भारताचा प्राप्तिकर कायदा १९६१ हा गेली सहा दशके देशाच्या थेट कर व्यवस्थेचा कणा राहिला आहे. तथापि, सततच्या दुरुस्त्या, अपवाद, स्पष्टीकरणे, परिपत्रके व न्यायालयीन निर्णय यांमुळे हा कायदा हळूहळू अत्यंत गुंतागुंतीचा बनत गेला. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नवीन प्राप्तिकर कायदा २०२५ सादर करून १ एप्रिल २०२६ पासून (आकलन वर्ष २०२६-२७) अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. सीए आणि कर सल्लागारांच्या दृष्टीने हा बदल केवळ कायदेशीर नव्हे, तर कर अनुपालनाच्या संपूर्ण तत्त्वज्ञानात झालेला मूलभूत बदल मानावा लागेल.
या नव्या कायद्यामुळे नेमके काय बदल झाले आणि त्याचा नागरिकांवर काय परिणाम होणार हे जाणून घेऊ
१. कायद्याची रचना : ‘कॉम्प्लेक्स कॉम्प्लायन्स’कडून ‘क्लीन लॉ’कडे
१९६१ च्या कायद्यात कलमांची रचना अनेक ठिकाणी तुकड्या-तुकड्यांत विखुरलेली होती. एकाच व्यवहाराशी संबंधित तरतुदी वेगवेगळ्या कलमांत सापडत असल्याने, अर्थ लावताना संभ्रम निर्माण होत असे. नवीन प्राप्तिकर कायदा २०२५ मध्ये:
• संबंधित तरतुदी एकत्रित मांडण्यात आल्या आहेत
• अनावश्यक क्रॉस-रेफरन्स कमी करण्यात आले आहेत
• भाषाशैली तुलनेने सरळ व स्पष्ट ठेवण्यात आली आहे
यामुळे सीए व्यावसायिकांसाठी कायदेशीर अर्थ लावणे (interpretation) सोपे होणार असले, तरी सुरुवातीच्या काळात जुने निर्णय, न्यायनिवाडे आणि नवीन तरतुदी यांचा तौलनिक अभ्यास करणे अपरिहार्य ठरेल.
२. प्री-फिल्ड प्राप्तिकर विवरणपत्र : कर सल्लागारांची भूमिका बदलणार?
नवीन कायद्याचा केंद्रबिंदू म्हणजे तंत्रज्ञानाधारित प्री-फिल्ड प्राप्तिकर विवरणपत्रे. AIS, TIS, 26AS, बँका, नियोक्ता, म्युच्युअल फंड, विमा कंपन्या यांच्याकडून येणाऱ्या माहितीत मोठ्या प्रमाणात अचूकता अपेक्षित आहे.
सीएंच्या दृष्टिकोनातून याचे दोन महत्त्वाचे परिणाम होतील:
• साध्या पगारदार करदात्यांसाठी डेटा एंट्रीचे काम कमी होईल
• परंतु डेटा व्हॅलिडेशन, रीकन्सिलिएशन आणि रिस्क अॅनालिसिस याचे महत्त्व वाढेल
म्हणजेच, सीएंची भूमिका “फॉर्म भरणारा” न राहता “कर जोखीम व्यवस्थापक (Tax Risk Manager)” अशी अधिक सल्लागारप्रधान होईल.
३. जबाबदारीचे तत्त्व : कायदा सोपा, पण दायित्व कठोर
नवीन कायदा कर भरणे सुलभ करतो, मात्र जबाबदारी करदात्यावरच निश्चित करतो, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. प्री-फिल्ड डेटा चुकीचा असल्यासही “माहिती उपलब्ध होती” हा युक्तिवाद विभागाकडून मांडला जाऊ शकतो.
सीएंनी ग्राहकांना पुढील बाबी स्पष्ट करणे अत्यावश्यक ठरेल:
• प्री-फिल्ड म्हणजे अंतिम सत्य नाही
• भांडवली नफा, परदेशी उत्पन्न, व्याज, भाडे उत्पन्न यामध्ये विशेष दक्षता आवश्यक
• चुकीच्या रिटर्नसाठी दंड व व्याजाची जोखीम कायम
४. तपासणी पद्धतीत बदल : सर्वसाधारण छाननीचा (‘Routine Scrutiny’) शेवट?
नवीन कायद्यात तपासणी प्रक्रिया अधिक डेटा-ड्रिव्हन व एक्सेप्शन-बेस्ड होण्याची चिन्हे स्पष्ट आहेत. सर्वसाधारण प्रकरणांऐवजी:
• डेटामधील विसंगती
• असामान्य व्यवहार
• प्रोफाइलला न साजेशी आर्थिक हालचाल
यावर आधारित तपासणी होईल. सीएंसाठी याचा अर्थ असा की प्रोॲक्टिव्ह कर नियोजन आणि योग्य डॉक्युमेंटेशन अधिक महत्त्वाचे ठरेल.
५. वाद-विवाद व अपील : संधी की आव्हान?
नवीन कायद्याचा उद्देश वाद कमी करणे असला, तरी:
• सुरुवातीच्या काही वर्षांत व्याख्यात्मक वाद वाढण्याची शक्यता
• जुन्या निर्णयांचा नवीन कायद्याशी संबंध लावण्याचे आव्हान
• अपील व लिटिगेशनमध्ये नवीन युक्तिवादांची गरज
सीए आणि कर वकीलांसाठी हा काळ नवीन कौशल्ये आत्मसात करण्याचा ठरेल.
६. कर सल्लागार व्यवसायावर दीर्घकालीन परिणाम
दीर्घकालीन दृष्टीने पाहता:
• केवळ प्राप्तिकर विवरणपत्र फायलिंगवर आधारित प्रॅक्टिस कमी होईल
• सल्लागार सेवा, कर नियोजन, अनुपालन पुनरावलोकन यांना मागणी वाढेल
• तंत्रज्ञान समजून घेणाऱ्या सीएंना प्राधान्य मिळेल
कर संस्कृती बदलणारा कायदा
- नवीन प्राप्तिकर कायदा २०२५ हा कर दरांपेक्षा कर संस्कृती बदलणारा कायदा आहे. सीए आणि कर सल्लागारांसाठी हा बदल आव्हानात्मक असला, तरी योग्य तयारी, सतत अभ्यास आणि तंत्रज्ञान स्वीकारल्यास व्यावसायिक संधींनी भरलेला ठरू शकतो.
- या कायद्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सीए समुदायाची भूमिका केवळ अनुपालन करणारी नव्हे, तर करदाते आणि शासन यांच्यातील विश्वासाचा सेतू बनणारी असेल.

