल्ले करताना कोणती आव्हाने होती?

एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ म्हणाले, रात्री चंद्रप्रकाशात डोंगर चमकत असत. मात्र, त्यातही मोठा धोका होता. ढगांमुळे अचानक चंद्र झाकला गेला की संपूर्ण परिसर अंधारात जायचा. अशा वेळी मोहीम रद्द करून (abort) दरीतून बाहेर पडावे लागायचे. गरज पडल्यास विमानाचा वेग वाढवण्यासाठी आफ्टरबर्नर/रीहीटचा (विमानातील अतिरिक्त ज्वलनासाठी वापरले जाणारे साधन) वापर केला जायचा. रात्रीच्या मोहिमांचे नेतृत्व मी स्वतः करत असल्याने हा निर्णय मलाच घ्यावा लागायचा.

पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेच्या त्यांच्या बाजूच्या एका डोंगरावर रडार बसवले होते. भारतीय हवाई दलाच्या ELINT (Electronic Intelligence) विमानांनी या रडारचे अचूक लोकेशन शोधून निश्चित केले होते. त्या काळात GIS सॉफ्टवेअर उपलब्ध नसल्याने पश्चिम हवाई कमांडच्या मुख्यालयाने रडारच्या सिग्नलची क्षमता दर्शवणारा 3D नकाशा तयार करून दिला होता. त्यावर प्रत्येक ५ अंशांवर रडारची पकड किती असेल हे दाखवण्यात आले होते.

त्यामुळे पाकिस्तानी रडारला चुकवून भारतीय वैमानिक दरीत थेट प्रवेश करत असत. पुढे ते डोंगर माथ्याच्या रेषेपेक्षा खाली उड्डाण करत असत. लक्ष्याजवळ पोहोचताना ते आणखी खाली येत, म्हणजे लक्ष्याच्या पातळीपासून सुमारे १ किलोमीटर (जवळपास ३,००० फूट) उंचीवर येऊन त्यानंतर शस्त्रांचा मारा केला जात असे.

या मोहिमेत आणखी एक मोठा धोका होता. भारतीय विमाने पाकिस्तानी सैनिकांच्या SAM (Surface-to-Air Missile) क्षेपणास्त्रांच्या कक्षेत होती. पहिल्याच रात्री पाकिस्तानकडून आमच्या दिशेने कमी उंचीवरून मारा करणारे SAM क्षेपणास्त्र डागण्यात आले, पण त्यांनी अचूकपणे लक्ष्य पकडलेच नाही. बहुधा विमानाचा आवाज ऐकून त्यांनी अंदाजाने क्षेपणास्त्र डागले, त्यामुळे ते निष्फळ ठरले.

रात्रीच्या वेळी कमी उंचीवरून हल्ला करण्यामध्ये धोका अधिक होता; पण त्याचे चांगले परिणाम दिसत होते. कारण बॉम्ब टाकताना आम्ही लक्ष्याच्या अगदी जवळ असायचो, त्यामुळे अचूकपणे हल्ले करता येत होते. एवढंच नाही तर विमानाचे पंखे थोडे झुकवून बॉम्ब नेमका कुठे आदळला हे वैमानिकांना चंद्रप्रकाशातही पाहता येत होते.

अजय आहुजा यांना पकडल्यानंतर नेमकं काय घडलं?

२१ मे १९९९ रोजीच्या पाहणी मोहिमांमध्ये लक्ष्याच्या परिसरातून केवळ एक फेरी मारून पुढे गेल्यास खांद्यावरून डागल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्राचा धोका तुलनेने कमी होता. मात्र, स्क्वॉड्रन लीडर अजय आहुजा यांची मोहीम वेगळी होती.

आहुजा हे Battle Damage Assessment (BDA) मोहिमेवर होते. त्याचवेळी मिग-२७ फॉर्मेशनच्या लीडरकडून त्यांना संदेश आला. बटालिक सेक्टरमध्ये हल्ल्यासाठी गेलेल्या ग्रुप कॅप्टन (तेव्हा फ्लाइट लेफ्टनंट) के. नचिकेता यांच्या विमानाचे इंजिन बंद पडले होते, त्यामुळे नचिकेता यांचा शोध घेण्यासाठी आहुजा यांना त्या परिसरात पाठवण्यात आले होते.

