COVID-19 Returns With New Variant BA.3.2 : सहा वर्षांपूर्वी आलेल्या करोना महामारीने संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला होता. या विषाणूमुळे लाखो लोकांना आपले प्राण गमावावे लागले होते. करोनाचा सामना करण्यासाठी अनेक देशांनी टाळेबंदीची घोषणाही केली होती. त्यामध्ये कित्येकांना बेरोजगारीचे संकट ओढवले होते. यादरम्यान करोनानंतर आता आणखी एका नव्या महामारीचे संकट जगावर घोंगावत आहे. अमेरिकेसह तब्बल २२ देशांत या विषाणूने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणांमुळे जगभरातील सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांची चिंता वाढवली. या पार्श्वभूमीवर करोनाच्या नव्या सुपर व्हेरिएंट नेमका आहे तरी काय? त्याविषयीचा हा आढावा…
जगावर पुन्हा करोना महामारीचे संकट?
अमेरिकेत सध्या करोनाचा एक नवीन विषाणू वेगाने पसरत असून, त्याला ‘BA.3.2’ असे नाव देण्यात आले आहे. अमेरिकेच्या ‘सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन’ या संस्थेने आपल्या साप्ताहिक अहवालात या विषाणूच्या वाढत्या धोक्याची पुष्टी केली आहे. अहवालानुसार, हा विषाणू अमेरिकेतील निम्म्या राज्यांमध्ये, तसेच इतर २२ देशांमध्ये आढळून आला आहे. BA.3.2 विषाणूचे पहिले प्रकरण नोव्हेंबर २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेत आढळून आले होते. त्यानंतर २०२५ मध्ये त्याचा प्रसार वेगाने वाढू लागला. संशोधकांनी या विषाणूला ‘सिकाडा’ असे टोपणनाव दिले आहे, जे एका कीटकावर आधारित आहे. हा विषाणू प्रत्यक्षात समोर येण्यापूर्वी दीर्घकाळ ‘सुप्त अवस्थेत’ भूमिगत राहिला असावा, असा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे या विषाणूमध्ये तब्बल ७० ते ७५ उत्परिवर्तने (म्युटेशन्स) आढळून आली आहेत. इतर कोणत्याही विषाणूंच्या तुलनेत ही संख्या खूप जास्त असल्याने तो अत्यंत संसर्गजन्य मानला जात आहे.
करोनाचा नवा विषाणू नेमका काा?
जगभरात करोनाचे नवनवीन प्रकार समोर येत असतानाच आता शास्त्रज्ञांनी ‘BA.3.2’ या विषाणूवर लक्ष केंद्रित केले आहे. हा व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या जुन्या ‘BA.3’ वंशावळीतील असल्याचे सांगितले जात आहे. २०२२ च्या सुरुवातीपासून या विषाणूचा मानवी आरोग्यावर फारसा परिणाम होत नव्हता. आता मात्र त्याने डोके वर काढले असून अनेकांना विळखा घालण्यास सुरुवात केली आहे. संशोधकांच्या मते, हा विषाणू सध्या अमेरिकेत पसरलेल्या ‘JN.1’ या व्हेरिएंटच्या वंशावळीपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. प्रदीर्घ काळ सुप्त राहिल्यानंतर तो पुन्हा सक्रिय झाल्याने त्याला ‘लाँग-ब्राँच डिसेंडंट’ असे संबोधण्यात आले आहे.
अमेरिकेतील कोणत्या राज्यांत आढळले रुग्ण?
अमेरिकेत चार प्रवाशांच्या नमुन्यांमध्ये आणि पाच रुग्णांच्या क्लिनिकल अहवालात BA.3.2 हा विषाणू आढळून आला आहे. तसेच, २० हून अधिक राज्यांमधील सांडपाण्याच्या १३२ नमुन्यांमध्ये त्याचे अंश सापडल्याचे ‘सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन’ या संस्थेने म्हटले आहे. नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ दरम्यान गोळा केलेल्या नमुन्यांनुसार, डेन्मार्कमध्ये ३० टक्के, जर्मनी आणि नेदरलँड्समध्ये या विषाणूचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. हा विषाणू अमेरिकेतील कॅलिफोर्निया, फ्लोरिडा, न्यूयॉर्क, टेक्सास, न्यू जर्सी, पेनसिल्व्हेनिया, व्हर्जिनिया यांसह अनेक राज्यांमध्ये आढळला आहे. एकूण २० हून अधिक राज्यांमध्ये त्याचा शोध लागला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, अमेरिकन प्रशासनाने तेथील नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे.
करोनाच्या नव्या विषाणूची लक्षणे कोणती?
जगभरात वेगाने पसरणाऱ्या करोनाच्या ‘BA.3.2’ या नव्या विषाणूने आरोग्य तज्ज्ञांची चिंता वाढवली आहे. या विषाणूची लक्षणे आणि त्यावर लसींचा होणारा परिणामांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, घशातील तीव्र खवखव हे ‘BA.3.2’ विषाणूचे प्रमुख लक्षण आहे. त्याशिवाय नाक बंद होणे किंवा सर्दी, सतत खोकला, ताप किंवा थंडी वाजणे, तोंडाची चव जाणे, थकवा, स्नायूचे दुखणे, डोकेदुखी, मळमळ आणि उलट्या होणे, जुलाब लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अशीही लक्षणे दिसून येतात. या विषाणूवर लसीकरण कितपत प्रभावी ठरेल, हा सध्या सर्वांत मोठा प्रश्न आहे. काही संशोधकांच्या मते, सुदैवाने सध्या प्रचलित असलेल्या इतर विषाणूंपेक्षा ‘BA.3.2’ हा अधिक घातक किंवा जीवघेणा असल्याचे कोणतेही पुरावे अद्याप मिळालेले नाहीत. मात्र, करोनाच्या जुन्या प्रकारापेक्षा या विषाणूवर होणारा लसीचा परिणाम तुलनेने कमी असू शकतो.
हेही वाचा : Cognitive Shuffling : मेंदूला शांत करून झोप आणणारे हे खास तंत्र तुम्हाला माहितीये का? संशोधन काय सांगते?
नव्या विषाणूबाबत तज्ज्ञांचे मत काय?
सध्या अमेरिकेत BA.3.2 चे प्रमाण कमी असले तरी आरोग्य तज्ज्ञांनी तेथील नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. जॉन्स हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे विषाणूशास्त्रज्ञ अँड्र्यू पेकोश यांच्या मते, आतापर्यंत या विषाणूचा मोठा धोका असल्याचे दिसून आलेले नाही. परंतु, सध्याची काही प्रकरणे पाहता, भविष्यात तो अधिक वेगाने पसरण्याची किंवा गंभीर आजार निर्माण करण्याची शक्यता वाढू शकते. या नव्या विषाणूमुळे उन्हाळ्यात करोनाची नवी लाट येईल का? याबाबतही डॉ. हॉपकिन्स यांनी भाष्य केले आहे. उन्हाळ्यात करोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू शकते; मात्र तसे होईलच याची सध्या खात्री देता येत नाही. विषाणू सतत स्वतःमध्ये बदल करत असल्याने आगामी काही महिने अत्यंत महत्त्वाचे ठरू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
