अनिल कांबळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विवाहानंतर अनेक महिलांना बाळ होत नाही. त्यासाठी वेगवेगळी कारणे असतात. यावर पर्याय म्हणून बाळ दत्तक घेतले जाते. पण ही प्रक्रिया किचकट व वेळखाऊ आहे. गरजू दाम्पत्य थांबण्यास तयार नसल्याने गैरमार्गाने बाळ प्राप्त करण्याचे प्रयत्न केले जातात. अशा दाम्पत्यांचा शोध घेऊन त्यांना नवजात बाळ विक्री करणाऱ्या टोळ्या सध्या मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्या आहेत. नागपूर हे या टोळ्यांचे मुख्य केंद्रस्थान म्हणून पुढे आले आहे. ८ ते १० राज्यांत टोळ्या कार्यरत असून त्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.

कोण करतात नवजात बाळ विक्री?

अनैतिक संबंध, विवाहबाह्य संबंध आणि प्रेमसंबंधातून गर्भवती झाल्यानंतर तरुणी गर्भपात करण्यासाठी रुग्णालयात धाव घेतात. अनेकदा डॉक्टर्स महिलेच्या जिवाला धोका असल्याचे सांंगून गर्भपातास नकार देतात. अशा प्रसंगात महिला बाळाला जन्म देतात. अशा महिलांना हेरून त्यांना पैशाचे आमिष दाखवले जाते. तसेच अनैतिक संबधातून महिला किंवा तरुणी गर्भवती झाल्यास तिचे बाळ नातेवाईकच परस्पर विक्री करीत असल्याचेही काही घटनांमध्ये आढळून आले आहे.

टोळीचे काम कसे चालते?

बाळ विक्री करणाऱ्या टोळीची एक साखळी आहे. टोळीप्रमुख उपराजधानीतील काही रुग्णालयांतील डॉक्टर, परिचारिका आणि प्रयोगशाळा सहायकांना हाताशी धरतात. तसेच काही वेळा तथाकथित महिला सामाजिक कार्यकर्त्या , तोतया डॉक्टर, देहव्यापारात सक्रिय महिला, तरुणींची एक फळी कार्यरत असते. या महिला अनैतिक संबंधातून गर्भवती झालेल्या किंवा बाळ नको असणाऱ्या महिलांचा शोध घेतात. गभर्वती अविवाहित तरुणी असेल तर तिला २ ते ५ लाख रुपयाचे आमिष दाखवून बाळ गर्भात असतानाच त्याच्या विक्रीचा व्यवहार करतात. दुसरीकडे, नको असलेले बाळ जन्मास आल्यास रुग्णालय बनावट नावाने गर्भवती महिलेची नोंद करून बाळ जन्मास येताच विक्री करतात.

विश्लेषण: कुत्र्यांच्या ‘या’ ११ प्रजातींवर गुरुग्राममध्ये बंदी! नेमकं घडलंय काय? का होतोय या कुत्र्यांना विरोध?

परराज्यात बाळ विक्री करण्याची कारणे कोणती?

महाराष्ट्रातील बाळविक्री करणाऱ्या टोळ्या अन्य राज्यात बाळविक्रीला प्राधान्य देतात. कारण बाळ खरेदी करणारे अन्य राज्यातील दाम्पत्य बाळासाठी ७ ते १५ लाख रुपये द्यायला सहज तयार होतात. परराज्यात बाळ विकल्याने बाळाचे आई-वडील आणि नातेवाईकांचाही संपर्क तुटतो. राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात बाळ विकल्यास पोलीस, सामाजिक संघटना यांच्यामार्फत बिंग फुटण्याची भीती असते. त्यामुळे महाराष्ट्र सोडून अन्य राज्यांना प्राधान्य दिले जात असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये तेलंगणा, गुजरात, मध्य प्रदेश, दिल्ली, राजस्थान, छत्तीसगड, केरळ, कर्नाटक, ओडिशा या राज्यात बाळ विक्रीस प्राधान्य देण्यात येते.

बाळाची बोली का लावली जाते?

अनेक दाम्पत्ये मुलासाठी आग्रही असतात. काही बोगस अनाथालय किंवा काही स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी मुलगा अनाथालयात दाखल झाल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता थेट बाळ विक्री करणाऱ्या टोळीशी संपर्क साधतात. नवजात बाळ मुलगा असल्यास खरेदीदार दाम्पत्यांचा विशेष रस असतो. त्याचा गैरफायदा टोळी घेते. मुलासाठी काही दाम्पत्यांमध्ये चक्क बोली लावली जाते. जो जास्त पैसे देण्यास तयार असेल त्यांना मुलाचा ताबा दिला जातो.

टोळ्यांमध्ये रुग्णालयांचा सहभाग आहे काय?

रुग्णालयात गर्भपातासाठी आलेल्या कुमारी माता किंवा बाळ नको असलेल्या दाम्पत्याची माहिती, पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक बाळ विकणाऱ्या टोळीला दिला जातो. या टोळीतील सदस्य त्या महिलेशी संपर्क साधून बाळाला जन्म देण्याकरिता तिला तयार करतात. त्यासाठी तिला पैसे आणि सोन्याच्या दागिन्यांचे आमिषही दाखवण्यात येते.

विश्लेषण : DNA म्हणजे काय, कोणी लावला होता शोध? श्रद्धा हत्याकांडाच्या तपासात कशी निभवणार महत्त्वपूर्ण भूमिका

बाळ दत्तक घेण्याची प्रक्रिया किचकट आहे का?

केंद्र सरकारने मूल दत्तक घेण्यासाठी केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण म्हणजेच सीएआरएची (कारा) स्थापना केली आहे. या संस्थेद्वारे अनाथ किंवा बेवारस सापडलेल्या मुलांना दत्तक दिले जाते. परंतु, ही प्रक्रिया किचकट स्वरूपाची आहे. बाळ दत्तक घेताना अनेक प्रकारची कागदपत्रे, संपत्ती विवरण व अनेक अटी, शर्तींची पूर्तता करावी लागते. अर्ज केल्यानंतर सरासरी २ ते ३ वर्षे बाळ मिळत नाही. एवढी प्रतीक्षा करण्याची दाम्पत्याची तयारी नसते. त्यामुळे धनाढ्य दाम्पत्य बेकायदेशीर मार्गाने बाळ मिळवतात.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New born babies business nagpur crime news gang print exp pmw
First published on: 27-11-2022 at 11:06 IST