आहुजा मात्र दुसऱ्याच एका मिग-२७ विमानाचे अवशेष जिथे पडले होते त्या परिसरात घिरट्या घालत होते. बर्फाळ प्रदेश असल्याने विमानाचे काळे अवशेष सहज ओळखता येऊ शकत होते. या भागात घिरट्या घालत असताना आहुजांनी याच परिसरात मार्ग बदलून आलेल्या एका हेलिकॉप्टरच्या वैमानिकाशी सातत्याने संपर्क सुरू ठेवला.

अजय आहुजा सतत त्या भागात घिरट्या घालत होते. अपघातग्रस्त विमानाच्या ठिकाणाशी संपर्क कायम ठेवण्याच्या प्रयत्नात त्यांचे विमान हळूहळू खाली आले असावे, त्यामुळे पाकिस्तानच्या स्टिंगर क्षेपणास्त्राने त्यांच्या विमानाला लक्ष्य केले.

यावेळी क्षेपणास्त्राचा मारा होत असतानाही आहुजा यांनी मागे न हटता प्रशिक्षणानुसार योग्य पद्धतीने पलटवार केला. विमानावर नियंत्रण ठेवत त्यांनी ते खाली आणले आणि सिंधू नदीत उतरवले. विमानातून बाहेर पडण्यापूर्वी त्यांनी आपले लोकेशन कळवले. मात्र, त्यानंतर पाकिस्तानी सैनिक आणि इतर सशस्त्र लोकांनी त्यांना घेरले. आहुजांच्या शरीरावर लहान शस्त्रांच्या गोळ्यांच्या जखमा आढळल्या. याचा अर्थ आहुजा यांचा मृत्यू युद्धकैदी (Prisoner of War) असताना झाला, असा निष्कर्ष काढला जात आहे.

जीपीएसमध्ये अमेरिकेकडून फेरफार करण्यात आला होता का?

भारतीय हवाई मोहिमांदरम्यान अमेरिकेकडून जीपीएस सिग्नलमध्ये फेरफार करण्यात आला, असा दावा ‘ऑपरेशन सफेद सागर’ वेब सीरिजमध्ये करण्यात आला आहे. मात्र, माजी हवाई दलप्रमुख बी. एस. धनोआ यांच्या मते हा दावा योग्य नाही. काही लोकांना GPS मध्ये जाणीवपूर्वक फेरफार करण्यात आल्याचे वाटते. मात्र, धनोआ यांचा त्यावर विश्वास नाही.

त्यांनी यामागे दोन तांत्रिक कारणे सांगितली. २ मे २००० पूर्वी GPS मध्ये ‘Selective Availability’ नावाची यंत्रणा होती. या यंत्रणेनुसार, जगभरातील नागरिकांसाठी जीपीएसची अचूकता सुमारे १०० मीटरपर्यंत मर्यादित होती. याशिवाय, WGS 84 आणि Everest Spheroid या पृथ्वीवरील ठिकाणांचे अचूक लोकेशन निश्चित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन वेगवेगळ्या संदर्भ प्रणाली आहेत. या दोन्ही प्रणालींमधील फरकामुळेही जीपीएसच्या लोकेशनमध्ये काही प्रमाणात ठराविक दिशा निश्चित करण्यात चूक निर्माण होत होती, त्यामुळे ही चूक अमेरिकेने मुद्दाम केली होती असे मानण्याचे कारण नसल्याचे धनोआ सांगतात.

भारतीय नकाशे Everest Spheroid या संदर्भ प्रणालीवर आधारित होते. मात्र, हँडहेल्ड जीपीएस उपकरणांमध्ये WGS 84 संदर्भ प्रणाली वापरली जात होती, त्यामुळे भारतीय नकाशांवरील लोकेशन जीपीएसमध्ये अचूक दिसण्यासाठी हा फरक दुरुस्त करावा लागत होता.

मात्र, मिग-२१ आणि मिग-२३ बीएन विमानांमध्ये बसवलेल्या Time Arc-6 GPS मध्ये भारतीय एव्हरेस्टच्या निर्देशांकांवरून (Indian Everest Coordinates) उड्डाण करणे निवडता येत असे. लष्कराकडून लक्ष्यांची माहिती Mil Grid म्हणजेच भारतीय एव्हरेस्टच्या निर्देशांकांत दिली जायची, त्यामुळे वैमानिक आधी १:५०,००० प्रमाणातील नकाशावर लक्ष्याचे लोकेशन निश्चित करायचे आणि त्यानंतर मोजपट्टीच्या मदतीने त्याचे अचूक अक्षांश-रेखांश निश्चित केले जायचे.